महावीरांनी जैन धर्म नव्याने प्रस्थापित करताना अनेक क्रांतिकारी बदल केले. उदाहरणार्थ, जातिव्यवस्था नाकारुन समानतेवर आधारित समाजाची रचना केली, स्त्रियांना मोक्षाचे व संघाचे कर खुले केले, इ. एकविसाव्या शतकात महावीरांचे अनुकरण करायचे ठरवल्यावर आम्हाला समानतेच्या तत्त्वाने भुरळ घातली व कुठेतरी सुप्त इच्छा अशीही होती की आपण काहीतरी क्रांतिकारक करावे.
विषमता कुठे कुठे आहे याचा शोध घेताना लक्षात आले की समाजाच्या एका घटकाला आपण शतकानुशतके केवळ विषमतेचीच वागणूक दिली असे नाही, तर त्यांचे मनुष्य म्हणून अस्तित्त्वही नाकारले. हा घटक म्हणजे, तृतीयपंथी.
‘‘तृतीयपंथी? म्हणजे हिजडेच ना? आता तुम्ही आम्हा सर्वांना त्यांच्या दावणीला बांधणार?’’
‘‘अहो, दावणीला तर आपण बांधलंय त्यांना, अमानुषतेच्या दावणीला! आता त्यांना त्यातून मुक्त करायचं, मुख्य प्रवाहात आणायचं.’’
‘‘पण त्यांची काही लायकी आहे का? कुचकामी लोक ते! सिग्नलवर गाडी थांबली की टाळया वाजवून भीक मागायची, कुठल्या घरी बाळाचा जन्म झाला की तिथे जाऊन पसे वसूल करायचे, नाही दिले तर शिव्याशाप दयायचे, आणि या सर्वांवर कळस म्हणजे शरीरविक्रय! हीच त्यांची जिंदगी. आम्ही तर घरी सवार्ंना सांगून ठेवले आहे, त्यांची सावली देखील अंगावर पडू द्यायची नाही. आणि तुम्ही त्यांना मुख्य प्रवाहात आणणार म्हणे!’’
‘‘ते असं आयुष्य जगतात हा त्यांचा दोष आहे का? ते तृतीयपंथी आहेत कारण त्यांचे शारीरिक िलग व मानसिक िलग यात निसर्गत:च दुर्दैवाने गल्लत झाली आहे. आपण सुदैवी की निसर्गाने आपल्यात ही गल्लत केली नाही. पण निसर्गाने जे केले त्याची एवढी भयानक शिक्षा? त्यांच्या खडतर आयुष्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर ‘शीर्षक? जो आपको सूझे!’ हे आमच्या एका भगिनीने लिहीलेले पुस्तक वाचा. तुमचे त्यांच्याविषयीचे अनेक गरसमज दूर होतील. तुम्हाला माहित आहे का, आपल्या राज्यघटनेत ‘व्यक्ती’ या शब्दाची व्याख्या स्त्री किंवा पुरुष अशी दिली आहे. जो या दोन्ही गटात बसत नाही, त्याचे काय? पहा, तृतीयपंथीयांना ते पुरुष किंवा स्त्री नसल्यामुळे कुठलेच घटनादत्त अधिकार नाहीत, त्यांना शिक्षण नाही, त्यामुळे कमाईच्या संधी कमी, बॅँकेत खातं उघडणं, पासपोर्ट मिळवणं किंवा अगदी किमान सभ्यतेचं आयुष्य जगणं त्यांना आपण अशक्य करुन टाकलं आहे. त्यांची हक्काची लढाई सुरुच आहे; पण या परिस्थितीत भीक मागणं व शरीरविक्रय करणं यापेक्षा त्यांच्याकडे उपजीविकेचं काय साधन आहे?’’
दीर्घ काळ शातंता..
आमच्या समविचारी स्न्ोह्यंनी असा निश्चय केला की महावीर जयंतीच्या दिवशी तृतीयपंथीयांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करायचे. यामध्ये तरुण मुलामुलींचा पुढाकार मोठा होता. तृतीयपंथीयांशी संपर्क साधणं, त्यांना कार्यक्रमाची रुपरेषा सांगणं, त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणं अशा सर्व दिव्यांतून पार पडून नऊ-दहा तृतीयपंथीयांपासून सुरु झालेला कार्यक्रम आज दहा वर्षांंनंतर वेगळयाच उंचीला पोहोचला आहे. गेल्या दहा बारा वर्षांंत आमचे व तृतीयपंथीयांचे अनोखे स्नेहबंध जुळले आहेत. ही आपल्याला दाखवलेली दया नाही तर आपल्यावर केलेले निरपेक्ष प्रेमाचे सिंचन आहे हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. भारताच्या अनेक भागांतून तृतीयपंथी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावतात. आपली कला-नृत्य, मेहंदी काढणे, मेकअप करणे, वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवणे, इ. सादर करतात. कार्यक्रमाच्या एक आठवडा आधीपासून आम्हा मित्रमंडळींच्या घरी आम्ही त्यांना चहापानाला बोलवतो. त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी चहापानाला बोलवणे हा या प्रवासातला अगदी गहिवरुन टाकणारा क्षण होता. आता हे अगदी सहजपणे व नियमित सुरु झाले आहे. आमच्या इतर कार्यक्रमांमध्येही ते आवर्जून हजेरी लावतात. लग्नप्रसंगी प्रेमाच्या अधिकाराने येतात. आपणही इतरांसारखी प्रतिष्ठेची कमाई केली पाहिजे, हा विचार त्यांच्यात झिरपू लागला आहे. त्यांच्यासाठी उपजीविकेच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न आमची स्नेही मंडळीही करतच आहेत.
तृतीयपंथीयांना अनुकूल कायदे आज होत आहेत. त्यांच्यात शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. पण त्यांना सामाजिक मान्यता केवळ कायद्याने मिळणार नाही, त्यासाठी आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. आपल्या मनातील त्यांच्याबद्दलची घृणा काढून टाकून त्यांच्याकडे एकदा प्रेमाने बघण्याची गरज आहे. पुरुषाची ताकद व स्त्रीचे मार्दव असा अनोखा संगम असणाऱ्या तृतीयपंथीयांना समानेतेने वागवण्याची प्रेरणा हा आम्हाला महावीरांकडून लाभलेला संदेश आहे.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com