भविष्यकालीन विज्ञानाासंबंधीचं एक व्यापक चित्र ‘विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा’ या पुस्तकामधून आपल्यासमोर उभं राहतं. वेगाने विकसित होणाऱ्या रोबोटिक्स, एरोनॉटिक्स, अवकाशविज्ञान, न्यूरो सायन्स यांसारख्या तंत्र व विज्ञानातील चौकटीपल्याडच्या करिअरचा परिचयही या पुस्तकातून करून देण्यात आला आहे. हे पुस्तक ज्येष्ठ शास्त्रज्ञ, देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि सृजन पाल सिंह यांच्या संशोधनातून साकारले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील अद्ययावत संशोधनातून कुठल्या गोष्टी साध्य झाल्या आहेत आणि त्याचे आपल्या भविष्यावर कोणते परिणाम होतील, हे साध्यासोप्या भाषेत आणि रंजक शैलीत मांडण्याचा प्रयत्न लेखकद्वयीने केला आहे.

आजच्या पिढीची स्वप्नं, आकांक्षा, कल्पकता, ध्येय, आव्हानं लक्षात घेत भविष्यकाळातील विज्ञानवाटा उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. संशोधनाने घडलेल्या किमया आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात घडलेले सकारात्मक बदल हे केवळ शास्त्रज्ञांच्या शोध घेण्याच्या ध्यासातून शक्य होते हे सांगतानाच हा शास्त्रीय ध्यास कशामुळे साध्य होतो, महान शास्त्रज्ञ कशामुळे घडतो, एखादा शास्त्रज्ञ यशस्वी का होतो, शास्त्रज्ञ व्हायचं तर कोणती शाखा निवडावी, काय करावं यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात सापडतात.

आयुष्यात घडलेल्या अद्भुत घटना आणि त्यांना आलेले अविस्मरणीय अनुभव यांमुळे बालपणापासूनच महान शास्त्रज्ञांच्या मनाची जडणघडण होण्यास मदत होते, हे नमूद करतानाच शास्त्रज्ञांना नेहमी प्रश्न पडतात, शास्त्रज्ञांकडे चिकाटी असते, ते नाउमेद होत नाहीत, संशोधनामागचा हेतू हा निखळ सेवाभावाचा असावा हे संशोधनासाठीचे आद्यमंत्रही त्यांनी सांगितले आहेत. एखाद्या संशोधनाचं तत्त्व स्पष्ट करताना रामन, मायकेल फॅरेडे, अ‍ॅलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांसारख्या थोर शास्त्रज्ञांचे किस्से आणि अनुभव यांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.

रोबोटिक्स, एरोनॉटिक्स, अवकाशविज्ञान, न्यूरो सायन्स या क्षेत्रांवर स्वतंत्र प्रकरणे बेतली आहेत. भविष्यात रोबोटिक्स क्षेत्रात काय घडेल, याविषयी प्रत्येकाच्या मनातील कुतूहल शमवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रोबोट्स निर्मितीच्या विविध टप्प्यांपासून अलीकडच्या स्मार्ट रोबोट्समुळे वैद्यक, औद्योगिक, सुरक्षाविषयक, अंतराळ मोहिमा, घरगुती वापर आणि नैसर्गिक आपत्तीच्या क्षेत्रांमध्ये शक्य होणारी कामे, रोबोट्सचे पुराणातील संदर्भ, रोबोटिक्सचं भविष्य यांचा वेध घेण्याचा प्रयत्नही या पुस्तकात करण्यात आला आहे.

त्याचबरोबर एका रोबोटची किंमत किती असते, रोबोट्स माणसांपेक्षा शक्तिशाली झाले तर.., रोबोटिक्सच्या विविध स्पर्धा कोणत्या, रोबोट्सच्या खेळांच्या स्पर्धा असतात का, सायबोग्र्ज म्हणजे काय, रोबोट्स किती लहान असू शकतात, ह्य़ुमनॉइड आणि रोबोट यांच्यात काय फरक असतो, बायोइन्स्पायर्ड रोबोट म्हणजे काय, रोबोटिक शास्त्रज्ञ अथवा रोबोटिक इंजिनीअर कसे होता येईल.. या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्याला या पुस्तकात मिळतात.

एरोनॉटिक्स प्रकरणात विमानविद्येचा इतिहास, आधुनिक काळातील संशोधन आणि या क्षेत्राचं भविष्य याविषयी सविस्तर माहिती देतानाच विमान, विमानोड्डाण, विमानासाठी लागणारे इंधन आणि विमानाची इंधन कार्यक्षमता म्हणजे काय, ऑटोपायलट, टब्र्युलन्स या संकल्पना त्यामागील सिद्धान्तासह विशद केल्या आहेत.

पॅथॉलॉजीविषयीच्या प्रकरणात या क्षेत्राची पाश्र्वभूमी, त्या क्षेत्रातील संशोधन आणि भविष्य यांवर एक प्रकरण बेतलेलं आहे. सूक्ष्म जीवांचे – सूक्ष्म जंतूंचे प्रकार, लसी तसेच कर्करोग आणि एचआयव्ही रोग यांचं स्वरूप स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात पॅथॉलॉजी करिअरची माहिती देताना उपयुक्त लिंक्सही दिल्या आहेत.

अंतराळ विज्ञानावरील वाचनीय प्रकरणात अंतराळ विज्ञानातील अद्ययावत शोध आणि या क्षेत्राचे भविष्य यासंबंधीचे कुतूहल शमते. या प्रकरणात अंतराळ विज्ञानाचा इतिहास, खगोलशास्त्रज्ञांचे विविध सिद्धान्त, त्यांची संशोधने दडपून टाकण्याचे झालेले प्रयत्न, अंतराळ विज्ञानातील अद्ययावत संशोधने, भविष्यातील आव्हाने आणि संधी याविषयीही माहिती मिळते. बिग बँग थिअरी तसेच आयन प्रॉपल्शन आणि सोलर सेल स्पेसशिल्स या अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख होते.

न्यूरो सायन्स म्हणजे नेमकं काय, या क्षेत्रातील आधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञानाचा झालेला वापर या विषयावरही स्वतंत्र प्रकरण बेतलं आहे. न्यूरॉन्स आणि सायनॅप्सेस या चेतापेशींची वैशिष्टय़े, कार्य याबाबत विस्ताराने लिहिले आहे. मटेरिअल सायन्सचं अद्भुत जगही एका प्रकरणातून आपल्यासमोर उभं राहतं. बायो इन्स्पायर्ड मटेरिअल्स, ऊर्जा कार्यक्षम मटेरिअल्स, नॅनो मटेरिअल्स या मटेरिअल्समधील नव्या शाखांशी ओळख होते. लाखो वर्षांपासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीचा अभ्यास ज्या शाखेत जीवाश्मांद्वारे केला जातो, त्या जीवाश्मविज्ञान अर्थात पॅलिऑन्टोलॉजी या मुलखावेगळ्या शास्त्राची माहिती आपल्याला या पुस्तकात देण्यात आली आहे.

अत्यंत वेगाने विकसित होत असलेल्या या विद्याशाखांवरील प्रकरणांत त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी मुलाखतींद्वारे ग्रेट भेटही घडते. त्यात रोबोटिक्स विषयावर एडिनबर्ग सेंटर फॉर रोबोटिक्सचे प्रोफेसर सेतू विजयकुमार यांनी तर जगद्विख्यात न्यूरोसर्जन जोगी व्ही. पट्टिसापू यांची न्यूरोसायन्स विषयावर मुलाखत आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी एरोनॉटिक्स – त्यातही क्षेपणास्त्रांचं तंत्रज्ञान तसेच अंतराळ विज्ञान या विषयांवरील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत तर डॉ. अशोक विखे पाटील यांच्याशी आजार, उपचारपद्धती, औषधांचा शोध या विषयांवर बातचीत केली आहे. या प्रत्येक प्रकरणाअंती त्या त्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती देण्यात आली आहे. आपल्या पाल्याला अमुक एका क्षेत्रात स्वारस्य असेल तर पालकांनी काय करायला हवे, याविषयी लेखकद्वयीने पालकांशी हितगुजही केले आहे.

अत्यंत अवघड विषय सोपे करून सांगण्याची हातोटी आणि संबंधित विषयाच्या तज्ज्ञांशी चर्चा करून त्याआधारे अद्ययावत तंत्रज्ञानाचा करून दिलेला परिचय यामुळे या पुस्तकाचे उपयुक्ततामूल्य अधिक वाढले आहे.

रोबोटिक्स, एरोनॉटिक्स, अवकाशविज्ञान, न्यूरो सायन्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये होणारे संशोधन, त्याचे मानवजीवनावर होणारे संभाव्य परिणाम याची चुणूक आपल्याला या पुस्तकातील विविध लेखांमधून दिसते. अलीकडे इंटरनेटवरून माहिती उतरवत विज्ञान-तंत्रज्ञान या विषयांवर लेख-पुस्तके लिहिणाऱ्या लेखकूंची कमी नाही. अशा वेळी दोन जाणत्या शास्त्रज्ञांनी- अधिकचे वाचन, संशोधन करून त्या क्षेत्रातील मान्यवर शास्त्रज्ञाची मुलाखत घेऊन लिहिलेले पुस्तक शास्त्रकाटय़ाच्या कसोटीस निश्चितच उतरते आणि म्हणूनच अमूल्य ठरते!

विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा : लेखक – ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि सृजन पाल सिंग. , अनुवाद – प्रणव सखदेव., प्रकाशक – रोहन प्रकाशन, पृष्ठसंख्या झ्र् १९५, मूल्य – रु. २००/-
सुचिता देशपांडे –

संशोधकांची तोंडओळख
मानवी जीवन अधिकाधिक प्रगतिशील आणि सुखकर बनविणाऱ्या संशोधकांची माहिती नव्या पिढीला मिळावी, त्यांच्यात विज्ञाननिष्ठा आणि संशोधकवृत्ती रुजावी या हेतूने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. साध्यासोप्या शब्दांतील संवादातून मुलांची जिज्ञासा जागवत, वैज्ञानिक माहिती रंजक पद्धतीने या पुस्तकात सादर करण्यात आली आहे.
युरेका क्लबमध्ये जमणारी सोसायटीतील मुलं, त्यांच्या विज्ञान विषयाच्या शंका दूर करत नवनवी माहिती देणारी त्यांची अश्विनीताई हे एकत्र जमून विज्ञानाच्या घडामोडींवर चर्चा करत. ताईने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची, नवनवी माहिती गोळा करायची, प्रश्नमंजूषा खेळायचे आणि संबंधित शोध लावणाऱ्या मूळ संशोधकांविषयी जाणून घ्यायचं, हा त्यांचा नित्यक्रम होता.
आधुनिक विज्ञानाचा पाया रचणारे गणितज्ज्ञ, भूमितीचे जनक युक्लिड, गुरुत्व आणि प्लवनशीलतेचा सिद्धान्त मांडणारे आर्किमिडीज, सूर्यकेंद्री विश्वसिद्धान्त मांडणारा पोलिश शास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकस, इटालियन खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिलीई, सूर्यकेंद्रित सिद्धान्त सुधारित स्वरूपात मांडणारे योहान्स केप्लर, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडणारा आयझ्ॉक न्यूटन, आठशे पुस्तकं आणि शोधनिबंध लिहिणारे स्विस गणितज्ज्ञ लिओनार्ड यूलर, वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्त्रज्ञ जेम्स व्ॉट, मूलभूत अणुरचना स्पष्ट करणारे शास्त्रज्ञ जॉन डाल्टन, विद्युतचलित्राचा शोध लावणारा ब्रिटिश संशोधक मायकेल फॅरेडे, जीवशास्त्राच्या उत्क्रांतीचं कोडं उलगडणारे ब्रिटिश वैज्ञानिक चार्ल्स डार्विन, अनुवंशशास्त्राचे जनक ग्रेगॉर मेंडेल, पाश्चरीकरणाचा जनक असलेले फ्रेंच शास्त्रज्ञ लुई पाश्चर, क्ष किरणांचा शोध लावणारा जर्मन शास्त्रज्ञ डब्ल्यू. सी. राँटजेन, संशोधनाचा मुकुटमणी थॉमस एडिसन, आधुनिक संदेशवहनाचे जनक असलेले स्कॉटिश संशोधक अलेक्झांडर ग्रॅहम बेल, आधुनिक मनोवैद्यकशास्त्राचे जनक मानले जाणारे ऑस्ट्रियन मानशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड, डायनॅमो विकासात पुढाकार घेणारा निकोला टेस्ला, क्वांटम थिअरीचे जनक मॅक्स प्लँक, विमानोड्डाणाचं स्वप्न प्रत्यक्षात आणणारे राइट बंधू, अणुगर्भाविषयी क्रांतिकारी सिद्धान्त मांडणारे अर्नेस्ट रुदरफोर्ड, विसाव्या शतकातील महान पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन, सेमीकंडक्टरचा शोध लावणारे विल्यम्स शॉक्ली, मध्य व दक्षिण अमेरिका शोधणारा दर्यासारंग वास्को द गामा, मोटारउद्योगात क्रांती करणारे अमेरिकेचे उद्योजक हेन्री फोर्ड अशा गिन्याचुन्या जगाला बदलून टाकणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांना जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
प्रत्येक संशोधकाबद्दल लिहिताना त्या संशोधकाची पाश्र्वभूमी, त्याची प्रयोगशीलता यासंबंधीचे किस्से लिहिले आहेत. त्याचे संशोधन, शोध लागलेला क्षण, त्यांच्या शोधाची उपयुक्तता या संबंधीची माहिती रंजक पद्धतीने आणि मुलांना समजेल अशा भाषेत दिल्याने मुलांना या २६ संशोधकांची आणि त्यांच्या संशोधनाच्या महानतेची ओळख या पुस्तकाच्या निमित्ताने नक्कीच होईल!

युरेका क्लब
लेखक – गौरी गंधे
प्रकाशक – रोहन प्रकाशन,
पृष्ठसंख्या – १००
मूल्य – रु. १३१/-