मिशन मणिपूर ही एकांडय़ा देशभक्ताची किंबहुना क्रांतिकारकाची वीरगाथा आहे. भय्याजी काणे आणि जयवंत कोंडविलकर या गुरू-शिष्याने पूर्वाचलाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंचेचाळीस वर्षांपूर्वी एका यज्ञाला सुरुवात केली आणि भय्याजी अनंतात विलीन झाल्यानंतरही तो धगधगत आहे. देशाचं स्वास्थ्य टिकून राहायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे ते उमगल्यावर क्षणाचाही विलंब न करता तेव्हाच्या रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक असलेले भय्याजी काणे आपल्या दहा-बारा वर्षांच्या शिष्योत्तमाला हजारो किलोमीटर दूर असलेल्या मणिपूर राज्यात घेऊन जातात काय आणि तिथल्या लोकांत देशप्रेमाची ज्योत पेटवतात काय, सगळंच मती गुंग करणारं आहे. पण हे करीत असताना अगदी रोजच्या रोज त्यांना जिवावर उदार होऊन तिथे वास्तव्य करावं लागलं. आपल्याबरोबर असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांला देशप्रेमाचे धडे त्या रणभूमीवर देताना त्यांना कोणत्या परिस्थितीमधून जावं लागलं त्याचा जिताजागता इतिहास या पुस्तकात कथन केला आहे.

कीं घेतले व्रत न हें अम्हीं अंधतेने

लब्धप्रकाश-इतिहास-निसर्ग-मानें

जें दिव्य दाहक म्हणूनी असावयाचें

बुद्धय़ाचि वाण धरिले किर हें सतीचें

पराकोटीच्या देशप्रेमाने भारून गेलेली माणसंच हे असं म्हणतात आणि ते कृतीतही आणतात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ज्या खस्ता खाल्ल्या आणि जिवावर उदार होऊन बिटिश साम्राज्याला सळो की पळो करून सोडलं त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. पण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी देशापुढच्या समस्या किंवा देशाच्या एकात्मतेला असणारा धोका किंचितही कमी झालेला नाही. देशाच्या सीमावर्ती राज्यांमध्ये तर ही समस्या नेहमीच सतावत आली आहे. सीमावर्ती राज्य म्हटलं की जम्मू-काश्मीर हे राज्य नजरेसमोर येतं, पण तिकडे पूर्वाचलात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालॅण्ड, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम या राज्यांमध्ये जो िहसाचार चालू असतो किंवा देशविघातक शक्ती कार्यरत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. शंकर दिनकर काणे (भय्याजी काणे) या शिक्षकाने हे जाणलं आणि समस्येला मुळातून हात घातला, शिक्षक पुढची पिढी घडवतो असं म्हणतात, भय्याजींनी ते म्हणणं पूर्वेकडच्या राज्यांमध्ये जाऊन करून दाखवलं. हे असंभव वाटणारं काम त्यांनी कसं केलं ते वाचताना अंगावर रोमांचं उभं राहतं.

असामान्य शिक्षक काय करू शकतो ते आचार्य चाणक्यांनी दाखवून दिलं आहे. भय्याजी असेच असामान्य शिक्षक होते आणि जयवंत कोंडविलकर या त्यांच्या शिष्याने त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी जे परिश्रम घेतले त्याला तोड नाही. युद्धभूमीवर लढत असताना सनिकांना देशाचं पाठबळ लाभतं, पण असं कुठलंच पाठबळ नसताना या दोघांनी हे कार्य केलं तेव्हा ‘बुद्धय़ाचि वाण धरिले’ याची त्यांना जाणीव होती. भय्याजींनी हे कार्य कसं यशस्वी केलं ते समजण्यासाठी हे पुस्तक मुळातून वाचलं पाहिजे. जिवावर बेतणारे प्रसंग, फील्ड मार्शल करिअप्पा आणि फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची प्रत्यक्ष भेट, या सेनानींनी भय्याजींच्या कामाचं केललं कौतुक असे मनाला हेलावून टाकणारे प्रसंग या पुस्तकात येतात तेव्हा वाचकही सद्गदित होतो.

देशाच्या अनेक भागांत फुटीरतेला खतपाणी घालणाऱ्या शक्ती वाढत चालल्या आहेत. नुसता भूभाग म्हणजे देश नव्हे, तर तिथला समाज, तिथली माणसं एकोप्याने राहणार असतील तर आपला देश कुणी अस्थिर करू शकत नाही. पूर्वेकडच्या राज्यांमध्ये ही समस्या मोठय़ा प्रमाणावर आहे त्यावर नेमका उपाय काय ते सप्रमाण सिद्ध करून दाखवणाऱ्या कर्तृत्वाचा हा आलेख आहे.

गुरूचा हात पकडून शिकता शिकता जयवंत कोंडविलकर कधी कत्रे झाले, ते कसे घडले याचं चित्र हे पुस्तक वाचता वाचता वाचकाच्या डोळ्यांसमोरून सरकू लागतं. मिशन मणिपूर ही एका कर्मयोग्याच्या दीर्घ आणि खडतर जीवनाची गाथा आहे, असं या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ब्रि. (निवृत्त) हेमंत महाजन म्हणतात, ते सार्थ आहे. ही स्फूर्तिगाथा लेखक पुरुषोत्तम रानडे ( ईशान्य वार्ता मासिकाचे संपादक) यांच्या व्यासंगामुळे वाचकांसमोर येत आहे. पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर ते संपेपर्यंत वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्या लिखाणात आहे.

मिशन मणिपूर, लेखक : पुरुषोत्तम रानडे, श्री व्यंकटेश प्रकाशन मुंबई, मूल्य : रु. १५०
नरेंद्र प्रभू – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader