‘‘आपटण्यासाठी आधी उचलायचे असते’’.. राज ठाकरे यांच्या या वाक्याला काही वर्षांपूर्वी लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात डोक्यावर घेतले होते.. उद्या हेच लोक आपण योग्य दिशेने काम केले नाही तर आपल्यालाही आपटतील याची जाणीव त्या वेळी कदाचित राज यांना झाली नसेल.. परंतु लोक काहीही विसरत नाहीत. मनसेकडून झालेल्या अपेक्षाभंगामुळे आणि नरेंद्र मोदी यांच्या रूपाने पर्याय सापडताच याच जनतेने लोकसभा निवडणुकीत अक्षरश: उचलून आपटले. या पाश्र्वभूमीवर थोडय़ाच महिन्यांत येणारी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक हे मनसेसाठी अग्निदिव्य ठरणार आहे.
खरे तर मनसेचा अवघ्या आठ वर्षांचा प्रवास हा झंझावाती म्हणावा लागेल. ‘‘माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे. त्यामुळेच मी शिवसेनेच्या सर्व पदांचा आज राजीनामा देत आहे.’’ आठ वर्षांपूर्वी दादरच्या शिवाजी पार्क येथील कृष्णभुवन या आपल्या निवासस्थानासमोर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राज यांनी केलेली ही घोषणा शिवसेनेसाठी एक वादळ निर्माण करणारी होती. शिवसेना सोडल्यापासून सहा महिने राज यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. महाराष्ट्राच्या या दौऱ्यात त्यांना लोकांच्या नजरेत त्यांच्याबद्दल एक अपेक्षा दिसली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराला लोक केव्हाच विटले होते; परंतु शिवसेना-भाजप हा सक्षम पर्याय वाटत नसल्यामुळे लोकांना काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडून देण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत बंड करून स्वत:चा पक्ष काढण्याचे धाडस करणाऱ्या राज यांच्याबद्दल तेव्हा सहानुभूतीची एक लाट निर्माण झाली होती. सामान्यपणे कोणत्याही बंडखोरीला अथवा प्रस्थापितांविरुद्ध दंड थोपटून उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला समाजाची काही प्रमाणात साथ व सहानुभूती मिळत असते. तसे पाहिले तर शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या हयातीत अनेक वादळे पचवली होती. बंडू शिंगरे यांनी शिवसेना सोडून प्रतिशिवसेना स्थापन केली तेव्हापासून छगन भुजबळांचे बंड, नारायण राणेंचे बंड, गणेश नाईकांपासून अनेकांनी शिवसेना सोडून दिल्याचे धक्के बाळासाहेबांनी लीलया पचवले होते; तथापि हे घरातील बंड त्यांच्यासाठीही धक्कादायक होते. शिवसैनिकांसाठीही राज यांच्या बंडाचा धक्का मोठा होता, कारण राज हे थेट बाळासाहेबांसारखे दिसतात, त्यांच्यासारखे आक्रमक भाषण करतात, त्यांचे वागणे, बोलणे यात बाळासाहेबांचा भास होत असल्यामुळे तसेच ते कार्यकर्त्यांसाठी नेहमी उपलब्ध असल्यामुळे शिवसैनिकांना राज यांच्याविषयी विशेष आत्मीयता होती.
मनसेची ब्लू प्रिंट
पक्ष स्थापनेपासून खरे तर राज यांनी अनेकदा त्यांच्या ब्लू पिंट्रचा उल्लेख केला असल्यामुळे त्यांच्या या विकास आराखडय़ाविषयी लोकांना आता फारशी उत्सुकता राहिलेली नाही. त्यातच गेल्या आठ वर्षांच्या वाटचालीत ठोस भूमिका महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर मांडून आंदोलने करता येणे शक्य असतानाही केवळ टोलसारख्या विषयाला प्राधान्य देऊन प्रसिद्धी मिळविली. मुदलात टोलचा प्रश्न हा राज्यातील २६ गाडय़ांशी संबंधित आहे. त्यामुळे आता टोल की तुरडाळ नेमक्या कोणत्या मुद्दय़ांना राज प्राधान्य देणार यावर त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. सत्ता दिल्यास सुतासारखे सरळ करतो, ही भाषा ऐकायला बरी वाटत असली तरी ठोस कार्यक्रम जाहीर न केल्यास विधानसभेतही हाती फारसे काही लागणार नाही.
मनसेतच नवनिर्माणाची गरज
महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्याऐवजी पक्षातच नवनिर्माण करणे गरजेचे असल्याचे मनसेच्याच कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पक्षाकडून राज्याच्या वेगवेगळ्या भागात जाणारे सरचिटणीस अथवा काही आमदार हे खरे तर सरंजामदारच अधिक आहेत. हे सरंजामदार ना कार्यकर्त्यांना वेळ देतात ना त्यांचे प्रश्न समजावून घेतात. अशांच्या भरवशावर पक्ष कसा चालणार, असा सवालही मनसेत उपस्थित केला जात आहे. राज ठाकरे यांच्या करिश्म्यावर अजूनही कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. परंतु नरेंद्र मोदी यांनी आगामी चार महिन्यांत काही ठोस करून दाखवले तर महाराष्ट्रात विधानसभेतही मोदी यांचेच वादळ घोंगावेल, अशी भीती मनसेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर पक्षाची रचना करताना स्टार, यार व कलाकारांना आतातरी बाजूला ठेवा असेही मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होताना दिसते.
या पाश्र्वभूमीवर राज यांनी स्वत:चा पक्ष काढल्यानंतर स्वाभाविकपणे राजकारणात येऊ पाहाणारा मोठा तरुणवर्ग त्यांच्याकडे आकृष्ट झाला. महाविद्यालयातील हजारो तरुणांच्या मोबाइलवर राज यांची छायाचित्रे तसेच भाषणांच्या क्लिप दिसू लागल्या. मनसेच्या स्थापनेनंतर शिवाजी पार्कवर झालेल्या पहिल्याच सभेला लाखांची गर्दीही जमली आणि राज यांचे भाषणही जोरदार गाजले. महाराष्ट्राच्या विकासाचे, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न राज यांनी दाखवले. राज यांच्या स्वप्नातील शेतकरी हा जीन्स पॅन्ट घालून ट्रॅक्टरवर बसलेला होता. सत्तरच्या दशकातील ‘अँग्री यंग मॅन अमिताभ’ हाच राज यांच्या रूपाने राजकारणात अवतरल्याचा आभास त्या वेळी हजारो तरुणांना झाला. रस्ते, पाणी, वीज, शिक्षणासह कोणत्याही मूलभूत प्रश्नांवर मी तडजोड करणार नाही. चागंली कामे केली तर उद्योगपतीही निश्चितपणे निधी देतील, त्यामुळे पैसे खाण्याची गरज नाही, ही त्यांची वक्तव्ये तेव्हा तरुणाईलाच नव्हे तर भल्याभल्यांना भुरळ घालून गेली. शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘‘आजपासून हा बाळ महाराष्ट्राला अर्पण करतो,’’ असे सांगितले होते. त्याची आठवण करून देत शिवाजी पार्कवरील पक्षस्थापनेच्या पहिल्या सभेत राज यांनी ‘‘मीच मला महाराष्ट्राला अर्पण करतो,’’ असे सांगून भावनिक लाट निर्माण केली होती.
भावनिक व सहानुभूतीचे राजकारण करण्यात राज यांचा हात कोणी धरू शकत नाही. त्याचप्रमाणे टायमिंग साधण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे. यामुळेच गेल्या आठ वर्षांत पाहाता पाहाता मनसेची कमान मोठी होत गेली. मुंबई महापालिकेच्या पहिल्या निडणुकीत सात नगरसेवक विजयी झाले, तर दुसऱ्या पालिका निवडणुकीत सातचे सत्तावीस नगरसेवक झाले. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये सातही नगरसेवक मनसेचे विजयी होण्याचा चमत्कार राज यांनी घडवून आणला. एवढेच नव्हे तर गेल्या लोकसभा निवडणुकीत ११ जागा लढवून तब्बल १५ लाखांहून अधिक मते मिळवली. विधानसभा निवडणुकीत १४३ जागा लढवताना मनसेचे १३ आमदार विजयी झाले, तर त्यांना पंचवीस लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले. राज यांना मिळालेल्या गेल्या आठ वर्षांतील या यशामध्ये त्यांच्या करिश्माचा वाटा जसा मोठा आहे त्याचप्रमाणे प्रस्थापितांविरोधातील नाराजी हेही एक प्रमुख कारण आहे. अन्य पक्षांपेक्षा माझा पक्ष वेगळा असेल, असे सुरुवातीपासून सांगणाऱ्या राज यांच्यावर लोकांनी विश्वास ठेवला, कारण अन्य पक्षांच्या राजकारणाला ते कंटाळले होते; तथापि मनसेविषयी राज यांनी उंचावलेल्या अपेक्षा आणि दाखवलेले चित्र याचा वास्तवाशी काहीही संबंध नसल्याचे हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागले. राज यांची भाषणे व त्यातील विचार हे उत्तम असतील, ऐकायलाही चांगले असतील, परंतु राज यांचे सहकारी ते विचार प्रत्यक्षात आणण्यास सक्षम नसल्याचे दिसून येऊ लागले. गेल्या आठ वर्षांत पक्ष उभा राहिला तो केवळ राज यांच्या करिश्म्यावर, परंतु पक्षबांधणी तसेच पक्षात नेते अथवा चांगले कार्यकर्ते घडविण्याबाबत फारसे काही झाले नाही. त्यातच निवडून आलेल्या नगरसेवक अथवा आमदारांकडून म्हणावी तशी कामगिरीही होताना दिसली नाही. याच्याच परिणामी मराठी माणूस पुन्हा एकदा शिवसेनेकडे वळल्याचे दिसून येते. अर्थात हेच एकमेव कारण नाही, तर शिवसेनेने त्यातही प्रामुख्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिद्दीने केलेली पक्षबांधणी त्याला कारणीभूत आहे.
लाटेवर स्वार होणारे लाट खाली गेली की जसे गायब होतात, तशीच काहीशी स्थिती या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाहावयास मिळते. गेल्या लोकसभा निवडणुकीत अकरा जागा लढलेला मनसे या वेळी महाराष्ट्रात किमान पंचवीस जागा लढवेल असा अंदाज होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने टाळी मागून पाहिली होती. भाजपने तर राज यांच्यामागे अक्षरश: ‘दार उघड बये दार उघड’चा जप चालवला होता. भाजपचे महाराष्ट्रातील सर्वच नेते राज यांना महायुतीत येण्यासाठी आवतण देत होते. नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांनी गुप्त खलबतेही करून पाहिली. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यापासून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यापर्यंत साऱ्यांनीच राज यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांची चाचपणी केली. टाळीला टाटाचे उत्तर मिळाल्यापासून सावध झालेल्या शिवसेनेने पक्षाच्या बांधणीकडे सर्वशक्तिनिशी लक्ष दिले. त्यातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर होणारी लोकसभेची निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वार्थाने महत्त्वाची ठरणारी होती. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव यांनी महाराष्ट्रात जाऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भेटीचा सपाटा लावला. त्यानंतर लोकसभानिहाय गटनेत्यांचे मेळावे घेतले. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात त्यांनी वेडय़ासारखे दौरे करून शिवसेना एकसंध राहील याची काळजी घेतली. तोपर्यंत नरेंद्र मोदी नावाचे वादळ घोंघावणार असून त्या सुनामीत सारेच साफ होणार याचा अंदाजही कोणाला नव्हता. नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यापासून त्यांनी साऱ्या देशाचा दौरा करण्यास सुरुवात केली तेव्हाही मोदी एवढा करिश्मा करतील असे भाजपमध्येही कोणाला वाटले नव्हते. मोदी यांच्या आगमनामुळे भाजपला एक आशा जरूर निर्माण झाली होती. जसजसा लोकसभा निवडणुकीचा ज्वर आणि जोर वाढू लागला, वातावरण तापू लागले आणि विकासाच्या लाटेवर स्वार होत मोदींच्या भाषणांनी सप्तसूर गाठला तसे भाजपचे कमळ फुलायला लागले. ‘मोदी, मोदी’ असा जयघोष आणि ‘हर हर मोदी, घर घर मोदी’च्या घोषणांनी नरेंद्र मोदी यांच्या सभा गाजू लागल्या तेव्हा भाजपच्या नेत्यांनी आपल्या दंडातील बेटकुळ्या दाखविण्यास सुरुवात केली. राज ठाकरे यांनी मनसेची परिस्थिती आणि मोदी लाटेचा अंदाज घेत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी पक्षाच्या वर्धापन दिनीच ‘‘माझे खासदार पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा देतील’’ असे जाहीर करून ‘राज’कीय बाण सोडून दिला. अवघ्या दहा जागा लढवून काही जागा जिंकता आल्यास आगामी विधानसभेत त्याचा फायदा मिळेल असा राज यांचा होरा होता; परंतु प्रत्यक्ष प्रचारसभांत भाषण करताना, ‘‘काय तेच तेच बोलायचे, तेच तेच प्रश्न घेऊन निवडणुकांना सामोरे जायचे’’ अशा केलेल्या सुरुवातीमुळे लोकांचा अपेक्षाभंग होऊ लागला. महाराष्ट्राचे खासदार जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा त्यांना राज्य सरकारकडून एक पुस्तिका दिली जाते. त्या पुस्तिकेत महाराष्ट्राच्या दिल्लीत सोडवायच्या प्रश्नांची जंत्री असते. राज यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कोणतेही ठोस मुद्दे मांडले नाहीत. महाराष्ट्राच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण आवाज उठवला नाही. पुण्याच्या पहिल्या प्रचारसभेत त्यांनी सेना-भाजपचे नेते कसे आपल्याकडे आले याचा पट उलगडून दाखवला, तर डोंबिवलीच्या सभेत उद्धव यांच्या ‘खंजीर खुपसला’ या आरोपाला उत्तर देताना शिवसेनाप्रमुखांना दिले जाणारे तेलकट वडे आणि आपण पाठवलेले सूप काढल्यामुळे केवळ शिवसैनिकच नव्हे तर मराठी मतदारही मोठय़ा प्रमाणात नाराज झाला. त्याचाही मोठा फटका मोदीलाटेबरोबर मनसेला बसला.
मुदलातच आजही मनसे उभा आहे तो केवळ राज यांच्या करिश्म्यावर. स्टार, यार व कलाकारांचाच प्रभाव पक्षावर असून सरचिटणीस तसेच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांशीच जेथे संपर्क नाही तेथे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रश्नच येत नाही. बिनकामाच्या मुजोर पदाधिकाऱ्यांना जोपर्यंत राज हाकलणार नाहीत तोपर्यंत पक्षाचे काही खरे नाही, असे मनसेचेच कार्यकर्ते आता उघडपणे बोलू लागले आहेत. या पदाधिकाऱ्यांना तळागाळातील कार्यकर्त्यांशी काहीही घेणेदेणे नसल्यामुळेच महाराष्ट्रात बूथनिहाय गटाध्यक्ष अथवा पोलिंग एजंट मनसेकडे उपलब्ध नाहीत. पक्षबांधणीचा प्रयत्न राज यांनी केला असला तरी डॉक्टर व कंपाऊंडर हे दोन्ही रोल एकच व्यक्ती करणार असेल तर पक्ष वाढेल कसा, असा सवाल मनसेच्याच पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. राज यांनी वेळोवेळी संपर्कप्रमुख म्हणून ज्यांना नेमले अथवा ज्यांच्याकडे एखाद्या जिल्ह्य़ातील पक्षबांधणीची जबाबदारी दिली त्यातील बहुतेकांनी केवळ ‘दुकानदारी’ करून त्या त्या भागात गटबाजीला खतपाणी घालण्याचेच काम केले. यातूनच तळातील कार्यकर्ता नेत्यांना अथवा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जुमानताना दिसत नाही. झटपट मोठे होण्याच्या नादात पक्षाचे पदाधिकारी जो ‘मनसे धिंगाणा’ घालतायत त्याला आळा घालण्याचे काम कोणी करताना दिसत नाही. परिणामी मनसे हा खंडणीखोरांचा पक्ष असल्याची हेटाळणी होऊ लागली आहे. मुंबई, ठाणे, पुणे व नाशिकमधील नगरसेवकांच्या कामगिरीचा नियमितपणे कोणी आढावाही घेत नाही. ज्या महापालिका, नगरपालिका, विधानसभा अथवा लोकसभा निवडणुका मनसे लढत नाही, त्या ठिकाणचे पदाधिकारी अन्य पक्षांच्या उमेदवारांशी ‘अर्थपूर्ण हातमिळवणी’ करताना दिसतात. या साऱ्याला कठोरपणे आळा घालून पक्षबांधणीचा व्यापक कार्यक्रम राज यांनी घेणे अपेक्षित आहे. जिल्ह्य़ाजिल्ह्य़ांत जाऊन कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन राज यांनी मार्गदर्शन केल्यास विधानसभा निवडणुकीत पक्षाला उभारी मिळेल, अन्यथा विधानसभा निवडणुकीत पानिपत निश्चित आहे.
पक्ष या अर्थाने एकीकडे मनसेची वाटचाल उतरत्या दिशेने सुरू असताना दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणी व पक्षशिस्त याला अनन्यसाधारण महत्त्व दिले. सातत्याने पक्षाच्या वेगवेगळ्या विभागांच्या बैठका घेऊन त्यांच्या कामाचा आढावा घेणे व आवश्यक त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन बदल करणे, त्याचप्रमाणे तळातील कार्यकर्त्यांच्या कायम संपर्कात राहण्याचे काम उद्धव यांनी केले. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर तर त्यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय गटप्रमुखांचे, उपशाखा व शाखाप्रमुखांचे मेळावे घेतले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रमुखच संपर्कात असल्यामुळे अन्य नेत्यांवरही त्याचा आपोआप वचक बसतो. लोकसभा निवडणुकीतही प्रचारात उद्धव यांनी कोणतीच कसर बाकी ठेवली नाही. शिवसेनेच्या मतदारसंघात कोणतीही गडबड होणार नाही, याची काटेकोरपणे घेतलेली काळजी आणि मोदीलाट यामुळेच आज महाराष्ट्रात शिवसेनेला अठरा जागा मिळाल्या आहेत. गेल्या लोकसभेत मुंबईत सहाही जागा महायुतीला गमवाव्या लागल्या होत्या, तर या वेळी सहाही जागा महायुतीने एकहाती जिंकल्या. गेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या वेळी मराठी मते मनसेमुळे फुटल्याचा आरोप शिवसेनेने केला होता; परंतु या वेळी लोकांनीच मनसेला नाकारले असून सेना-भाजपच्या मतांमध्ये जी वाढ झालेली दिसते ती मनसेची मते वळल्यामुळेच झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मनसेची मते १५ लाखांवरून थेट सात लाखांपर्यंत आली असून मनसेच्या दहाही उमेदवारांवर डिपॉझिट गमाविण्याची नामुष्की ओढावली आहे. या धक्क्य़ातून बाहेर येणे हे मोठे आव्हान राज ठाकरे यांच्यासमोर आहे.
केवळ मराठी मतांचे राजकारण आजपर्यंत केल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे व नाशिकमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी मनसेला बरीच मेहनत करावी लागेल. विदर्भ व मराठवाडय़ात राज यांच्याविषयी तरुणांमध्ये आकर्षण मोठय़ा प्रमाणात आहे. ते संघटित करावे लागणार आहे. आता अन्य पक्षातून मनसेमध्ये येऊन तिकीट घेण्यासाठी सध्याच्या राजकीय परिस्थितीत फारसे कोणी इच्छुक असणार नाहीत. अशा वेळी मनसेमधीलच चांगल्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर विधानसभा निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात मनसेचा प्रभाव जवळपास नाही. अशा परिस्थितीत मनसेच्या प्रचाराचा सारा भार हा राज ठाकरे यांनाच एकहाती सांभाळावा लागणार आहे. त्यामुळे आतापासून विधानसभा निवडणुकीपर्यंत मेहनत घेणे एवढाच पर्याय राज व त्यांच्या मनसेसमोर शिल्लक आहे.
लोकसभेत मिळालेल्या विजयामुळे सेना-भाजपमध्ये आता महाराष्ट्रात कधी एकदा सत्तेवर येतो असे झाल्यास नवल नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीला त्यांच्या मुजोर कारभाराची किंमत विधानसभेत मोजावी लागणार हे निश्चितच आहे; तथापि भाजपने विधानसभेत सेनेकडून जास्त जागा मागितल्यामुळे जर गोंधळ उडाला व राज यांनी या संधीचा फायदा घेत तसेच महाराष्ट्रातील प्रश्न घेऊन अभ्यासपूर्ण रण माजवले, तर काही प्रमाणात मनसेला त्याचा फायदा होऊ शकेल. अन्यथा लोकांना गृहीत धरू नका, असे आपल्या भाषणातून वेळोवेळी सांगणाऱ्या राज यांच्या मनसेला लोक विधानसभा निवडणुकीतही गृहीत धरणार नाहीत.