तंत्रज्ञानाने समाजात होणाऱ्या अमूलाग्र बदलांचा अचूक वेध ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर यांनी ‘कालान्तर’ मध्ये घेतला आहे. केवळ बदलाची नकारात्मक बाजू यात मांडलेली नाही तर बदलासाठी काय केले पाहिजे याचे उपायही सुचवले आहेत. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराने संवाद हरवत चालल्याची तक्रार सुरू असते. त्याचा आढावा घेत, समाजातील बदल केवळ दिखाऊ आहेत की टिकाऊ याचेही चिंतन आहे. राज्य स्थापनेनंतर आता आपण कुठवर आलो आहोत. आपले आदर्श काय आहेत याचे परखड विवेचन लेखकांनी केले आहे. समाजजीवन बदलले असे म्हणतो, मात्र परिस्थिती काय आहे असा मूलभूत प्रश्न वारंवार उपस्थित केला आहे. केवळ भौतिक बदल म्हणजे सर्व काही आहे काय?  सार्वजनिक जीवनातील बदलांची चर्चा करताना भाषा, संस्कार, चळवळी, शिष्टाचार या सगळ्यांचा धांडोळा यामध्ये आहे.

आमच्या काळी असे होते म्हणून लेखक स्वप्नरंजनात रमलेला नाही. आताची स्थिती अशी आहे की, मुळात आपली चूक झाली याची खंतच कुणाला वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे मग भाषेची आबाळ सुरू झाली. उच्चारात, लेखनात चुकांचे काही वाटत नाही. नुसते मराठी बोला म्हणून भाषा कशी सुधारणार? त्यासाठी चांगले मराठी ऐकले पाहिजे, त्यातून चांगली भाषा कोणती तेही कळाले पाहिजे. त्यासाठी वाचन हवे असा सल्ला लेखक देतात. इतकेच काय हस्ताक्षर या लेखकलेवरही सुंदर विवेचन यामध्ये आहे. आजच्या कार्टून व गेम्सच्या युगात इसापनीतीतील गोष्टी गायब झाल्याची खंत आहे. आजी-आजोबांकडून गोष्टी ऐकणे हा आनंद असायचा, मात्र आता मुलांना तंत्रज्ञानाच्या वेडाने मोबाइल, गेम हेच प्रिय वाटते. त्यातून संस्कार कसे मिळणार हा प्रश्नच आहे.

सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवरही उत्तम भाष्य पुस्तकात आहे. शिक्षक-विद्यार्थी नाते, सध्याची शैक्षणिक व्यवस्था, शाळा-महाविद्यालय ते विद्यापीठ असा हा प्रवास रंजकपणे मांडला आहे. कालौघात गुरू-शिष्य नाते फारच औपचारिक झाल्याचे मतप्रदर्शन आहे. एकेकाळी परदेशगमन निशिद्ध होते. मात्र परदेशात शिकायला जाणे ही अभिमानाची बाब आहे. त्यात गैर काहीच नाही. मात्र बाहेरच्या काही बाबींचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नात आपले मूळ विसरत चालल्याची लेखकाची खंत आहे. बदलत्या काळाबरोबर चार पैसे हातात आल्यावर बटबटीत श्रीमंती आली यावर नाराजी व्यक्त करताना, अधिकाधिक सुखासाठी संस्कार विसरत चाललो आहोत. मेहनतीने मिळवलेल्या संपत्तीबाबत तक्रार नाही मात्र अधिक पैसे मिळवण्याच्या मोहात साधनशुचितेलाच सोडचिठ्ठी दिली जात आहे, हे योग्य नाही याची जाणीव करून दिली आहे. पूर्वीसारखे आदर्श नेते आता मिळणार नाहीत, बहुतेक ठिकाणी विश्वासार्हता गमावलेली माणसे आहेत मग आदर्श निर्माण होणार कसे हा सवाल आहे.

समाजाचा प्रवास अधिकाधिक सुसंस्कृततेकडे व्हावा, त्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा हे शिष्टाचारामध्ये अपेक्षित आहे. आपण जर सुसंस्कृत व्हायचेच नाही असे ठरवले नाही तर मग समाजजीवन चालणार कसे? त्य़्ाा दृष्टीने आपले वर्तन इतरांना त्रास होणार नाही असे असले पाहिजे. केवळ दंडेलीच्या जोरावर मी म्हणेन तेच खरे असे जर वर्तन ठेवले तर तर मग त्या समाजाला सुसंस्कृत कसे म्हणणार हा प्रश्न आहे. शेजारधर्म, संभाषणचातुर्य ते अगदी भोजनप्रसंगी कसे वागले पाहिजे. पंक्तीत बसल्यावर इतरांचे जेवण होण्यापूर्वी आपले जेवण संपवणे किंवा इतर मंडळींच्या फार मागे राहाणे या दोन्ही त्याज्य आहेत. कोणती परंपरा सांभाळायची व कोणती खंडित करायची हा विवेक असणारा समाजच वैचारिक प्रगल्भतेच्या वाटेने प्रवास करतो हे लेखकाचे मत मार्मिक आहे. एखाद्या गोष्टीला केवळ सोयीने परंपरा म्हणायचे त्याच तर्कसंगत विचार ठेवला नाही तर मग काय होईल. नेते व अनुयायींच्या संबंधावरही उत्तम विवेचन आहे. अनुयायांच्या राजकीय व आर्थिक भवितव्याची काळजी घेतली नाही तर अनुयायी मिळणे कठीण होईल. थोडय़ात सवंग लोकनुरंजन करणे हा उद्योग झाला आहे. पूर्वी गावपातळीवर काम केलेले कार्यकर्ते पुढे जात. आता घराणेशाही, फलकबाजी करून झटपट नेता होण्याची घाई आहे. त्यासाठी थांबण्याची तयारी नाही. उमेदवारी मिळाली नाही तर लगेच निष्ठा बदलता येते इतक्या गोष्टी सत्तालोलुप झाल्या आहेत. विचार किंवा सेवा हा भाग दुर्मीळ होत चालला आहे.

वाममार्गाने अर्थार्जन करण्यापासून वाचवण्यासाठी उच्च नैतिक आधार गरजेचा आहे. हा आधार पूर्वी धर्माचरण किंवा कौटुंबिक संस्कारातून मिळे. मात्र आता धर्माचरणाचे बाह्य सोपस्कार उरले आहेत. त्यात दैनंदिन आचार-विचारांशी काही संबंध उरलेला नाही याची दखल या पुस्तकाच्या निमित्ताने परखडपणे लेखकाने घेतली आहे. भरपूर पडझड झाली असली तरी नाऊमेद होण्याचे कारण नाही असा दिलासा यानिमित्ताने आहे. चांगले बदल घडवण्यासाठी राज्यकर्त्यांबरोबर समाजानेही सक्रिय सहभाग दिला पाहिजे. केवळ कोणीतरी राज्यकर्त्ये हे करेल हे मानून आपल्याला काय त्याचे ही प्रवृत्ती सोडून दिली पाहिजे. थोडक्यात चांगल्या बदलांची सुरुवात स्वत:पासून केल्यास सुदृढ समाजनिर्मिती होईल असाच संदेश या पुस्तकाचा आहे.

कालान्तर, लेखक : डॉ. अरुण टिकेकर, प्रकाशक : रोहन प्रकाशन, पृष्ठसंख्या : १५४, मूल्य : रु. १८०/-
हृषीकेश देशपांडे
response.lokprabha@expressindia.com