शिवछत्रपतींच्या वास्तव्याने पुनित झालेला राजगड म्हणजे अवघ्या मराठी माणसाच्या दृष्टीने उत्तुंगतेचा, पराक्रमाचा परमावधी! पण राजगड त्याहीपलीकडे जाऊन आपल्या राकटपणाची मोहिनी घालत राहतो. अगदी ऋतुगणिक आपलं रूपडं बदलत संमोहित करतो…

डोंगरवाटांवर टाकलेल्या पहिल्या पावलांसोबत आठवतो तो धो-धो कोसळणारा पाऊस. त्या आठवणींसोबत मनही चिंब भिजून जातं. आठवतं की, तो पाऊस शरीरात मुरला अन् त्यासोबत मनात मुरले ते हिरवेगर्द डोंगर, लालजर्द वाटा, भणाणता वारा, हालतंडोलतं धुकं, कडकडतं ऊन, थिजवणारी थंडी.. आज या डोंगरांच्या प्रेमात पडून पस्तीस र्वष उलटलीत, मात्र मनीची चित्रं आणि त्या चित्रातले ते रंग अजून तसेच आहेत. ओले, ताजे अन् गंध असलेले!
डोंगरवाटांची ही नुसती तोंडओळख होती. त्यांच्या अंतरंगात अजूनही शिरायचं होतं. आज कधी कधी निवांत बसलेला असतो. मनी काहीच सुरू नसतं. केवळ पांढराधोप मोकळा पडदा. डोळे मिटलेले असतात. अन् अचानक पाहिलेला पहिला दुर्ग आठवतो. निळ्याभोर आभाळाच्या ताणलेल्या पडद्यावर, खांद्यांवरचा काळाकभिन्न बालेकिल्ला मिरवणारा, लांबलचक माच्यांच्या कुशीतले सोनसळे गवत सळसळणारा राजगड आठवतो. मनी खात्रीचा विचार उमटतो.. खरंच मी भाग्याचा! पहिलाच दुर्ग पाहिला, अन् तोही राजगड! इतक्या देखण्या रूपाचा अन् अशा गुणांचा. दुसऱ्या कुण्याही दुर्गास राजगडाचा हेवा वाटावा.
राजगडाचा डोंगर देवानं निवांत क्षणी रचला आहे. मन सुखावलेलं असताना. तृप्त असताना. जणू तांबडफुटीच्या निकरक्षणी त्यानं पाहिलेलं ते स्वप्न आहे. रंगदेखणं स्वप्न. मात्र डोंगर रचून झाला, पहाट झाली अन् देवाचं स्वप्न भंगलं. डोंगर तसाच राहिला. झाडापानांनी मोहरला. फळाफुलांनी वोळून आला. वाट पाहात राहिला, दुसऱ्या स्वप्नाची!
ते स्वप्न शिवछत्रपतींनी पाहिलं. वयाच्या पंधराव्या वर्षी पाहिलं. मुरुंबदेवाच्या डोंगराचं ते देवदत्त रूप पाहून ते लहानगं लेकरू हरीखलं. वेडावल्या इरेसरीनं त्यानं डोंगराला तटाबुरुजांची अंगडीटोपडी लेवविली. कलेकलेनं आकार घेत भीमरूपी महारुद्रावाणी, कळकळत्या काळ्या पत्थरांनी नटलेला राजगड उभा राहिला. रामभक्त हनुमंताचं वर्णन करताना समर्थ रामदास म्हणतात-
रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पति।
जो नरात वानरात भक्तिप्रेम वित्पति।
दासदक्ष स्वामीपक्ष नीजकाजसारथी।
वीरजोर शीरजोर धक्किधग मारुती।।
राजगड अगदी तसाच आहे. स्वामीच्या चरणाशी लीन. स्वामीकाजाशी तत्पर. पाहताक्षणी अंगी वीरश्री फुलावी असा. रौद्र. धक्किधग!
जवळजवळ तीन-साडेतीनशे वेळा मी राजगड पाहिलाय. सगळ्या ऋतूंमध्ये पाहिलाय. सहाही ऋतुसोहळे अनुभवलेत. दिवसरात्रीच्या हरएक प्रहरी राजगड चढलो-उतरलोय. राजगडाच्या अंगाखांद्यावरून ओघळणाऱ्या दहाही वाटांनी चढ-उतार करताना दिसणारं राजगडाचं देवदुर्लभ रूप मी मनाच्या अगदी आतल्या कोपऱ्यात साठवून ठेवलंय. तिथे दोघा-तिघा खाशांनाच प्रवेश. त्यातला एक राजगड..!
छताचा पंखा उलटा ठेवल्यावर दिसेल तसा राजगड दिसतो. पंख्याची तीन पाती म्हणजे राजगडाच्या तीन दिशांना धावणाऱ्या तीन माच्या अन् मधोमध तो उत्तुंग बालेकिल्ला. या दुर्गावर आज दहा वाटांनी जाता येतं आणि या दहाही वाटांनी चढता-उतरताना हा देखणा दुर्ग अजूनच असामान्य भासत राहतो. तो आपल्याकडे पाहतो. खुणावतो. मिठीत घेऊ पाहतो. कानी हलकेच कुजबुजतो. विचारतो, कसा आहेस रे पुता? हे असं भासलं की, मग मन खुळावतं. सरावैरा धावतं. इतिहासाच्या वाटांवर रमतं. कधी अज्ञाताच्या डोही बुडी देत एकंकार होतं. देवाच्या द्वारी क्षणभरी उभं ठाकताक्षणी मुक्तीची द्वारे खडाखडा उघडावीत, अगदी तीच परी होते.
मळ्याहून वर चढणारी वाट या सगळ्या वाटांमध्ये माझ्या अतिशय आवडीची. एक चित्र डोळ्यांपुढे साकारतं. कृष्णपक्षातली काळोखदाटली रात्र असावी. आभाळात नक्षत्रांनी आपला मांड मांडलेला असावा. काळोखा कोपरा शोधावा लागावा अशी आकाशगंगा लखलखत असावी अन् मळ्याच्या वाटेने चढत असताना त्या उजाळ काळोखात दोन्ही बाहू पसरलेला राजगड सामोरा दिसत असावा. हा अनुभव केवळ अद्भुत असतो.
भोरजवळ वेळवंडी नदीवर धरण बांधलंय. त्या धरणाच्या फुगवटय़ाच्या – येसाजी कंक जलाशयाच्या – तीरावर, राजगडाच्या दक्षिण पायथ्याशी मळे नावाचं लहानगं खेडं. इतकं लहान की, केवळ वाटेवर आहे म्हणून एस्. टी. थांबायची. भंवताली डेरेदार आंब्यांची गर्द राई अन् देवराई वाटावी असं घनगर्द रान. इतकं गच्च की, रानात शिरताच समोर असलेला राजगडाचा धिप्पाड पहाडही दृष्टीस पडू नये. मळ्यात शिरताक्षणी हिरव्या रंगांच्या नाना छटा घेऊन हे अरण्य आपल्याला सामोरं येतं. वळून पाहावं तर पाठीशी दिसतो निळ्याशार पाण्याचा अथांग विस्तार अन् लालचुटुक कौलांची घरं. तीच लाली घेऊन वाट आपल्या पायांखाली येते अन् त्या हिरव्या रानाच्या कुशीतून राजगडाच्या चढाला लागते. मुळात ही वाट पावसाच्या खळाळत वाहणाऱ्या पाण्याची. पावसाळा उलगला की, मग माणसांची. पाण्याने धुपून, माणसांनी चालून वाट आता खोलखोल होत चाललीय. भल्या थोरल्या झाडांची मुळं उघडी पडलीत. हळूहळू वळतवाकत, दम काढत लाललाल मातीची ही लहानशी वाट अर्धा डोंगर चढते अन् रान संपवीत उघडय़ावर येताक्षणी सुवेळा अन् संजीवनी या दोन्ही माच्यांचे हात दोन्ही बाजूंस पसरीत शिवरुद्र राजगड तुम्हाला मिठीत घ्यायला तुमच्या सामोरा उभा ठाकतो.
आता गर्दावलेलं रान पाठीशी राहतं. डोळ्यांसमोर दिसते उभी डोंगरधार अन् त्या धारेला भांग पाडत गेलेली निमुळती, नाजूकशी पायवाट. ऋतुपरत्वे हिचं रूप बदलतं. उन्हाळ्यात दोहो बाजूंचं गवत वाट सोडून आडवं झालेलं असतं. कधी वणव्याची झळ लागते. अवघे उतार जळून काळेभंगार होतात. त्या थंड राखेवरून येणाऱ्या मऊमंद झुळकासुद्धा विझल्या वणव्याचा दाह घेऊन वाहतात. कधी एकदा ही वाट संपते असं होऊन जातं. अगदी उभा चढ. श्वास धापतो. संयत व्हायला म्हणून हातच्या काठीवर भार देत आपण जागी उभे राहतो. खाली वाकलं, नीट निरखून पाहिलं तर त्या राखाळल्या थराखाली इवली इवली तृणबीजं लपलेली दिसतात अन् मग आपल्याला प्रलयजळांत हेलकावणाऱ्या मनूच्या नावेची आठवण होते. जाणवते, खात्री पटते की, अवघड काळात स्थिरबुद्धी राखणाराच पुनरुत्थानाच्या वाटेवर नेटका चालू शकतो.
ऋतू पुढे सरतात. वळवाच्या सरी पावसकाळाचे ढोल पिटतात. आभाळ पूर्वेकडून काळवंडतं. त्या गर्दसावळ्या ढगांच्या पोटात घुमघुमतं. मोकळ्या आभाळाच्या पाठीवर विजांचे फटकारे उठतात अन् फाटल्या आभाळातून महामूर पाणी तापल्या धरित्रीवर बरसू लागतं. वरली राख धुऊन जाते. त्या पहिल्यावहिल्या जळस्पर्शानं तरारलेली ती तृणबीजं डोळे उघडतात. दोन इवल्या इवल्या पानांचे हात जोडीत आभाळीच्या देवाला नमस्कारतात. आयुष्याची वाट चालू लागतात. चार-दोन दिवसांतच काळ्यापिवळ्या रानाचा मागमूस उरत नाही. साराच डोंगरउतार हिरवळून जातो. बरसत्या पाण्याखाली न्हात, वाऱ्यावर डुलताडुलता अवघं रान एकमेकाला स्पर्शत, एकमेकांची चौकशी करीत असतं. हळूहळू पोसत असतं. वाढत असतं.
पावसाळा उलगतो. तीन महिने गच्च दाटून असलेलं धुकट विरळ होतं. त्यातून मध्येच आकाशाचा निळसर तुकडा दिसतो. आता जडावलेली तृणपाती हसतात. त्यांना ठाऊक असतं की, ही निरोपाची वेळ. जन्मापासून जे साठलं ते वाटून टाकायची वेळ. तोवर श्रावण उलटलेला असतो. भाद्रपदाची चाहूल लागते अन् या वाटेवर तृणपुष्पांचा गालिचा उलगडत जातो. ऐन वाटेवरही हे वैभव विखुरतं अन् पाऊल कुठे ठेवावं हा प्रश्न आपल्या मनी उभा राहतो. इवलीशी, चिन्नीमिन्नी रानफुलं अवघ्या उतारभर वाऱ्यासवे डोलत असतात. खिदळत असतात. रूपरंगाचा दंभ बाजूस सारून. कृतकृत्यतेच्या भावनेनं. तृप्ततेच्या भावनेनं. ते पाहिलं की एक प्रश्न मनाला स्पर्शून जातो. आयुष्याची इतिकर्तव्यता तृप्ततेतच असते काय?
सारं रान जोगावतं. कुसळी गवत गुडघामांडी वाढतं. आश्विनातल्या घटांना रानफुलांच्या माळा लागतात. घटांभोवतीची अंकुरलेली अष्टधान्ये पाहून प्रसन्न होऊन आई अंबा वाघावर बसून रानातल्या उभ्याआडव्या वाटांवर फिरते. गड चढून जाते. पद्मावतीच्या मंदिरी गुपित होते. आश्विन सरतो अन् थंडीचं सूत हाती धरून काíतक या पायवाटेवर पाऊल घालतो. आता अवघी वाट सोनकीच्या सूर्यप्रकाशी फुलांनी अक्षरश: दाटून जाते. पिवळंधम्मक होऊन अवघं रान वाऱ्याच्या लोटांवर लोळत असतं. मग अशा क्षणी त्या वाटेवर पाऊल घालणारा कुणी एक, त्या पीतसमुद्रात उभा राहून, समोरचा सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेला कभिन्न काळा राजगड पाहून समाधानात असतो. मनोमन तृप्तावत असतो.
आता मार्गशीर्षांतली थंडी सोबत दवभार घेऊन वाटेवर उतरते. या काळात रात्रीचं या वाटेवर पाऊल घातलं तर नाकाच्या शेंडय़ावरून गळणाऱ्या घामात दवच जास्त असतं. अवघी वाट दवानं भिजते. गव्हाच्या अन् हरभऱ्याच्या मुळाशी दवानं आळं करावं तसं रानभर गवताच्या मुळाशी दव साठतं. तो साठलेला ओलावा पोटाशी धरून, पावसाळ्याची वाट पाहात, तृणबीजं उन्हाळा साहून जातात. आपणही तेच करीत असतो. फरक हेतूचा असतो, निर्हेतुकपणे कम्रे करण्याचा असतो. ज्ञानोबामाऊली म्हणतात-
परि ते बीजे जैसी दग्धली।
नुगवतीची पेरिली।
तशी कम्रेचि परि तया जाहली।
मोक्षहेतु।।
मागील मुमुक्षु जे होते।
तिही ऐशिया जाणोनि माते।
कम्रे केली समस्ते।
धनुर्धरा।।
मन उघडं असलं की, डोंगरवाटा खूप काही समजावून सांगत असतात. तुमच्या आयुष्याशी ऋतुचक्रांचे मेळ घालतात. अवघडल्या क्षणी पाऊल कुठं ठेवावं याची जाण करून देतात!
राजगड अद्भुत इतिहासाचा साक्षीदार आहे. शिवछत्रपतींच्या आयुष्यातला पंचवीस वर्षांचा लखलखता कालखंड या दुर्गानं स्वत:च्या तळहातीच्या रेषा निरखाव्या तसा निरखला आहे. साडेतीनशे दुर्गाचा तो स्वामी या राजगडावर पंचवीस र्वष राहिला आहे. याच डोंगरवाटांनी चढलाउतरला आहे. पंचवीस र्वष येथला निसर्ग न्याहाळला आहे. येथली पंचवीस ऋतुचक्रं गरगरताना न्याहाळली आहेत. कडकडते उन्हाळे पाहिलेत. धुकटाने दाटलेले पावसाळे पाहिलेत. हाडबोचरी थंडी अनुभवलीय. धाल्या मनानं त्या शिवछत्रपती राजानं राजगड अन् त्याच्या वाटा अनुभविल्या आहेत. अशाच एका तृप्त क्षणी हलक्या झालेल्या त्याच्या मनीचे विचार त्याच्या हातीच्या बोरूवाटे उमटले आहेत. जणू त्याच्या जीवनाचं तत्त्वज्ञान त्या कागदांवर उतरलं आहे:
नाशिवंत सुखासाठी।
अंतरला जगजेठी।।
मनुष्यजन्म गेल्या वारे।
काय करिसील बा रे।।
धन्य धन्य याते गोडी।
लक्ष चौऱ्यांशीची जोडी।।
शिवराजे सांगे जना।
म्या तो सोडिली वासना।।
हे तत्त्वज्ञान म्हणजे जणू राजगडाचा शिवछत्रपतींच्या मस्तकी असलेला वरदहस्त आहे.
गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला जे जे उत्तम, जे जे उदात्त त्याची जंत्री सांगताना म्हणतात, वेदांमध्ये मी सामवेद, मासांमध्ये मी मार्गशीर्ष, ऋतूंमधला मी वसंत, वृष्णींमधला मी कृष्ण, पांडवांमधला मी अर्जुन.. हे सारं बोलताना त्यांनी, दुर्गानाम् राजदुर्गोऽहम् ‘दुर्गामधला मी राजगड’ असं म्हटलं असतं तर गीता अन् तिचं तत्त्वज्ञान अधिक परिपूर्ण झालं असतं.
असं आपलं मला वाटतं, कारण माझा राजगड आहेच तसा!
(छायाचित्रे – महेंद्र गोवेकर, हर्षल महाजन, सुहास जोशी)

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader