काही दिवसांपूर्वी एका सांगीतिक कार्यक्रमात रुद्रवीणावादन ऐकण्याची संधी मिळाली. कलाकाराविषयी सांगितले गेले की भारतातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या रुद्रवीणावादकांपकी ते आहेत.
आज रुद्रवीणेविषयी लिहिण्याचे कोरण म्हणजे आम्हाला बोचणारी आपल्या अभिजात कलांची दैन्यावस्था. आपल्या संस्कृतीत चौसष्ट कलांची माहिती आहे, आणि हल्ली विनोदाने जाहिरात कलेला पासष्टावी कला म्हटले जाते. पण आजचे चित्र असे आहे की कुठलीही कला केवळ या पासष्टाव्या कलेच्या आधारेच तगू शकते. ही कोणाला अतिशयोक्ती वाटत असेल, तर प्रसिद्धीच्या वलयांपासून दूर असणाऱ्या कलांना आज अस्तित्व टिकवण्यासाठी किती संघर्ष करावा लागत आहे, ते जरा तपासून पाहावे.
आम्ही अभिजात संगीताच्या बाबतीत हा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून असे लक्षात आले की अनेक प्रकारच्या गायनशैली, वाद्ये आता नामशेष होत चालली आहेत. त्यांची साधना करणारे कलावंत कमी होत चालले आहेत, कारण त्यांच्या कलेच्या आधारावर त्यांचा उदरनिर्वाह होणे अशक्यप्राय आहे. संगीतक्षेत्रातील नामवंत संस्था व पदाधिकाऱ्यांना देखील या वादन, वाद्ये व कलावंत यांविषयी माहिती नाही.
का अशी दुरवस्था यावी?
कोणी म्हणेल की त्यात एवढे खंत करण्यासारखे काय आहे? नवीन गोष्टी आल्या की जुन्या मागे पडणारच. आज इतर संगीत परंपरांतून नव्या गायनशैली, नवीन वाद्ये परिचित झाली आहेत व ती आपल्या संगीतात चपखल सामावली गेली आहेत. जे कालबा होते, त्याचा अस्त ठरलेला आहे. कॉम्प्युटर आल्यावर टाइपरायटर कालबा झाला. ईमेल्समुळे तार कालबा झाली, तसेच हे!
तार्किकदृष्टय़ा या स्पष्टीकरणात काही चूक नाही. पण सांस्कृतिकदृष्टय़ा ते तितकेसे पटणारे नाही. कारण वर दिलेली उदाहरणे व कला यांच्यात निश्चित भेद आहे. एक नवीन कौशल्य विकसित झाल्यावर जुने कौशल्य मागे पडणे स्वाभाविक आहे. पण कला म्हणजे केवळ व्यावसायिक कौशल्य नव्हे; ती आयुष्यभराची साधना असते; ती पोटार्थी कधीच नसते, तर ईश्वराच्या आराधनेचे माध्यम असते. साधना कालबा कशी होईल? अनेक कला आणि शैली प्राचीन काळापासून गुण्यागोिवदाने नांदत आल्या आहेत. त्यांच्या लुप्त होण्यामागे इतर काही कारणे असली पाहिजेत.
इतिहास सांगतो की अभिजात संगीताच्या साधकांना राजाश्रय मिळत असे. त्यांच्या साधनेत खंड पडू नये म्हणून संस्थानांतर्फे त्यांच्या नियमित उत्पन्नाची तजवीज केली जात असे. यांतून कलाकारांच्या पिढय़ा घडत असत. अनेक कलाकारांच्या चरित्रांमधून असे उल्लेख आढळतात. पुढे ब्रिटिश राजवटीत संस्थाने खालसा झाल्यानंतर त्यांचा भक्कम आधारच कोलमडला. या कला व कलावंतांना पोरकेपणच आले. टिकून राहण्याचा एकमेव मार्ग त्यांच्यासमोर होता तो म्हणजे लोकाश्रय. ज्यांना तो लाभला, त्यांची कला टिकली आणि बहरली. ज्यांना नाही लाभला, त्यांच्या भाळी दुर्दैवाचे दशावतारच आले.
याचा मथितार्थ असा की भक्कम आधाराच्या अभावी कोलमडलेल्या कलांना लोकाश्रय लाभला तर त्यांना ऊर्जितावस्था येईल. त्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत.
असा एक प्रयत्न अलीकडेच आम्ही केला. शहीद जवानांच्या गौरवार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात संरक्षण दलातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्या वेळी आम्ही रुद्रवीणावादनाचे आयोजन केले. नावावरून हे वाद्य रौद्ररसाशी संबंधित आहे, अर्थात युद्धपरिस्थितीत ऐकण्यास अत्यंत योग्य. रुद्रवीणेच्या स्वरांच्या या ताकदीचा लाभ आपल्या वीर जवानांना व्हावा, यासाठी आम्ही हा प्रयोग केला. आधुनिक काळात आपल्याला त्याची प्रचीती घेता यावी यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न.
या प्रयोगाच्या निमित्ताने लक्षात आले की कलांना जर लोकाश्रयाच्या आधाराने जगायचे असेल, तर कलाकारांना समाजभान दाखवावे लागेल, आपली कला समाजोपयोगी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. हा काळाचा अपरिहार्य महिमा आहे. कलेतून ईश्वरप्राप्ती हेच सूत्र असेल, तर कलाविष्काराने रंजल्यागांजल्यांचे दु:ख दूर करून ईश्वरप्राप्ती साधण्याचा प्रयत्न त्यांनी करायला हवा.
आम्ही असाही प्रयोग गेल्या काही वर्षांपासून करत आहोत. श्रीकृष्णाने जगाला दोन मोठय़ा देणग्या दिल्या भगवद्गीता आणि बासरी. त्यापकी भगवद्गीता धर्मग्रंथ म्हणून मान्यता पावली; पण बासरी मात्र केवळ मनोरंजनाचे साधन म्हणूनच उरली. बासरीच्या स्वरांचा उपयोग समाजातील दु:ख दूर करण्यासाठी करावा, असे आम्ही ठरवले. एका ऋषितुल्य बासरीवादक कलाकाराने त्याला दुजोरा दिला आणि मानसिकदृष्टया विकलांग मुलांसाठी बासरीवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. पहिल्या कार्यक्रमाच्या वेळचा अनुभव असा की एरव्ही अत्यंत अशांत आणि िहस्र असणाऱ्या मनोदुर्बल मुलांनी एक तासभर शांत बसून बासरीवादन ऐकले. या कार्यक्रमांची वारंवारता वाढवली, तर मुलांचे मनोदौर्बल्य कमीदेखील होऊ शकेल. नागपूर, उजैन, अयोध्या, पुणे, बंगळुरू, भावनगर, करका अशा अनेक ठिकाणी या कार्यक्रमांचे आयोजन आम्ही केले. विशेष म्हणजे त्या ऋषितुल्य कलाकाराने मानधन न घेता केवळ ‘समाजाप्रती देणे’ या समर्पितभावाने कला सादर केली.
कॅन्सर पेशंटसाठी व्हायोलिनवादन या आमच्या प्रयोगाची आत्ताच सुरुवात झाली आहे.
हे प्रयोग कशासाठी?
आपण प्रयोगशील ऋषींचे वारसदार आहोत; असे नवनवे प्रयोग करून ज्ञानवृद्धी व संस्कृतिसंवर्धन करण्याचा वारसा आपल्याकडे चालत आलेला आहे. आपण त्याचे खरेखुरे वारसदार व्हायला हवे.
आधुनिक भाषेत सांगायचे तर या प्रयोगांतून आम्ही देशसेवा करीत आहोत. प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या संमिश्र सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करायला हवे, आपली प्रत्येक कृती देशासाठी अभिमानास्पद असायला हवी. आपल्या अभिजात कलांना अनोखे सामाजिक आयाम देऊन आम्ही आमच्या कर्तव्यांचे पालन करीत आहोत, अशी आमची प्रामाणिक भावना आहे.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com