पावसाळा विशेषांक
पाऊस येणार असल्याची वर्दी आपल्याला निसर्गातल्या ज्यांच्याकडून मिळते त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे पक्षी. प्रत्यक्ष पावसाळ्यात तर आपल्याला त्यांचे कितीतरी प्रकार, त्यांचे कितीतरी विभ्रम पाहायला मिळतात. अर्थात पावसाळ्यातलं हे पक्षिजीवन आपल्याला जेवढं विलोभनीय वाटतं तेवढंच पक्ष्यांसाठी खडतरही असतं.
ग्रीष्म आणि वर्षां ऋतू सुरू झाले की माझं मन कोकणातल्या बालपणातल्या आठवणींनी हरखून जातं. संपूर्ण शालेय जीवनातील मे महिन्यातील सुट्टीत आमचे आई-वडील आम्हाला आमच्या कोकणातील गावी- देवगड तालुक्यातील नारिंग्रे आणि आजोळी- वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा इथे घेऊन जायचे. सुमारे दोन महिने तिथल्या निसर्ग परिसरात हुदडून पाऊस सुरू झाला की आम्ही मुंबईला परतायचो. हे पावसाचे सुरुवातीचे दिवस आजही माझ्या डोळ्यांसमोर येतात. मे महिन्याच्या शेवटीशेवटी आजी आम्हाला सांगायची, ‘ऐका, समुद्राची गाज सुरू झाली. आता पाऊस सुरू येणार. चला परतायची तयारी सुरू करा.’ सुमारे १२ किलोमीटर अंतरावरील वेंगुल्र्याच्या समुद्रात उधाण सुरू झाल्याचं आम्हाला घर बसल्या समजायचं! परतीच्या विचाराने मन नाराज व्हायचं, पण राहिलेले उद्योग करण्याच्या मागे आम्ही लगबगीने लागायचो. त्यातला महत्त्वाचा उद्योग असायचा तो सावंतवाडीला मामाकडे जायचं आणि नरेंद्र डोंगर आणि आंबोलीच्या जंगलात भटकायचं!
एकदा असंच पावसाच्या आगमनाचं वातावरण तयार झालं होतं. मी उजाडता उजाडता केशव मामाबरोबर सावंतवाडीला जायला निघालो, चालतच! त्या वेळी चालत किंवा दुचाकी प्रवास हाच योग्य, परवडणारा आणि आवडणारा होता. होडावडा ते सावंतवाडी ही वाट सुमारे १५ किलोमीटरची आणि नरेंद्र डोंगरातून जाणारी. गेल्या दोन आठवडय़ांतील वळवाच्या पावसाने परिसर हिरवागार झालेला होता. शेतीची कामंही सुरू झाली होती. नद्या-नाले वाहायला लागले होते. मुलं गळ टाकून मासे पकडायच्या उद्योगात रमली होती. वादळवाऱ्याचंही लक्षण दिसत होतं. माड एका आवेशात, अंगात आल्यासारखे घुमायला लागले होते. वातावरणात मृद्गंध पसरला होता. नरेंद्र घाटीचा चढ सुरू झाला, झाडा-झुडपांवरची लाल माती पहिल्या पावसाने धुवून गेली होती. संपूर्ण हिरवाई न्हाऊन स्वच्छ झाली होती. छोटे झरे खळाळायला लागले होते. एका बाजूच्या कपारींतून धबधबे ओझरायला लागले होते. मामाबरोबर गप्पा मारत चालत असताना अचानक खालील दरीतून एक शीळ ऐकू आली. मामा म्हणाला की, कोणी गावकरी चोरवाटेने येत असणार. भीती वाटते म्हणून गाणं म्हणत किंवा शीळ घालत यायची पद्धतच आहे. पण ही शीळ अगदी सुरेल होती. मी मनात म्हटलं, कोणी गुराखी बासरीत रंगला असणार. पण पुढे ती शीळ कधी आमच्या मागून, तर कधी पुढून, कधी दरीतून तर कधी वर कपारीतून अशी चकवा द्यायला लागली. मामा थोडा गंभीर झाला. आम्ही झपाझप चालायला लागलो. सावंतवाडीला पोहोचल्यावर मामा मला म्हणाला, ‘या नरेंद्र घाटीत भुतं-खेतं आहेत. गेल्याच महिन्यात एक मुलगा शाळेतून दुचाकीवरून परतताना इथेच पडून मरण पावला होता. त्याचीच शीळ असणार ती. सुटलो आपण!’ माझा त्या वयातसुद्धा भुता-खेतांवर विश्वास नव्हता, पण पुढचे चार-पाच दिवस नरेंद्र डोंगरात आणि आंबोलीच्या जंगलात फिरताना त्या शिळेने आमचा पिच्छा पुरवला होता हे मात्र खरं!
त्यानंतरची अनेक र्वष भुर्रकन उडून गेली. महाविद्यालयीन शिक्षण संपवून वास्तुकलेचा व्यवसाय सुरू करताकरता मी मुंबई नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या संपर्कात आलो होतो.  सह्य़ाद्रीतील एका पावसाळी निसर्गभ्रमंतीत अचानक ‘तीच’ सुरेल शीळ ऐकू आली.  प्रश्नार्थक नजरेने मी बरोबरच्या डॉ. अलमाडी या बुजुर्ग निसर्ग अभ्यासकाकडे पहिलं. त्यांनी स्मितहास्य करत स्वत: तशीच शीळ घालायला सुरुवात केली. काही वेळाने त्यांना प्रत्युत्तर मिळालं. त्यांनी मला खुणावत त्या दिशेने हलकंच नेलं. बाजूच्या खळखळणाऱ्या ओढय़ाकिनाऱ्याच्या खडकावर एक काळसर-निळसर पक्षी तुषारांशी जणू काही खेळत होता आणि खेळताखेळता मधुर शीळ घालत होता. त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर नरेंद्र घाटीतून दुचाकीवरून शीळ वाजवत रमतगमत जाणारा शालेय विद्यार्थी आला. डॉ. अलमाडी हसत हसत म्हणाले, ‘हा आहे मलबार व्हिसलिंग थ्रश आणि सलीम अलींनी याला अनुरूप नाव ठेवलं आहे ‘आयडल/ व्हिसलिंग स्कूलबॉय’ किंवा ‘भायखळा लोफर’! सलीम अलींच्या या ‘उनाड विद्यार्थ्यां’ला किंवा ‘भायखळ्याच्या मवाल्या’ला मराठीत गोगी किंवा कस्तुर म्हणतात. साधारणपणे मनेच्या आकाराचा हा पक्षी डोंगराळ जंगलात झऱ्यांच्या किनाऱ्याने खडकांवर खेळताना आढळतो. त्याच्या काळसर-निळसर रंगावर सूर्यप्रकाशात एक वेगळीच जांभळटसर, बदलत्या रंगांची छटा उजळते. विशेषत: पावसाळ्यात असे तिरके सूर्यकिरण पडले की त्याच्या पंखांवर जणू काही इंद्रधनूच प्रतििबबित झाल्याचा भास होतो.  यातला नर म्हणजे तानसेनच! पण विशेषत: ग्रीष्म-वर्षां ऋतू या विणीच्या हंगामात नराला सुरेला कंठ फुटतो, मादीला आकर्षति करण्यासाठी. पावसाळ्यात खळखळणाऱ्या निर्झरांच्या तुषारांशी खेळत तो पाण्यातील कीटक, गांडुळ, गोगलगायी किंवा खेकडे पकडत मधुर शीळ घालत परिसरातील माद्यांवर कटाक्ष टाकत असतो. जणू काही रंगेल युवकच जाणाऱ्यायेणाऱ्या तरुणींना पाहून मादक शीळ घालून डोळा मारत आहे!
त्या भुताच्या शिळेचं कोडं असं सुटलं आणि पुढे पक्षिजगतातले अनेक निसर्गविभ्रम असेच अभ्यासातून, निसर्गभ्रमंतींतून उलगडत जायला लागले. पक्षी नेहमीच विविध रंगांनी, चित्तवेधक भिरक्यांनी आपलं लक्ष वेधून घेत असतात. पण अनेक पक्ष्यांचा विणीचा हंगाम ग्रीष्म- वर्षां ऋतूत सुरू होतो. त्याच वेळी फुलं-फळं बहरलेली असतात, विपुल कीटक परिसरात असतात. पक्ष्यांसाठी ‘सुगीचेच’ दिवस! पिल्लांचं पालनपोषण करण्यासाठी अगदी योग्य काळ. मग निसर्ग उत्क्रांतीच्या एका विलोभनीय टप्प्यातून द्विजगण जातात. नरांच्या पिसांवर आकर्षक रंग उमलतात, कित्येकांना सुरेल कंठ फुटतो, निसर्ग भूपाळ्या सुरू होतात, अनेकांच्या  विलोभनीय नृत्यमुद्रा सुरू होतात. माद्याही या मादक विभ्रमांना आकर्षति होतात आणि मग ‘प्रेम-प्रकरणं’ सुरू होतात. विविध पक्ष्यांची प्रियाराधनं पाहायची असतील तर ती या वर्षां ऋतूतच खास! यातली काही प्रमुख उदाहरणं म्हणजे मोर, बगळे आणि इतर पाणपक्षी, सुगरण, कोकीळ कुलातील जाती, दयाळ, कीटकभक्षी पक्षी विशेषत: स्वर्गीय नर्तक किंवा पॅरॅडाइज फ्लायकॅचर वगरे.
त्याशिवाय पावसाच्या सुरुवातीला आणखी एक पक्षिजगतातलं वैशिष्टय़ पाहायला मिळतं, एक वेगळं पक्षी स्थलांतर! नर्ऋत्य मोसमी वारे पाऊस घेऊन कोकण किनारपट्टीवर यायला लागले की काही पक्षी या वाऱ्यांबरोबर दक्षिण- उत्तर प्रवास करतात, वाटेत योग्य स्थळ दिसलं की तिथे तात्पुरता निवारा घेतात, पावसाळा संपला की परततात.  हिवाळ्यातल्या उत्तर- दक्षिण पक्षिस्थलांतरापेक्षा हे वेगळं असतं, कारण इथे हे पक्षी बहुतांशी या नव्या तात्पुरत्या ‘कर्मभूमी’तच, पावसाळ्यातच आपली पुढची पिढी निर्माण करतात आणि मग ‘मायभूमी’ परततात. तसं पाहिलं तर यांच्या ‘मायभूमी’ – ‘कर्मभूमी’चा हा एक गोंधळच आहे! यातले प्रमुख पक्षी आहेत चातक किंवा पाइड क्रेस्टेड कुकू, नवरंग (इंडियन पिट्टा), मच्छीमार किंवा खंडय़ा कुलातील तिबोटी खंडय़ा (थ्री टोड किंगफिशर) वगरे.
यापकी चातक आपल्यापकी बहुतेकांना लोककथांतून, कवितांतून, म्हणींतून आणि संस्कृत वाङ्मयातून कधी ना कधी भेटलेला असतो. याच्या दोन जाती आपल्याकडे पावसाबरोबर अवतरतात. एक श्रीलंकेतील / दक्षिण भारतातील, तर दुसरी अफ्रिकेतील, वेगळ्या ओळखायला कठीण! चातक आकाराने मनेपेक्षा काहीसा मोठा, लांब शेपटीचा.  काळ्या-पांढऱ्या रंगाच्या व डोक्यावर लक्षवेधक तुरा असलेल्या या पक्ष्यांचं स्थलांतर गटागटात असतं, पण पाणपक्ष्यांसारखं मोठय़ा समूहात नसतं. त्यांचं आगमन ‘पिऊ पिऊ’ अशा नादमधुर आवाजाने ते जाहीर करतात. सहसा झाडांवरच असणारे हे पक्षी या स्थलांतराच्या सुरुवातीच्या काळात घरांमध्येही शिरतात. अनेक वेळा या नव्या उपऱ्यांना कावळ्यांच्या विरोधालाही सामोरं जावं लागतं. हाच काळ त्यांचा विणीचा हंगाम असतो. मात्र या कोकीळ कुलातील ‘परभृत’ पक्ष्यांना आपल्या पिल्लांच्या संगोपनाची जबाबदारी मात्र नको असते. मग ते कावळे, वटवटे अशा पक्ष्यांना फसवून त्यांच्या घरटय़ात अंडी घालतात आणि आपल्या पुढच्या पिढीचं ‘आयां’मार्फत संगोपन करून घेतात! पक्षिनिरीक्षकांसाठी अशी निरीक्षणं म्हणजे एक आव्हान तर असतंच, पण अशा अभ्यासपूर्ण नोंदी या पक्षिशास्त्राच्या अभ्यासाला खूप आवश्यक ठरतात. चातकाने अगदी पूर्वापार साहित्यिकांना मोहित केलेलं आहे. हे पक्षी चांदण्या रात्री जेव्हा झाडांवरून तो नादमधुर, आर्त पुकारा करतात तेव्हा कविमनाला ती पर्जन्यासाठीची आळवणीच वाटते. व्याकूळ मनाने केलेली, त्या पहिल्या थेंबासाठीची! त्यातूनच ‘चातकासारखी वाट पाहतो’ अशी म्हण निर्माण झाली तर ‘पिऊ पिऊ पपिहा बोले’ असं प्रेमगीत तयार झालं. आपल्या मर्ढेकरांनीही म्हटलं नाही का,
‘आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी;
किती चातक चोचीने प्यावा वर्षां ऋतू तरी’
चातकासारखाच दुसरा पावसाळी स्थलांतरित पक्षी म्हणजे नवरंग (इंडियन पिट्टा).  हा पक्षी तुमच्या दृष्टीस पडला तर तुम्हाला निश्चितच वेडा करून टाकेल, त्याच्या नवरंगी पिसाऱ्याने आणि ‘खुणावणाऱ्या’ शिळेने! त्याच्या ‘िव्हट ट्यूऽऽऽ’ अशा दुहेरी शिळेचं नामांतर आमच्या एका ‘रंगिल्या’ मित्राने केलं ‘लाइन क्लिअर’!  त्याचा बसकट, आखूड शेपटीचा आकार, पंखांवर पिवळ्या, हिरव्या, निळ्या रंगांची उधळण, डोळ्यात नखरेल काजळ आणि हिरवाईतून चुकूनमाकून मिळणारं दर्शन पक्षिनिरीक्षकाला घायाळ करून टाकतं! एरवी वनपरिसरातच सापडणारा हा पक्षी या पावसाळ्याच्या सुरुवातीच्या स्थलांतराच्या काळात शहरातही शिरतो.
नवरंगसारखाच बहुरंगी आणि पावसाळी स्थलांतरित पक्षी तिबेटी खंडय़ा (थ्री टोड जंगल किंगफिशर). हा मच्छीमार किंवा खंडय़ा कुलातील चिमणीच्या आकाराचा पक्षी पावसाच्या सुरुवातील अचानक उगवतो. त्याला पाहायला मात्र जंगलात जायला हवं. एखाद्या ओढय़ाकिनारी किंवा बाजूच्या छोटय़ा झाडावर पाण्याकडे टक लावून बसलेला दिसेल. तुम्ही नशीबवान असाल तर किनाऱ्याच्या मातीच्या उंचवटय़ात पोखरलेलं त्याचं घरटंही दिसेल. छोटे मासे, पाली, गोगलगायी, खेकडे इत्यादींसाठी सूर मारताना तो विविध रंगांची उधळण आपल्या पंखांतून करतो. दोन नर एकत्र आले तर आपल्या परिसराच्या हक्कासाठी मजेशीर पण जोरदार झगडा करतात. हुतुतू किंवा आटय़ापाटय़ासारख्या एकमेकांना हुलकावण्या देत दटावतात. अशाच एका झगडय़ाचं फार मजेशीर वर्णन सलीम अलींनी त्यांच्या पक्षिकोशात केलं आहे. इतर खंडय़ा कुलातील पक्ष्यांप्रमाणे हाही सदैव बहुधा घाईत असतो आणि अशाच घाईत अनेकदा भिंतींवर किंवा खिडक्यांच्या तावदानांवर आपटून जखमी झाल्याची उदाहरणं आहेत.
वसंत – ग्रीष्म – वर्षां या तिन्ही ऋतूंत आसमंत आपल्या संगीताने भारावून टाकणारे पक्षी म्हणजे कोकीळ कुलातले परभृत पक्षी. परभृत एवढय़ासाठी की ते स्वत: कधीच घरटी करत नाहीत, पिल्लांचं संगोपनही करत नाहीत. कावळा, वटवटे यांसारख्या पक्ष्यांना हुलकावणी देऊन त्यांच्या घरटय़ाात अंडं घालून आपली पिढी वाढवतात. यापकी कोकिळा आपल्या सर्वाना नराच्या संगीतमय पंचमातल्या ‘कुहू कुहू बोले कोयलिया’मुळे परिचयाची आहेच. पण तिच्या इतर जातभाईंचं नातं पावसाशी घट्ट विणलेलं आहे. त्यातला श्व्ोत-कोकीळ / पावशा (इंडियन कुकू) हा सतत शब्दकोडी सोडवत असतो, ‘क्रॉसवर्ड पझल, क्रॉसवर्ड पझल’ अशी साद देत! चांदण्या रात्री तर त्याच्या हाकाऱ्यांना बहरच येतो.  पाऊस-पियू (कमन हक कुकू किंवा ब्रेनफिवर) पक्षी ‘पाऊस आला, पाऊस आला’ अशी साद दिवसरात्र घालत असतो. तर गंडेदार-कोकीळ (बँडेड बे कुकू) चढत्या आवाजात पावसाची आळवणी करत असतो, ‘झोती होती, झोती होती’ म्हणत. राखाडी-पावशा (प्लेंटिव कुकू) आर्त हाकेने आपल्यालाही हळवं करून टाकतो. सगळ्यात गमतीशीर कोतवाल-कोकीळ (ड्रोंगो कुकू) हा सतत एक ते सात किंवा आठपर्यंत उजळणी घोकत असतो! हे कोकीळ कुलातले पक्षी आपल्या संगीताने आपल्या अस्तित्वाची जाणीव देत असतात, पण नजरेस पडणं मात्र कठीण. अगदी परिसरात छान लपून जातात. मी पावसाळ्याच्या या सुरुवातीच्या काळात अनेक दिवस माझ्या कर्नाळा अभयारण्याजवळच्या निसर्गधामात घालवतो आणि या कोकीळ कुलातील सर्व पक्ष्यांच्या मफिलीत रंगून जातो, त्यांच्या हाकाऱ्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने शब्दांकन करण्यात तासन् तास गुंततो.
आमच्या या निसर्गधाम परिसरात खैराची अनेक झाडं आहेत आणि पाऊस सुरू होता होता या झाडांवर सुगरणी बागडायला लागतात. आजूबाजूचा परिसर हिरवळीने, भातशेतीने बहरला की या सुगरणीच्या नरांची लगबग सुरू होते. चिमणीसारख्या दिसणाऱ्या नरांचा ‘हळदी’ समारंभ झालेला असतो! ते ‘रंगात’ तर आलेले असतातच, पण त्यांच्या प्रियाराधनेच्या महत्त्वाच्या जबाबदारीत गुंतून जातात. गवताची पाती गोळा करत, विणकरासारखं कौशल्य दाखवत छोटय़ा चोचीने घरटी विणायला लागतात. बघताबघता खैराची झाडं झुलणाऱ्या सुडौल खोप्यांनी नटली जातात, मग प्रियाराधन सुरू होतं. गजबजाटात ‘मंगलाष्टकं’ म्हटली जातात आणि लवकरच खोप्यांचे पाळणे झुलायला लागतात. पावसाळ्यातलं हा खास ‘प्रीतिसंगम’ पाहत आपण प्रत्येकाने बहिणाबाईंचं काव्य अनुभवलं पाहिजे.
तसे अनेक पाणपक्षी पावसाळ्यात आपल्याला भुलवतात. पण बालकवींच्या कविमनात फुललेली  ‘बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळ’ कोण विसरेल? ग्रीष्म ऋतूतच या शुभ्र बगळ्यांवर तपकिरी झाक चढते, डोक्यावर हलकाच तुरा उमलतो आणि त्यांचं प्रणयाराधन सुरू होतं. सभोवारची हिरवाई, कृष्णमेघांनी भरलेलं आभाळ, रिमझिम धारांची बरसात, अधूनमधून डोकावणारा आदित्य, वर इंद्रधनूचं तोरण आणि त्यात विहरणारी बलाकमाला सगळ्या पावसाळ्याला स्वप्नमय करून टाकते!
अशाच एका पावसाळ्यात आम्ही बोरिवली राष्ट्रीय उद्यानातील ‘पोंगम’ दरी परिसरात निसर्ग अभ्यासासाठी निघालो होतो. सर्व परिसर हिरवागार तर होताच, पण डोंगरउतार रानहळदीच्या गुलाबी फुलोऱ्यांनी रंगून गेले होते. आम्ही दरीच्या टोकाला असलेल्या गवताळ कुरणाकडे विश्रांतीसाठी निघालो होतो आणि अचानक एक मंत्रमुग्ध करून टाकणारा रंगचित्रपट त्या हिरवाईच्या पटलावर उमटला. रानमोरांचा कळप तिथे बागडत, चरत होता.  सुमारे सात-आठ लांडोर आणि एक मोर! आणि तो मयूरराज नृत्यसंभ्रमात तल्लीन झाला होता! तो कृष्णवर्णीय पिसारा फुलवून, अधूनमधून थिरकवत, नाजूक पदन्यास करत आपल्या प्रेयसीवृंदातून रिंगणं घेत होता. अधूनमधून आनंदाने परिसराला आपल्या केकारवाने घुमवत होता. प्रेयशा आपलं लक्ष नाही असं दाखवत होत्या, पण नक्कीच त्या या प्रेमभऱ्या विभ्रमाला भुललेल्या होत्या. कोण भुलणार नाही! मयूरनृत्य पाहिल्याशिवाय वर्षां ऋतूतल्या निसर्ग अनुभवाची पूर्तता होत नाही.
पण पावसाळ्यातलं हे पक्षिजीवन आपल्याला जेवढं विलोभनीय वाटतं तेवढंच पक्ष्यांसाठी खडतरही असतं. २३ जून १९८४ च्या एका पावसाळी सहलीत आम्ही सकाळीच माळशेज घाट चढत होतो. पाऊस फार जोरात नव्हता, पण परिसर धुक्याने/ डोंगरावर विसावणाऱ्या मेघांनी धुंद झालेला होता. एक-दोन मीटरपलीकडचं काही दिसत नव्हतं. त्यातच सुसाट वारा! आम्ही कसेबसे वर खिरेश्वरजवळच्या नुकत्याच नव्याने बांधकाम झालेल्या पर्यटन निवासात पोहोचलो. तोपर्यंत धुकं विरलं होतं. थोडासा सूर्यप्रकाशही अधूनमधून डोकावत होता. वारा मात्र सुसाट होता. खालच्या दरीतून घोंघावत वर उसळत होता. आम्ही पठारावर, दरीकिनाऱ्याने फिरायला निघालो, तूफान वाऱ्याशी सामना करत! हरिश्चंद्रगडाचं दर्शन अधूनमधून कृष्णमेघांच्या पडद्याआडून होत होतं. काही अवधीत अचानक एक छोटा तपकिरी कवडा एका खडकाजवळ पडलेला दिसला. त्याला उचललं तर त्याच्या डोक्याला जबर जखम झालेली दिसली. त्याला औषधपाणी करण्यासाठी घेऊन जात असताना आणखी एक तसाच कवडा जखमी होऊन मरून पडलेला दिसला आणि पुढे काही अंतरावर खडकावर आपटून जखमी झालेला बेल ढोकरी पक्षी (चेस्टनट बिटर्न) सापडला.  आम्ही गोंधळून गेलो होतो, पण आता अधिक निरीक्षणात गुंतलो. एक लक्षात आलं की, खालच्या दरीतून वर उसळणाऱ्या वाऱ्याचा जोर इतका प्रचंड होता की गिधाडांसारख्या बलवान पक्ष्यांनाही उडणं कठीण जात होतं. बगळे वाऱ्याबरोबर भरकटत जात होते! पुढच्या काही तासांत आम्हाला त्या पठारावर आणि पर्यटक निवासाच्या आजूबाजूला नऊ जातींचे बावीस पक्षी जखमी होऊन मरून पडलेले सापडले. पुढे रात्रभर हा एक प्रकारचा पक्षी-संहार सुरू होता. ते खडकांवर आपटत होते, पर्यटक निवासाच्या भिंतींवर, तावदानांवर आपटत होते, जखमी होऊन पडत होते. यात प्रामुख्याने जमिनीवरचे, जड आणि उडण्यात अकुशल असे पक्षी होते- लाव्हे, कवडे, पाणकोंबडी, हरियाल, नवरंग इत्यादी. त्याशिवाय दोन वटवाघळंही मेलेली सापडली.  हा होता पावसाळ्यातील निसर्गाचा उग्र आविष्कार!  दोन दिवसांत एकूण चौदा जातींच्या त्रेचाळीस पक्ष्यांची कलेवरं घेऊन आम्ही परतलो.  मुंबई नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या संग्रहालयात ते नमुने अभ्यासानंतर जमा केले. या निरीक्षणावर आणि त्याच्या पृथक्करणानंतर मी आणि संजय मोंगाने एकत्रित लिहिलेला शोधनिबंध मुंबई नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या विज्ञान पत्रिकेत प्रकाशित झाला. या निरीक्षणाने जगभरातील पक्षिवैज्ञानिकांचं लक्ष वेधून घेतलं. आसाममधील जितगा येथील अशाच निरीक्षणाची यापूर्वी ‘पक्षी आत्महत्या’ म्हणून नोंद होती. पक्षिजीवनाचा हा एक वेगळाच अनुभव!
तरीही अशा खडतर जीवनातून उभारी घेत पक्षिगण आपल्याला अपरंपार आनंद देत असतात. आपण काय करतो त्यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी? परिसरात असलेली हिरवाई राखली, झाडं-झुडपं लावून त्यांचा सांभाळ केला तर पक्षी अगदी आपल्या परिसरात येऊन आपल्याला त्यांच्या मधुर संगीतात, निसर्गविभ्रमात नक्कीच मश्गूल करतील. मात्र आपण ‘येरे येरे पावसा’ ही आळवणी करताना चुकीच्या विकासाचा ‘खोटा पसा’ निसर्गाला दिला तर त्याचा उग्र आविष्कार आपल्यालाही भोगावा लागेल; नुकत्याच झालेल्या उत्तराखंडातील आघाताप्रमाणे!

Story img Loader