34lp-minalअमृतसर हे शीख धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र स्थान आहे आणि तेथील सुवर्णमंदिरात केवळ शीखच नव्हे तर इतरही अनेक धर्माचे अनुयायी दर्शनासाठी येत असतात. आम्हालाही अमृतसरला जाण्याचा योग आला. तेथील इतर सर्व प्रेक्षणीय व ऐतिहासिक स्थळांबरोबरच सुवर्णमंदिराला भेट हा एक खास कार्यक्रम होता. सुवर्णमंदिराचा परिसर व तेथील दृश्य नेत्रसुखद व तितकेच पवित्र आहे. आम्ही आमची पादत्राणे तेथील राखीव जागेत ठेवली. दर्शन, लंगर सर्व आटोपून आम्ही बाहेर आलो आणि बिल्ला देऊन चपला घ्यायला गेलो. मंदिर परिसरातून बाहेर पडण्याच्या रस्त्यावर तळघरात प्रशस्त जागेत चप्पल स्टॅण्ड आहेत आणि चपला परत देताना तिथल्या व्यक्तीने त्या पुसून आम्हाला परत दिल्या. आम्हाला आश्चर्य वाटले. आमच्या बरोबर आलेल्या शीख स्नेह्य़ांनी माहिती पुरवली की सर्वच शीख मंडळी गुरुकरात स्वेच्छेने अशी ‘कारसेवा’ करतात. त्यांच्या धार्मिक आचारांचा तो एक भाग आहे. एकदम आठवले, ग्यानी झैलसिंग राष्ट्रपती झाल्यावर सुवर्णमंदिरात माथा टेकण्यासाठी गेले होते व त्यांनी कारसेवा केली होती. त्या वेळेस वृत्तपत्रांत काही प्रतिक्रियाही आल्या होत्या.

ते काही असो, या कारसेवेने आमच्या विचारचक्राला मोठीच चालना दिली. आपली सामाजिक प्रतिष्ठा, हुद्दा, वय यांचा बाऊ न करता एक धार्मिक कार्य म्हणून कारसेवा करणाऱ्या शीख बांधवांच्या श्रद्धेचे कौतुक वाटले. त्यातील ‘निरपेक्ष सेवे’चा भाव मनाला अगदी भिडला. आपणही समाजाची अशी निरपेक्ष सेवा करावी या विचाराने मनात मूळ धरले.

पण आपण कशाची सेवा द्यायची? आणि कुठे द्यायची? आपली कुठे संघटना नाही की कार्यालय नाही. आणि जरी असले तरी लोक तिथे सेवा घ्यायला का येतील?

या प्रश्नांची उत्तरे जरी मिळत नव्हती, तरी काही गोष्टींबद्दल आम्ही ठाम होतो. जी काही सेवा आम्ही देणार ती ‘धार्मिक आदेश’ म्हणून नव्हे, तर मानवतेच्या दृष्टिकोनातून द्यायची. त्यामध्ये, म्हणजे सेवा देण्या व घेण्यामध्ये, सर्व वयोगटांतील, सर्व थरांतील लोकांना सामावून घ्यायचे. इतकेच नव्हे, तर आजच्या विज्ञान युगाशी, बुद्धिप्रामाण्यवादी काळाशी सुसंगत असेल, अशी सेवा द्यायची.

एकदम विजेसारखी कल्पना चमकली- ‘मोबाइल फोन- भ्रमणध्वनी.’ आज बहुसंख्य लोक मोबाइल वापरतात. जे वापरतात त्या सर्वाना तो प्राणप्रिय असतो. आपल्या प्रियतम व्यक्तीपेक्षाही आपण आपल्या मोबाइलच्या सहवासात व सान्निध्यात अधिक असतो, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. पण याच आपल्या लाडक्या मोबाइलच्या बाबतीत एक कठोर सत्य म्हणजे जगातील सर्वात अस्वच्छ गोष्टींमध्ये मोबाइलचा दुसरा क्रमांक आहे. पहिला क्रमांक- अर्थातच शौचालयाचा! आता कल्पना करा, आपणच वापरून इतका अस्वच्छ झालेला मोबाइल आपण सतत हातात खेळवतो, नाका-तोंडाजवळ नेतो आणि केवढय़ा जंतुसंसर्गाला निमंत्रण देतो! आपण आपल्या आरोग्याला असलेल्या या धोक्याविषयी किती अनभिज्ञ असतो! पण विज्ञानविषयक नियतकालिके आपल्याला या गंभीर संकटांची इत्थंभूत माहिती देतील.

याला काही उपाय आहे का?

उपाय आहे- मोबाइल स्वच्छ करणे.

पण कसे? त्याला पाण्याने आंघोळ तर घालता येत नाही! आम्हाला उत्तर सापडले- आपण लोकांचे मोबाइल फोन स्वच्छ करून द्यायचे. आमचे एक रसायनशास्त्रप्रेमी स्नेही तत्परतेने पुढे सरसावले. आपल्या संशोधनातून त्यांनी मोबाइल स्वच्छ, र्निजतुक करू शकणारे आम्लमुक्त रासायनिक द्रावण तयार केले व लहान लहान बाटल्यांमध्ये भरून ते आमच्या हवाली केले. त्याची प्रक्रियाही सांगितली. कापसाच्या लहानशा बोळ्यावर दोन थेंब द्रावण टाकून त्याने मोबाइल स्वच्छ करायचा व नंतर टिश्यू पेपरने तो कोरडा करायचा. तो र्निजतुक झालेला असतो. यामध्ये पाण्याचा वापर न करता मोबाइल जंतुमुक्तकेला जातो.

आम्ही त्यांना या द्रावणाचे शुल्क विचारले. ते म्हणाले, ‘ही आमची कारसेवा समजा.’

आम्ही भारावलो व शतगुणित उत्साहाने कामाला लागलो. जेथे जेथे जाऊ, तेथे तेथे आम्ही लोकांचे मोबाइल फोन स्वच्छ करून देऊ लागलो. लहान मुलेसुद्धा आवडीने हे काम करायला पुढे येऊ लागली. सभा-संमेलनांमध्ये, सार्वजनिक समारंभांमध्ये आयोजकांची परवानगी घेऊन आम्ही स्टॉल लावू लागलो- नि:शुल्क मोबाइल स्वच्छतेचा!

हे करताना अनेक तऱ्हेचे अनुभव आले. एक मंत्रिमहोदय स्वत:चा मोबाइल स्वच्छतेसाठीही आमच्या हातात द्यायला तयार होईनात! आम्ही त्यातील गुप्त माहितीचा गैरवापर करू अशी रास्त (!) भीती त्यांना वाटली असावी! अनेक ठिकाणी लोक आम्हाला मोबाइल दुरुस्त करणारे समजून तो सुधारण्यासाठी हातात द्यायचे. पण एक अनुभव मात्र सार्वत्रिक होता, लोकांना मोबाइलच्या अस्वच्छतेबद्दलचे शास्त्रीय सत्य सांगितले की त्याच्या स्वच्छतेची आवश्यकताही त्यांना पटते.

आमच्यावर नेहमी टीकास्त्र सोडणारे आमचे स्नेही म्हणाले, ‘प्रदूषणाने भरलेल्या या जगात आमच्या आरोग्यासाठी तुम्ही जो उपक्रम करता आहात, ती एक जनजागृतीच आहे. मला पण एक बाटली द्या, मी पण जमेल तसे करेन.’ आमचा विश्वासच बसेना. ते म्हणाले, ‘तुम्हाला काय वाटलं, मी फक्त नावंच ठेवतो? मला चांगल्याची प्रशंसाही करता येते.’

शीख धर्मीयांच्या कुठल्याशा सणाला आम्ही गुरुकरात त्यांच्या रीतसर परवानगीने मोबाइल स्वच्छतेचा स्टॉल लावला. तिथे जमलेल्या अनेकांनी त्याचा लाभ घेतला. त्यांच्यापैकी एका उच्चविद्याविभूषित व्यक्तीने या सर्व प्रकाराबद्दल कुतूहलाने चौकशी केली. आम्ही नेहमीची सर्व माहिती दिली आणि सांगितले की या सेवेची प्रेरणा आम्हाला शीख धर्मातून मिळाली. त्यांना आनंद झाला. आपल्या कारसेवेचे हे विज्ञानावगुंठित रूप त्यांना अनपेक्षित होते.

हा सेवेचा वसा चालवताना आम्हालाही असाच आनंद मिळतो, निरपेक्ष आनंद!
डॉ. मीनल कातरणीकर

Story img Loader