आषाढ महिना सुरू झाला, धुवांधार बरसणाऱ्या संततधारेने गुरुपौर्णिमेची चाहूल दिली आणि लख्कन वीज चमकावी तसे मागच्या वर्षीचे व्हॉट्सअॅप मेसेज आठवले – ‘हॅपी गुरू पौर्णिमा’ हा मेसेज वाचला तेव्हा आणि आत्ता आठवला तेव्हासुद्धा मन अगदी अस्वस्थ झालं. आपण आपल्या सोयीनुसार गुरुपौर्णिमेचंही एक कर्मकांड करुन टाकलं आहे का? की गुरुपौर्णिमेची उदात्तता, मांगल्य सर्वत्र पसरवण्याचा हा आधुनिक प्रयत्न आहे?
‘‘अहो, तरुण पिढीला त्यानिमित्ताने गुरुपौर्णिमेची आठवण होते. हे काय कमी आहे? काळ बदलला आहे, आपण ही बदलायला हवं. उगाच सारखं त्यांना नाकं मुरडत बसण्यापेक्षा त्यांच्या उत्सवात सामील व्हा.’’
‘‘म्हणजे काय करू?’’
‘‘अहो, त्यांच्या गुरुबद्दलच्या कल्पना वेगळ्या आहेत. आता इन्स्टंटचा जमाना आहे. यशाच्या वाटेवर जलद गतीने नेणारा, त्यासाठी उपयुक्त टिप्स देणारा गुरू आता सर्वाधिक लोकप्रिय असतो. शिष्यांचा मत्सर करणाऱ्या गुरूंपासून सावध राहण्याचेही चॅलेंज असते.’’
आमच्या स्नेह्य़ांहे बोलणे ऐकून आम्हाला एकदम माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या उद्गारांची आठवण झाली. ते पंतप्रधान असताना कुठल्याशा प्रसंगी म्हणाले होते, ‘‘आजकल गुरू कम और गुरुघंटालही जादा नजर आते है।’’ गुरू आणि गुरुघंटाल यांच्यातील फरक ओळखणे अवघडच! आणि गुरूची प्राप्ती होणे हे तर परमभाग्य. आपली तरुण पिढी या विचारांशी सहमत होईल का? कोचिंग क्लासेसच्या ज्ञानावर पोसलेल्या या पिढीला आपण गुरुपौर्णिमा का साजरी करतो, गुरुपौर्णिमा व शिक्षक दिन यांच्यातील फरक काय हे तरी माहिती आहे का?
त्यांना जर माहीत नसेल, तर आपण तो त्यांना सांगायला हवा. शिक्षक दिनाविषयी पुन्हा केव्हा तरी बोलू. पण आज गुरुपौर्णिमेविषयीच जरा विस्ताराने चर्चा करू.
‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्’ असा ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो, ज्यांच्या लेखणीपासून जगातील कुठलाही विषय अस्पर्श राहू शकला नाही, त्या व्यासमुनींच्या स्मरणार्थ आषाढातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून अत्यंत प्राचीन काळापासून साजरी केली जाते. गुरूशिवाय विद्य्ोची प्रगती होत नाही. जी विद्या मुक्तीकडे, अमृतत्वाकडे नेते तीच खरी विद्या. ती गुरूकडूनच प्राप्त करून घ्यायची असते. हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला लागू आहे.
कुतूहल म्हणून कोशातील ‘गुरू’ या विषयावरील माहिती वाचली आणि गुरूंचे वेगवेगळे प्रकार बघून विस्मय वाटला. आपल्या शिष्यांना उत्कर्षांकडे घेऊन जाण्याच्या भिन्न भिन्न रीतींनुसार विचारगुरू, अनुग्रहगुरू; परीसगुरू, चंद्रगुरू, छायानिधी गुरू, नादनिधी गुरू; कच्छपगुरू क्रौंचगुरू असे किती प्रकार! कोणी आपल्या केवळ सान्निध्याने शिष्याचे कल्याण करणारा, तर कोणी सारासार विवेक शिकवून शिष्याला तारून नेणारा. कोणी केवळ स्पर्शाने शिष्याला दिव्यज्ञान देणारा, तर कोणी केवळ शिष्याचे स्मरण करून त्याला आत्मानंद देणारा!
‘‘या सर्वामधून आपला गुरू कसा शोधायचा?’’
‘‘हो, ती एक कसोटीच असते. पण शिष्याला हा शोध घ्यावाच लागत नाही. खरा गुरू शिष्याची प्रतीक्षा करत असतो आणि योग्य वेळी तोच शिष्याला आपल्याकडे बोलावून घेतो.’’
‘‘हे जरा बाऊन्सर आहे.’’
‘‘का बरं? किती तरी उदाहरणं आहेत. गहिनीनाथ-निवृत्ती, विसोबा खेचर-नामदेव, रामकृष्ण-विवेकानंद..’’
‘‘पण ही सर्व अध्यात्मातली सद्गुरूंची नावं झाली. आपलं काय?’’
‘‘अहो, सद्गुरू हा जीवनाचा मार्गदर्शक असतो. शिष्याला सन्मार्गावर नेतो; विविध विषयांची सखोल माहिती, शास्त्रांचे ज्ञान देतो, उत्तमोत्तम ग्रंथांचे वाचन करवून घेऊन शिष्याच्या व्यक्तिमत्त्वाला सखोलत्व प्राप्त करून देतो. ओल्या मातीच्या गोळ्याला सुबक आकार देण्याचे मोलाचे कार्य करतो. शिष्याच्या साधनेवर, वागणुकीवर सद्गुरूचे बारीक लक्ष असते. थोडक्यात तो रल्ल चा र४ल्ल बनवतो.’’
चिनी विचारवंत कन्फ्यूशिअस याला एकदा शिष्याने विचारले, ‘‘मृत्यूचे महत्त्व काय?’’ त्यावर कन्फ्यूशिअसने उत्तर दिले, ‘‘अजून आपल्याला आपल्या जीवनाचेच महत्त्व नीटसे कळलेले नाही, मग मृत्यूचे महत्त्व कसे कळणार?’’
जीवनाचे महत्त्व समजवण्यासाठी आपल्याला सद्गुरूच्या मार्गदर्शनाची गरज असते. तोच आपल्या जीवननौकेचा नावाडी असतो. त्यांच्या सहवासाने, प्रेमाने, स्पर्शाने, भावनिक वैचारिक जवळिकीने आपल्या मनातील मतमतांचा गलबला दूर होतो व मन अंतर्मुख होते.
म्हणूनच सद्गुरूंचे आपल्या आयुष्यात येणे म्हणजे परीसस्पर्श. पण वास्तविक सद्गुरू परिसाहूनही श्रेष्ठ असतो. कारण परीस लोखंडाचे सोने करतो, परंतु लोखंडाला स्वत:ची शक्ती देऊ शकत नाही.
सद्गुरू परीसाहूनही सरस । अभेदत्वची मिळे भक्तास
आपणासारखेच भक्तांस । अधिकारी बनविती ॥
सद्गुरू शिष्याला केवळ ‘आदर्श शिष्य’ याच पायरीपर्यंत आणून ठेवत नाहीत, तर त्याला ते स्वत:सारखे बनवण्याचा प्रयत्न करतात. गुरू आणि शिष्य यांच्यातील भेदभावच संपूर्णपणे मिटवतात.
सद्रूंची प्राप्ती होण्यासाठी आपल्यालाही नम्र व रिकामे व्हावे लागते. गुरूंना ज्ञानाचे मूर्तिमंत रूप म्हणून बघावे लागते. संपूर्ण समर्पित भाव अंगी बाणवावा लागतो. तेथे कुठल्या व्यावहारिक देवघेवीला वावच नसतो. केवळ प्रणाम व सेवा हीच साधने!
अशा सत्शिष्याचे व सद्गुरूंचे नातेही मोठे विलक्षण असते. आपल्या शिष्यांकडून आपला पराजय व्हावा, ही सद्गुरूंची एकमेव इच्छा असते. सद्गुरूंच्या ऋणातून कधीच उतराई होता येत नाही असे ज्ञानेश्वर उगाच म्हणत नाहीत; कबीरांचा दोहासुद्धा तितकाच बोलका आहे.
गुरु गोिबद दोउ खडे काके लागूॅँ पॉँय।
बलिहारी गुरू आपने गोिबद दियो बताय॥
अशा सद्गुरूंप्रति अपार कृतज्ञभावनेने गुरुपौणिर्मेनिमित्त त्यांना त्रिवार वंदन!
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com