54-lp-minal‘‘या  वर्षी धुळवड मस्त झाली!  तरुणवर्गाचा अगदी आग्रहच होता- म्हणे डीजे पाहिजे, रेनडान्स तर मस्ट! खरं सांगू का, आधी वाटलं की हे जरा अतीच होतंय. पण रेनडान्स एन्जॉय केल्यावर असं वाटलं, क्या बात है! आणि ठरवलं, पुढच्या वर्षी त्यांच्यावर टीका करायची नाही. पण रविवारच्या मीटिंगमध्ये तुम्ही दिसला नाहीत ते?

‘‘रविवारी ना, अहो आम्ही ईस्टरच्या कार्यक्रमासाठी चर्चमध्ये गेलो होतो.’’

‘‘काय राव, आपल्या धर्मातले सण तुम्हाला कमी पडायला लागले की नकोसे वाटायला लागले? तुम्ही अगदी परधर्मीयांचे सण साजरे करण्यासाठी त्यांच्या अड्डय़ावर जायला लागलात?’’

‘‘परधर्मीयांचे सण? म्हणजे काय?’’

यावर आमच्या स्नेह्यांनी जो कटाक्ष टाकला त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. तुच्छता, आमच्याबद्दलची कीव, संताप, क्वचित परधर्माबद्दल तिरस्कार.. काय काय नव्हते त्यात!

या सर्व भावनांवर कसाबसा ताबा मिळवून ते म्हणाले, ‘‘तुमचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला का? नाही ना? मग ख्रिश्चन धर्म हा तुमच्यासाठी परधर्म नाही का? आणि त्यांचे सण तुमच्यासाठी परधर्मीयांचे सण नाहीत का?’’

‘‘अहो, आपला जन्म कुठल्याही धर्मात झाला असला तरी तथाकथित ‘परधर्मीयांचे’ सण आपण साजरे करू नयेत, असा काही नियम आहे का? आणि ‘आपले’ सण आपण किती पावित्र्याने साजरे करतो? उलट सर्व धर्मातील शिकवण अधोरेखित करणारे सण आपण साजरे केले तर समाजात धार्मिक सलोखा निर्माण होण्यास मदत होईल.’’

‘‘अच्छा! म्हणजे तुम्ही धार्मिक सलोखा निर्माण करायला गेला होतात तर! पण अशा एकतर्फी प्रयत्नांना काय अर्थ आहे? एका बाजूला अनेक  शतकांपासून चालत आलेली धर्मातरे, सांस्कृतिक आक्रमणे आणि दुसऱ्या बाजूला आपला बुळचट सलोख्याचा विचार –  हा असमतोल नाही का?’’

‘‘या युक्तिवादांचा प्रतिवाद आम्हाला अनेक प्रकारे करता येईल, पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की आम्ही ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांबद्दल नव्हे, तर येशू ख्रिस्ताच्या शिकवणीबद्दल बोलत आहोत. त्याने सर्व विश्वाला प्रेम व सेवेचा संदेश दिला. तो संदेश आपण आत्मसात करणे यापेक्षा ईस्टर- येशूच्या पुनरुत्थानाचा सण- साजरा करण्यामागे वेगळा काही उद्देश असू शकतो का?’’

सर्व धार्मिक चौकटीच्या, पंथोपपंथांच्या पलीकडे जाऊन विचार केला तर असे दिसते की राम, कृष्ण, येशू, पगंबर, बुद्ध, ज्ञानेश्वर, कबीर यांसारखे महानुभाव या भूतलावर भ्रातृभाव निर्माण व्हावा म्हणून अवतरले, त्यासाठी झटले; पण आपणही तेवढेच हट्टी, आपण काही भ्रातृभाव वाढीस लागू दिला नाही. उलट आपण याच दिव्य पुरुषांच्या सभोवती त्यांना एकमेकांपासून अलग करणाऱ्या िभती बांधल्या. याचे कारण कदाचित असे असेल की आपण त्या शक्तींशी योग्य रीतीने संधान साधत नाही, त्यांची शिकवण समजून घेऊन आचरणात आणत नाही.

पण केशवसुत म्हणतात तसे ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ या भावनेने निदान आपण वर्तमानकाळात तरी आपली वृत्ती बदलून आपल्या भवतालातही परिवर्तन घडवू शकतो.

ईस्टर हा ह्यसाठी फारच उत्तम दिवस आहे, कारण या दिवशी येशूचे पुनरुत्थान झाले. जणू आपल्याला प्रेम व सेवेच्या शिकवणीचे स्मरण करून देण्यासाठीच तो पुन्हा प्रकट झाला. मग आपल्याला त्याचा प्रेम व सेवेचा संदेश या दिवसापासून आचरणात आणायला हवा.

आमच्या काही समविचारी मित्रमंडळींनी असे ठरवले की जे सर्व समाजाची सेवा करतात त्यांच्याबरोबर हा सण साजरा करायचा. सफाई कामगार हे कुठल्याही गावाच्या, शहराच्या सार्वजनिक आरोग्याचे आधारस्तंभ असतात. स्वत: अतिशय घाणीत काम करून ते आपल्यासाठी परिसर स्वच्छ ठेवतात. पण आपण त्यांना ओळखतही नाही, त्यांच्याशी बोलणे, त्यांची विचारपूस करणे ही तर दूरची गोष्ट. ईस्टरच्या सणानिमित्ताने हा दुरावा दूर करून या बांधवांशी प्रेमाचे नाते निर्माण करण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी त्यांनी चर्चच्या लोकांशी विचारविनिमय करून कार्यक्रम ठरवला आणि सफाई कामगारांना ईस्टरच्या समारंभाचे सहकुटुंब आमंत्रण दिले. त्यांच्यासाठी करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. अनेक स्वादिष्ट पदार्थ, मिठाई देऊन तोंड गोड केले. आपल्यासाठी आयोजित केलेल्या या समारंभामुळे ती सर्वमंडळी आधी बुजली, पण मनातून हरखूनही गेली. ते सर्व त्यांना आवडत होते, पण कसा प्रतिसाद द्यावा हे त्यांना उमगत नव्हते. साहजिकच आहे, पांढरपेशांच्या जगापासून ते अनेक योजने दूर असतात; त्यांचा संबंध केवळ या जगाने निर्माण केलेल्या घाणीशी असतो. आणि त्या जगाला यांच्याशी काही देणेघेणे नसते. पण आमच्या मित्रांनी पुढाकार घेऊन, विशेष प्रयत्न करून त्यांची भीड घालवली आणि मग सुरू झाला एक आनंदोत्सव! हा उपक्रम गेली अनेक वर्षे सुरू आहे. सफाई कामगार बांधवही सहकुटुंब सहपरिवार यात सामील होतात. एवढेच नव्हे, तर चर्चशी संबंधित सर्व जणही यात अतिशय आपुलकीने सहभागी होतात. मनावरची पोलादी आवरणे आणि मधल्या िभती गळून पडताना बघून आनंद होतो. प्रेमाच्या सेतूंनी माणसे जोडली गेल्याची जाणीव सुखद असते.

काही वर्षांपूर्वी यांच्यापकीच काही जणांनी एक प्रतीकात्मक कार्यक्रम केला. चर्चच्या आवारात तुळशीचे रोप लावायचे आणि शिवमंदिराच्या आवारात ख्रिसमस ट्री लावायचे.

‘मग? रुजले का ख्रिसमस ट्री?’ खवचट प्रश्न आलाच!

‘‘अहो प्रतीकात्मक कार्यक्रमात ती अपेक्षा नव्हतीच. महत्त्वाची होती ती दोन्ही संस्थांची रूढींना ओलांडण्याची तयारी. ते घडून आले हे विशेष, तेच आमचे यश!’’

आता ज्या कार्यक्रमात मानवतेच्या उदात्त मूल्यांचे संवर्धन होत असेल, आणि निरपेक्ष प्रेमाचे सिंचन होत असेल तो कार्यक्रम लौकिकार्थाने कुठल्याही धर्माचा असला तरी कोणासाठीही परधर्मीयांचा कसा ठरेल?
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader