दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदरची काही वर्षे युरोप आणि अमेरिकेत बऱ्याच प्रमाणात अणुसंशोधन सुरू होते. अणूचे विखंडन करून खूप मोठय़ा प्रमाणात ऊर्जा मोकळी करता येते हे सिद्ध झाले होते. मात्र मानवी स्वभाव असा विचित्र आहे की त्या ऊर्जेचा वापर वीजनिर्मिती आणि अन्य रचनात्मक कामांसाठी करण्यापेक्षा विध्वंसक कामांसाठी करण्यालाच त्याने प्राधान्य दिले. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर ६ ऑगस्ट आणि ९ ऑगस्ट १९४५ रोजी टाकलेल्या अणुबॉम्बनी प्रचंड विनाश घडवला. या हल्ल्याने दुसऱ्या महायुद्धाचा अखेरचा अध्याय लिहिला गेला आणि जगाला अणुयुगात आणून सोडले. इतिहासात आजवर कधी नव्हे इतकी संहारक क्षमता या शस्त्राने मानवाच्या हाती दिली.
सुरुवातीची काही वर्षे ही विद्या अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन या मोजक्या देशांची मक्तेदारी होती. या अस्त्रांनी जागतिक सत्तासमीकरणे बदलून टाकली. अमेरिका आणि रशियाच्या गोटातील देशांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले होते. जोवर ही अस्त्रे या मूठभर देशांकडे होती तोवर ती जबाबदार देशांच्या हाती असल्याचा समज होता. मात्र आपल्यालाही स्वसंरक्षणाचा त्यांच्याइतकाच अधिकार आहे आणि त्यासाठी आपणही ही अस्त्रे हस्तगत केली पाहिजेच अशी मनीषा अन्य कित्येक देशांच्या ठायी निर्माण झाली. त्यातून जागतिक अण्वस्त्रस्पर्धा निर्माण झाली. आता या धोकादायक महानाटय़ाची जगाच्या वेगवेगळ्या भागांत विभागीय उपकथानके लिहिली जाऊ लागली. पुढे चीन, भारत आणि इस्रायलनेही ती विद्या आत्मसात केली.
भारताकडून १९४७-४८, १९६५ आणि १९७१च्या युद्धांत चारीमुंडय़ा चीत झाल्यानंतर आणि १९७१च्या बांगलादेश मुक्ती युद्धात देशाची दोन शकले झाल्यानंतर पाकिस्तानची अस्मिता चांगलीच दुखावली होती. त्यांना भयगंडाने पछाडले होते. एक वेळ गवत खाऊन राहू पण हिंदू भारतापासून संरक्षणासाठी अणुबॉम्ब बनवूच अशा वल्गना त्यांचे नेते करू लागले होते. पाकिस्तानमध्ये यापूर्वीही पाकिस्तान अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष मुनीर अहमद खान यांच्या नेतृत्वाखाली अण्वस्त्र कार्यक्रम राबवला जात होता. मात्र त्याला फारसे यश लाभले नव्हते. भारताने पोखरणच्या वाळवंटात १९७४ साली अणुस्फोट केल्यानंतर तर पाकिस्तानी नेत्यांची अस्वस्थता शिगेला पोहोचली.
नेमक्या याच काळात युरोपमध्ये अणुसंशोधन प्रकल्पात कामावर असलेल्या अब्दुल कादिर (ए. क्यू.) खान नावाच्या पाकिस्तानी शास्त्रज्ञाने पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांना एक पत्र पाठवले. त्यात खानने आपण पाकिस्तानसाठी अणबॉम्ब बनवून देऊ शकतो, असे आश्वासन दिले होते. भुट्टोंनी या तरुणाला देशात परत येऊ देऊन सर्व मदत देऊ केली. इथून पुढे पाकिस्तानच्या हाती एक हुकमी एक्का लागला होता. या प्रसंगानंतर पाकिस्तानचे नशीब उजळले असे म्हटले तरी जगाच्या दृष्टीने मात्र एक दु:स्वप्न सुरू झाले होते.
अब्दुल कादिर (ए. क्यू.) खान यांचा जन्म अखंड भारतातील भोपाळमध्ये झाला होता. फाळणीनंतर ते पाकिस्तानला गेले. पुढे कराची विद्यापीठातून पदवी ग्रहण करून लहानसहान नोकऱ्या केल्यानंतर ते १९६१ साली जर्मनीत व नंतर नेदरलॅण्डला गेले आणि तेथून धातुशास्त्रातील पदवी मिळवली. त्याच दरम्यान नेदरलॅण्डच्या हेनी नावाच्या मुलीबरोबर त्यांनी विवाह केला. पुढे जर्मनी, नेदरलॅण्ड्स, ब्रिटन आणि अमेरिकी यांच्या सहभागाने अणुसंशोधनासाठी युरेन्को नावाची एक कंपनी स्थापन झाली. त्यांच्या युरोपीय प्रयोगशाळांमध्ये सेंट्रिफ्यूज पद्धतीने युरेनियम शुद्धीकरणासाठी नवी पद्धत विकसित केली जात होती. खान यांना जर्मन, डच आणि इंग्रजी भाषा चांगल्या अवगत होत्या आणि त्यांचा डच मुलीशी विवाह झाला होता. याचा फायदा मिळून त्यांना या तंत्रज्ञानाचे भाषांतर करण्याची नोकरी मिळाली आणि त्याचा त्यांनी पुरेपूर लाभ उठवला. केवळ काही आठवडय़ांत त्यांनी सर्व गोपनीय अणुतंत्रज्ञाची कागदपत्रे मिळवून थेट पाकिस्तान गाठले. पाकिस्तानचा हा अण्वस्त्रे मिळवण्याचा प्रवास म्हणजे जागतिक हेरगिरीच्या इतिहासातील एक आश्चर्य मानला जातो.
पाकिस्तानात त्यांना काहुटा येथे अणुप्रकल्प उभारण्यासाठी सर्व मदत मिळाली. सुरुवातीला मुनीर अहमद खान यांच्याशी काही खटके उडाले, पण पाकिस्तानी राज्यकर्त्यांना अणुबॉम्ब मिळवण्याची इतकी घाई होती की ते ए. क्यू. खानच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहिले. येथून पुढचा प्रवास म्हणजे वैयक्तिक आणि देशाची महत्त्वाकांक्षा, फसवणूक, हेरगिरी, जागतिक सत्ताकारणातील घटनांचा हवा तसा घेतलेला फायदा आणि महासत्तांनी आपल्या फायद्यापोटी पाकिस्तानसारख्या बेजबाबदार देशाचे अपराध कसे पोटी घातले आणि नंतर हाच भस्मासुर त्यांच्याच जिवावर कसा उठला आणि त्यातून जागतिक शांततेला कसा धोका निर्माण झाला आहे याची विदारक कहाणी आहे.
अमेरिकेला त्या काळात अफगाणिस्तानमध्ये घुसलेल्या रशियाला काटशह देण्यास पाकिस्तानची गरज होती आणि त्यापोटी पाकिस्तानने आपले उखळ चांगलेच पांढरे करून घेतले. अमेरिकी राज्यकर्त्यांनीही आपल्या प्रतिनिधीगृहाची फसवणूक करून पाकिस्तानला मदत केली. पाकिस्तानला अण्वस्त्रसज्ज करण्यात चीननेही भारतावर नियंत्रण ठेवण्याच्या कल्पनेने मुक्त मदत केली. पाकिस्तानने मिळालेले तंत्रज्ञान केवळ आपल्यापुरते न ठेवता ते उत्तर कोरिया, लिबिया, इराण अशा देशांना चोरटय़ा मार्गाने पुरवले. अखेर हे तंत्रज्ञान अल-कायदा आणि तालिबानसारख्या धर्माध दहशतवाद्यांच्या हाती पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींत अमेरिकेची सीआयए, इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजन्सी आणि अन्य जागतिक समुदाय हतबल ठरला. त्याची उत्कंठापूर्ण पण उद्वेगजनक कहाणी या दोन्ही पुस्तकांत मांडली आहे.
‘न्यूक्लिअर डिसेप्शन’ आणि ‘अ मॅन फ्रॉम पाकिस्तान’ या दोन इंग्रजी पुस्तकांचा ही दोन पुस्तके हा अनुवाद आहे. विषय साधारण एकच असल्याने बरीचशी माहिती समानच आहे. अणुसंशोधन हा विषय काहीसा क्लिष्ट असल्याने तो सामान्य वाचकांपर्यंत आणण्यात काहीशी कसरत करावी लागते. त्या अनुषंगाने भाषांतरित पुस्तकांच्या काही मर्यादा येथेही दिसून येतात. मूळ पुस्तकाच्या गाभ्याला धक्का न लावता हे आव्हान पेलताना त्या येणार हे स्पष्ट आहे. पण मुळातच विषय उत्कंठावर्धक असल्याने पुस्तके वाचनीय आहेत.
पाकिस्तानी अणुबॉम्ब : एक घोर फसवणूक, चोरी व फसवणूक यातून जन्मलेल्या पाकिस्तानी अणुबॉम्बची कहाणी, मूळ लेखक : एड्रियन लेव्ही व कॅथरिन स्कॉट-क्लार्क, मराठी रूपांतर : सुधीर काळे, प्रकाशक : मॅजेस्टिक प्रकाशन,पाने : ४३०, किंमत : ५५० रुपये
तो एक पाकिस्तानी, जगातील सर्वात घातकी अणू तस्करीची सत्यकथा, मूळ लेखक : डग्लस फ्रान्झ, कॅथरिन कॉलिन्स,अनुवाद : शेखर जोशी, प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस,पाने : ४४४, किंमत : ४५० रुपये
सचिन दिवाण – response.lokprabha@expressindia.com