प्रश्नचिन्ह कुणी शोधून काढलं कळत नाही! कुणा माणसाचं काय अडलं होतं त्याच्यावाचून? मनुष्य जमातीस लाखो र्वष पुरून उरेल एवढी मोठी डोकेदुखी या प्रश्नचिन्हातून आपण निर्माण करतोय हे कळत नव्हतं त्याला? मनुष्य वगळता इतर सर्व जीवसृष्टीत प्रश्नचिन्हाशिवाय एकूण एक सजीव सुखात आणि उदंड आनंदात जगतायत. नाही म्हणायला कुत्रे आणि वानर या दोन प्राण्यांच्या शेपटीत प्रश्नचिन्ह आहे, परंतु ते त्यांच्या डोक्यापुढे नाही. डोक्याच्या मागे दुसऱ्या टोकाला आहे. स्वत:च निर्माण केलेल्या प्रश्नामागे धावणारा तत्त्ववेत्ता आणि स्वत:च्याच प्रश्नचिन्हांकित शेपटीचा पाठलाग गोलगोल फिरत करणारा कुत्रा यात फरक तो कोणता? ‘‘हेच येडे आपले वंशज काय?’’ हा माणसाकडे पाहून वानराच्या डोक्यात आलेला प्रश्न शेपटीतून उद्भवला तर नसेल? बसकण मारलेल्या म्हशीला शेपूट पिरगाळून उठवा. ती ‘वाँय’ म्हणते. दावण सोडून नदीकडे पिटाळत न्या. पावलोपावली ‘वाँय’. परत गोठय़ाकडे आणताना ‘वाँय’. खाण्यासाठी कडबा टाका. ‘वाँय’. घमेलं भरून आंबोण खायला घाला. ‘वाँय.’ या तिच्या प्रश्नचिन्हांकित ‘वाँय’वरून तर इंग्रजांनी ‘व्हाय?’ हा प्रश्नचिन्हांकित शब्द निर्माण केला नसेल? आपल्या संस्कृतोद्भव उच्चारपद्धतीमुळे आपण ‘व्हाय’ म्हणतो, पण युरोपीयन आणि अमेरिकन माणसे अनुस्वारासकट ‘वाँय्’ असेच म्हणतात की नाही पाहा. कुत्रा, वानर आणि म्हैस या तीन प्राण्यांपर्यंत कदाचित प्रश्नचिन्ह पोहोचले असावे, पण तेही त्यांना माणसांच्या वागणुकीतूनच सापडलेले दिसते. कुत्र्याची शेपूट इस्त्री करून सरळ करण्याचा प्रयत्न करणे आणि एखादा कूटप्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे या दोहोत कसे दृष्ट लागण्याइतके साम्य आहे पाहा.
ज्याने प्रश्नचिन्ह शोधून काढले तो माणूसच होता. प्रश्नचिन्ह म्हणजे डोक्याला मोफतच ताप, खार, कल्हई लावणे होय, हेही त्याच्या तेव्हाच लक्षात आले असावे. त्यातून चकचकीत कल्हई लागलेल्या डोक्याच्या आकाराचेच प्रश्नचिन्ह त्याने बनविले. एखाद्या प्रश्नचिन्हास नाक, कान, डोळे, त्यावर चष्मा चितारून पाहा. आपण विचारवंत असाल तर ते थेट तुमच्यासारखे दिसते की नाही पाहा. प्रश्नचिन्ह हे आत्मचित्रणाचा मूलभूत पायाच होऊन राहिले आहे.
ज्या प्रश्नांची खात्रीशीर उत्तरे कुणापाशीच नाहीत ते प्रश्न इतरांना विचारून त्यांच्या बुद्धीचे मोजमाप घेण्याचा उद्योग विद्वान मंडळी निष्ठेने करत असतात, इतर माणसे आपल्याइतकीच निर्बुद्ध आहेत याची खात्री करून घेण्याचा तर हा उद्योग नसेल? एसेस्सी बोर्डाने आम्हास अनेक प्रश्न विचारून आम्ही पस्तीस टक्के विद्वान आहोत, असा निष्कर्ष काढला. त्याबद्दल बोर्डाचे आम्ही कृतज्ञ आहोत. मात्र आपण शंभर टक्के विद्वान आहोत, हा निष्कर्ष त्यांनी स्वत:स एकही प्रश्न न विचारता कसा काढला हा प्रश्न विचारायची परवानगी आम्हास नाही. आणखी तळागाळातला प्रश्न असा की, शंभर टक्के विद्वत्ता आपणापाशी खरोखरच असती, तर आपण एसेस्सी बोर्डात कशाला चिकटला असतात? मग एका अविद्वानाने दुसऱ्या अविद्वानाच्या विद्वत्तेचे मूल्यमापन करणे म्हणजे झोकांडय़ा खाणाऱ्याने दुसऱ्या दारुडय़ास ‘‘दारू पितो ७७७-!’’ म्हणण्यासारखे होत नाही काय? हा प्रश्न आम्ही तरी कशाला विचारतोय? खरं उत्तर आहे कुणाकडे? एसेस्सीचे सर्टिफिकेट मिळाल्यानंतरसुद्धा आम्ही किमान पस्तीस टक्के तरी विद्वान आहोत याची खात्री आम्हाला कशी वाटावी? गळक्या मापाने मोजून लिटरभर दूध घालणाऱ्या भय्याजीवर भरवसा तरी कसा ठेवायचा? एसेस्सी हा विद्वत्तेचा आएसआय मार्क समजला जातो. त्यानुसार आमच्या डोक्यात फक्त पस्तीस टक्के बुद्धिमत्ता असेल तर उर्वरित पासष्ट टक्के डोक्यात काय असेल हा डोके चक्रावून टाकणारा प्रश्न. तो स्वत:ससुद्धा विचारण्यात अर्थ नाही.
आयुष्याच्या सुरुवातीचीच शाळेतली अकरा आणि कॉलेजमधली चार अशी ऐन उमेदीची पंधरा वर्षे आम्ही प्रश्नचिन्हांच्या निबीड दंडकारण्यात काढली. प्रकाशाचा किरणसुद्धा आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. ‘‘प्रकाशाकडे पाठ फिरवून चालायला लागलात, तर तुम्हाला प्रकाश दिसणार कधी?’’ हाही पुन्हा प्रश्नच गुरुदेव रवींद्रनाथ आम्हाला विचारतात. पण गुरुदेव, इतकी असंख्य प्रश्नचिन्हे ओलांडून प्रकाशाचा किरण आमच्यापर्यंत येणार तरी कुठून? आम्हाला दिशा दाखवा. आम्ही त्या दिशेने चालायला तयार आहोत. त्याऐवजी प्रश्नचिन्हांच्या जंगलात आणखी एक भले मोठे घनदाट प्रश्नचिन्ह उभे करून आपण आम्हाला प्रकाशाचा किरण शोधायला सांगता? (पाहिलंत? आणखी एक प्रश्न उगवला?)
उत्तरे सापडत नाहीत आणि प्रश्न विचारून प्रश्न संपवता येत नाहीत. परवा आमच्या डॉक्टरांकडे गेलो होतो. डिक्शनरीत डॉक्टर या शब्दाचा अर्थ पाहून गेलो होतो. डॉक्टर म्हणजे पंडित, विद्वान, विद्यापीठातली सर्वोच्च पदवी धारण करणारा. त्यांच्या क्लिनिकमध्ये खुर्ची शेजारच्या भिंतीला खुंटीवर स्टेथॉस्कोप घडी करून टांगलेला होता. खुंटीवर टांगलेल्या प्रश्नचिन्हासारखा दिसत होता. तो मला विचारत होता, शरीर माझं आणि मला काय झालंय हा प्रश्न विचारत मी डॉक्टरांकडे का जातो? ‘‘माझा उजवा हात कुठे आहे? डावा कान कुठे आहे?’’ हे डॉक्टरांना न विचारतासुद्धा मला कळायची सोय आहे ना? मग मला काय झालंय? हा प्रश्न मला का पडतो? त्याच्यावरचा उपाय मला कळत नाही, डॉक्टरांना कळतो असे मी का समजतो? माणूस वगळता इतर प्राण्यांना हा प्रश्न का पडत नाही? कुठला हत्ती मला काय झालंय विचारत पशुवैद्यामागे धावत सुटतो? जंगलात आणि निबीड अरण्यात पशूंना तपासत कोणता वैद्य फिरतो? तरीही सगळे व्यवस्थित जगून मरतात. फार कशाला? आपल्या स्वत:च्या पूर्वजांना कुणीही कसले उपचार न करता ते कसे जगले? ते जगले म्हणूनच आपण आहोत. यातून एकच सरळ निष्कर्ष निघतो. स्वत:ला काय झालं आहे आणि काय करायला हवं आहे हे प्रत्येकाला समजण्याची व्यवस्था निसर्गाने नक्की केली आहे. माणसापाशीही ती असणार आहे. पाण्याची गरज असते तेव्हा तहान लागते. विश्रांतीची गरज असते तेव्हा डोळे मिटतात. मग तब्येत बिघडल्यावर काय करायला हवं हे विचारत माणूस डॉक्टरांकडे का जातो? त्याला कळायची व्यवस्था नाही? हे सगळे प्रश्न खुंटीवर टांगलेल्या स्टेथॉस्कोपच्या प्रश्नचिन्हात एकत्रितपणे दिसत होते. आमच्या मनातल्या एकूण एक प्रश्नांना भिंतीवरच्या खुंटीनेच जणू आधार दिला होता.
स्टेथॉस्कोपला जोडलेली दोन उलटसुलट प्रश्नचिन्हं कानाला अडकवून डॉक्टर पेशंटला तपासतात तेव्हा आतल्या आत त्यांना काय वाटत असतं कळायला मार्ग नाही, पण त्यांचा निष्कर्ष आणि उपचार (त्यांनी सांगितलाच तर) ऐकण्याजोगा असतो. ‘‘निश्चित काही आत्ताच सांगता येत नाही. कसलं तरी इन्फेक्शन असावं. अँटिबायोटिक्स सुरू करू. बघू या काय होते ते!’’ ते तरी यापेक्षा वेगळं ते काय सांगणार? मला काय झालंय हे मलाच माहीत नसेल तर इतर कुणालाही ते कसं कळणार?
एकूण एक प्रश्नचिन्हांची मूलभूत गडबड इथे असावी. प्रश्न इतरांनी विचारायचे आणि उत्तरं आपण द्यायची हा प्रोसेस पार माँटेसरी के.जी.पासून जो सुरू होतो तो मरेपर्यंत संपत नाही. शेवटी मृत्यू म्हणजे काय हासुद्धा प्रश्नच जिवंत राहतो. माणूस मरतो. हे सारे वर्षांनुवर्षे, पिढय़ान्पिढय़ा असेच चालत आले. प्रश्नांचे जंगल वाढत जाऊन आता त्याचे दंडकारण्य झाले. उत्तरांची वस्ती अभावानेच कुठे सापडली तर सापडते. त्यातली खरी उत्तरे किती आणि आभासी उत्तरे किती, हा आणखी गहन प्रश्न.
ज्याच्या प्रश्नांची उत्तरे त्यानेच शोधणे आणि सापडलेल्या उत्तरांचा खरेखोटेपणा त्यानेच पडताळून निष्कर्ष काढणे हा एकच पर्याय या प्रश्नांच्या जंगलातून बाहेर पडण्याचा असावा. आपल्याला मिळालेली उत्तरे आपल्यापुरती खरी. ती इतरांनापण खरी वाटलीच पाहिजेत या दुराग्रहातून माणसाने युद्धे- महायुद्धे केली. अगणित प्रश्न सावरीच्या बोंडातल्या म्हाताऱ्यांसारखे हवेत पसरले. हाती मात्र काहीच लागले नाही. सापडलेली उत्तरे इतरांस सांगू नयेत असे अजिबात नाही. अवश्य सांगावीत, पण इतरांना त्यांच्या बुद्धीने वेगळी उत्तरे शोधण्याची मुभा ठेवावी. ती ऐकून त्यावर विचार करण्याची मुभा स्वत:लापण द्यायला हवी. कुणाच्या कोंबडय़ाने का होईना उजाडण्याशी कारण! माझ्याच कोंबडय़ाने उजाडलं पाहिजे हा हट्ट कशासाठी? प्रश्न यातून उद्भवतात आणि त्यांची उत्तरं कुणालाच सापडत नाहीत. मला जे कळलं ते कितीही फायनल सत्य वाटत असलं तरी ते माझ्यापुरतं फायनल. इतरांना सापडलेलं फायनल सत्य त्यापेक्षा वेगळं असलं तर असू द्यावं. अंतिम सत्य सापडण्याचा हा उजवा पर्याय. मला सापडलेलं अंतिम सत्य इतरांना मान्य नाही म्हणजे काय? यातून नको तसे संघर्ष फक्त झाले. माणसे मेली, पण प्रश्न जिवंत राहिले. सुटले थोडे. निरुत्तर अतोनात राहिले.
ज्याला आपण नंदनवन, स्वर्ग वगैरे म्हणतो ते कदाचित प्रश्नचिन्हविरहित जग असावे, सोपे जग असावे, साधे असावे. मग त्या दिशेने आपण का नाही जायचं?
प्रश्नांच्या निबीड अरण्यात या आणखी एका प्रश्नाची भर न घालता जाऊन तर पाहू या!