घर खरेदी करताना नेमकं काय काय पहायचं, कशाकशाचा विचार करायचा आणि निर्णय घ्यायचा याबाबत खूपदा आपल्याला माहिती नसते. म्हणून संबंधित व्यवहार करताना काय करावं आणि करू नये याची माहिती-

प्रश्न : नवीन सदनिका खरेदी करतेवेळी काय करायला हवे आणि काय करू नये?
सुरेश देवळालकर, हैदराबाद.

उत्तर : नवीन सदनिका ठेकेदार किंवा विकासकाकडून (बिल्डर-डेव्हलपर) खरेदी करतेवेळी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट (मोफा) हा कायदा लागू होतो. त्यातील तरतुदींमध्ये बिल्डर आणि ग्राहक यांच्यामधील करार कसा असावा याची माहिती दिलेली आहे. त्यानुसार करारपत्र असावे. सदनिका खरेदी करताना त्याची रक्कम चटई क्षेत्रफळाच्या (कार्पेट एरियावर) आधारावर ठरविण्यात यावी, अशी तरतूद सुधारित कायद्यात आहे. त्यानुसारच सदनिकेचे मूल्य निश्चित केले असल्याची खात्री करून घेण्यात यावी. खरेदीदार या तरतुदींकडे दुर्लक्ष करतात. त्याचा फायदा बिल्डर लॉबी घेत आली आहे. नवीन सदनिका खरेदी करतेवेळी घ्यायची काळजी –
१. ज्या जमिनीवर इमारत आहे, ती जमीन (प्लॉट) शासनाची, वन खात्याची अथवा आदिवासींच्या मालकीची नसावी. ती बेकायदेशीरपणे अधिग्रहण केलेली नसावी. तर ती बोजाविरहित (फ्री होल्ड) किंवा भाडेतत्त्वावर (लीज होल्ड) यापैकी कशी आहे, याची खात्री करून घ्यावी. इमारत बांधलेली जमीन बिनशेती (एन.ए.) परवाना प्राप्त असावी.
२. ज्या जमिनीवर इमारत बांधलेली आहे अशा बांधकामाला आणि बांधकाम नकाशांना महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच संबंधित प्राधिकरणांची रीतसर मंजुरी- परवानगी घेण्यात आली असल्याची खात्री करून घ्यावी. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला (ऑक्युपेशन सर्टिफिकेट) व इमारतीचा ताबा घेण्यासाठी- राहण्यासाठी परिपूर्ण असल्याबाबतचा ना हरकत दाखला (एन.ओ.सी.) तपासून घ्यावा. त्याचप्रमाणे सदर जमिनीसंदर्भातील ७-१२ व इंडेक्स टूच्या उताऱ्यावरील नोंदीसुद्धा तपासून घ्याव्यात.
३. ठेकेदाराने किंवा बिल्डरने जाहिरातींमधून प्रसिद्ध केलेल्या व सदनिका खरेदीदारांना देऊ केलेल्या सदनिकेमधील व परिसरातील सुविधांसह सर्व सुखसोयींचा अंतर्भाव करारपत्रानुसार असल्याची खात्री करून घ्यावी.
४. सदनिकाधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था रीतसर स्थापन करून तिच्या संपूर्ण दप्तराचा ताबा त्या संस्थेच्या सभासदांकडे हस्तांतरित करतेवेळी जमिनीचे मालकी हक्कसुद्धा हस्तांतरित करण्याची (कन्व्हेयन्स) तरतूद करारनाम्यात केली असल्याची खात्री करून घ्यावी.
५. करारनाम्यातील तरतुदींनुसार व देऊ केलेल्या सोयीसुविधांनुसार बिल्डरने सर्व पूर्तता केली असेल तरच सदनिकेचा ताबा घ्या; अन्यथा अपूर्तता व अन्य तक्रारींच्या संदर्भात बिल्डरबरोबर (लेखी) पत्रव्यवहार करावा व त्याची पोहोच घ्यावी. जेणेकरून भविष्यात त्याचा पुरावा म्हणून उपयोग होऊ शकेल.
६. बिल्डर तथा ठेकेदाराने मालमत्ता कर, वीजबिले, पाणीपट्टी व इतर कर संबंधित प्राधिकरणाकडे वेळोवेळी भरली असल्याची म्हणजेच थकबाकी नसल्याची खात्री करून घ्यावी, अन्यथा मोठय़ा प्रमाणात थकबाकी निघाली तर त्याचा बोजा सदनिकाधारकांवर म्हणजेच ग्राहकांवर पडतो याची गांभीर्याने नोंद घ्यावी. त्याच वेळी सांडपाणी, वीज व पिण्यायोग्य पाण्याच्या जोडण्या इमारतीला रीतसर देण्यात आल्याची खात्री करून घ्यावी.
७. सदनिकेमध्ये अंतर्गत दिलेल्या सोयी-सुविधांचा दर्जा करारपत्रातील नोंदींनुसार असल्याची व तसेच ते कार्यान्वित असल्याची खात्री करून घेण्यात यावी.
८. सदनिकेच्या इमारतीसंदर्भात आर्किटेक्ट, इंजिनीयर आणि अॅडव्होकेटस् यांनी जमीन व त्यावरील बांधकामासंदर्भात तयार केलेले अहवाल काळजीपूर्वक वाचून ग्राहक हक्काला बाधा नसल्याची खात्री करून घ्यावी.
९. इमारतीमधील सदनिकांसंदर्भात भिंतींमधून- गच्चीवरून विहित कालावधीत गळती होणार नसल्याचे हमीपत्र आणि गळती झाल्यास त्याबाबतच्या स्वखर्चाने करावयाच्या दुरुस्तीबाबत हमीपत्रात तरतूद करण्यात आली असल्याची खात्री करून घ्यावी.
१०. बिल्डर तथा विकासकाकडून सदनिका खरेदी करतेवेळी पुरावा म्हणून धनादेशाने (चेकने) रकमा अदा कराव्यात. दिलेल्या रकमांच्या संदर्भातील पावत्या वेळीच तपासून घ्याव्यात व आपण निवड केलेल्या सदनिकेचा क्रमांक त्या पावतीवर तसेच करारनाम्यात नोंदलेला असल्याची खात्री करून घ्यावी.
पुढील गोष्टी टाळाव्यात.
* सदनिका खरेदीच्या बाबतीत घाई किंवा उतावीळपणा टाळावा. तसेच परिसरातील सोयी-सुविधांची खात्री करून घ्यावी.
* रोखीने व्यवहार (कॅश पेमेंट) टाळावेत. त्याचप्रमाणे नोंदणीकृत करार करण्याबाबत विलंब टाळावा.
* दिलेल्या रकमांच्या संदर्भात रेव्हेन्यू स्टॅम्प लावलेल्या व अधिकृत व्यक्तीच्या सह्या असलेल्या पावत्या वेळोवेळी घेण्यास विसरू नये.
* बिल्डर-विकासक आपल्याला फसवतीलच असा पूर्वग्रहदूषित विचार करून वागू नये, मात्र सावधगिरी बाळगावी.
* करारपत्रातील ग्राहकाचे तथा सदनिका खरेदीदाराचे हक्क अबाधित असल्याबाबत खात्री करण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नये, जेणेकरून स्वत:चे नुकसान होणार नाही. तसेच मॉडेल अॅग्रीमेंटच्या विरोधात असेल असे करारपत्र करण्याचे टाळावे.

आवाहन
सहकारी सोसायटीसंदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा लोकप्रभाला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘सहकार जागर’ असा उल्लेख करावा.

Story img Loader