मथितार्थ
संपूर्ण देशाचे नाही पण तमाम काँग्रेसजनांचे लक्ष पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाकडे लागून राहिले होते. काँग्रेसजनांना अपेक्षित असलेली ‘ती’ घोषणा या अधिवेशनात होईल, असे बोलले जात होते. पण अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच त्यातील हवा काढण्यात आली आणि युवराज राहुल गांधी हे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या प्रचारप्रमुखपदाची धुरा सांभाळतील, असे जाहीर करण्यात आले. पंतप्रधानपदासाठी त्यांचे नाव जाहीर होणार नाही हेही त्याचवेळेस स्पष्ट झालेले होते. पण तरीही या देशाला केवळ नेहरू-गांधी घराणेच तारू शकते, अशा भ्रमातील काही काँग्रेसजन आशा लावून बसले होते. अधिवेशनातही त्याचा प्रत्यय आला. पण भूमिका आदल्याच दिवशी स्पष्ट करण्यात आल्याचे सांगून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यावर पडदा टाकला. युवराजांचे त्वेषपूर्ण भाषण बरेच चैतन्य निर्माण करून गेले, असे काँग्रेसजनांना वाटते आहे. हे अधिवेशन म्हणजे दुसरे-तिसरे काहीही नाही तर काँग्रेसचा ‘सेफ गेम’च होता. मोदींच्या समोर राहुलला उभे करून पराभव माथी आला तर भविष्यातली बेगमीही संपलेली असेल, असा विचार त्यामागे होता!
राहुल गांधी यांची आजवरची कारकीर्द पाहता काँग्रेस नेतृत्वाने असा सेफ गेम खेळणे अपेक्षितच होते. २००४ साली राहुल गांधींनी राजकारणात प्रवेश केला आणि लोकसभेची अमेठीची जागा लढवली तेव्हापासून आजतागायत ते ‘अँग्री यंग मॅन’च्याच भूमिकेमध्ये आहेत. १० वर्षांत त्यात फारसा बदल झालेला नाही. मग स्वत:च्याच पक्षाचा पंतप्रधान महत्त्वाच्या परदेश दौऱ्यावर असताना त्यांचा जाहीर पाणउतारा करायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे ज्या निर्णयाची अंमलबजावणी पंतप्रधानांनी केली होती तो निर्णय घेणाऱ्यांमध्ये खुद्द त्यांच्या मातोश्रींचाही समावेश होता. तो काँग्रेसने आणि नंतर कॅबिनेटने घेतलेला निर्णय होता. आपणच आपल्या माणसाचा तोही पंतप्रधान या सर्वोच्च पदी असलेल्या व्यक्तीचा जाहीर पाणउतारा करीत आहोत, याचे भानही युवराजांना नव्हते. केवळ तेवढेच नव्हे तर नंतर युवराजांनी महाराष्ट्राचे सत्शील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही आदर्श अहवालावरून जाहीर कोंडी केली. या दोन्ही वेळेस ते पक्षाचे उपाध्यक्ष कमी आणि ‘अँग्री यंग मॅन’ असलेले युवराजच अधिक होते. युवराजांनी कुणाची कधी कदर करण्याची गरज नसते. आणि ‘अँग्री यंग मॅन’ हा अँग्री म्हणजेच रागावलेला असल्याने त्या अवस्थेत विवेकबुद्धीला तिलांजलीच मिळालेली असते!
नाही म्हणायला या अँग्री यंग युवराजांमुळे थोडेफार चैतन्य तर आलेच. त्यांनी घेतलेल्या त्या भूमिकेने पक्षातील सारी व्यवस्थाच बदलण्याचा घाट घातला. आता १२८ वर्षे वयाचा हा पक्ष आणि त्यातील नेतेमंडळी ही घाट घालण्यासाठी नव्हे तर घाट दाखवण्यासाठी प्रसिद्ध आहेत, याची कल्पना त्यांना यायला हवी होती. पण युवराजांच्या आले मना.. तिथे कोण काय करणार? २००७ साली इंडियन युथ काँग्रेस आणि एनएसयूआयची धुरा सांभाळताना त्यांनी राजकारणातील समूळ बदलासाठी युवकांना साद घातली पाहिजे. त्यांची पहिली घोषणा होती पैसा, पाठिंब्याचे राजकारण आणि घराणेशाही संपुष्टात आणण्याची. अशी घोषणा करणारे युवराज स्वत: घराणेशाहीचेच प्रतिनिधित्व करीत होते. पण ते त्यांनी लक्षात घेण्याचे काहीच कारण नव्हते. कारण समस्त काँग्रेसजनांनी हे केव्हाच स्वीकारलेले आहे की, नेहरू आणि गांधी घराण्याशिवाय त्यांचा उद्धार होणे कठीण आहे. त्यामुळे हा मुद्दा अपवाद असून अपवादानेच नियम सिद्ध होतो, यावर काँग्रेसजनांची ठाम आंधळी श्रद्धा आहे.
युवराजच पंतप्रधानपदासाठी लायक आहेत, असे गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसजनांना वाटत होतेच. त्यामुळे अधूनमधून उचकी येते तशी काँग्रेसजनांनाच युवराजांच्या पंतप्रधानपदाची अनावर उबळ येते. पंतप्रधानही आता आपण थकलो, हेच काय ते शेवटचे.. असेच काहीसे बोलू लागतात आणि पुन्हा एकदा आशा युवराजांवर येऊन स्थिरावतात. त्यामुळेच गेल्या वर्षी जयपूरच्या थंडीत युवराजांची निवड पक्षाच्या उपाध्यक्षपदी झाल्यानंतर अनेकांचा जयपुरी गारठा पार पळून गेला आणि त्यांना एकदम उबदार वाटू लागले. त्याच अधिवेशनात त्यांनी कुटुंबाच्या त्यागाचा आदर्श समोर ठेवत सत्ता हे हलाहल असल्याचे सांगणारे भावनिक भाषणही केले!
त्यानंतर त्यांनी लगेचच पक्षातील निवडींपासून ते निवडणुकांपर्यंत सर्वत्र लक्ष घालण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेश निवडणुकांच्या वेळेस उमेदवार निवडीसाठी त्रिस्तरीय पद्धत ठरवली. तीच पद्धत नंतर अलीकडे झालेल्या चार राज्यांमध्ये अवलंबणार असेही जाहीर झाले होते. सलग तीनदा पराभव झालेल्यांना व यापूर्वी डिपॉझिट जप्त झालेल्यांना उमेदवारी नाही, गुंडपुंड तसेच गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्यांना तिकीट नाही, घराणेशाहीने तिकीट मिळणार नाही असे निकष जाहीर झाले होते.. पण अखेरच्या क्षणी झालेल्या साक्षात्काराने निकष बासनात गेले आणि उमेदवारी मिळाली त्यात घराणेशाहीवाल्यांचाच भरणा अधिक होता. उत्तर प्रदेशचीच री ओढली गेली ती अलीकडे झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये. तिथेही सुरुवातीस निकष जाहीर झाले खरे. पण अखेरीस व्हायचे तेच झाले. छत्तीसगढमध्ये काँग्रेसचे नेते मोतीलाल व्होरांच्या यापूर्वी तीनदा सपाटून पडलेल्या मुलालाच उमेदवारी मिळाली. राजस्थानात तर घराणेशाहीचा वारसा सांगणारे तब्बल २० नातेवाईक काँग्रेसच्या वतीने निवडणुकांच्या िरगणात होते. एवढेच नव्हे तर गाजलेल्या भँवरीदेवी प्रकरणातील गुन्हेगार तसेच बलात्काराचे आरोप असलेल्यालाही काँग्रेसची उमेदवारी मिळाली! विजयी होण्याची सर्वाधिक शक्यता असलेले उमेदवार असे त्या सर्वाचे वर्णन करण्यात आले. निकष हाच होता तर मग घराणेशाही मोडीत काढण्याची पोकळ भाषा आणि दावा का करण्यात आला? स्वत: युवराजांकडेही पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणूनच काँग्रेसजन पाहत आहेत. मग घराणेशाही कोण, कोणाची मोडणार?
तुम्ही निवडणुकांमध्ये काय करता याहीपेक्षा राजकारणात विजयाला महत्त्व असते आणि मतांच्या टक्केवारीला, असे म्हटले जाते. त्या मैदानातही काँग्रेसला सपशेल हार पत्करावी लागली. उत्तर प्रदेशातील मतांची टक्केवारी २५ टक्क्यांवरून थेट सात टक्क्यांवर आली. एकूण ४०३ पैकी केवळ २८ जागा काँग्रेसला मिळाल्या.. पण तरीही उत्तर प्रदेश गेल्याने काही फारसा फरक पडत नाही; देश आहेच की असा काँग्रेसचा आवेश होता.
आता त्या आवेशालाही थेट आव्हान देण्याचे काम देशाच्या राजधानीमध्ये ‘आप’ने केले आहे. गेल्या १० वर्षांतील राजकारणानंतर या अँग्री यंग युवराजांना जे जमले नाही ते अरिवद केजरीवाल यांनी केवळ १४ महिन्यांत करून दाखविले. दिल्लीतील तरुणाई आज त्यांच्या मागे आहे. युवराजांनी मागासवर्गाला सोबत घेण्याचे स्वप्न पाहिले. केजरीवालांनी ते प्रत्यक्षात आणले. मागासवर्गाचा पक्ष म्हणून परिचय असलेल्या बसपाची दिल्लीतील ताकद त्यांनी ‘आप’कडे वळवली. दिल्लीतील वाल्मीकी समाजाला सोबत घेऊन केजरीवाल यांनी बसपाची मते ‘आप’ल्याकडे फिरवली. बसपाची मतांची टक्केवारी आता १४ वरून ५ वर आली आहे.
तरीही आता युवराजांच्या नव्या कार्यपद्धतीचे दाखले दिले जात आहेत. त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ५४० मतदारसंघांचे तीन प्रकारे आगळे सर्वेक्षण केले असून त्याद्वारेच संभाव्य उमेदवारांची निश्चिती केली जाणार आहे, असे म्हटले जाते. यापूर्वी १२८ वर्षे जुन्या असलेल्या काँग्रेसमध्ये केंद्रीय कार्यकारिणी निर्णय घ्यायची. आता मात्र प्रथम जिल्हा, मग प्रदेश आणि नंतर अ. भा. स्तरावरील छाननी समिती अशा चाळण्या असतील. दर महिन्याच्या १० तारखेला युवराजांना अपडेट दिले जाणार, अशी रचना आहे. ‘ग्रासरूट फीडबॅक’ असे गोंडस नाव त्याला देण्यात आले आहे.. पण अखेरीस जिंकून येणाऱ्यालाच उमेदवारी मिळणार असेल तर युवराजांचा हा देखावा कशासाठी?
२००४ साली राहुल गांधी राजकारणात आले तेव्हाची परिस्थिती आणि सद्यस्थिती यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. तेव्हा एनडीए सरकारच्या काळातील ‘इंडिया शायनिंग’चा हवाला देऊन युवराज प्रश्न विचारायचे, ‘या इंडिया शायिनगने आम आदमीला काय दिले? काँग्रेस आम आदमीसाठीच आहे.’ आता अशी विधाने करण्याची सोय आम आदमीने ठेवलेलीच नाही! कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी राष्ट्रीय अधिवेशनात केलेल्या त्वेषपूर्ण भाषणात केवळ आवेशच अधिक होता. तो त्वेष कार्यकर्त्यांचा म्हणजेच अ‍ॅक्टिव्हिस्टचा होता! आपणच सध्या सत्ताधारी आहोत, याचे त्यांचे भान बहुधा सुटलेले असावे. राजकारणातील त्यांच्या प्रवेशाला आता एक दशक उलटत आले तरीही ते अँग्री आणि यंगच आहेत. माणसाचे वय वाढले की, त्याबरोबर अनुभवातून एक परिपक्वताही येते. पडद्यावर अँग्री यंग भूमिका गाजवणारा अमिताभही नंतर परिपक्व भूमिकेत दिसू लागतो. पण युवराज हे युवराज असल्याने ते आजही यंग आणि अँग्रीच आहेत. ते परिपक्व केव्हा होणार, हाच धर्मराजाकडेही उत्तर नसलेला यक्षप्रश्न आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा