अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. त्यांपैकी वस्त्रांचे कितीतरी प्रकार आपण रोजच्या जीवनात वापरत असतो. पण फारसा त्यांच्या धाग्या-दोऱ्यांचा माग काढत नाही. हा माग ‘करामत धाग्या-दोऱ्यांची या पुस्तकात पदार्थविज्ञानतज्ज्ञ डॉ. वर्षां जोशी यांनी काढला आहे. अश्मयुगाच्या शेवटी म्हणजे २५ हजार वर्षांंपूर्वी सुईचा शोध लागला आणि पानं किंवा प्राण्यांची कातडी व्यवस्थित शिवून त्यापासून मानवाला कपडे तयार करता येऊ लागले. त्यामुळं माणसाची एक मूलभूत गरज अर्थात वस्त्रांची दुनिया काळाप्रमाणं विकसित होत गेली, अशी माहिती विषयाच्या प्रस्तावनेत मिळते आणि वस्त्रांच्या विविधांगी कहाणीत गुंगून जाण्यासाठी आपण सरसावतो.
विषय बोजड होऊ नये आणि माहिती नीट कळावी यासाठी तंतू आणि वस्त्र, भारतीय वस्त्रपरंपरा आणि कपडय़ांची निगा आणि काळजी असे तीन विभाग करण्यात आलेले आहेत. पहिल्या विभागात वनस्पतीजन्य, प्राणिजन्य आणि मानवनिर्मित तंतू, त्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रिया, त्यापासून तयार होणारी वस्त्रे आदींची माहिती दिली आहे. अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या सूत अर्थात कॉटनची गाठ सर्वप्रथम पडते. ैविनोबा भावे यांनी केलेल्या संशोधनानुसार भारतात गृत्समद ऋषींनी कापसाचा शोध वीस हजार वर्षांंपूर्वी लावला. त्यांनी कापड विणण्याचाही प्रयत्न केला होता. आणखी एका उल्लेखानुसार विविध रंगांची आकर्षक छपाई केलेल्या चिन्ट्झ या भारतीय सुती कापडाला पूर्वीच्या काळी इतकी मागणी होती की त्यामुळं इंग्लंड, फ्रान्ससारख्या देशांमधील कापडाचा धंदा धोक्यात आला होता. त्यानंतर सुताचे गुणधर्म, सूत कातणं आणि विणणं, सॅटिन आणि सॅटीनमधला सूक्ष्म पण तितकाच परिणामकारी फरक, तरुणाईचं लाडकं डेनिम, कापड विणण्याच्या काही पद्धती, कापडावर केल्या जाणाऱ्या प्रक्रिया सविस्तरपणं समजावून सांगितल्या आहेत.
‘रंगीत कपडे व्यक्तिमत्त्वाला उठाव आणतात. त्यामुळं कापड उद्योगात कापड रंगवण्याला खूप महत्त्व आहे,’ असं सांगत हा रंग कसा लावतात, कापडावर छपाई कशी करतात ती माहितीही दिली आहे. त्यातही हातानं छपाई करण्याची जुनी पद्धत भारत, चीन, आफ्रिका, जपान या देशांमध्ये अजूनही खूप वापरली जाते. त्याखेरीज यंत्राच्या साहाय्यानं छपाई करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, सुती कापडाचे कोणते प्रकार आहेत आणि त्यांचा उपयोग विशिष्ट कामांसाठीच का केला जातो, ते कळतं. पुढच्या वनस्पतीजन्य तंतू या अंतर्गत लिनन, ताग, नारळ इत्यादींची ओळख होते. ‘फ्लॅक्सच्या रोपाला लॅटिनमध्ये असलेल्या लिनम आणि ग्रीकमध्ये असलेल्या लिनन या नावावरून त्याच्या धाग्याला लिनन हे नाव पडलं.’ तसंच ‘महाभारतामध्ये तागापासून बनवलेल्या वस्त्रांचा उल्लेख आढळतो.’ ‘युरोपात अंबाडीपासून तयार केलेल्या दोरखंडाचा उपयोग जहाजासाठी केला जात असे. ख्रिस्तोफर कोलंबसनं त्याचा उपयोग केल्याचे उल्लेख आढळतात’, अशी माहिती मिळते.
प्राणिजन्य तंतू या विभागाचा प्रारंभ होतो, सर्वांच्या माहितीच्या धाग्यानं अर्थात रेशमानं! धाग्यांमधला ‘उच्चभ्रू धागा’ असा उल्लेख होणाऱ्या ैरेशमाचा शोध सर्वप्रथम चीनमध्ये लागला. रेशीम बनवल्याचं गुपित त्यांनी जवळजवळ तीन हजार वर्षं जपलं आणि त्यातून भरपूर पैसा कमावला. हे रेशीम मिळवण्याची प्रक्रिया कशी असते, रेशीम धाग्याची रचना आणि गुणधर्म काय आहेत, जंगली रेशमाचे प्रकार कोणते, रेशमी कापडांचे प्रकार कोणते याची माहिती दिली आहे. ‘तेनुन पहंग दिराजा’ नावाचं खास तलम रेशमी कापड मलेशियात बनवलं जातं. क्रेपचं कापड खूप पीळ दिलेल्या धाग्यांचं असतं. जॉर्जेट तशाच पद्धतीनं विणतात, पण त्याचा पोत छोटे कण हाताला लागल्यासारखा म्हणजे ‘ग्रेनी’ असतो, अशी माहिती मिळते. रेशमापाठोपाठ येते लोकर. लोकरीच्या धाग्यांचा इतिहास, तिचे प्रकार व धागे बनवण्याची प्रक्रिया, तंतूंची रचना व गुणधर्म, विविध कापडांचे प्रकार वाचायला मिळतात. बकऱ्यांपासून लोकर कशी मिळवतात, तसंच उंट, व्हिकुना, ग्वानॅको, याक, अल्पाका, लामा, मस्कऑक्स, अंगोरा आदींपासून लोकर कशी मिळवली जाते, ते सांगितलं आहे. सर्वात उच्च प्रतीच्या समजल्या जाणाऱ्या मेरिनो लोकरीपेक्षाही व्हिकुनाची लोकर तलम, मऊ आणि उच्च प्रतीची समजली जाते, अशी माहितीही समजते. शिवाय ऊब देणारी फरमध्ये विविध प्राण्यांपासून फर कशी मिळवतात ही माहिती दिली आहे.
मानवनिर्मित तंतू या विभागात रेयॉन, नायलॉन, पॉलिएस्टर इत्यादी तंतूंची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हिस्कोज रेयॉनपासून अतिशय उच्च प्रतीचं मुलायम शर्टिंग बनतं. तसंच अँक्रिलिक घाम चांगला शोषून घेत असल्यानं खेळाडूंचे टीशर्टस्, जॅकेटस्, ट्रॅक पँट्स यासाठी अँक्रिलिकचा वापर केला जातो. तर ैमायक्रोफायबरपासून मजबूत पण स्पर्शाला मऊ असणारं कापड तयार करता येते, अशी माहिती उपलब्ध
होते. सामान्यांच्या माहितीकक्षेच्या बाहेर असू शकणाऱ्या काचतंतू, उच्च कार्यक्षमतेचे तंतू, उच्चतंत्र तंतू, स्मार्ट फायबर, ई टेक्सटाइल्स आदी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या तंतूंविषयी सविस्तर माहिती मिळते, जी मूळातूनच वाचायला हवी. शिवाय ‘जर’ म्हणजे धातूपासून मानवानं तयार केलेला तंतूच. ऋग्वेदात आणि यजुर्वेदात ‘पेशस’ या नावानं जरींच्या वस्त्राचा उल्लेख आहे, अशा प्रकारची जरीबद्दलची माहिती कळते.
भारतीय वस्त्रपरंपरेच्या इतिहासाचा सखोल मागोवा घेण्यात आला आहे. भारतीय पोशाखाचं वैशिष्टय़ं असणाऱ्या साडीच्या इतिहासाचा भरजरी पदर, सुती साडय़ांचे विविध प्रकार, विविध प्रकारच्या प्रसिद्ध साडय़ा, बनारस ब्रोकेड विणण्याची हातोटी, उत्तर व मध्य, पश्चिम, दक्षिण व पूर्व भागातील साडय़ांची माहिती, महाराष्ट्रातील वस्त्रपरंपरा आणि या परंपरेत काळानुसार होत गेलेले बदल, पैठणीची वैशिष्टय़ं अशी वैविध्यपूर्ण माहिती वाचायला मिळते. शिवाय कपडय़ांची निगा आणि काळजी कशी घ्यावी, हेही सविस्तरपणं कळतं. या विषयाचा अधिक अभ्यास करावासा वाटेल, त्यांच्यासाठी पुस्तकाच्या अखेरीस देण्यात आलेली संदर्भसूची उपयुक्त ठरेल. या सगळ्या अभ्यासपूर्ण माहितीला काही छायाचित्रांची जोड कदाचित देता आली असती, तर ते अधिक उपयुक्त ठरले असते, कारण त्यामुळं तंतू आणि धागे ओळखणं सोपं गेलं असतं. शिवाय आजच्या वाचकांना समाजमाध्यमांमुळं मजकुरासोबत व्हिज्युअल्स पाहायची सवय लागली आहे. असो, एकूणच वस्त्रांचा इतिहास कथन करणारं, त्याविषयीचं कुतुहल शमवणारं आणि त्यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारे हे ‘धागे-दोरे’ वाचायलाच हवेत.
करामत धाग्या-दोऱ्यांची –
लेखक : डॉ. वर्षां जोशी
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पृष्ठे : २१६
किंमत : २५० रुपये.