सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे महात्मा फुले नेहमीच जलसाकारांचे प्रेरणास्थान राहिले आहेत. समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर प्रहार करणं, गरीब शेतकरी, कामगार, मजूर यांचे प्रश्न मांडणं, स्रीशिक्षण, अस्पृश्यता, बालविवाह यासंदर्भात लोकांचे डोळे उघडणं यासाठी महात्मा फुले यांनी आपलं आयुष्य वाहिलं होतं. त्यासाठीच त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आपले विचार मांडण्यासाठी लिखाण केलं. नाटक, वैचारिक पुस्तकं, अखंड या माध्यमातून आपले परखड विचार मांडत ते अखेपर्यंत जनजागृतीसाठी झटले. त्यांनी लिहिलेले अखंड, पोवाडे, पदं जलसाकारांनी आपल्या कार्यक्रमांतून वापरले. पुढे पुढे महात्मा फुले यांच्या विचारांचा धागा पकडून नवीन जलसे लिहायला सुरुवात झाली. लोकजागृतीमध्ये सत्यशोधक जलशांचा अशा रीतीने मोठा वाटा होता. त्यांच्या या योगदानाची साद्यंत माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे. लेखक सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक तर आहेतच, त्यांची पीएच.डी.सुद्धा सत्यशोधक जलसे या विषयावरच आहे.

महात्मा फुले यांच्याबरेबरच कृष्णराव भालेकर, दिनकरराव जवळकर, मुकुंदराव पाटील, केशवराव जेधे, अण्णासाहेब लठ्ठे आणि इतरही अनेकांनी सत्यशोधक चळवळीसाठी लिखाण केले. सुरुवातीच्या काळात महात्मा फुले, कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील यांची काव्यरचना सादर केली जायची. त्यानंतर इतरही अनेकांनी पदे रचली. या पद्धतीने सत्यशोधक विचार तळागाळात रुजवला गेला.

महाराष्ट्रात तमाशा, गवळणी, वग, गण, फार्स हे कलाप्रकार लोकप्रिय आहेत. त्यात फार्स विनोदी असले तरी त्यात मनोरंजनाबरोबरच लोकशिक्षण हाही हेतू असतो. तमाशा मनोरंजनपर असला तरी जास्त लोकप्रिय आहे. त्यामुळे त्यांचा आधार घेत तमाशाच्या धर्तीवरच जलसे लिहिले आणि सादर केले गेले. बहुजन समाजातील कलाकारांनी बहुजनांच्या प्रबोधनासाठी सादर केलेली कलाकृती म्हणजे जलसा असं त्याचं स्वरूप होतं. समाजातील परिस्थितीचं वर्णन करून लोकशिक्षण, मनोरंजन असं त्याचं स्वरूप होतं. सावकार, ब्राह्मण यांच्या दडपणाखाली हलाखीचं जीवन जगणाऱ्या बहुजन समाजाला जागं करणं, विचार करायला लावणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. ओतूरच्या भीमराव महामुनी यांनी पहिल्यांदा सत्यशोधक जलसा सुरू केला आणि गावोगाव पसरवला. रामचंद्र घाडगे यांनी त्याचा आणखी प्रचार-प्रसार केला. त्याशिवाय ज्योत्याजीराव फाळके, तुकाराम भोसले, केशवराव विचारे, तात्याबा जाधव, भाऊसाहेब पाटोळे, तातोबा यादव कासेगावकर, गणपतराव मोरे या सगळ्यांनी जलसे तळागाळापर्यंत पोहोचवले. त्यांना त्यांच्या कामात शाहू महाराजांची मोठी मदत होत असे. पुस्तकात उल्लेख केलेलं जलसाकारांच्या जलसानिष्ठेचं एक उदाहरण विलक्षण आहे. १९१८ मध्ये कराडला गोविंदराव घाडगे यांचा जलसा होता. त्यासाठी जमलेली गर्दी बघून कराडच्या मामलेदारांनी मनाई हुकूम जारी केला. घाडगे यांना मामलेदाराच्या या कृतीचा राग आला. त्यांनी सगळं सोडून जलशाच्या प्रचारा-प्रसारासाठी आयुष्य वाहून टाकलं. टाटा कंपनीने मुळशी धरण बांधलं तेव्हाच्या संघर्षांत जलसाकारांनी कसं लोकमत घडवलं याचीही चर्चा या पुस्तकात आहे.

या जलशांमधली पदं अन्याय्य रूढी परंपरा, अंधश्रद्धा यावर कोरडे ओढत. सुधारणांचा जोरदार पुरस्कर करत. ते गेय असल्यामुळे लोकांच्या मनावर पटकन ठसतं.

लहान थोरांनी शाळेत जावे
शिक्षण शिकून मोठे व्हावे
केशवपनाला विरोध करणारा जलसा म्हणतो,
अण्णा मी तुमची लाडकी
मला कशी करता हो बोडकी
तुम्ही सोडा तुमचा हट्ट
लावा माझा पाट

अतिशय दमदारपणे, आक्रमकपणे खडय़ा आवाजात जलसा सुरू झाला की ऐकणाऱ्याच्या मनात वीरश्री संचारायची.

समाजाला शहाणं करायचं हा हेतू असल्यामुळे जलशात गाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर रंगरंगोटी केली जायची नाही. पण लांबून पाहणाऱ्याला समजावं म्हणून वेशभूषा केलेली असायची. ढोलकी, तुणतुणे, टाळ, डफ, हार्मोनियम अशी वाद्यं वाजवली जायची. जलशांच्या या परंपरेची तपशीलवार माहिती या पुस्तकातून वाचायला मिळते. सुरुवातीला गण, पदं, पोवाडे हा गेय भाग झाला की मग फार्स सादर केले जायचे. सत्यशोधक जलशांनंतर आंबेडकरी जलसे सुरू झाले. शाहीर भीमराव कर्डक म्हणतात त्याप्रमाणे सत्यशोधक चळवळ आणि महात्मा फुले यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जसे सत्यशोधक जलसे निर्माण होत गेले, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अस्पृश्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आंबेडकरी जलसा उभा राहिला.

१९२० ते ४० या काळात जलसे जोरदार होते. पण १९५९ नंतर मात्र त्यांना हळूहळू ओहोटी लागत गेली. शिक्षणाचं प्रमाण वाढलं, लोक वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये गेले तसतसे जलसे कमी होत गेले. शिक्षण घेऊन नोकरी करायला लागले. त्यांना स्वतंत्र आणि निर्भीड करणं हा जलशांचा हेतू सफल होत गेल्यामुळे त्यांना ओहोटी लागत गेली असंही म्हणता येईल.

यातील बळीराम बुवाजी कदम, नरहरी केरूबा कदम, गजराबाई अंबादास मुरवटे, गोपीनाथ काशीनाथ नाईक या जलसा कलावंतांच्या मुलाखती वाचनीय आहेत. ज्यांनी भरपूर जलसे पाहिलेले आहेत असे दीनमित्र या सत्यशोधक विचारांच्या साप्ताहिकाचे संपादक माधवराव, मुकुंदराव पाटील यांची मुलाखत, जलशात गायली जाणारी पदं यामुळे   पुस्तकाचे संदर्भमूल्य वाढले आहे.
सत्यशोधक जलसे, डॉ. संभाजी खराट, लोकसाहित्य प्रकाशन, पृष्ठे : १४४, मूल्य : १२० रुपये
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com