18-lp-dr-minal८ मार्च- जागतिक महिला दिन. या निमित्ताने ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीनुसार ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम झाले. कर्तृत्ववान स्त्रियांच्या यशोगाथा गायल्या गेल्या. सर्वसाधारण स्त्रियांनी किती संघर्ष करून आपल्या आयुष्याला आकार दिला त्याच्या कहाण्या सांगितल्या गेल्या. स्त्री किती महान आहे, यावर कविता, भाषणे यांची रेलचेलही झाली. स्त्रीची कर्तबगारी, प्रतिष्ठा, समाजातील स्थान यांची उत्तुंगता दाखवणारे रमणीय चित्र ८ मार्चला सर्वत्र बघायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘मग, ते चित्र खोटं आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे का?’’ आमचे स्नेही जरा आक्रमक दिसत होते. ‘‘आज खरंच सर्व क्षेत्रांत स्त्रियांनी जी गरुडझेप घेतली आहे, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या प्रत्येक ठिकाणी उभ्या आहेत. तसंच पुरुषांपेक्षा वेगळी अशी दृष्टी, कार्यशैली त्यांच्याकडे आहे. स्वातंत्र्याचं वारं त्यांना चांगलं मानवलं आहे. यापुढे त्यांची घोडदौड थांबवणं कुणालाच शक्य नाही.’’

‘‘हे खरं असलं, तरी वर्षांतल्या ३६५ दिवसांपैकी एक दिवस ‘महिला दिन’ म्हणून साजरा करण्यासारखी परिस्थिती जगभर आहेच!’’ आम्ही त्यांच्या भरधाव गाडीला एकदम ब्रेक लावला. ते अडखळले, तरी त्यांनी तसं न दाखवता प्रतिहल्ला चढवला. ‘‘तुम्ही अगदी छिद्रान्वेषी आहात हो! प्रत्येक गोष्टीची कमकुवत बाजूच बरोबर हेरता. या महिला दिनाकडे सकारात्मक दृष्टीने बघा ना. महिलांचा गौरव दिन म्हणून त्याचे स्वागत करा.’’

‘‘सकारात्मक दृष्टी बाळगायला आमची हरकत नाही, पण त्या उत्साहात सत्याकडे डोळेझाक होता कामा नये. आम्हाला सांगा, प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात स्त्रीचा संबंध कधी येतो? अगदी जन्मापासून. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या रूपात स्त्रीची व आपली भेट होत राहते, पण आपल्याला स्त्रीची पहिली ओळख माता म्हणूनच होते. हे नैसर्गिक सत्य आहे. पण आज आपल्या सभोवती नजर टाकली तर कोणीही पुरुष मातृभावाने स्त्रीकडे बघताना किंवा तिच्याशी वर्तन करताना दिसतो का?’’

‘‘तुम्ही अगदी प्रतिगामी विचार करता बुवा! अहो, ‘आई’शिवाय स्त्रीची इतर रूपे खोटी तर नाहीत ना? मग तिला बहीण, मैत्रीण, प्रेयसी यांच्या रूपात बघितले तर चुकले कुठे?’’

‘‘यात चुकले कुठेच नाही. पण या सर्वामागून स्त्रीकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याची दृष्टी हळूहळू प्रवेशते . ती घातक आहे. या सर्व भूमिका स्त्रीच्या स्वातंत्र्याला मारक आहेत. आईच्या स्वातंत्र्यावर आपण किंवा समाज बंधने लादू शकत नाही. पण बहीण, मैत्रीण, पत्नी, प्रेयसी किंवा इतर नाती स्त्रीच्या स्वातंत्र्याचा मोठय़ा प्रमाणावर संकोच करतात, त्यांच्या पिळवणुकीला किंवा छळाला किंवा तत्सम प्रकारांना आमंत्रण देतात.’’

‘‘हो, पण आता स्त्रियांच्या संरक्षणार्थ प्रभावी कायदे केले आहेत. राखीव जागांची भरीव तरतूद करून त्यांच्या सक्षमीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत.’’ ‘‘कायदे केले, पण त्यांच्या अंमलबजावणीचे काय? हे सर्व वरवरचे उपाय आहेत, दुखण्यावरचे उपचार. त्यातून दुखण्याला प्रतिबंध होत नाही.’’

‘‘म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे?’’ ‘‘स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला रोखण्यासाठी आपण कायदे केले, पण स्त्रियांवर अन्याय होऊ न देण्याची मानसिकता समाजात निर्माण केली का? ती केली नाही तर कायदे म्हणजे फक्त वरवरची मलमपट्टी ठरेल. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी आपण राखीव जागा निर्माण केल्या, पण त्याबरोबर त्यांच्यासाठी शत्रू निर्माण केले. स्त्रियांच्या राखीव जागांमुळे ज्यांच्या संधी गेल्या तो तमाम पुरुषवर्ग त्यांच्याकडे स्पर्धक किंवा दुश्मन म्हणून पाहू लागला. स्त्रियांचे सक्षमीकरण सुदृढ समाजासाठी आवश्यक आहे, हा विचार समाजात रुजवण्याचे प्रयत्न आपण केले नाहीत किंवा जे केले ते अपुरे आहेत, हे चित्र बदलायला हवं. स्त्रियांबद्दल सर्वजण किमान आदराची भावना बाळगतील, असं वातावरण निर्माण करायला हवं. पूर्वी स्त्रीचा देवी म्हणून सन्मान होत असे. आधुनिक स्त्रीची अपेक्षा आहे की आम्हाला देवी नको, एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून वागवा. ही अपेक्षा अवास्तव आहे का?’’

‘‘तुमच्याकडे काही उपाय असतीलच!’’ इति स्नेही. ‘‘उपाय आहेत का माहीत नाही, पण कुठल्या दिशेने जायचे याचे काही आडाखे आहेत. आपल्या बोलण्यात किती तरी अपशब्द स्त्रीसंदर्भात असतात. लहान मुलांपासून मोठय़ा माणसांपर्यंत सर्वाच्याच तोंडी आईबहिणीवरून शिव्या असतात. यातून स्त्रीविषयी नकळत अनादर रुजतो. आपल्याला महिला दिन साजरा करायचा असेल तर त्या दिवसापासून असे अनादरयुक्त शब्द वापरणार नाही, इतरांना वापरू देणार नाही, असा निश्चय करायला हवा.’’

‘‘मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षिकांना ‘बाई’ म्हणतात. आता शिक्षिकाही ‘बाई’च आणि घरकाम करणारीसुद्धा ‘बाई’च? शिक्षिकांसाठी सन्मानपूर्ण शब्द आपण बोलण्यात रुजवायला हवा. या फारच लहान गोष्टी आहेत. पण त्यांचा संबंध लहान मुलांशी, त्यांच्या बोलण्याशी व त्यातून रुजणाऱ्या मूल्यांशी असल्यामुळे त्यांची परिणामकारकता दीर्घकालीन ठरते.’’ आमचे स्नेही या सूचनांचा गंभीरपणे विचार करू लागले.

‘‘आमचे गावी राहणारे एक मित्र आहेत. त्यांनी महिला दिनानिमित्त एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ते म्हणतात निसर्गातील स्त्रीरूप म्हणजे नदी- स्त्रीसारखीच जीवनदायिनी. महिला दिनाचे औचित्य साधून नद्यांचे योग्य संवर्धन व शुद्धीकरण याविषयी जनजागृती करण्याचा वसा त्यांनी घेतला आहे. यासाठी १००० शाळांचे उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवले आहे.’’ आमचे स्नेही या अनोख्या कल्पनेने प्रभावित झाले.

चला, आपण सगळे या महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या रूढींना व सवयींना हद्दपार करू या व आपल्या कार्याला विज्ञानाचे अधिष्ठानही देऊ या.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व प्रेमाचे प्रयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman international womens day