कथा वाचता वाचता खळखळून हसण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर द. मा. मिरासदार आणि त्यांची पुस्तकं हा चांगला पर्याय आहे, हे पुन्हा एकदा गप्पागोष्टी वाचताना सतत जाणवत राहतं. ‘गप्पागोष्टीं’मधील कथा कुणी तरी ज्येष्ठानं आपल्या सहकाऱ्यांना, आपल्याभोवती असणाऱ्यांना सांगाव्यात इतक्या सहजपणे लिहिल्या असल्याने त्या खरोखरच ‘गप्पागोष्टी’ वाटतात.
कथासंग्रहातील ‘माझा कै. वृत्तपत्र व्यवसाय’ या पहिल्याच कथेतील नायक पत्रकारितेतील करिअर कशा प्रकारे संपुष्टात येतं याचं वर्णन करतो. वृत्तपत्र व्यवसायात असणाऱ्या प्रत्येकाला जवळची वाटावी अशी ही कथा.
रुपया गडगडल्याची बातमी संपादकांनी सांगितल्यानंतर या तरुण पत्रकारासमोर उभं राहिलेलं चित्रं, बजेटची बातमी करण्यासाठी बजेट घेऊन येऊन ते बातमी करेपर्यंतची कथा वाचून अगदी हसून हसून पुरेवाट होते. घसारा निधी, चलन फुगवटा, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कर यांच्या पत्रकाराने केलेल्या व्याख्या तर किती हसावं आता असं होऊन जातं.
‘ड्रॉइंग मास्तरांचा तास’ या कथेत चित्रकलेचे शिक्षक आणि त्यांनी घेतलेली इतिहासाची उजळणी आहे. मास्तरांचे कुंजपुरा, बारभाई, पानिपतची लढाई याविषयीचं ‘ज्ञान’ ते कसं सिद्ध करतात आणि फळ्यावर टिंब काढून, रेषा मारून दाखवलेली पानिपतची लढाई हे वाचनीय (हसणीय) आहे.
आजच्या शहरी लोकांचं खेडय़ाविषयी असणारं अतिज्ञान ‘खेडय़ातील एक दिवस’मधून समजतं. शहरी लोकांची शेती, तिथलं राहणीमान याविषयीची कल्पना हास्यास्पद वाटत असली तरी ही स्थिती आज बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत असल्याने कुठे तरी ही विनोदी कथा विचार करायला लावते, काळजीत टाकते.
काकांचे अंतिम संस्कार करताना प्रत्येक शेजाऱ्याचा, नातेवाईकाचा कलंदरपणा मिरासदार यांनी त्या त्या व्यक्तिचित्रणात जिवंत केला आहे. काकांची ‘बॉडी’ बदलली गेल्यानंतरचा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. रामभाऊ, विशापंत, डोंगऱ्यांची स्थिती नक्की काय झाली असेल याची कल्पनाच चेहऱ्यावर हसू उमटवते.
शाळेतील इरसाल पोरं नवीन मास्तरांना कशी त्रास देतात, पहिला तास घेताना प्रत्येक शिक्षकाला काय अनुभव येतो, शिक्षकांनी केलेला अभ्यास कसा ऐन वेळी पोरांच्या इरसालपणामुळे विसरला जातो. त्यामुळे ‘चहामधील आसाम, मळ्याचे चहा, पायथ्याचे डोंगर, आसाममधील मळे जास्त चहा पितात’ असे शब्दप्रयोग वाक्यांमध्ये केले जातात. त्यातून झालेली विनोदनिर्मिती ‘एका वर्गातील पाठ’ या कथेत आहे.
खरं तर प्रत्येक कथाच वेगळी. त्या कथेचा, विनोदाचा बाज वेगळा. असं असूनही प्रत्येक कथा ही चेहऱ्यावर हसू आणतेच आणते. द. मा. यांची पात्रं आणि त्यांनी त्यांचं केलेलं वर्णन इतकं जिवंत, की प्रत्येक कथेतली स्थिती, प्रसंग जशाचा तसा डोळ्यासमोर उभा राहतो. हे सगळं द. मा. मिरासदार यांना कुठे, कसे मिळाले असेल अशा आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं ते ‘माझ्या विनोदाची उलटतपासणी’मध्ये मिळतात. त्यांच्या लिखाणामागे नक्की काय काय आहे, हे समजून घेताना एका लेखकाचा प्रवास उलगडत जातो.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शि. द. फडणीस यांनी काढलेल्या चित्राचाही आपल्याला हसवण्यात नक्कीच वाटा असतो. पुस्तक संपलं तरी मनातल्या मनात त्यातील पात्रं, त्यांचे विनोद आठवत राहतात आणि नकळत चेहऱ्यावर हसू उमटते.
गप्पागोष्टी, लेखक : द.मा. मिरासदार, मेहता पब्लिशिंग हाऊस, मूल्य : १५० रुपये
response.lokprabha@expressindia.com