‘‘चला बाबा, ऑक्टोबर महिन्याच्या टूरचं बुकिंग करून आलो. आता घरच्यांची भुणभुण कमी होईल. टूर-प्लािनग आणि शॉिपग यासाठी काही त्यांना माझी गरज नाही.’’

‘‘तुम्ही अगदी नियमितपणे सहलींना जाता नाही?’’

‘‘हो तर आणि तेसुद्धा एकाच पर्यटन कंपनीबरोबर. मागच्या वर्षी आमच्या त्यांच्याबरोबर दहा सहली पूर्ण झाल्या.’’

‘‘मग, त्यांनी त्यांचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून तुमची नेमणूक केली की नाही?’’

‘‘काय थट्टा करता? आम्ही काही त्यांच्यासाठी जात नाही, आम्ही आमच्या आनंदासाठी जातो.’’

‘‘थट्टा नाही, आम्ही अगदी प्रामाणिक कुतूहलाने विचारलं. खरं म्हणजे तुम्हाला असं विचारायचं आहे, की लोक पर्यटनाला कशासाठी जातात? आता तुमचंच बघा, तुम्ही जवळजवळ र्अध जग फिरलात, भारतही बघितलाच असेल. काय उद्देश असतो पर्यटनाचा?’’

त्यांचा आवडीचा विषय निघाल्यावर त्यांची कळी खुलली. त्यांनी बठकच मारली.

‘‘अहो, आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवलं आहे ना-

‘केल्याने देशाटन

पंडितमत्री सभेत संचार

होतसे ज्ञान मनुजा

चातुर्य येतसे फार’

आता पंडितमत्री आणि सभासंचार हे काही आमचे प्रांत नाहीत. पण देशाटन-पर्यटन हा आमचा वीक-पॉइंट आहे. आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनाचा थकवा जावा, रिफ्रेश व्हावं, नवनवे प्रदेश बघावेत, नवीन ओळखी व्हाव्यात असे अनेक उद्देश सफल होतात.’’

‘‘तुमचा मित्रपरिवार बराच वाढला असेल ना? सर्वजण याच उद्देशाने येतात का?’’

‘‘अहो, दर ट्रीपमध्ये नवे सहप्रवासी. सहलीहून घरी परतल्यावर काही दिवस उत्साहाने संपर्क ठेवला जातो, हळूहळू आपले दैनंदिन व्याप सुरू झाले की त्याचे रंग फिकट होत जातात. ‘सारे प्रवासी घडीचे!’ दुसरं काय? आणि येणाऱ्यांच्या तऱ्हा तरी किती! कोणी निरुद्देश भटकंतीसाठी, कोणी जणू फक्त फोटो काढण्यासाठी किंवा शॉिपग करण्यासाठीच येतात. पण आमच्या सहलींमुळे आम्हाला क्रीडा-पर्यटन, धार्मिक-पर्यटन, आरोग्य-पर्यटन असे अनेक प्रकार बघायला मिळाले. आम्ही मात्र स्वत:ला असं बांधून घेतलं नाही. आम्ही केवळ मस्तमौला बनून फिरतो आणि ताजेतवाने होऊन येतो.’’

त्यांचं बोलणं ऐकता ऐकता मन एकदम भूतकाळात गेलं. आमचे आजी-आजोबा एका धार्मिक सहलीला जाऊन आले; आणि आल्यानंतर दोघांनीही आपापल्या आवडीच्या एका पदार्थाचा त्याग केला. त्या सहलीची आयुष्यभर आठवण राहावी म्हणून! आपण आता अशा आठवणी फोटोंमधून जपतो. जुन्या काळात ते प्रमाण जरा कमी होते; सहलींच्या संधी व सोयीदेखील दुर्मीळ होत्या; कदाचित त्यामुळेच जी सहल किंवा यात्रा करू तिची आठवण इतक्या जिवापाड जपण्याकडे लोकांचा कल असायचा. आता ही वस्तूचा त्याग करण्याची कल्पना लोकांना कदाचित हास्यास्पद वाटेल.

आमची एक सहल आमच्या चांगलीच स्मरणात राहिली आहे आणि ती म्हणजे शांतिनिकेतनची सहल. काही वर्षांपूर्वी आम्ही अंदाजे २०-२५ जण गुरुदेव टागोरांनी उभारलेले शांतिनिकेतन बघण्याच्या इच्छेने झपाटलो व पुढच्या गोष्टी घडत गेल्या. अनपेक्षितपणे तेथील पूर्वपल्ली अतिथीगृहात आमची सर्वाची राहण्याची सोय झाल्याचा आम्हाला फोन आला व आम्ही उत्साहाने तयारीला लागलो. तयारीही खासच. रवींद्रनाथांचे चरित्र व शांतिनिकेतनविषयी जमेल तेवढे साहित्य आम्ही सर्वानी वाचून काढले व तिथे फिरताना आम्हाला एक विशेष नजर मिळाली. ती सहल आम्हा सर्वानाच खूप श्रीमंत करून गेली. काही फोटो, खूपशा आठवणी आणि शांतिनिकेतनच्या भूमीवर तिथलेच होऊन राहिल्याचा अपार आनंद!

त्या सहलीपासून आमच्या अंगी एक सवय बाणली. कुठेही पर्यटनाला जाताना तिथली जमेल तितकी माहिती मिळवायची. वस्तुसंग्रहालये, विशेष संस्था, स्थानिक महत्त्वाची व जिव्हाळयाची ठिकाणे व व्यक्ती, दु:खितांचे अश्रू पुसण्यासाठी काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती, नवीन प्रयोग करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांच्याबद्दल शक्य तितकी माहिती जमा करूनच आम्ही देश-विदेशातील पर्यटनाला निघतो. स्थानिक अन्न नाईलाज म्हणून नव्हे तर आनंदाने खातो. शक्य असेल तर सुसज्ज हॉटेलांपेक्षा तिथल्या वैशिष्टय़पूर्ण ठिकाणी राहतो. तिथे झालेल्या ओळखी दीर्घकाळ टिकवून ठेवतो व त्यांनाही आमच्या घरी येण्याचे अगत्याने आमंत्रण देतो. आणि हो, प्रवासात भेटणाऱ्या लोकांचे, विशेषत: वाहतूक कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी स्वच्छ करून देतो. पर्यटनातून आनंद मिळवण्याची आमची ही तऱ्हा.

आज जग खूप जवळ आले आहे, अद्ययावत् साधनांमुळे प्रवासही सुखकर झाला आहे. त्यामुळे पर्यटनाला खूपच चालना मिळाली आहे. पण या सर्व बायात्रा; अंतर्यात्रेचे काय?

‘‘आता हे काय नवीन?’’

‘‘अंतर्यात्रा म्हणजे आपण प्रत्येकाने आपल्या अंतरंगात केलेली यात्रा.’’

जैन धर्मातील प्रेक्षाध्यानात अंतर्यात्रा ही एक पायरी आहे. त्यामध्ये व्यक्तीने शरीरातील शक्तिकेंद्रांपासून ते ज्ञानकेंद्रापर्यंत विशेष अवलोकन करणे अभिप्रेत असते. आम्हाला एवढय़ा तांत्रिक अर्थाने अंतर्यात्रा अपेक्षित नाही. पण अंतरंगातील प्रवास प्रत्येकाने मौनावस्थेत तटस्थपणे व चिकित्सकपणे करावा, स्वत:च्या विकासासाठी तो आवश्यक आहे, असे वाटते.

‘‘त्यात करायचं काय आहे? आपलं मन क्षणोक्षणी काहीतरी विचार करतंच असतं ना.’’

‘‘ते विचार म्हणजे अंतर्यात्रा नव्हे. त्या विचारांचे निरीक्षण म्हणजे अंतर्यात्रा. एकदा करून बघा, म्हणजे त्यातली विविधता कळेल. कधी समाधानाची, कधी आनंदाची, कधी पश्चात्तापाची, कधी सार्थकाची, कधी प्रेमाची..’’

गोनीदांची ‘भ्रमणगाथा’ हा बायात्रा व अंतर्यात्रा यांच्या मिलाफाचा सुरेख नमुना आहे.

आमचे स्नेही विचारमग्न झाले. बहुधा अंतर्यात्रेत असावेत! त्यांना तसेच सोडून आम्हीदेखील आमच्या अंतर्यात्रेला निघालो.
डॉ. मीनल कातरणीकर

response.lokprabha@expressindia.com

Story img Loader