नुकताच साजरा झालेला विजयादशमी ऊर्फ दसऱ्याचा सण भारतभरातला एक महत्त्वाचा सण. या सणाचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक कथा आहेत. रामायणकथेनुसार विजयादशमीचा सण हा रामाचा रावणावरील, म्हणजे सुष्ट प्रवृत्तींचा दुष्ट प्रवृत्तींवरील विजय साजरा करणारा दिवस आहे. त्यानुसार पुढे रावणदहनाची प्रथा सुरू झाली. तर महाभारत कथेनुसार बारा वर्षांचा वनवास व एक वर्षांचा अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी शमीच्या झाडावर लपवलेली शस्त्रे काढून त्यांचे पूजन केले व ते न्यायासाठी शस्त्रसज्ज झाले. त्यानुसार पुढे शमीपूजन, शस्त्रपूजन या प्रथा सुरू झाल्या. इतरही अनेक कथा आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आम्हीही सर्वाप्रमाणेच हा सण आनंदात साजरा करतो आणि आपला आनंद इतरांपर्यंत पोहोचवायचाही प्रयत्न मनापासून करतो.

प्रचलित सुसंस्कृततेच्या कल्पनांनुसार आपण जिंकण्यासाठी कोणाची हत्या करण्याची गरज नसते. विजय, पराजय, न्याय, शस्त्रे या सर्व संकल्पनांची पारंपरिक झूल उतरलेली आहे आणि त्यांना कालसुसंगत असे आधुनिक आयाम प्राप्त झाले आहेत. त्यानुसार ‘शस्त्र’ म्हटल्यावर पारंपरिक व आधुनिक अशी युद्धसाधने डोळ्यांसमोर येतात, तसेच जीवन जगण्यासाठी उपयुक्त अशी इतर साधनेही सूचित होतात. तुकाराम महाराज पारमार्थिक संदर्भात म्हणाले, ‘‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग।’’ पण आजचे शहरी जीवन बघितले तर हातातोंडाची गाठ पडण्यासाठी सर्वाचे दैनंदिन जीवनच युद्धसदृश झाले आहे. जगण्यासाठी उठल्यापासून झोपेपर्यंत केवळ संघर्षच करावा लागतो. अशा धकाधकीच्या जीवनाची रेलगाडी चालवणे हे कोणा एकाचे काम नव्हे, त्यामध्ये असंख्यांचे असंख्य हात साहाय्यभूत होत असतात, ते आपल्या जीवनसाधनांची निगा राखत असतात.

दसऱ्याला या आधुनिक शस्त्रांची व विशेषत: शस्त्रे जोपासणाऱ्यांची पूजा करायला हवी, असे आम्हा सर्व समविचारी लोकांना वाटले.

‘‘म्हणजे तुम्ही असं सुचवता आहात का की आपण आपल्या वाहनांची किंवा इतर साधनांची पूजा करायची? ती तर लोक करतातच ना! दसऱ्याला वाहन खरेदी केली जाते; ज्यांच्याकडे वाहने असतात ते त्या वाहनांची, लोहाची पूजा करतात. त्यात नवीन असं काय आहे?’’

‘‘हे चांगलंच आहे आणि आपल्याला याचाच पुढे विस्तार करायचा आहे. आपल्या सार्वजनिक वाहतूक साधनांचाही विचार व्हायला हवा आणि साधनांचाच नाही, तर त्यांची निगराणी राखणाऱ्यांचा सुद्धा.’’

‘‘म्हणजे नेमका कोणाचा?’’

‘‘महानगरांमध्ये बहुतांशी लोक सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतात. आपणही कुठे अगदी लवकर पोहोचायचं असेल, तर लोकल ट्रेनने प्रवास करतो. स्टेशन्सवरच्या प्रचंड गर्दीत तिकीट देणारे किंवा मोटरमन, गार्ड यांच्याकडे आपण कधी बघतही नाही. तिकीट तपासनीस आपल्याला थांबवतात, म्हणून त्यांचे तोंड बघावे लागते. अन्यथा कितीतरी वेळा आपण त्यांच्या आजूबाजूने, क्वचित त्यांना धक्का देऊनही गाडी पकडण्यासाठी पळत सुटतो. आपल्यासमोर दिसणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांची ही कथा, तर रुळांची देखभाल करणारे गँगमन, सिग्नलमन यांच्याबद्दल तर विचारायलाच नको. त्यांची दखल आपण फक्त बातम्यांमधून घेतो. ‘रेल्वेच्या धडकेत दोन गँगमन ठार’ किंवा ‘गँगमनच्या वा मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला, हजारोंचे प्राण वाचले.’ चहाबरोबर बिस्किटाचा तुकडा मोडावा इतक्या सहजतेने आपण या बातम्या वाचून विसरूनही जातो.’’

‘‘मग आपण काय करायला हवं? अपघाती मृत्यू कुणाला सांगून येतो का? आपल्यालाही येऊ शकतो. जे चांगली कामगिरी करतात त्यांना सरकार बक्षीस देते. आणखी काय?’’

‘‘आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल आपली हीच भावना असेल का?’’

एक अस्वस्थ शांतता.

होय, हेच खरं आहे. गँगमन, सिग्नलमन यांच्यासारखी माणसं आपल्या खिजगणतीतही नसतात. पण त्यांच्या व इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जिवावरच बहुसंख्यांचा दररोजचा प्रवास निर्धोक होत असतो. म्हणूनच त्यांची व त्यांच्या कामाची पावती त्यांना देणे, हे आपले कर्तव्य ठरते. आम्ही या कर्तव्याला प्रेमाची जोड देऊन दसऱ्याचा सण त्यांच्याबरोबर साजरा करायचं ठरवलं.

दसऱ्याच्या दिवशी सकाळी आम्ही स्टेशनमास्तरांच्या कार्यालयात जाऊन त्यांना फुलं, मिठाई व भेटकार्डासहित दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या सर्व कर्मचारी वर्गाला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. साधारणत: अकरा प्रकारचे कर्मचारी रेल्वेच्या कामाशी निगडित असतात. त्या सर्वाना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन त्यांचे तोंड गोड करतो, त्यांच्या कामाप्रति कृतज्ञता व्यक्त करतो.

सुरुवातीच्या काळात एक मजेशीर अनुभव आला. आम्ही सात-आठ जण जेव्हा स्टेशनमास्तरांच्या केबिनमध्ये गेलो, तेव्हा ते संशयी नजरेने आमच्याकडे बघून अंदाज घेत आमच्याशी बोलत होते. पण संभाषणातून आमच्या येण्याचा उद्देश समजल्यावर त्यांच्या मनावरचा ताण निवळला, त्यांनी मोकळेपणे हसून आमच्याशी हस्तांदोलन केले व आमच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

यावर्षी या कार्यक्रमाचा अजून विस्तार करायचं आम्ही ठरवलं. दसऱ्याच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केवळ आम्ही व रेल्वे कर्मचारी यांच्यापुरती न ठेवता त्या दिवशी रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनाही या उपक्रमात सामील करून घेण्याची योजना आखली. त्यासाठी एका मध्यमवयीन स्त्रीच्या आवाजात पुढील आशयाची ध्वनिफीत ध्वनिमुद्रित करून घेतली – ‘मी आई, बहीण, मावशी, काकी या नात्याने सर्वाशी निगडित आहे. आजच्या सणाच्या दिवशी माझ्याकडे माझे सर्व नातेवाईक सुखरूप पोहोचतात ते केवळ तुमच्या मेहनतीमुळे. त्यासाठी तुम्हाला, तुमच्यासारख्या लोहपूजकांना दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा.’ ही ध्वनिफीत भारतातील अनेक स्थानकांवर त्या त्या राज्यभाषेत वाजवण्याची परवानगी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळवली व कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. आम्हाला वाटते, रेल्वे कर्मचाऱ्यांप्रति आपल्या सर्वाची हीच भावना असेल.

आपल्या दैनंदिन जीवनातील शस्त्रांच्या पूजकांना आम्ही आमच्या प्रेमशस्त्राने पूजले, हीच आमची विजयादशमी!
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com