अकरा दिवसांचा मुक्काम आटोपून बाप्पा परतीच्या प्रवासाला सज्ज झाले आणि भक्तांनी ‘पुनरागमनाय’ असे म्हणून जड अंत:करणाने त्यांचे विसर्जन केले. त्यानंतर दरवर्षीच काही काळ सर्वाना चुकल्याचुकल्या-सारखे वाटते, पण अल्पावधीत सर्व व्यवहार पूर्वपदावर येतात. पुढील वर्षीच्या उत्सवाची चाहूल लागेपर्यंत सर्वाना त्याबाबतीत विश्रांतीच असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्हाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या आवाहनाचे कोडेच आहे. बाप्पा आपल्या मनातून कधी विसर्जित होत नाहीत; किंबहुना होऊ  नयेत. मग पुढच्या वर्षी लवकर कोणी यायचे? मूर्तीनी? प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेना म्हणून स्नेह्यांना गाठले; तर ते आमच्यावरच  डाफरले, ‘‘उगाच प्रत्येक गोष्टीचा कीस काढू नका. सुरू झालेला उत्सव केव्हातरी संपणारच; पण तो कायमचा संपत नाही, दरवर्षी येतच राहतो. त्यासाठी ‘पुनरागमनाय’. यात एवढं कोडं पडण्यासारखं काय आहे?’’

एवढय़ावर न थांबता त्यांनी पुढे जाऊन आम्हाला करकचून चिमटा काढला, ‘‘तुम्ही वर्षभरात एवढे कार्यक्रम करत असता, कधी रिक्षावाल्यांसाठी, कधी तृतीयपंथीयांसाठी वगैरे; प्रत्येक कार्यक्रम वर्षांतून एकदाच येतो ना? मग तुम्हीही कार्यक्रम संपल्यानंतर ‘पुनरागमनाय’ या भावनेनेच पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागता की नाही?’’ त्यांनी अगदी विजयी मुद्रेने आमच्याकडे पाहिले.

आता अंतर्मुख होण्याची वेळ आमची होती आणि विशेषत: त्यांच्या शेवटच्या वाक्याने विचारांचे कल्लोळ मनात उठले. सर्वात प्रथम मनात विचार आला की आपले कार्यक्रम गणेशोत्सवासारखे आहेत? तेवढा दिवस साजरा झाला की बात खतम! म्हणजे समजा संक्रांतीच्या दिवशी रिक्षावाल्यांना तिळगूळ द्यायचा कार्यक्रम आहे. दिवसभरात जमेल तेवढय़ा रिक्षावाल्यांना तिळगूळ देऊन झाला की पुढच्या संक्रांतीपर्यंत त्यांच्याशी भांडायला, सुट्टय़ा पैश्यांवरून हुज्जत घालायला मोकळे. ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ हे एका दिवसाचं कर्मकांड आणि ‘पुनरागमनाय’ हे पुढील वर्षीच्या वायद्याचं कर्मकांड. तेच तृतीयपंथीयांचं. महावीर जयंतीला एकदा त्यांचा कार्यक्रम उरकला की पुढच्या महावीर जयंतीपर्यंत त्यांना हुडूतहुडूत करायला आपण मोकळे! छे! आपले प्रेमाचे प्रयोग म्हणजे असं एका दिवसाचं कर्मकांड आहे का? हा विचार मनात आल्यावर लख्ख प्रकाश पडला. मनात काय ठुसठुसत होते त्याचाही छडा लागला.

‘पुनरागमानाय’ असे म्हणून एखाद्या गोष्टीतून आपण केवळ भौतिकदृष्टय़ाच नव्हे तर मानसिकदृष्टय़ाही सोडवणूक करून घेत असतो. पण विविध पातळ्यांवर विविध प्रकारचे प्रेमाचे जे प्रयोग आम्ही आणि आमचे समविचारी मित्र करत आहोत, त्यातून मानसिक सोडवणूक कशी करून घेता येईल? आणि अशी सोडवणूक करून घ्यायची असती तर या फंदात आम्ही कशाला पडलो असतो?

खरं सांगायचं तर गांधीजींच्या सत्याच्या प्रयोगांनी आम्ही कमालीचे प्रभावित झालो आहोत. ‘सत्य हाच ईश्वर’ हा निर्णय एकदा झाल्यावर ज्या निश्चयाने, चिकाटीने व निर्भयतेने गांधीजींनी ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला त्याचा एक लहानसा अंश तरी आपल्यात उतरावा असे आम्हाला मनापासून वाटते. पण आम्ही सत्याशी झटण्याएवढे महान खरोखरच नाही. आम्ही आहोत ‘आम आदमी’ आणि आमची अनुभूती आहे ‘प्रेम हाच परमेश्वर’ याची. ईश्वराच्या हृदयातून वाहणारा तो अखंड प्रेमनिर्झर आपल्या बारीकसारीक कृतींमधून, बोलण्यामधून, विचारांमधून व एकंदरच सर्व व्यक्तिमत्त्वातून जगामध्ये खळाळत वाहावा, अशी आमची मनापासून इच्छा आहे. अनंत पैलू असणाऱ्या या सुंदर प्रेमभावनेचा ‘करतलामलकवत्’ तळहातावर ठेवलेल्या आवळ्यासारखा सर्व बाजूंनी धांडोळा घ्यावा, असा आमचा प्रयत्न असतो. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना जसे सुरांचे सौंदर्याचे, निसर्गाचे वेड होते, तसे आम्हाला प्रेमाचे वेड लागले आहे.

कोणाच्या मनात येईल, ‘काय उगाच मोठी मोठी नावे आमच्या तोंडावर फेकता? त्यांच्या पायधुळीची तरी सर आहे का तुम्हाला?’

पण आम्ही खरंच सांगतो, प्रेमाची हीच तर गंमत आहे. त्याच्या बाबतीत लहान-मोठं असं काही नसतं. ज्याला प्रेमाच्या परताव्याची मुळीच अपेक्षा नाही, त्याच्या हृदयातलं प्रेम सर्वोच्च, मग तो/ती लौकिकदृष्टय़ा कोणीही असो. तालेवाराच्या हृदयातील प्रेम मोठं आणि गरिबाच्या हृदयातील लहान, अशी व्यावहारिक  समीकरणं तिथं कुचकामी ठरतात. आणि अमका कार्यक्रम, तमका कार्यक्रम अशी विभागणीसुद्धा केवळ लोकांच्या सोयीसाठी असते.

आपण जर एखाद्या मोकळ्या पटांगणात पाण्याने भरलेली परात ठेवली तर त्यात आकाशाचे प्रतिबिंब दिसते. त्याक्षणी आकाशात रंगांचा, ढगांचा वा तारेतारकांचा जो खेळ सुरू असेल, तो परातीतील पाण्यात प्रतिबिंबित होतो. परातीची जागा बदलली, किंवा आकाशातील देखावा बदलला की प्रतिबिंब बदलते. आमचे विविध कार्यक्रम म्हणजे ईश्वरी प्रेमाची विविध प्रतिबिंबे. कधी हे चित्र तर कधी ते चित्र. कार्यक्रम बदलला की प्रेमाचे नवे रूपडे, नवा आविष्कार. मग तो बदल परातीच्या जागेमुळे असो की आकाशातील देखावा बदलल्यामुळे असो. चित्रदर्शीप्रमाणे आपण फक्त औत्सुक्याने आता समोर काय दिसेल त्याला सामोरे जायचे व त्या रंगात न्हाऊन निघायचे.

पण विचार करा, आकाशातील विविध देखावे परातीवर अवलंबून असतात का? प्रतिबिंब पडो वा ना पडो, आकाशातील रंगांची नैसर्गिक उधळण मुक्तपणे सुरूच असते ना? मग तसेच त्या ‘अनाम’ प्रेमाचे आहे.  विशिष्ट कार्यक्रम करणे हा त्या प्रेमाच्या आविष्काराचा एक पैलू झाला. पण कार्यक्रम नसले तरी प्रेमाच्या अभिषेकात खंड पडत नाही. आमची ‘प्रेम की नैया’ सतत वाहतच राहते आणि दोन्ही काठांवर हिरवळ फुलवत जाते.

या प्रेमाचे विसर्जन कसे होईल? आणि त्याला ‘पुन्हा ये’ असे आवाहन का करावे लागेल? जो जातो त्याला ‘लवकर परत ये’ असे म्हणतात. पण प्रेम असे जातच नाही ना! मग ‘पुनरागमनाय’ हे आवाहन सर्वथा गैरलागू आहे.

मनाने अशी समाधानाची ग्वाही दिल्यावर आम्ही नि:शंकपणे व उत्साहाने पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागलो.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com