शाळेत असताना विज्ञानाच्या प्रयोगशाळेत भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र यांतील प्रयोग, जीवशास्त्रातील प्राण्यांची व वनस्पतींची निरीक्षणे यांमध्ये लक्ष इतके गुंतून राही की प्रयोगाचा तास निरंतर सुरूच राहावा, त्याचे टोल कधी पडूच नयेत, असे वाटे. आज प्रेमाच्या प्रयोगांविषयी मनात हीच भावना आहे. पण प्रत्येकच गोष्टीला कुठे ना कुठे एक व्यवहार्य अंत असतो, त्यानुसार या प्रेमाच्या प्रयोगांना सध्यातरी पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे.

आम्हा समविचारी स्नेह्यंच्या परिवाराने या प्रयोगांची मुहूर्तमेढ करून थोडयाच काळात त्यांना वेग व आकार दिला. तेव्हा अनेक जणांनी आमची तुलना सिडनी व ब्रिट्रिस वेब यांच्याशी केली. हे ब्रिटिश दाम्पत्य म्हणजे ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या विश्वात मान्यता पावलेल्या संस्थेचे संस्थापक. विद्वत्तेच्या आणि एकूण आवाक्याच्या बाबतीत आमची त्यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही. व्यासंगाच्या बाबतीत आम्ही त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही. आम्ही ‘अंतरीची हाक’ ऐकून या प्रयोगांचा अध्याय सुरू केला आणि अगदी प्रांजळपणे सांगायचं तर हे प्रयोग करताना आम्हाला देहाच्या बंधनांची, मर्यादांची जाणीवच उरली नाही. आपण विश्वाकार झाल्याची अनुभूती अनेकदा आली. किंचितशा अभिमानाने आम्ही म्हणू शकलो की आमचे हे कार्य वेब दाम्पत्याच्या कामगिरीच्या तोडीचे आहे.

आमच्या प्रयोगांनी बाळसे भरल्यानंतर अनेकांनी आम्हाला सल्ला दिला की आम्ही संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून कार्य करावे. पण संस्थेचे संस्थान व्हायला वेळ लागत नाही. याला सन्माननीय अपवाद असतीलही. पण आम्हाला असे वाटते की आमच्यासाठी प्रेमसिंचन महत्त्वाचे आहे, पदे व पदाधिकार नाही. त्यासाठी संस्थेच्या औपचारिक चौकटीची गरज नाही. एक परिवार म्हणून आपण हे सर्व करू शकतो. जिच्याकडे प्रेमभरले हृदय आहे अशी कोणतीही व्यक्ती या परिवाराची सदस्य होऊ शकते. प्रत्येकाच्या हृदयात आमचे नोंदणी कार्यालय आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

या प्रयोगांविषयी लिहायला सुरुवात केल्यावर अनेक शुभचिंतकांनी लिखाण मनोरंजक व्हावे म्हणून अनेक कल्पना सुचवल्या. त्यावेळी आमची एक समविचारी भगिनी निशिगंधा ठाकूर हिने लिहिलेल्या ‘सत्य हेच साहित्य’ या पुस्तकाची आठवण झाली. साहित्य म्हणजे कल्पनाविलासात्मक लिखाण नव्हे तर सत्य व केवळ सत्याच्या अधिष्ठानावर उभारलेली इमारत, याचा आदर्श नमुना म्हणजे हे पुस्तक. प्रेमाच्या प्रयोगांच्या बाबतीत हे शंभर टक्के लागू आहे. या लिखाणातील प्रत्येक शब्द हा सत्याचा आविष्कार आहे. या प्रयोगांचे विषय, ते करण्याची पद्धती, त्यात सहभागी झालेले प्रयोगार्थी या कुठल्याच बाबतीत कल्पनारंजनाला थाराच नाही. जे घडले तेच जसेच्या तसे लिहिले आणि जे घडले ते मूलत:च इतके रोमांचकारी होते की त्याला उसने मनोरंजन मूल्य देण्याची गरज आम्हाला तरी भासली नाही. या प्रयोगांचे वाचन करणाऱ्यांनाही यातला प्रामाणिकपणा भिडला याची वेळोवेळी पावती मिळत गेली.

‘‘तुमचे ‘प्रेमाचे प्रयोग’ म्हणजे गांधीजींच्या ‘सत्याच्या प्रयोगांच्या’ मॉडेलवर आधारलेला उपक्रम आहे का?’’ अशी विचारणाही अनेकांकडून होते. पण खरं सांगायचं तर एम. के. या नामसाधम्र्यापलीकडे गांधीजी व आम्ही यांच्यात इतर कुठलाही समान दुवा नाही. त्या विश्वमानवाशी आमची बरोबरी व्हावी अशी आकांक्षा आमच्या मनात नाही.

पण हे म्हणत असताना ज्ञानेश्वरीतला एक सुंदर दृष्टांत आठवला. राजहंसाचे रूप, त्याचा डौलदार पदन्यास यांची ऐट खासच असते. पण त्याच्या अनुपम सौंदर्यामुळे स्वत:बद्दल न्यूनगंड बाळगून इतरांनी चालूच नये का? आम्ही राजहंस नसू, पण आम्ही आमच्या देवदत्त पायांनी चालण्याचा प्रयत्न केला, पंखांनी भरारी घेतली व हे सर्व परमेश्वराच्या कृपेने शक्य झाले. कधी ठेचकाळलो, धुळीत पडायची वेळ आली, पण त्या कृपावंत हातांनी सावरले, अलगद उचलले आणि जखमांवर हळुवार फुंकर घालून पुन्हा पंख पसरायची उभारी दिली. आम्ही रूपाने राजहंस नसलो तरी ‘परमार्थीचे राजहंस’ आहोत याची प्रचीती आम्ही अनेकदा घेतली.

याविषयी किती लिहावे त्याला काही मर्यादाच नाही. पण ‘शब्द बापुडे केवळ वारा.’ त्यांच्यात आमच्या सर्व भावना कशा मावणार? आपल्या भारतीय परंपरेत शब्दांचे लंगडेपण अनेक प्रकारे अधोरेखित केले आहे. अंतिम सत्य हे अनिर्वचनीय आहे, हे ठासून सांगितले आहे. जे अनिर्वचनीय आहे त्याला शब्दांत पकडण्याचा प्रयत्न कायम थिटाच असणार. पण लौकिक जीवनात शब्दांविना कुठलाही संवाद होऊ शकत नाही. आम्ही असा शब्दांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यासंदर्भात एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. एक व्यावहारिक गरज म्हणून लेखक या रकान्यात माझे नाव आले. पण अर्थातच, या प्रयोगांचे श्रेय केवळ नाही. आमच्या सर्व समविचारी मित्रांचा सामूहिक ‘अनाम’ चेहरा ही या सर्व प्रयोगांमागची शक्ती आहे. त्या प्रयोगांना शब्दरूप करण्याचे भाग्य मला लाभले इतकेच!

गाय आणि वासराचे कधी निरीक्षण केले असेल तर एक हृद्य दृश्य नेहमी दिसते. वासराचे दूध पिऊन झाले तरी ते गायीला लुचत राहते, ढुशा मारत राहते, तिच्या पोटावर डोके घासत स्पर्शाचा आनंद लुटत राहते. आमचे आता तसेच चालू आहे. पण आम्हाला खात्री आहे की ‘शब्दांवाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले’ या क्षमतेचे सर्व सहृदय वाचक आमच्या भावना समजून घेतील व आमच्या प्रेमाच्या प्रयोगांच्या वाटेवरचे यात्रिकही होतील!

सर्वाना सरत्या वर्षांतून नववर्षांत पदार्पण करण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

(समाप्त)

डॉ. मीनल कातरणीकर response.lokprabha@expressindia.com