भारतीय चित्रपटसृष्टीतला सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचा अनोखा मिलाफ म्हणजे वहिदा रेहमान. प्यासा, गाईड, तीसरी कसम, मुझे जीने दो अशा चित्रपटांतून वहिदा रेहमानचा सशक्त अभिनय चित्रपटरसिकांनी पाहिला. ‘चौदहवी का चाँद’सारख्या चित्रपटातल्या तिच्या राजस, लोभस रुपडय़ानं सिनेप्रेमींना नेहमीच मोहवलं. चित्रपटांच्या ग्लॅमरस जगात वावरून, यशाचं शिखर गाठूनही कायमच जमिनीवर असलेल्या, मितभाषी वहिदा रेहमान या जादूने त्यांना भुरळ घातली. अर्थात ती भुरळ नव्हती, तर वहिदासारख्या कसदार अभिनेत्रीचा तो त्यांच्या मनावर उमटलेला अमीट असा ठसा होता. कचकडय़ाच्या, दिखाऊ दुनियेत बावनकशी सोनं आपल्या तेजानंच चकाकतं किंवा बंदा रुपया नेहमी खणखणीतच वाजतो तसं वहिदाचं होतं. अद्वितीय सौंदर्य, अनुमप असं नृत्यकौशल्य, अभिनयाची नेमकी समज, जबरदस्त आकलन या सगळ्याच्या अनोख्या मिश्रणाने वहिदाला कधीही एक सोडाच अर्धी पायरीदेखील खाली उतरू दिलं नाही. त्यामुळेच या नावाभोवती असलेलं वलय, आब आजही तसाच आहे.
आजचा सिनेमा, आजची सिनेसृष्टी पूर्ण वेगळी आहे. वहिदा रेहमानच्या काळाच्या तुलनेत आज तंत्रदृष्टय़ा, आशयदृष्टय़ा सिनेमा खूप बदलला आहे. खूप पुढे गेला आहे. सशक्त स्त्री व्यक्तिरेखांची मांडणी आजच्या प्रेक्षकाला सवयीची झाली आहे. तरीही ५०-६० वर्षांपूर्वी वहिदाने साकारलेल्या अत्यंत सशक्त कसदार स्त्री व्यक्तिरेखांची मोहिनी आजही तितकीच आहे. खरं तर त्या काळातही ‘गाईड’सारख्या सिनेमातून वहिदाने साकारलेली रोझी काळाच्या पुढेच होती. वहिदाच्या अभिनयामुळे ती अधिक जिवंत झाली आणि वहिदाबद्दल असलेल्या विश्वासार्हतेमुळे स्वीकारली गेली, वाखाणली गेली.
तर अशी ही वहिदा रेहमान. स्त्री व्यक्तिरेखांच्या बाबतीत काहीशा पारंपरिक, चोखंदळ असलेल्या भारतीय चित्रपटरसिकाला तिने आपल्या अभिनय सामर्थ्यांने अधिक चोखंदळ केलं, पण तरीही तिच्यामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये नेहमीच एक अंतर राहिलं आहे. वहिदाच्या मितभाषी स्वभावामुळे असेल, तिच्या क्लास अ‍ॅक्टमुळे असेल, पण लोकप्रियता आणि रसिकमान्यता मिळूनही वहिदाकडूनही ते राखलं गेलं आणि अप्रत्यक्षपणे ते असं अंतर असणारच असं जणू रसिकांनीही मान्य केलं होतं. त्यामुळेच या गुणी अभिनेत्रीबद्दल नेहमी बोललं गेलं, ते तिच्या अभिनयाबद्दल, तिने साकारलेल्या भूमिकांबद्दल. गॉसिप करणाऱ्यांना आवडणारं वादळ तिच्या आयुष्यात घोंगावून गेलं असलं तरी वहिदाबद्दल तेव्हाही आणि नंतरही कुजबूज करायची संधीही तिने कुणाला दिली नाही. चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्य यातली सीमारेषा तिने कायमच स्पष्ट ठेवली. अशा या वहिदा रेहमानचं आयुष्य, तिचे विचार, तिचे अनुभव, तिचं जगणं या सगळ्याबद्दल प्रेक्षकांना कायमच कुतूहल राहिलं आहे.
‘ वहिदा रेहमान.. हितगुजातून उलगडलेली’ या पुस्तकातून ते उलगडण्याचा प्रयत्न केला आहे, नसरीन मुन्नी कबीर यांनी. नसरीन मुन्नी कबीर यांनी वहिदाशी मारलेल्या गप्पा, तिला विचारलेले प्रश्न आणि त्यांची तिने दिलेली उत्तरं यातून हे पुस्तक साकारलं आहे. त्यातून उलगडत गेलेला वहिदाचा प्रवास हा एका संवेदनशील व्यक्तीचा प्रवास आहे. तिच्या ठायी असलेली जगण्याची समज, तिची बुद्धिमत्ता, तिचं सिनेमाचं आकलन या गोष्टी या पुस्तकातून पानोपानी भेटत जातात. त्यात अनेक प्रसंगांची माहिती आहे, अनेक व्यक्तींबरोबरचे अनुभव आहेत, वेगवेगळ्या सिनेमांच्या शूटिंगदरम्यानचे अनुभव आहेत, वहिदाचं बालपण, तिचा चित्रपटसृष्टीतला प्रवेश, सिनेमाच्या मुख्य प्रवाहात येणं, तिचं लग्नाआधीचं म्हणजे आईवडिलांचं कुटुंब, लग्नानंतरचं जगणं, वहिदाच्या मत्रिणी, तिचं सिनेमाच्या क्षेत्राबद्दलचं चिंतन अशा अनेक गोष्टी पुस्तकात ओघाने येत जातात. अर्थात, त्या येतात त्या नसरीन मुन्नी कबीर यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या ओघात. त्या प्रश्नांच्या चौकटीतली वहिदा रेहमानच त्यामुळे आपल्याला समजू शकते. पण मुळात एखाद्या कमी बोलणाऱ्या, मीडियापासून लांब राहणाऱ्या व्यक्तीला बोलतं करणं हेच मुळात अवघड असल्यामुळे हेही नसे थोडके.
या सगळ्यामुळे वहिदा रेहमानबरोबर झालेल्या गप्पांचं हे पुस्तक वाचणं हा खरोखरच आनंददायक अनुभव आहे. त्यात आपल्याला माहीत नसलेले अनेक प्रसंग आहेत. अनेक व्यक्तींबाबतचं वहिदाचं विवेचन यात आहे. तिचा भारतीय सिनेमांकडे बघण्याचा दृष्टिकोन, तिला असलेली दिग्दर्शकाची नजर, तिची चिंतनशीलता, विश्लेषण करण्याची, एखादी गोष्ट समजून घेण्याची तिची पद्धत या सगळ्यामध्ये आपण गुंगुन जातो. गुरुदत्त, अबरार अल्वी यांच्यासोबत काम करतानाचे प्रसंग, तीसरी कसम सिनेमाच्या चित्रिकरणासाठी प्रवास करतानाचा जमावाचा अनुभव, आईबरोबरचं वहिदाचं नातं, खासगीपण जपण्याचा आग्रह या सगळ्या गोष्टीबाबत वहिदाने गप्पा मारल्या आहेत. मिलिंद चंपानेकरकर यांनी पुस्तकाचा अनुवाद चांगला केला आहे.
८ वहिदा रेहमान हितगुजातून उलगडलेली
मूळ लेखक : नसरीन मुन्नी कबीर
अनुवाद : मििलद चंपानेरकर
प्रकाशक : रोहन प्रकाशन
मूल्य : २५० रुपये
पृष्ठे : २४५
response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा