चित्रकथी
वृत्तछायाचित्रण नेमके कशाशी खातात आणि चांगले व्यावसायिक वृत्तछायाचित्रण म्हणजे काय, या दोन्ही बाबी समजून घ्यायच्या असतील तर ब्रुक्स क्राफ्ट समजून घ्यावा लागेल. टाइम, वॉल स्ट्रीट जर्नल, लाइफ, बिझनेस वीक, व्हॅनिटी फेअर, एनबीसी न्यूज, सीएनएन, फ्रंटलाइन, सोर्स मीडिया, कोस्टल लाइफ ही जगप्रसिद्ध वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके वाचणाऱ्यांसाठी किंवा चॅनल्स पाहणाऱ्यांसाठी ब्रुक्स क्राफ्ट हे नाव तसे नवीन नाही. कदाचित तुम्ही त्याला चेहऱ्याने ओळखत नसाल किंवा मग छायाचित्रांखालचे छायाचित्रकाराचे नाव पाहण्याची सवय नसेल तर नावही प्रथमच ऐकत असाल. पण छायाचित्रे सांगितली की, निश्चितच ओळख पटेल. मध्यंतरी जगप्रसिद्ध टाइम साप्ताहिकाने एक फोटो प्रसिद्ध केला होता. अर्थात ते त्यांचे मुखपृष्ठ जगभरात गाजले. होतेच तसे ते.. व्हाइस हाऊसचा व्हरांडा आणि त्यातून हसतखेळत पाठमोऱ्या जाणाऱ्या जगभरातील तीन प्रभावशाली व्यक्ती. मधोमध अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या दोन्ही बाजूंस दोन माजी राष्ट्राध्यक्ष बिल िक्लटन आणि जॉर्ज बुश. खरेतर हे छायाचित्र पाठमोरे आहे. त्यात कुणाच्याही चेहऱ्यावरील भाव त्यामुळे दिसत नाहीत. पण तरीही ते बोलके आहे. कारण पाठमोरे असले तरी तिघांची देहबोली खूप काही सांगून जाते. ओबामांचे दोन्ही हात त्या दोघांच्या कमरेभोवती हलकेच आहेत आणि बुश व िक्लटन यांचे हसरे चेहरे काहीसे तिरक्या कोनातून दिसताहेत. छायाचित्रकाराला तो नेमका क्षण त्यात पकडता आला आहे. अर्थात हा असा दुर्मीळ क्षण टाइमच्या मुखपृष्ठावर न झळकता तरच नवल. जगभरात गाजलेले हे छायाचित्र होते ब्रुक्स क्राफ्टचे. आताच ब्रुक्सची आठवण येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यंदाचा सर्वोत्कृष्ट छायाचित्रकाराचा पुरस्कार त्याला अलीकडेच प्रदान करण्यात आला.

त्याचे आणखी एक छायाचित्र त्याला या पुरस्काराप्रत नेण्यास कारण ठरले. बराक ओबामांचे ते छायाचित्र त्याने गेल्या वर्षी पार पडलेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारादरम्यान टिपले होते. या प्रचारादरम्यान टिपलेली सर्व छायाचित्रे ही कृष्णधवल आहेत. आणि ती पाहिल्यानंतर लक्षात येते की, त्या कृष्णधवल रंगांमध्येच ती जबरदस्त परिणामकारक ठरतात. त्याबद्दलही छायाचित्रकाराचे कौतुक करावे तेवढे थोडेच. त्याची ही संपूर्ण मालिका ब्रुक्सच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यात अनेक प्रभावी छायाचित्रे आहेत. ही सर्व छायाचित्रे उत्तम वृत्तछायाचित्रणाचा वस्तुपाठच आहेत. ओबामांशी हात मिळविण्यासाठी आसुसलेल्या चाहत्यांचे छायाचित्र तर तो जबरदस्त क्षण जिवंत ठेवणारे असेच आहे. या मालिकेतील सर्व छायाचित्रांवर कडी करतात आणि त्यातील एक आहे त्यांच्या निवडीनंतरचे. रंगीबेरंगी कागदाच्या तुकडय़ांचा आकर्षक वर्षांव केला जातो तेव्हाचे आणि दुसरे आहे १४ जुल २०१२ रोजी ग्लेन अलेन येथे टिपलेले त्यांच्या निवडणूक प्रचार भाषणादरम्यानचे. हे प्रचाराचे भाषण सुरू असतानाच अचानक पाऊस सुरू झाला आणि छत्री नाकारून ओबामांनी त्यांचे ते धीरगंभीर भाषण तसेच सुरू ठेवले. भाषणाची लय जराही बिघडू दिली नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील गांभीर्यभावांना एक नाटय़ात्म पाश्र्वभूमी देण्याचे कामच पावसाच्या थेंबांनी केले आहे. ओबामांचे आजवरचे हे सर्वाधिक नाटय़ात्म असे छायाचित्र आहे, तेच जगातील सर्वोत्कृष्टही ठरावे. तो नाटय़ात्म क्षण नेमका पकडणे हे ब्रुक्सचे कौशल्य आहे. हे छायाचित्रही त्याला समोरच्या बाजूने सहज टिपता आले असते. पण त्याने एका बाजूला जाऊन वेगळ्या कोनातून ओबामा वळताच टिपले आहे. त्यात पुढे झालेला त्यांचा हात त्या छायाचित्रात आऊट ऑफ फोकस असल्याने धूसर दिसतो, पण तोही एक वेगळेच नाटय़ छायाचित्रात निर्माण करतो. ब्रुक्स आपल्याला केवळ राजकारणी ओबामाच दाखवत नाही तर दुकानात आंबे खरेदीपूर्वी आंब्याच्या फळाचा वास घेणारे ओबामाही ब्रुक्सच्या छायाचित्रात दिसतात.

ब्रुक्सने त्याच्या राजकीय चित्रणादरम्यानही अनेक आगळे क्षण टिपले आहेत. त्यात बिल आणि हिलरी िक्लटन यांचे तोंडावर बोट ठेवत कुणाला तरी ‘गप्प बसा’ असे सांगतानाचे एक वेगळे छायाचित्र आहे. बहुधा ते मुलांसोबतचे असावे. पण क्षण एकदम वेगळा आहे.
पण ब्रुक्सचे सारे कर्तृत्व हे काही केवळ राजकीय चित्रणामध्येच नाही तर त्याने टिपलेली सिटीस्केप्स किंवा लँडस्केप्स, पोट्र्रेट्स, आíकटेक्चरल फोटोग्राफी हीदेखील तेवढीच स्वारस्यपूर्ण आहे. कोणत्या तरी एका विद्यापीठामधील एका भागाचे त्याने टिपलेले छायाचित्र केवळ अप्रतिम आहे. त्यात समोर मधोमध असलेल्या दरवाजाचे फरशीवर पडलेले प्रतििबब तर आहेच, पण त्याही आधी असलेल्या एका कमानीच्या िभतीवर पडलेल्या उन्हाच्या तिरिपीने त्या चित्रणाला एक वेगळेच परिमाण प्राप्त करून दिले आहे. आíकटेक्चरल फोटोग्राफीमध्ये अनेक मितींबरोबरच चांगल्या सौंदर्यपूर्ण अशा रचनांनाही तेवढेच महत्त्व असते. या दोन्हींचा मिलाफ या चित्रामध्ये झालेला दिसतो. सिटीस्केपमध्ये जातील अशी दोन चांगली छायाचित्रेही विशेष गाजली आहेत. त्यातील एकामध्ये बर्फ पडल्यानंतर पानगळ झालेल्या वृक्षांच्या पाश्र्वभूमीवर वॉिशग्टन मॉन्युमेंट पाहायला मिळते. दुसरे आहे ते पर्यटन या विषयावरचे. त्यात एका अप्रतिम निसर्गरम्य स्थळी एक व्यक्ती निवांत बसलेली दिसते. अनेकदा वृत्त छायाचित्रणामध्ये व्यक्तीचा चेहरा दाखवायचा नसतो, कारण त्या छायाचित्रात त्याला महत्त्व नसते, पण व्यक्तीला महत्त्व असते. व्यक्ती दाखवायची, पण चेहरा नाही आणि तरीही छायाचित्र चांगले असले पाहिजे ही म्हणजे वृत्तछायाचित्रकारांसाठी अनेकदा परीक्षाच असते. ब्रुक्स हा या परीक्षेत सर्वप्रथम आलेला गडी आहे हेच हे छायाचित्र सिद्ध करते. त्यात व्यक्ती महत्त्वाची ठरत नाही, पण ती आहे आणि पाहणाऱ्याचे लक्ष निसर्ग, त्यातील वेधक रंगसंगती आणि निरवतेकडेच जाते. हेच ब्रुक्सचे यश आहे.
खरेतर ओबामांच्या व्यक्तिचित्रणातून आपल्याला तो उत्तम व्यक्तिचित्रण करणारा असल्याचे कळलेले असते, पण त्याच्या प्रोफाइलमधील व्यक्तिचित्रे पाहिली की तो किती माहिर आहे, याचाही प्रत्यय येतो. ब्रुक्स वेगळा ठरतो कारण वेगळे टिपायाचे म्हणजे काय करायचे हे त्याला पक्के ठाऊक आहे. म्हणूनच जेव्हा इतर मंडळी इंद्रधनुष्य टिपण्यासाठी केवळ त्यावर लक्ष केंद्रित करतात, तेव्हा ब्रुक्स इंद्रधनुष्य टिपतो ते त्याकडे उत्सुकतेने पाहणाऱ्या पाठमोऱ्या भाऊबहिणीच्या बरोबर मधून!

Story img Loader