35-lp-dr-mrinal-katarnikar‘‘बरं का, ७ तारखेला महाशिवरात्र आहे आणि सर्वाना सुट्टीसुद्धा आहे. तेव्हा तुम्ही सर्वप्रथम आमच्याकडे फराळाला या. उपवासाची मेजवानी करू आणि गप्पागाण्यांचा फडही जमवू.’’ आमच्या स्नेह्य़ांनी आम्हाला अगदी मनापासून आमंत्रण दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांच्या ‘उपवासाच्या मेजवानी’वरून त्यांची थट्टा करायची जोरदार इच्छा झाली, पण आणखी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं, म्हणून त्या इच्छेला मुरड घातली. ‘‘अरे वा! खरंच छान कल्पना आहे. कशी साजरी करायची महाशिवरात्र? रात्री जागरण करायला हवं ना?’’

‘‘जागरण कशासाठी? दिवसभरच एन्जॉय करू.’’

‘‘अहो, ती महाशिव‘रात्र’ आहे ना! मग रात्रीचा काही कार्यक्रम नको का? कोजागरी पौर्णिमा त्या चांदण्यांशिवाय कशी साजरी होईल? तशीच महाशिवरात्र दिवसा कशी साजरी होईल?’’

‘‘अरे यार, तुम्ही काही तरी तांत्रिक मुद्दे काढून सुट्टीचा मजा किरकिरा करू नका बुवा!’’

‘‘अहो, तांत्रिक मुद्दे नाहीत. आम्हाला एक सांगा, भगवान शंकराचं तुम्हाला वर्णन करायला सांगितलं तर कसं कराल?’’

त्यांनी काही क्षण विचार केला आणि म्हणाले, ‘‘थोडक्यात सांगणं कठीण आहे. पण तरीही तो भोळा सांब म्हणून ओळखला जातो. चटकन प्रसन्न होणारी देवता आहे. हिमालयात वास्तव्य करते, कल्याणकारी, विरागी वृत्तीची. पुराणात शंकराशी संबंधित अनेक गोष्टी, आख्यायिका आहेत. पण याचा काय संबंध?’’

‘‘अहो, याचाच तर संबंध आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवाच्या या गुणांची आराधना करायला हवी की नाही?’’

‘‘म्हणजे पूजाअर्चा किंवा भजन-कीर्तन असं म्हणता का?’’

‘‘नाही, नाही, या अशा कर्मकांडाबद्दल नाही बोलत आम्ही.’’

‘‘या पूजाअर्चेला असे झिडकारू नका. सबंध भारतभर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत महाशिवरात्र अशीच साजरी करतात. उपवास, दुग्धाभिषेक, भजन, सत्संग वगैरे करून.’’

‘‘हो, बरोबर आहे. महाशिवरात्रीचे हे पारंपरिक कार्यक्रम झाले. पण वीरशैव संप्रदायाचे संस्थापक बसवेश्वर या कर्मकांडांबद्दल म्हणतात- हा सर्व प्रकार म्हणजे दरुगधी दारूने भरलेलं मडकं बाहेरून सुशोभित करण्यासारखं आहे. त्यांच्या मते भक्ती म्हणजे संपूर्ण शरणता आणि उपास्य दैवताशी एकत्व. ते शिवाचे म्हणजे लिंगाचे उपासक होते पण निर्गुण उपासक.’’

‘‘अहो, तो पारमार्थिक लोकांचा मार्ग झाला. आपल्यासारखी व्यावहारिक माणसं सध्या करतोय यापेक्षा वेगळं काय करणार?’’

‘‘बरंच काही करू शकतो.’’

‘‘म्हणजे कसं?’’

‘‘हे बघा. महाशिवरात्र साजरी करण्याचा आपला उद्देश काय आहे? शंकराची उपासना. मग त्या उपासनेतून शंकराचे गुणधर्म आपल्या अंगी बाणले जावेत, असं काही तरी आपल्याकडून व्हायला हवं. तुम्हीच मघाशी सांगितलंत ना, की शंकर ही चट्कन प्रसन्न होणारी देवता आहे. आपण कधी कोणावर पटकन खूश होतो का? कोणी आपली स्तुती करू लागला की आपण वरवर खूश झाल्याचं दाखवलं तरी मनातून संशयी विचार करत राहतो. पण ज्याचं मन निष्कपटी असतं त्याच्या मनात असे विचार येत नाहीत. शंकराचा हा स्वभावविशेष आहे- निष्कपटी व प्रेमाने भरलेलं हृदय. ते आपल्याला प्राप्त व्हावं, यासाठी आपण जे करू ती शंकराची आराधना. बरं, त्यासाठी शिवमंदिरात जाण्याची किंवा लिंगपूजा करण्याची काय आवश्यकता? शंकराचं वास्तव्य कोठे असतं? हिमालयात. मग आपणही अशा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन ती रात्र व्यतीत करायला हवी.’’

‘‘थंडी किती असते तेव्हा आणि तुम्हाला निसर्गात जायचंय!’’

‘‘थंडी असेल तर अग्नी प्रज्वलित करा. कल्पना करा, ताऱ्यांनी फुललेलं आकाश, आजूबाजूला वृक्षवल्ली, निशाचरांची चाहूल, उघडय़ा माळरानावर प्रज्वलित केलेला अग्नी, त्याभोवती आपण सारे! किती भारून टाकणारं वातावरण असेल!’’

‘‘अरे वा! तुम्ही तर महाशिवरात्रीच्या नावाखाली झकास रेव्ह पार्टीची कल्पना सुचवलीत!’’

‘‘रेव्ह पार्टी! छे, छे, अहो त्या अग्नीभोवती बसून आपण धिंगाणा करायचा नाही किंवा गाणं बजावणं नाही करायचं. तिथे जमलेल्या सर्वानी मौन पाळायचं, ध्यान करायचं, अंतर्मुख व्हायचं.’’

‘‘मौन कशासाठी? आणि जमणार आहे का ते रात्रभर?’’

‘‘प्रयत्न करायला काय हरकत आहे? शंकराचा दुसरा स्वभावविशेष म्हणजे वैराग्य. अशा सुंदर ठिकाणी सर्वासोबत जाऊन गप्पाटप्पा न करता, हुल्लडबाजी न करता ध्यानात काळ व्यतीत करणं हे आपल्यासाठी वैराग्यच नाही का? मौन आपल्याला स्वत:शी संवाद करायला उद्युक्त करतं. तसंच निसर्गाचा प्रत्येक स्वर ऐकण्याची संधीदेखील उपलब्ध करून देतं. आम्ही गेली अनेक वर्षे याचा अनुभव घेत आहोत. आपल्या मौनामुळे आपल्या शक्तीचा, अवधानाचा अपव्यय बंद होतो. निसर्गातील ज्या अनेकविध चांगल्या गोष्टी, ऊर्जा असतात, त्या आपल्यामध्ये सामावतात. आपणही अंतर्मुख होतो. त्या शक्तींचा प्रत्यय आपल्याला येतो. त्यातून जी प्रसन्नता आपल्यात भरून राहते, ती पुढे अनेक काळापर्यंत आपल्याला ऊर्जा पुरवत राहते. या वर्षी आम्ही शिवथरघळीत जाणार आहोत. तुम्ही येणार का? आलात तर आम्हाला आनंद होईल.’’

आम्ही त्यांची पंचाईत केली होती. एकतर त्यांच्या साबुदाणा वडय़ांच्या आणि इतर लज्जतदार पदार्थाच्या पार्टीवर पाणी ओतले होते आणि वर हा बुचकळ्यात टाकणारा प्रस्ताव. पण आम्ही तरी काय करणार? आम्ही जगावर प्रेम शिंपण्याचा वसाच घेतला आहे. आमच्या या परमस्नेह्य़ांना कर्मकांडाच्या निर्थक जंजाळातून आणि शरीरसुखाच्या आसक्तीतून बाहेर काढून काही अर्थपूर्ण करायला प्रवृत्त करणे, हे आमचे कर्तव्यच नाही का? आणि महाशिवरात्रीचा सण हे त्यासाठी योग्य निमित्त आहे. त्याला चिकटलेल्या कालबाह्य़ रूढी बाजूला करून डोळस आध्यात्मिकतेचा अंगीकार करणे, हे आजच्या काळाशी सुसंगत ठरेल. हा लहानसा प्रयोग आहे. त्याचा शुभारंभ आपण करू या.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com