35-lp-minal‘‘मग, आला तुमचा सर्टिफाइड दिवस!’’

आमचा प्रश्नार्थक चेहरा आणि बरेच संमिश्र भाव.

‘‘अहो, म्हणजे व्हॅलेंटाइन डे. प्रेमाचा महोत्सव ना.’’

अरे खरंच! सध्या सगळीकडे गुलाबी रंगाचं आणि हृदयाच्या आकाराच्या वस्तूंचं साम्राज्य आहे, कारण दोनच दिवसांवर व्हॅलेंटाइन डे आहे- आपले प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस. असं म्हणतात की, सगळी तरुणाई या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते.

दिन-माहात्म्य, स्थान-माहात्म्य या सर्व गोष्टी मान्य केल्या तरी काही प्रश्न डोके वर काढू लागले.

प्रेम व्यक्त करण्यासाठी असा वर्षभरातील एखादा दिवस राखून ठेवावा लागतो का? प्रेमासारख्या उत्स्फूर्त, नैसर्गिक भावनेच्या आविष्कारासाठी वर्षांतील ‘तो’ दिवस कधी उजाडेल याची वाट पाहत बसायचे? अशा ठरवून व्यक्त केलेल्या प्रेमात ती स्वाभाविकता असेल का? हे म्हणजे ढगाने पाण्याची बरसात करण्यासाठी मुहूर्त बघण्यासारखंच.

‘‘अरे, काय तुम्ही असा ‘बॅकवर्ड’ विचार करता? तरुण मुले बघा, आता जुनाटपणाने पंचांगातून मुहूर्त शोधत नाहीत. सरळ व्हॅलेंटाइन डेलाच लग्न करण्याचा आग्रह धरतात. त्यांची मानसिकता समजून घ्या. त्यांच्या मॉडर्निटीचा स्वीकार तरी करून बघा. सारखं काय तेच ते पुराण?’’

हे आणखीच काही तरी नवीन होतं. म्हणजे, फक्त व्हॅलेंटाइन डेचा ‘मुहूर्त’ साधून लग्न करणं ही मॉडर्निटी? (तरी बरं, त्यातली किती लग्ने त्या प्रेमी जोडप्यांनी आयुष्यभर टिकवली, असा अडचणीत टाकणारा प्रश्न त्यांच्यापुढे फेकला नाही, ते असो.) आम्हाला यातून दोन महत्त्वाच्या गोष्टींचा बोध झाला. एक म्हणजे तरुण पिढीने ‘जुन्यापुराण्या’ मुहूर्ताना बाजूला सारून ‘आधुनिक’ मुहूर्ताची स्थापना केली आहे आणि दुसरे म्हणजे, प्रेमाची आपली संकल्पना बहुतांशी प्रियकर-प्रेयसी यांच्यातील नात्याशी व मुख्यत्वे शरीराशी निगडित आहे. व्हॅलेंटाइन डे हा या प्रेमाचा उत्सव आहे.

‘‘आलात का तुमचा फलसफा (उर्दू शब्द- तत्त्वज्ञान) घेऊन?’’

‘‘अर्थातच! पण हा आरामखुर्चीत बसून आस्वाद घ्यायचा फलसफा नाही. कृतीत उतरवायचा आहे आणि प्रेमभावना या शरीराच्या मर्यादा पार करून अधिक व्यापकही व्हायला हवी. तसे नसते तर आम्ही दिग्गज कविवर्याच्या प्रेमकविता गायल्या असत्या; पण आमच्यासाठी ‘सत्य हेच साहित्य’ आणि आपल्या अवतीभवती अशा अनोख्या कृतिशील प्रेमाची अनेक उदाहरणे आहेत.’’

‘‘अच्छा, काय करतात हे प्रेमवीर?’’

आमच्या ओळखीच्या एक काकू आहेत. वयस्कर आहेत; पण उत्साही आणि चळवळ्या आहेत. काही ना काही निमित्ताने त्यांच्याकडे हळदीकुंकवासारखे कार्यक्रम वारंवार होत असतात; पण त्यांना असं वाटू लागलं की, आपण फार साचेबद्ध झालो आहोत. त्यांनी बराच विचार केला. एका हळदीकुंकवाला त्यांनी त्यांच्या परिचित स्त्रियांना बोलावले नाही; त्या जवळच्या पोलीस वसाहतीत गेल्या आणि त्या सर्व पोलिसांच्या सर्व पत्नींना त्यांनी कार्यक्रमाचे आमंत्रण दिले. एक अपरिचित स्त्री आपल्याला बोलवत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले. काही जणी गेल्या नाहीत; पण बऱ्याच जणी कुतूहलाने गेल्या. ‘‘तुम्हा सर्वाचे पती जोखमीची कामे करतात, जीव धोक्यात घालतात. ते डय़ुटीवर गेले की, तुमची घालमेल होत असेल. तुमच्या अखंड सौभाग्यासाठी तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात असे वाटले, म्हणून या वेळी तुम्हाला बोलावले. आता प्रत्येक वेळी बोलावेन.’’ काकूंनी आपली भूमिका मांडली. आपले एक लहानसे पाऊल आपल्याला रक्ताच्या नात्यापलीकडच्या इतक्या बहिणी व त्यांची कुटुंबे मिळवून देईल, याची काकूंनासुद्धा कल्पना नव्हती.

‘‘आपल्या सोसायटीतल्या एका तरुणाला एका आजींबद्दल समजलं. त्या आजींची सांपत्तिक स्थिती उत्तम, पतिदेव निवर्तलेले, दोन्ही मुले परदेशात आणि या एकटय़ाच भारतात.  हा तरुण मुलगा एक दिवस त्यांच्याकडे गेला आणि गप्पा मारून आला. आता तो नियमितपणे  त्यांच्याशी गप्पा मारतो, बाहेरची बारीकसारीक कामे करतो, त्यांचा एकटेपणा घालवण्याचा मनापासून प्रयत्न करतो.’’

‘‘हो, हो, आपल्या घरातल्या वृद्धांना वृद्धाश्रमात टाकायचे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि बाहेर या लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या! छान उद्योग आहे!!’’

‘‘नाही; त्याला स्वत:च्या घरातल्या वृद्धांची सेवा करण्याची दुर्दैवाने संधी मिळाली नाही; पण सेवा फक्त आपल्याच माणसांची करायची नसते, अशा निरपेक्ष प्रेमातूनही स्नेहबंध निर्माण होतात, हे त्याने आपल्या कृतीतून अनुभवलं.’’

‘‘आपण त्या प्रदर्शनात गेलो होतो, आठवतं का? तिथे आपण त्या पिशव्यांच्या स्टॉलवरून विणलेल्या पर्सेस घेतल्या होत्या. त्या मावशी कित्येक वर्षांपासून तऱ्हेतऱ्हेच्या पर्सेस विणतात, इतरांना देतात, प्रदर्शनात विक्री करतात. घरबसल्या त्यांचा व्यवसाय उत्तम सुरू आहे; पण एक दिवस त्या अनाथ-अपंग मुलींच्या संस्थेत गेल्या. आपली पर्सेस विणण्याची कला तिथल्या मुलींना नि:शुल्क शिकवण्याची इच्छा त्यांनी संस्थाचालकांना सांगितली. त्यांनाही आनंद झाला. मावशी आता त्या मुलींसाठी नवीन डिझाइन्स तयार करतात. मुलीसुद्धा मावशीची आतुरतेने वाट बघतात, त्यांच्यातल्या या अकृत्रिम स्नेहात वयाचा फरक केव्हाच गळून पडला आहे.’’

आणखी किती उदाहरणं देऊ?

‘‘पुरे, आम्हाला समजले, प्रेम हे केवळ शरीरापुरते व व्यावहारिक नात्यांपुरते नाही. ते केव्हाही व्यक्त करता येते. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस व्हॅलेंटाइन डे होवो व जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ‘यू आर माय व्हॅलेंटाइन’ असे म्हणायची संधी मिळो, ही प्रभुचरणी प्रार्थना!’’

‘‘तथास्तु!!’’
डॉ. मीनल कातरणीकर
response.lokprabha@expressindia.com

Story img Loader