‘कविता म्हणजे आकाशीची वीज, ती धरू पाहणारे शेकडा ९९ टक्के लोक होरपळून जातात..’ असं गोविंदाग्रजांनी म्हटलं होतं. नवकविता यमकं, छंदमुक्त झाल्यानंतर मुक्तछंदात लिहिणाऱ्या कवींची संख्या भारंभार वाढली. एखादी चमकदार कल्पना घेऊन शब्दांशी केलेल्या खेळालाच लोक कविता समजायला लागले. पण कवी असणं, कविता लिहिणं ही हटातटाने साध्य करण्याची गोष्ट नाहीच. कवी असणं ही वृत्ती असते. ती असते किंवा नसते. ती असेल तर ती आपसूकच उमलून येते. ती आहे, याचा डांगोरा पिटावा लागत नाही. शब्दांशी खेळण्याचा खटाटोप करावा लागत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजीव काळे यांच्या ‘मोर’ या कवितासंग्रहातल्या कविता वाचताना नेमका या गोष्टीचा प्रत्यय येतो. मोर हे प्रतीक आहे, आनंदाचं. पावसाच्या वर्षांवानंतर आपला सुंदर पिसारा फुलवून, तनमन विसरून नाचणारा हा देखणा पक्षी म्हणजे मनाच्या आनंदविभोर वृत्तीचंच प्रतीक. त्याचं शीर्षक आपल्या कवितासंग्रहाला देऊन एक प्रकारे कवी राजीव काळे यांनी त्यांची कविता नेमकं काय सांगू इच्छिते हेच सूचित केलं आहे.

शीर्षक कवितेत ते म्हणतात,

बहरपिसाऱ्याचे

चित्तचोर मोर

कधीच उतरत नसतात

आधी वर्दी देऊन

कुणाच्या अंगणात.

फुललेला घनभार

आणि

उत्सुक मोकळे अंगण

एवढेच पुरेसं त्यांना

निमित्त आणि निमंत्रण.

मनाच्या उत्स्फूर्ततेचं हे नेमकं वर्णन आहे. जगातल्या सगळ्या बेरीज-वजाबाक्या, गुणाकार-भागाकारांना पुरून उरणारी उत्स्फूर्तता मोराच्या फुललेल्या पिसाऱ्याशी असं नातं सांगते.

अशी लाभो मग्नता

जशी उन्हाची

वाऱ्याची

सरींची

भुईची..

असं एका कवितेत राजीव काळे म्हणतात तेव्हा ते नेमकं काय सांगू पाहात आहेत, हे जाणवायला लागतं. ही मग्नता साधली की आपोआपच पुढची पायरी असते ती म्हणजे,

माझा रंग

मज लाभो

माझा संग

मज लाभो

आजच्या कमालीच्या वेगवान, जीवघेण्या स्पर्धेच्या जगात स्वत:शी संवाद साधायला कुणाला वेळ आहे? सतत काही तरी मिळवण्याच्या मागे असताना जिथे काही तरी फायदा आहे, तिथल्या रंगात रंगणं, अशाच लोकांच्या मागे जाणं, टिकण्यासाठीची अपरिहार्य धडपड या सगळ्यामध्ये स्वत: सोडून इतर सगळ्यांशी संवाद साधला जातो. त्यामुळे माझा रंग मज लाभो, माझा संग मज लाभो हा कवीच्या स्वत:शी संवाद साधण्याच्या, स्वत:च्या शोधाच्या प्रेरणेचा आर्त उद्गार आहे, असं वाटतं. म्हणूनच एका कवितेत कवी म्हणतो,

माझे मज काही

मिळो दे रे

आपण सतत कुणाचे कुणी तरी म्हणून जगत असतो, कशासाठी तरी जगत असतो. इतरांना आपल्याकडून काही तरी अपेक्षित असतं त्यानुसार आपल्या सगळ्या सगळ्या बेरीज-वजाबाक्या सुरू असतात. पण आपल्याला काय हवं असतं, ते आपल्याला माहीत असतं का, मुळात आपण आपल्याला काय हवंय याचा शोध तरी घेतो का, हा मुद्दा या ओळी गहिरेपणे व्यक्त करतात.

स्वत:च्या शोधाची कवीची ही आनंदयात्रा पुढे पुढे त्याच्या एकटय़ापुरतीच राहत नाही, ती त्यापलीकडे जाणारं काही तरी शोधायला, मागायला लागते. माझं गाणं माझं मला मिळणार आहेच, पण ते इतरांनाही मिळो, जगण्यातली तल्लीनता, जगण्यातला आनंद त्यांनाही लाभो असं कवीला वाटतं.

..आणि गिरकीदार गाणे

ते मिळते गाता गाता

गिरकी घेता घेता

ते मिळो माझे मला

ज्याचे त्याला

थोडक्यात जो जे वांच्छील तो ते लाहो पातळीवर येत कवी म्हणतो,

लाभो

ज्याचे त्याला सस्नेह आभाळ

राजीव काळे यांच्या कवितेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ती कमालीची अल्पाक्षरी कविता आहे. ती शब्दबंबाळ होत नाही, दुसऱ्यालाही शब्दबंबाळ करत नाही. आपल्या नेमक्या, मोजक्या म्हणण्यातूनच, खरं म्हणजे न म्हणण्यातूच खूप काही सांगून जाते. आपल्याला जे सांगायचंय ते शब्दांचा भडिमार करून सांगणं एकवेळ सोपं असतं, पण मोती तोलावा तसा प्रत्येक शब्द न् शब्द तोलत ते सांगितलं जातं, तेव्हा ते अधिक अर्थपूर्ण होत जातं.

नातं

मुळास बिलगून

भुईत भुई झालेलं

खोल झिरपणारं

अशा शब्दांमधून नात्याचं वर्णन येतं तेव्हा तितकंच सखोल चिंतन करून आलेलं असतं.

या भुईत भुई होणाऱ्या नात्यासारखंच राजीव काळे यांच्या कवितेचं निसर्गाशी, आसपासच्या भवतालाशी एक गहिरं नातं आहे, खरं तर त्यांच्या कवितेतूनच नात्याचा एक अखंड शोध आहे. तसाच स्वत:चाही अखंड शोध आहे. स्वत:शी सतत चाललेला अखंड संवाद आहे. कुणाशी तरी एकरूप होण्याची अक्षय आस आहे. त्याबरोबरच मानवी सुखदु:खांची, जगण्याची एक व्यापक, सखोल अशी जाणीव या कवितांमधून झिरपत राहते. जगण्याच्या या सगळ्या पसाऱ्यात मोरासारखं असताना कवीची ही जाणीव म्हणते..

असाच निघून जाईन

अचानक

एखाद्या

निसटत्या निमूटक्षणी

पसरलेल्या पथारीची

घडीही न घालता

मोर, राजीव काळे, नवता बुक वर्ल्ड, मूल्य :  रु. १२०, पृष्ठे : ९३
वैशाली चिटणीस