लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनमत संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रात सुरू केला. देशभक्तीबरोबरच मेळे, पोवाडे, कीर्तने आदींद्वारे सांस्कृतिक उन्नतीवरही त्यांनी भर दिला. या परंपरेचा हाच धागा पकडून सार्वजनिक गणेशोत्सव काळात पुण्यामध्ये सुरेश कलमाडींनी पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केली. १९८९ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे ते अध्यक्ष होते. देशी-परदेशी पर्यटकांना पुण्यात आकर्षति करणे आणि पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत उगवत्या व नवोदित कलाकरांना हक्काचे व्यासपीठ मिळणे अशा हेतूंनी प्रेरित होऊन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आणि यातूनच पुणे फेस्टिव्हलचा जन्म झाला.
पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरिक, भारत सरकारचा पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते.
प्रारंभी काही वष्रे पुण्यातील नेहरू स्टेडियमजवळील मोकळ्या जागेत भव्य मांडवात मुख्य कार्यक्रम व्हायचे, तर बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर, रामचंद्र सभा मंडप, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, लोकमान्य सभागृह आदी ठिकाणीही अन्य कार्यक्रम व्हायचे. पुणे महानगरपालिकेने २५०० हून अधिक क्षमतेच्या भव्य श्री गणेश कला क्रीडा रंगमंचची निर्मिती केल्यानंतर पुणे फेस्टिव्हलचा भव्य उद्घाटन सोहळा व मुख्य कार्यक्रम तेथे होऊ लागले.
पुणे फेस्टिव्हलमध्ये गायन, वादन, नृत्य, संगीत, क्रीडा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन २५ वष्रे मोठय़ा प्रमाणात होत आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलाकारांचे गायन, वादन, नृत्य, लोककलांचे दर्शन, लावणी महोत्सव, उर्दू मुशायरा, मराठी व िहदी हास्य कवी संमेलन, लोकनाटय़, पाककला स्पर्धा, पुष्परचना, विविध गुणदर्शन, नकला, जादूचे प्रयोग, गणेश देखावा स्पर्धा, स्वच्छ झोपडपट्टी स्पर्धा, एकपात्री प्रयोग, महाराष्ट्रीय सणांमधील महिलांचे खेळ, महिला महोत्सव, मराठी, िहदी, गुजराती, इंग्रजी, सिंधी नाटकांचा महोत्सव, मराठी गाण्यांचे कार्यक्रम, गुजराती डायरो, केरळ महोत्सव, लावणी महोत्सव, कोल्हापूर महोत्सव, महाराष्ट्राची लोकधारा, गणेश चित्र प्रदर्शन, िव्हटेज कार रॅली, जलक्रीडा, बॉडी बििल्डग, मोटोक्रॉस, अष्टविनायक रॅली, स्केटिंग स्पर्धा, सायकल स्पर्धा, गोल्फ स्पर्धा, रोल बॉल स्पर्धा, ट्रेकिंग, मल्लखांब, योगा, बलगाडा स्पर्धा, गावजत्रा, पुण्यातील गुणवंत तसेच उदयास येणाऱ्या कलावंतांचा उगवते तारे व इंद्रधनू कार्यक्रम, भव्य शोभायात्रा, गुणवंतांचा गौरव, पर्यटनविषयक परिसंवाद व कार्यशाळा, शताब्दी साजरी करणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सव मंडळांचा गौरव अशी सारी जंत्री पुणे फेस्टिव्हलच्या वैविध्याची आणि लोकप्रियतेची पावतीच आहे.
नामवंत चित्रपट कलावंतांची उपस्थिती हेदेखील पुणे फेस्टिव्हलचे वैशिष्टय़ मानावे लागेल. आजकाल अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत चित्रपट कलावंतांची लक्षणीय उपस्थिती असते. गोकुळाष्टमीला दहीहंडीत तर कोणाकडे कोणता चित्रपट कलावंत येणार ही मोठीच उत्सुकता असते. आज या प्रकारचं म्हणजे चित्रपट कलावंतांच्या या उपस्थितीचं कुणालाच नवल वाटत नाही. कारण प्रसिद्धीसाठी ते अशा कार्यक्रमांना येतात. आपल्या आवडत्या कलाकारांना बघण्यासाठी लोकही गर्दी करतात. सांस्कृतिक कार्यक्रमांना चित्रपट कलावंतांना बोलवण्याची पद्धत रुढ झाली ती पुणे फेस्टिव्हलपासून. त्याचं श्रेय पुणे फेस्टिव्हलचंच आहे, हे मान्य करायला हरकत नाही.
उद्योग क्षेत्रातील दिग्गजही पुणे फेस्टिव्हलमध्ये आवर्जून सहभागी झाले. शंतनुराव किर्लोस्कर, राहुलकुमार बजाज, नीलकंठ कल्याणी, विवेक गोएंका, या नामवंतांनी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून मनापासून दाद दिली.
पुण्यातील शताब्दी साजरी करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात गौरव केला जातो. ढोल-ताश्यांच्या निनादात संपन्न होणारे हे आगळेवेगळे सत्कार म्हणजे आधीच्या पिढय़ांबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञताच मानली पाहिजे.
राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन हा पुणे फेस्टिव्हलचा अंगभूत भागच मानला पाहिजे. पुणे हे धार्मिक सलोख्याचे शहर आहे. श्रीगजानन विराजमान झालेल्या पुणे फेस्टिव्हलच्या मंचावर संपूर्ण देशातून आलेले नामवंत उर्दू शायर ‘ऑल इंडिया उर्दू मुशायरा’ सादर करतात. त्यातून धार्मिक सलोख्याचे अनोखे दर्शन घडताना दिसते. त्याबरोबरच ईशान्य भारतातील पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक नृत्याविष्कारही राष्ट्रीय एकात्मतेचे अनोखे दर्शन घडवत राहतो.
पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन आणि रौप्य महोत्सवी समितीच्या अध्यक्षा हेमा मालिनी आणि पुणे फेस्टिव्हल यांचे अतूट भावनिक नाते जडले आहे. त्यांचा प्रत्येक पहिला बॅले त्या पुणे फेस्टिव्हलमध्ये सादर करतात. पुणे फेस्टिव्हलच्या २४ वर्षांच्या इतिहासात २० वष्रे त्यांनी या मंचावर स्वत: नवा बॅले वा गणेशवंदना सादर केले आहेत. तसेच त्यांच्या कन्या ईशा आणि आहना यांचे जाहीर नृत्य कार्यक्रमातील पदार्पणही त्यांनी पुणे फेस्टिव्हलच्या मंचावरच केले.
पुणे फेस्टिव्हलमुळे स्थानिक, उगवत्या व नवोदित कलाकारांना हक्काचे मोठे व्यासपीठ मिळाले व त्यातूनच अनेक कलाकार पुढे राष्ट्रीय स्तरावर तसेच अनेक टीव्ही चॅनेल्सवर चमकू लागले. पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी ७ ते १४ वष्रे वयोगटासाठी ‘उगवते तारे’ आणि १५-२५ वष्रे वयोगटासाठी ‘इंद्रधनू’ हे कार्यक्रम होतात. भरतनाटय़म्, कथ्थक, कुच्चीपुडी, ओडिसी, वेस्टर्न डान्स आदी नृत्य-प्रकारांबरोबरच शास्त्रीय गायन, भावगीते, वाद्यवादन, भक्तिगीते, चित्रपटगीते, नाटय़गीते, पोवाडे यांचे गायन, सुगम संगीत असे विविध कलाविष्कार हे उगवते व नवोदित कलाकार सादर करीत असतात. एका अर्थाने हा प्रज्ञाशोध मानावा लागेल. पंडित संजीव अभ्यंकर, शौनक अभिषेकी, शर्वरी जेमेनीस, बेला शेंडे, तेजश्री अडिगे, शेफाली लाहोटी, निकिता मोघे असे अनेक राष्ट्रीय पातळीवर चमकणारे कलाकार ही पुणे फेस्टिव्हलचीच देणगी आहे. महिलांच्या कलागुणांना वाव देणारा आणि त्यासाठी व्यासपीठ निर्माण करणारा महिला महोत्सव हजारो सहभागी महिलांच्या आत्मविश्वासात भरच टाकीत राहिला आहे.
पुणे फेस्टिव्हल िव्हटेज कार रॅली हीदेखील पुणेकरांची अतिशय आवडती रॅली बनली आहे. गेल्या १०० वर्षांतील जुन्या तसेच अत्याधुनिक अशा मोटारींचा त्यात समावेश असतो.
पुणे फेस्टिव्हलमध्ये बंगाली, गुजराती, सिंधी, िहदी, इंग्रजीमधल्या गाजलेल्या नाटकांचे प्रयोग होतात. तसेच केरळ महोत्सव, कोल्हापूर महोत्सव होतो. विविध संस्कृतीचा संगमच येथून होताना दिसतो.
स्व. पु. ल. देशपांडे आणि स्व. शांताबाई शेळके यांच्यावरील कार्यक्रम, मराठी हास्य कवी संमेलन, मराठी नाटके, एकपात्री मराठी हास्योत्सव, मराठी हास्यभूषण स्पर्धा, पुरुषोत्तम करंडक स्पध्रेतील विजेत्या एकांकिकांचे प्रयोग, राज्यस्तरीय एकांकिका स्पध्रेतील प्रथम क्रमांक विजेत्या एकांकिकेचा प्रयोग, लावणी महोत्सव, मराठी भावगीते व मराठी चित्रपट गीतांचे कार्यक्रम, नाटय़गीते, प्रभात चित्रपटाच्या ७५ व्या वर्षांनिमित्त विशेष कार्यक्रम, सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त गीतरामायण अशा अनेक मराठी कार्यक्रमांची पुणे फेस्टिव्हलमध्ये रेलचेल हे पुणे फेस्टिव्हलचे खास पुणेरीपण म्हणावे लागेल.
एक वैशिष्टय़ म्हणजे पुणे फेस्टिव्हलचे सर्व कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य असतात आणि हे सर्व कार्यक्रम केवळ खाजगी स्पॉन्सरशिपच्या आधारेच होत असतात. महाराष्ट्रात वा देशात भूकंप असो अथवा पूर-परिस्थिती, प्रत्येक वेळी पुणे फेस्टिव्हलने भरघोस आíथक मदतीचा हात पुढे केला आहे. फेस्टिवल यशस्वी होण्यामागे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे आणि शेकडो कार्यकर्त्यांंचे गेल्या २५ वर्षांंतील योगदानही महत्त्वाचे आहे.
response.lokprabha@expressindia.com
संग्रहित लेख, दिनांक 13th Sep 2013 रोजी प्रकाशित
पंचवीस वर्षांची उत्सवी परंपरा
राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन हा पुणे फेस्टिव्हलचा अंगभूत भागच आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-09-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune festival