नवरात्रीउत्सव जवळ आल्यावर सर्वांना गरबा, दांडिया-रास आणि नऊ दिवस वेगवेगळया रंगांचे कपडे घालून मिरवणे या गोष्टी आठवतात. पण नवरात्र हा देवीचा उत्सव आहे व उपवास, व्रतवैकल्ये, नियमित देवदर्शन अशा सात्विक मार्गाने तो पारंपारिकरीत्या साजरा केला जातो. आपल्या पुराणकथांमध्ये दुर्गा, चंडिका, महिषासुरमर्दिनी, काली अशा विविध रूपांत खल निर्दालन करणारी देवी आपल्याला भेटत राहते. ती शक्तीची प्रतीक आहे आणि स्त्री-रुपात प्रकट होते. या स्त्री-रुपाप्रती आदर व भक्तीभाव म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुमारिकांचे पूजन केले जाते. जिला स्त्रीत्व म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही, अशा बालिकांना देवीसमान मानून त्यांची पूजा केल्याने स्त्रियांप्रती आदरभाव वाढीस लागेल, अशी श्रद्धा त्यामागे आहे.
मात्र दुर्दैवाने आपले धार्मिक आचरण व सामाजिक वास्तव यांच्यात प्रचंड अंतर निर्माण झाले आहे. रोजच्या रोज कानावर आदळणाऱ्या स्त्रियांवरील, अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या, एकूणच स्त्रियांच्या सर्वंकष शोषणाच्या घटना बघितल्या तर आपल्या समाजात स्त्रियांविषयी आदर तर सोडाच, पण किमान माणुसकीचीही भावना नाही, हे दारुण वास्तव आपल्या मनाला चटके देते. आपल्या गावां शहरांमध्ये स्त्रिया, मुली सुरक्षित नाहीत, हे पाहून शरमेने मन खाली जाते.
‘‘स्त्रियांबद्दलचा हा अनादर कमी व्हावा, म्हणून तर देवीपूजन करायचे.’’
‘‘पण या पूजांचा आपल्या दैनंदिन वागण्याशी काही संबंधच दिसत नाही. मग असली निर्थक आणि निरुपयोगी कर्मकांडे कशाला करत राहायची?’’
एका बाजूला धार्मिकतेचा अभिमान मिरवायचा आणि दुसऱ्या बाजूला तथाकथित धर्म आणि समाजव्यवहार परस्परांपासून दूर ठेवायचे हा आपल्या समाजाच्या दुटप्पीपणाचा विशेष आहे आणि स्त्रियांशी होणारे पराकोटीचे गरवर्तन हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.
या परिस्थितीत बदल घडवायचा असेल, तर समस्येच्या मुळापर्यंत जायला हवे व आपल्या चौकटीच्या बाहेर पडून विचार करायला हवा.
कोणीही मनुष्य जेव्हा बलात्कारासारखे हिणकस, अमानुष कृत्य करतो किंवा आपल्या पौरुषाच्या बळावर स्त्रियांचे शोषण करतो, तेव्हा सतानी प्रवृत्तींनी त्याच्या मनाचा ताबा घेतलेला असतो. आपल्या कृत्याची वस्तुनिष्ठपणे योग्यायोग्यता ठरवण्याची क्षमता तो गमावतो. असे असेल तर या सतानी प्रवृत्तींचा प्रभाव कमी करणे आणि सत्प्रवृत्तींचा प्रभाव वाढवणे, हाच समस्येवरचा उपाय आहे. पण ते कर्मकांडातून साध्य होणार नाही. तर त्यासाठी प्रत्यक्ष हाडामांसाच्या स्त्रिया व मुलींशी आपले वर्तन सुधारायला हवे, आपल्या वागण्यातून त्यांच्याबद्दलचा आदर व सभ्यता व्यक्त व्हायला हवी. त्यांना देवी म्हणून नाही तर किमान माणूस म्हणून समाजात वागवले जायला हवे. हे सर्व कसे करता येईल या विषयी आम्ही आमच्या समविचारी मित्रांबरोबर बरेच विचारमंथन केले. त्यातून जे नवनीत निघाले ते असे-
स्त्रीची नानाविध रुपे आहेत. त्यांपकी वात्सल्य आणि सेवा हा तिचा मूलभूत स्वभाव आहे. मनात रुजलेला मातृभाव आणि इतरांची निरलस सेवा करण्याचा स्वभाव हे जणू स्त्रीचे व्यवच्छेदक लक्षणच. स्त्रीच्या या गुणांची पूजा करणे, सर्व समाजाला त्यासमोर नतमस्तक करविणे, हे आपले काम आहे. सेवेचे मूर्तिमंत रुप म्हणजे परिचारिका. मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्या बालमूर्तीला सर्वप्रथम हाती घेणारी, आणि अंतसमयी त्याच्या निष्प्राण देहावर चादर घालणारी ती परिचारिका. जन्म आणि मृत्यूच्या या दोन टोकांमध्ये अनेक प्रसंगी सेवाभावी वृत्तीने रुग्णांची शुश्रूषा करणारी ती परिचारिका. या परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे आम्ही ठरवले. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये शहरातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये रीतसर परवानगी घेऊन जायचे आणि तेथील सर्व परिचारिकांना फूल, ग्रीटींग कार्ड, मिठाई व उदबत्ती देऊन त्यांना नमस्कार करणे, त्यांच्या प्रमुखांना या सगळयांबरोबरच लहानशी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करणे, त्यांचे सर्वांचे मोबाईल फोन्स आमच्या विशिष्ट द्रावणाने निर्जंतुक करून देणे असा उपक्रम आम्ही गेल्या काही वर्षांंपासून सुरु केला आहे. परिचारिका ही उदबत्तीसारखी स्वत: जळून जगाला सेवेचा सुगंध देते; म्हणून त्यांना उदबत्ती द्यायची. या कार्यक्रमात आम्ही एक खास गोष्ट केली. कुठल्याही रुग्णालयातील वयाने सर्वात लहान परिचारिकेला आमच्यापकी वयाने सर्वात जेष्ठ गृहस्थ पायावर डोके ठेवून ‘माते, तुला वंदन असो’ असे म्हणून नमस्कार करतात. आमच्या मनातील कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मनापासूनचा प्रयत्न.
सुरुवातीपासूनचा अनुभव असा की या कार्यक्रमामुळे परिचारिका भारावून जातात, सद्गदित होतात. उपचार झाल्यावर रुग्ण व त्यांचे नातेवाईक डॉक्टरांचे आभार मानतात पण त्यांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिकांना फक्त बक्षिसी देतात. म्हणूनच आपल्या सेवेविषयी इतक्या आदरभावाने विचार करणारी माणसे समाजात आहेत, याचे त्यांना अप्रूप वाटते, त्या गहिवरतात. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमामुळे आमच्या बरोबर येणाऱ्या तरुण मुलांवर स्त्रियांकडे मातृभावाने बघण्याचा संस्कार रुजतो. समाजाचा स्त्रियांप्रति असणारा दृष्टिकोन बदलण्यासाठी हा संस्कार फार महत्त्वाचा आहे.
आज भारतातील अनेक राज्यांत आमची स्न्ोहीमंडळी मोठया प्रमाणावर हा कार्यक्रम करतात, देवीदर्शनाला नियमितपणे जावे तशा नियमितपणे नऊ दिवस वेगवेगळया रुग्णालयांमध्ये जातात. सत्प्रवृत्तींचा प्रभाव वाढवण्याच्या या उपक्रमात स्थानिकांना मोठया संख्येने सामील करुन घेतात.
स्त्री ही शक्ती आहे आणि ती सेवारुपाने सर्वांचे पालन करीत असते. ‘‘या देवी: सर्वभूतेषु सेवारुपेण संस्थिता’’. तिच्या या रुपाला नमस्कार केल्यामुळे आपल्या सभोवतालचे कलुषित वातावरण शुद्ध होतेच, पण त्याबरोबरच स्त्रीला देखील अनोखे प्रोत्साहन मिळून आत्मभान येते. तिच्यातील सेवाभावाला व मातृभावाला असे सकारात्मक आवाहन करणे, हीच आमची नवरात्रातील देवीपूजा होय.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com