प्रेमविवाहात बहुधा असं होत असावं की प्रियकर श्रीमंत तर प्रेयसी गरीब किंवा प्रेयसी हायली कॉलिफाइड तर प्रियकर दहावी किंवा बारावी पास, तर कधी कधी कुब्जेच्या प्रेमात पडलेला मदन आंधळा असावा आणि एखादा कट्टर हिंदूच्या प्रेमात बिगर हिंदू मुलगी पडावी. थोडक्यात परस्पर विरोधी किंवा दोन वेगवेगळय़ा टोकाच्या व्यक्ती प्रेमात पडतात आणि मग कळत नकळत आणि अपरिहार्यपणे लग्नाच्या बेडीत अडकतात. 

माझं ही असंच झालं. सात भावंडांमध्ये मी एक. आईबाबा मध्यमवर्गातील. तर रमा श्रीमंत. आईवडिलांना दोनच मुलं. रमाचा भाऊ वडिलांच्या व्यवसायात.
मी इंग्रजी साहित्यातील एम.ए.ची पदवी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यावर मुंबईच्या एका नामवंत कॉलेजात लेक्चरर म्हणून रुजू झालो. वाचनाचं जबरदस्त वेड किंवा व्यसनच म्हणाना. साहजिकच ब्रिटिश काऊन्सीलचं सभासदत्व पूर्वीच घेतलेलं. रमाची आणि माझी पहिली भेट बी.सी.एल.मध्येच झाली. नंतरच्या काही भेटींचे रूपांतर प्रेमात झाले. मरिन ड्राइव्हच्या समुद्र किनाऱ्यावर प्रेमाच्या आणाभाका झाल्या.
बऱ्याच अडथळ्यांना सामोरं जाताना थोडी दमछाक, थोडा मन:स्ताप झालाच. पण अखेरीस दोन्ही कुटुंबांच्या सर्व संमतीने आमचं लग्न पार पडलं.
थोडय़ाच दिवसांत कॉलेज जवळच्या एका उपनगरात एका वन बीएचके फ्लॅटमध्ये मी आणि रमा राह्य़ला गेलो. यथावकाश ‘राधा’ जन्माला आली. सहासात वर्षांतच नव्याची नवलाई संपल्यावर माझ्या आणि रमाच्या कुटुंबातील दरी वेगवेगळ्या प्रसंगांनिमित्ताने ठळकपणे जाणवायला लागली. मी एक साधा लेक्चरर तर रमाच्या कॉपरेरेट सेक्टरच्या नोकरीमुळे आणि हुद्यामुळे तिला मिळणारं पॅकेज आणि त्या तुलनेत मला मिळणारा पगार यांची कळत नकळत, पण वारंवार तुलना अटळ होती. परिणामी छोटय़ामोठय़ा कुरबुरींना सुरुवात झाली. आमच्या नात्यातील स्निग्धता आणि गोडवाही कमी व्हायला सुरुवात झाली होती.
राधाच्या जन्मानंतर काही वर्षांनी अपरिहार्य कारणामुळे रमाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. हा बदल आमच्या पथ्यावर पडेल आणि परत सगळं पहिल्यासारखं होईल असं मला उगाचंच वाटत रालं. नाही म्हणायला राधाचे लाड, हट्ट पुरविण्यात आणि तिचं संगोपन करण्यातील आनंद अवर्णनीय तर होताच पण, रमाला आणि मला घट्ट बांधून ठेवण्यात राधाचं योगदान कायमच महत्त्वाचं ठरत आलं.
काही वर्षांनी आमच्या दुराव्यात भर पडत चालली. ती एका नव्या कारणामुळे. रमाच्या वडिलांच्या सातत्याने वाढणाऱ्या व्यवसायात त्यांना मी हातभार लावावा कारण व्यवसाय धंद्यात घरचा माणूस असणं फार महत्त्वाचं असं त्यांचं म्हणणं आणि मी त्यांना होकार द्यावा असं रमाचं मत. पण माझा स्वभाव आणि छंद लक्षात घेता मी कॉलेजची नोकरी सोडून त्यांच्या व्यवसायात उडी घेणं म्हणजे दुधाचा धंदा करणाऱ्यानं दारूच्या धंद्यात उडी घेण्यासारखं होतं. बऱ्याच वेळा माझा नकार आडमार्गानं रमाच्या आणि तिच्या घरच्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी स्पष्ट नकार व्यक्त करण्याची वेळ आलीच आणि ती ही रमाच्या वडिलांच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी. रमाने माझ्या निर्णयावर उघड उघड आपली नाराजी दाखवली नसली तरी तिच्या वागण्यात माझा निर्णय तिला पसंत नव्हता हे सतत प्रतिबिंबित होत होतं.
माझ्या एकटय़ाच्या पगारात आमचा तिघांचा संसार, राधाच्या शिक्षणाचा वाढता खर्च आणि आवश्यक अशा विरंगुळय़ासाठी लागणारा खर्च हे सगळं सहज भागत होतं. नशिबानं बऱ्यापैकी चारचाकी आमची दिमतीला होतीच. पण वातानुकूलित अद्ययावत गाडी किंवा ऊठसूट विमान प्रवास किंवा हिऱ्यामोत्यांसारखे दागिने निश्चितच परवडण्यासारखे नव्हते.
राधाच्या कॉलेजच्या काश्मीर ट्रीपला जेव्हा मी नकार दिला तेव्हा राधाला समजवण्याऐवजी रमानं माझ्या मिळकतीवरच बोट ठेवलं. ‘‘राधा, काश्मीरच्या आणि सिंगापूरच्या दोनही ट्रिपस्ना तुझ्या आजोबांनी मला पहिल्या फटक्यात होकार दिला होता, पण तुझ्या डॅडीच्या पगारात अशा ट्रीपस् जमण्यासारख्या नाहीत हे तुला समजायला हवं, बेटा आता तू मोठी झालेस. बघता बघता कमवायला लागलीस की स्वत:च्या मिळकतीवर जाता येईल की तुला. मग कोणासमोर तोंड वेंगाडायची वेळ येणार नाही.’’
‘‘माझा अट्टहास नाहीय, ममी.’’ राधा म्हणाली.
‘‘आणि हो दुसऱ्या कोणी पैसे पुढे केले तर तुझ्या डॅडचा इगो दु:खावेल आणि डॅडच्या मानी राधालाही ते आवडणारं नाही.’’ रमाने पुस्ती जोडली. राधा गुपचूप आपल्या स्टडी रूममध्ये गेली.
राधाचा समजूतदारपणा आणि बरेच प्रसंगी गप्प राहाणं हे मलाही एक कोडंच आहे. प्रौढपणीदेखील कित्येक स्त्री-पुरुषांत अभावाने आढळणारा समजूतदारपणा हे राधाचं स्वभाव वैशिष्टय़ आमच्या दोघांच्या घरी कायमच एक कौतुकाचा विषय होता.
काश्मीरच्या ट्रिपला नकार देण्याच्या प्रसंगानंतर मीही फारच अस्वस्थ झालो होतो. अशाच आणखी एक-दोन प्रसंगानंतर रमाच्या वडिलांना नकार देण्यात माझं खरंच काही चुकलं होतं का हा एक विचार मला दिवसरात्र छळायला लागला होता. माझ्या निर्णयामुळे राधावरही अन्याय होतोय या विचारानं वारंवार माझ्या निर्णयाचा मी फेरविचार करावा असं मनात येऊ लागलं. क्वचित सिगरेट ओढणारा मी सकाळ-संध्याकाळ आणि नंतर तिन्ही त्रिकाळ धूम्रपानाच्या आहारी केव्हा गेलो हे माझंच मला कळलं नाही. राधाचा विचार किंवा रमाच्या वडिलांना दिलेल्या नकाराचा विचार आला की माझ्या रिकामटेकडय़ा वेळात माझा हात खिशातल्या सिगारेटच्या पाकिटाकडे जायचा.
एक रविवारी सकाळी ब्रेक फास्टच्या टेबलावर रमाने माझ्यासमोर सिगरेटचं पाकीट ठेवलं. ‘‘आता काय विडय़ा फुकायला लागलायस वाटतं!’’ असं म्हणत पाकिटातल्या सिगरेटस् टेबलावर ओतल्या. ‘‘नाही. ग. क्वचित केव्हा तरी.’’ सारवासारव करीत मी म्हटलं.
‘‘क्वचित सिगरेट ओढणारे भरलेली पाकिटं खिशात ठेवतात हे आज मला कळलं.’’ रमा म्हणाली.
मी गप्पच बसलो, तिच्या या तिरकस बोलण्यावर माझ्याकडे उत्तर नव्हतं. पण विनवणीच्या सुरात मी इतकंच म्हटलं, ‘‘राधाला कृपाकरून या बाबतीत काही सांगू नकोस.’’ ‘‘पैसा तुझा, सिगरेटही तुझ्या. राधाला समजलं किंवा नाही, तुला काय फरक पडणार आहे. परत धूम्रपान ही चैन थोडीच आहे!’’
त्या प्रसंगानंतर वेळोवेळी माझ्या धूम्रपानाची आणि माझी उद्धारगत करण्याची कोणतीही संधी रमा सोडत नव्हती. तिचंही वागणं एक प्रकारे बरोबर होतं हे पटत असून, मी बदलू शकत नव्हतो.
जीवनमानाविषयीच्या माझ्या कल्पना फारच माफक असल्याचं मला वाटायला लागलं. तरीही भौतिक सुखालादेखील कुठेतरी मुरड घालणं हे शांत आणि सुखी जीवनासाठी आवश्यक आहे हे माझ्या मनावर वर्षांनुवर्षे बिंबवलं गेल्यामुळे रमाच्या ‘हो’ला ‘हो’करणं किंवा तिच्या बाबांना होकार देणं मला जमण्यासारखं नव्हतं.
नंतरच्या एक रविवारी राधा आपल्या मामाकडे गेली होती. परत आल्यावर त्या रात्री नेहमी न चुकता ‘आय लव्ह यू’, ‘गुड नाइट’, ‘स्वीट ड्रिमस्’ असं काहीतरी मधाळ बोलून मगच आपल्या बेडरूममध्ये जाणारी राधा त्या दिवशी काहीही न बोलता आपल्या बेडरूममध्ये गेली. राधाचं वागणं मला थोडं विचित्र वाटलं. पण मनात आलं की दिवसभर बाहेर असल्यामुळे कंटाळली असेल किंवा विसरलीही असेल, पण पुढील चार-पाच दिवस मला काहीना काही कारणाने राधा टाळत असल्याचं लक्षात आल्यावर मीच तिला हटकलं, ‘‘काय झालाय बुवा, आमच्यावर कोणीतरी फार रागावलंय वाटतं?’’
पण, माझ्या प्रश्नाला उत्तर न देताच राधा निघून गेली. मी राधाच्या पाठोपाठ बेडरूमध्ये गेलो, ‘‘राधा बाळा, माझ्याशी बोलायचंदेखील नाही का?’’ तरीही राधा गप्पच. मग मी विचारलं, ‘‘काय झालंय तुला? मामाकडे गेली होतीस तिथे काही झालं का? कारण मी पाहातोय की मामाकडून आल्यापासून तू मला प्रयत्नपूर्वक टाळत्येस.’’
त्यावर राधा इतकंच म्हणाली, ‘‘मामाकडे काही झालं नाही.’’
‘‘मग झालंय तरी काय माझ्या बाळीला?’’
‘‘रात्री सांगेन.’’ राधा म्हणाली.
‘‘का. रात्रीचा मुहूर्त वगैरे बघून ठेवलायस का?’’ मी हसत म्हटलं.
‘‘एकदा सांगितल ना रात्री सांगेन म्हणून.’’
थोडय़ाशा घुश्श्यातच राधा म्हणाली.
त्या रात्री रमा आपल्या मैत्रिणीकडे जेवायला आणि मुक्कामाला जाणार होती. राधाचं आणि माझं जेवण झाल्यावर तेही एकमेकांशी काही न बोलता, आम्ही आपापल्या बेडरूममध्ये गेलो. मी साहजिकच राधाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहात होतो.
थोडय़ा वेळानं राधा आली. माझ्या हातातील पुस्तक तिनं दूर ठेवलं. आपले दोनही हात माझ्या गळय़ाभोवती घालत पोर ओक्साबोक्शी रडायला लागली.
काय झालंय मला काहीच कळेना. काय बोलावं तेही सुचेना.
काही क्षण गेल्यावर रडतरडत राधा म्हणाली, ‘‘डॅडी, मला तू खूप खूप हवा आहेस रे!’’
‘‘हे काय एकदम! माझं काही चुकलं का?’’ मी विचारलं.
‘‘नाही, काही नाही.’’ राधा माझाकडे बघत म्हणाली.
‘‘मग काय?’’ मी
‘‘मला एक प्रॉमिस देणार?’’
‘‘एक का? हवी तेवढी देईन.’’
‘‘नाही. एकच, फक्त एकच.’’
‘‘पण काय ते सांगशील का?’’
‘‘मला माझा पूर्वीचा डॅडी हवा आहे.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘आजून नाही कळलं?’’
‘‘काय?’’
‘‘तू सिगरेट नकोना पिऊस!’’
‘‘म्हणजे?’’ मी थोडा चपापलो.
‘‘मला सगळं समजलंय. रविमामाच्या सुधीरचं टोबॅकोवरचं प्रोजेक्ट परवा मी पाह्यलं आणि मला ते फार म्हणजे फार आवडलं आणि मी हे जेव्हा आजोबांना सांगितलं तर ते म्हणाले, ‘‘तुझ्या चेनस्मोकर बाबाला सांग ते.’’
राधाचे माझ्या गळय़ाभोवतीचे हात हळूवारपणे दूर करत मी म्हटलं, ‘‘आय एम सॉरी, माय डिअर. येस या क्षणापासून धूम्रपान बंद. जे कोणालाही जमलं नी ते तू आज करून दाखवलंस. इटीज नॉट दी मेसेज, बट दी स्पिरीट बिहाइंड इट, दॅट मॅटर्स’’
राधा मला परत बिलगली तेव्हा मी म्हटलं, ‘‘माझं पालकत्व स्वीकारण्याइतकी तू मोठी झालीस बाळा!’’
बऱ्याच दिवसांनी त्या रात्री मला शांत झोप लागली.
ग. करंदीकर

Story img Loader