‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतल्या सगळ्या भूमिकाही प्रेक्षकांच्या आवडीच्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे छोटय़ा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय ती आशू ही व्यक्तिरेखा. ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या पुष्कर चिरपुटकरशी बातचीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘किंजल, यू आर द माइन’ असं म्हणत आशू रात्री साडेदहा वाजता घराघरात पोहोचतो. चष्मा, दाढी, मिशी अशा अवतारात ‘माजघरा’त फिरतो. चुकीचं इंग्लिश बोलत सतत खाण्याचे विचार करणारा आशू त्याच घरात धमाल करतो. ही गोष्ट आहे झी मराठीच्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतल्या आशुतोष म्हणजेच आशूची. हा आशू साकारणारा पुष्कर चिरपुटकर खऱ्या आयुष्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर आहे. खरं तर या मालिकेतले सगळेच कलाकार घरोघरी लोकप्रिय झाले आहेत. पण, त्यातही आशू या व्यक्तिरेखेच्या चाहतावर्गात लहान मुलांची संख्या मोठी दिसते. मूळच्या पुण्याच्या असलेल्या पुष्करला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. साधारणपणे अभिनयाची आवड असली की, कलाकार थेट हिरोच्या खुर्चीत बसण्याची स्वप्न बघू लागतात. पण, पुष्कर याबाबत अपवाद ठरला. तो सांगतो, ‘मला अभिनयाची आवड असली तरी मला हिरोची भूमिका वगैरे मिळेल किंवा मिळायला हवी असा अट्टहास अजिबात नव्हता. कारण मला माहीत होतं की, आपल्यात हिरोसारखे फीचर्स नाहीत. या क्षेत्रात येण्याआधीपासूनच ही समज मला होती. त्यामुळे क्षेत्रात येताना त्रास झाला नाही.’ नायकाची भूमिका मिळाली नसली तरी मालिकेत तो मध्यवर्ती भूमिका साकारत असल्याचा त्याला आनंद आहे.
इंजिनीअरिंग करत असतानाच प्रायोगिक आणि हौशी रंगभूमीशी संबंधित काही ग्रुपमध्ये त्याने काम केलं. ‘प्रायोगिक, हौशी रंगभूमीवर काम करण्याचा मला आनंद मिळत गेला. वेगवेगळे प्रयोग करायला मिळाले. शिकत गेलो. अभिनयाची आवड वाढतच गेली. दुसरीकडे इंजिनीअरिंग सुरू होतं. ते संपल्यानंतर अभिनय क्षेत्रात करिअर करायचं असं मी ठरवलं. पण, स्वत:साठी विशिष्ट काळाची मर्यादा ठेवली. विशेष म्हणजे माझ्या घरून मला या गोष्टीसाठी पूर्ण पाठिंबा होता,’ पुष्कर त्याच्या करिअरच्या पहिल्या टप्प्याबाबत सांगत होता. या काळात हौशी रंगभूमीवरचा अनुभव पुष्करने घेतला. दरम्यान नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (एनएसडी) जाण्यासाठी त्याने प्रयत्नही केले, पण काही कारणास्तव ते जमून आलं नाही. पण एनएसडीच्या एका शिबिरात तो सहभागी झाला होता. तिथूनही बरंच काही शिकायला मिळाल्याचं तो सांगतो. या क्षेत्रात येण्यासाठी संघर्ष कोणालाही चुकलेला नाही. पुष्करही याला अपवाद नाही. ‘एनएसडीच्या शिबिरानंतर माझा संघर्ष सुरू झाला. करिअरचा सुरुवातीचाच टप्पा असल्यामुळे नेमकं काय करावं, कोणतं प्रोजेक्ट स्वीकारावं, कोणतं नाही फारसं कळत नव्हतं. मालिका करू की नको, नाटक करायचं का, सिनेमाचा विचार आता एवढय़ात करू या की नको असा गोंधळ उडाला होता. जवळपास साडेतीन र्वष विशेष काही घडत नव्हतं. एक व्यावसायिक नाटक करत होतो. पण तेही सात प्रयोगांनंतर बंद झालं. प्रायोगिक नाटकांमध्ये छोटय़ा भूमिका मिळत होत्या. पण मध्येच अडकलो होतो. धड हे नाही धड ते नाही अशी भावना मनात यायची. घरूनही नोकरीबाबत विचार करण्याचे सल्ले येऊ लागले. इंजिनीअर म्हणून सात-आठ महिने नोकरी केली. तिथे माझं मन रमत नसल्याचं माझ्या लक्षात आलं. नोकरी सोडली आणि समविचारी असे आम्ही काही मित्र एकत्र आलो आणि एक स्टुडिओ सुरू केला. तिथे साऊंड रेकॉर्डिग, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी, म्युझिक व्हिडीओ अशी कामं करू लागलो. तेव्हाच ‘शिवचरित्र आणि एक’ हे प्रायोगिक नाटक करायला मिळालं. त्याच वेळी शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शनही मी करू लागलो. झी मराठीवरच ‘डब्बा गुल’ या कार्यक्रमासाठी स्किटचं दिग्दर्शन मी करायचो. त्यानंतर एक-दीड र्वष अभिनयाकडे पाठ झाली होती. तेव्हा काही तरी करावंसं वाटलं. तिथेच ‘दिल, दोस्ती..’ या मालिकेची एंट्री झाली’, पुष्कर त्याच्या करिअरच्या संघर्षांबाबत सांगत होता.
‘बिनकामाचे संवाद’ या प्रायोगिक नाटकात पुष्कर भूमिका करतो. त्याच्यासोबत त्या नाटकात सुव्रत जोशी म्हणजे मालिकेतला सुजयही काम करतो. तिथे सुव्रतकडून मालिकेच्या ऑडिशनबद्दल पुष्करला कळलं. त्याने ऑडिशन दिली आणि त्याची निवडही झाली. विविध प्रायोगिक आणि हौशी नाटकांमध्ये अभिनय करूनही सिनेसृष्टीत येण्याची संधी पुष्करला मिळत नव्हती. पण खचून न जाता तो प्रयत्न, संघर्ष करत राहिला. संघर्ष करूनही मालिकेत काम करण्याची संधी खूप उशिरा मिळाली, असं मात्र त्याला अजिबात वाटत नाही. पुष्कर याबाबत सांगतो, ‘अभिनय क्षेत्रात मला उशिरा ब्रेक मिळाला असं मी अजिबात म्हणणार नाही. तसंच फार संघर्ष वगैरे केला असंही मी कधीच म्हणत नाही. मेहनत करत गेलो. काम न मिळणाऱ्या दिवसांमध्ये बरंच काही शिकलो. जी छोटी-मोठी कामं करत होतो त्यातूनही खूप अनुभव आले. स्वत:ची क्षमता स्वत:च ओळखली पाहिजे. त्यानुसार पावलं उचलायला हवीत. स्वप्न मोठी बघत असाल तर तशी तयारीही असायला हवी या मताचा मी आहे.’
मालिकेत सतत चुकीचं इंग्लिश बोलत असला तरी प्रत्यक्षात पुष्करने इंग्रजी नाटकं केली आहेत. आशूने चुकीच्या ठिकाणी चुकीचे इंग्रजी शब्द वापरणं आणि मग ते माजघरातल्या सगळ्यांनी दुरुस्त करणं हे मालिकेतले प्रसंग आता प्रेक्षकांच्याही आवडीचे झाले आहेत. याच्या विरुद्ध पुष्कर आहे. पुण्यात असताना त्याने एका इंग्रजी नाटकाच्या ग्रुपसोबत काम केलंय. तसंच तो कॉन्व्हेंटमध्ये शिकलाय. खऱ्या आयुष्यात इंग्रजीचं उत्तम ज्ञान असलं तरी त्याविरुद्ध विशिष्ट भूमिका पडद्यावर रंगवणं हे कलाकाराचं कौशल्य आहे. पुष्करने त्यासाठी घेतलेली मेहनत यामागे आहे हेच यातून दिसून येतं. तो सांगतो, ‘आशूच्या वागण्या-बोलण्यासारखे माझे काही मित्र आहेत. त्यांचं निरीक्षण करत मी ही भूमिका साकारतोय. बोलण्याची लकब, आवाजाचा पोत, उच्चार या सगळ्याचाच मला अभ्यास करावा लागला. माझ्यात आणि आशूमध्ये खूप फरक आहे. आशू साकारताना आयुष्यात भेटलेल्या अनेक माणसांच्या स्वभावाची इथे मदत झाली.’ आशू या व्यक्तिरेखेची निरागसता लहान मुलांनाही भावते. तो त्यांच्यातला एक आहे अशी छोटय़ा प्रेक्षकांची भावना असते. या छोटय़ा चाहत्यांचा एक किस्सा पुष्कर सांगतो, ‘सकाळची शिफ्ट होती. साधारण साडेनऊ-दहा वाजता निघायचं होतं. निघायची तयारी करत असतानाच दार वाजलं. उघडलं तर आठ-दहा लहान मुलं मला भेटायला आली होती. मी आवरून मग तुम्हाला भेटतो असं त्यांना सांगितलं. तर ती सगळी मुलं बिल्डिंगखाली माझी वाट बघत होती. माझा हा छोटय़ांचा चाहता वर्ग खूप भावला.’
कलाकारांचं कौतुकंही होतं आणि त्यांच्यावर टीकाही होत असते. कौतुकाप्रमाणे टीकाही सहन करणारे कलाकार कमीच आहेत. पुष्कर याबाबतचं त्याचं मत स्पष्ट मांडतो, ‘आमच्या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. कमी दिवसांत मालिका लोकप्रिय झाली. पण, ज्याप्रमाणे मालिकेचं कौतुक होतंय त्याचप्रमाणे एखादा एपिसोड आवडला नाही आणि त्यावर टीका झाली तर तीही त्याच पद्धतीने स्वीकारायला हवी. मुळात मला आनंद मिळतो तो अभिनय करण्याचा. मी माझ्या कामात आनंद शोधत असतो. एखादा प्रसंग करताना तो मी किती एन्जॉय करतो हे माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. मला प्रत्येक क्षण आनंदाने जगायला आवडतं. म्हणूनच मला माझं काम हे कौतुक आणि टीकेपेक्षा महत्त्वाचं वाटतं.’ पुष्करला अभिनयाबरोबरच दिग्दर्शनाचीही आवड आहे. शॉर्ट फिल्म्स आणि सिनेमांचं दिग्दर्शन करण्यात त्याला रस आहे.
चैताली जोशी

मराठीतील सर्व छोटा पडदा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushkar chirputkar