दिवाळीचं लायटिंग केल्यागत, आकाशात जाऊन फुटणाऱ्या फटाक्याप्रमाणे चकचक चकचक करून एक झाडच्या झाड चमकत होतं. आम्ही विजेऱ्या बंद करून त्याकडे स्तब्धपणे बघत होतो. झाड बघून चकित होतो न् होतो तो बाजूच्या विस्तीर्ण जंगलाकडे लक्ष गेलं. अख्खं जंगल जणू दिवाळी असल्यासारखं लखलखत होतं.
‘‘अजून किती वेळ लागेल लोणावळ्याला पोहोचायला?’’ अंदाजे पन्नास वेळा पन्नास जणांना विचारून झालेला हा प्रश्न स्वानंदने आणखी एका काकांना विचारला आणि त्यांच्या ‘दोन तास लागतील’ या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या उत्तरानंतर स्वानंदची झालेली भावमुद्रा बघून आम्हाला हसू आवरणं केवळ अशक्य होतं. ट्रेकचा पूर्वार्ध काजव्यांनी गाजवला असला तरी उत्तरार्ध मात्र स्वानंदच्या नावे झाला.
राजमाची, काजवे, जंगलातून मातीच्या रस्त्यावरून चालणं, मग दिसणारा नजारा हे सगळं खरं तर गेल्या वर्षीपासूनच डोक्यात होतं. पण गेल्या वर्षी हुकलेला हा ट्रेक या वेळी अखेर घडलाच. लक्ष काजव्यांच्या कल्पनेने, गुगलवरील त्या काजव्यांच्या फोटोंनी आमच्या ‘डोक्यात’ अगोदर काजवे चमकले आणि मग ते प्रत्यक्षात बघण्यासाठी आम्ही या ट्रेकचा प्लॅन आखला. आंतरजालावरून माहिती जमवली. विशेष उल्लेखनीय म्हणजे सागर बोरकर नावाच्या एका स्नेह्य़ांनी केलेलं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरलं. तिथे राहण्याची व जेवणाची सोय त्यांनी सुचवलेल्या ठिकाणी उत्तम झाली.
राजमाची गावात सुरेश जानोरे यांना फोन लावला. त्यांच्याकडे राहण्याची, जेवणाची उत्तम सोय होते. त्यांचं असं म्हणणं पडलं की आम्ही केलेला बेत आणि योजलेली वेळ अगदी योग्य असून आणखी वेळ केल्यास कदाचित काजवे दिसणार नाहीत. त्यामुळे ९-१० जून तारीखच नक्की केली. दर ट्रेकप्रमाणे येणाऱ्यांची संख्या वर-खाली झाली आणि मग शिवभक्त अनिकेत, अचानक डायलॉग फेम सौरभ, रॉकपॅचचा राजा स्वानंद, नवा गडी दुष्यंत आणि मी अशी पंचमहाभूतं काजवे बघायला निघालो.
ट्रेनने जावं, की गाडी काढावी, की बस.. असे पर्याय असताना शेवटी आम्हा प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली येश्टी आम्ही ठाण्याहून पकडली आणि रवाना झालो. महिला वाहक ताईंनी ‘‘मी सांगेन तिथेच उतरा, बरोबर जाल’’ असं बजावलेलं असूनही घाई, गडबड, संभ्रम या कारणांमुळे आम्ही खंडाळा एक्झिटलाच उतरलो. समोर रिक्षा स्टॅण्ड होता. तिथले दोन रिक्षावाले आमचे संभ्रमित चेहरे बघून देवासारखे(?) मदतीला आले आणि आम्हाला कुन्हे गावापर्यंत सोडायला तयार झाले (म्हणजे त्यांनी आम्हाला भरीस पाडलं). कामतमध्ये पोटं भरू आणि मग जाऊ असं म्हटलं तर ते तिथेही आमच्यासाठी थांबायला तयार झाले. इतकंच नव्हे तर आम्ही ४००चा भाव ३५० वर आणला याचा आनंदही त्यांनी आम्हाला मिळू दिला. मग आम्ही पोटपूजा केली, चहा प्यायलो आणि निघालो रिक्षाने राजमाचीला. रिक्षावाल्यांच्या म्हणण्यानुसार आमचं सहा किलोमीटर चालणं वाचणार होतं. हे ऐकून आमचा उत्साह लगेच द्विगुणित झाला. संध्याकाळची वेळ, वारा, आकाशातले पक्षी, यामुळे प्रफुल्लितही वाटत होतं. अशात आमच्या रिक्षा एका ठिकाणी येऊन थांबल्या. ‘इथून पुढे सरऽऽऽळ चालत जायचं’ असं त्या रिक्षावाल्याने सांगितलं. आमच्याकडे नकाशे होते तेही तसंच सांगत होते.
सुरू झालं.. पाउले चालती!. वेळ ५:४०. वाटेत डेल्ला अॅडव्हेंचर लागलं. नटूनथटून आलेली, इतर वेळी सोफे आणि गाद्या झिजवणारी, सर्वत्र गाडीने फिरणारी अशी उच्चभ्रू लोक अॅडव्हेंचरच्या शोधात आलेली बघून विशेष हसू आलं. हसत, गप्पा मारत आम्ही पुढे चालत राहिलो. पुढे सातच्या सुमारास सूर्य क्षितिजाकडे सरकू लागला. हीच ती वेळ हाच तो क्षण.. फोटू टाइम. अधूनमधून गावातील मंडळी एम एटी, स्प्लेंडरसारख्या तगडय़ा बाइक्स घेऊन त्या उंचसखल मातीच्या रस्त्यावरून टिबलसीट वगैरे जात होती. पण ट्रेकला आलेला एकही ग्रुप आम्हाला दिसला नाही, त्यामुळे गर्दी नसणार याचा आनंद होत होता.
चालता चालता दुष्यंत एकदम ‘ए..’ असं ओरडला. आम्ही दचकून मागे फिरलो. हा कुठे तरी झाडाकडे बोट दाखवून म्हणाला, ‘‘तो पक्षी बघ! वेगळाच आहे.’’ ‘एवढंच ना.. अरे मग केवढय़ाने ओरडतोस!’ आम्ही चौघांनी एकसुरात म्हटलं. पुन्हा काही वेळाने असंच. दुष्यंत आमच्याबरोबर पहिल्यांदाच येत होता त्यामुळे त्याच्या या सवयीची आम्हाला सवय नव्हती. पण याच सवयीमुळे पुढे जाऊन आम्हाला काही दुर्मीळ जीव दिसले, काही चांगले फोटो मिळाले हे मात्र खरं. त्याला यानिमित्त आम्ही आमच्या ग्रुपचा सलीम अली ही पदवी बहाल केली.
हळूहळू अंधार दाटत गेला. आता मिट्ट काळोख झाला होता. आमच्या एव्हरेडीच्या विजेऱ्या बाहेर निघाल्या होत्या. आता एकमेकांतील अंतर कमी ठेवून आम्ही चालत होतो. इतक्यात.. ‘ए..’ दबकी हाक.. ‘काजवे..’ समोरच्या झाडावर विरळसे काजवे चमकत होते. ट्रेकचा हेतू साध्य होणार अशी आमची आशा बळावली. आणखी जरा पुढे चालल्यावर दाट जंगल होतं. तिथे जाऊन जो नजारा, जे दृश्य आम्हाला दिसलंय, त्याचं वर्णन अशक्य आहे. दिवाळीचं लायटिंग केल्यागत, आकाशात जाऊन फुटणाऱ्या फटाक्याप्रमाणे चकचक चकचक करून एक झाडच्या झाड चमकत होतं. एका विशिष्ट लयीत. आम्ही विजेऱ्या बंद करून त्याकडे स्तब्धपणे बघत होतो. झाड बघून चकित होतो न् होतो तो बाजूच्या विस्तीर्ण जंगलाकडे लक्ष गेलं. अख्खं जंगल जणू दिवाळी असल्यासारखं लखलखत होतं. केवळ अवर्णनीय! काही वेळ डोळ्यांचं पारणं फिटेपर्यंत तिथेच उभे राहिलो. निसर्गाचा तो आविष्कार बघत राहिलो. डोळे तृप्त झाल्यावर मग कॅमेरे बाहेर काढले. काजव्यांना फोटो, व्हिडीओत टिपण्याचे अनेक दुबळे प्रयत्न करत आम्ही मार्गक्रमण चालू ठेवलं. साधारण दहाच्या सुमारास आम्ही राजमाचीच्या पायथ्याशी सुरेश जानोरे यांच्याकडे पोहोचलो.
मावळी जेवण, या संज्ञेविषयी आम्ही जे जे आडाखे बांधले होते, ते चुकीचे ठरवणारं, पण तरीही अतिशय चविष्ट असं जेवण आमची वाट बघत होतं. शेणाने सारवलेल्या घरात, मांडय़ा ठोकून आम्ही त्याचा आस्वाद घेतला. भाकऱ्या तर इतक्या सुरेख होत्या की काय विचारा. आणि वांगं-बटाटा भाजी व ठेचा- दी बेस्ट. ‘आमटी घे अजून थोडी.. ठेचा देऊ का.. भात हवा? भाकरी घे अजून.’ घरातल्या आजी अगदी प्रेमाने वाढत होत्या. अशी आपुलकी केवळ या गावातल्या मंडळींकडेच असते आणि त्यांनीच ती बाळगावी. शहरातल्या लोकांना ती जमतही नाही आणि शोभतही नाही. तिथे तुटकपणाचीच संस्कृती. असो. पाणी पिऊन कपडे बदलून झोपायची तयारी केली. जेवल्यावर पुन्हा काजवे बघायला जायच्या प्लॅनवर फुली मारली.
आता प्रश्न होता पडवीत झोपायचं की घराच्या आत. घरात पंखा नव्हता, पडवीत वारा होता. पडवीत काहीही येऊ शकतं, घरात ती शक्यता कमी. ‘जंगलात हायत की प्राणी, बिबटय़ा, रानडुकर असतं. पण बिबटय़ा माणसाला काही करत न्हाय’ जानोरेंची वाक्य ताजी होतीच. काहीही असो. पडवीत झोपण्याची मजा काही औरच असते आणि तसंही बिबटय़ा माणसाला काही करत नाही. त्यामुळे आम्ही अंथरुणं पडवीतच अंथरून झोपी गेलो. वरच्या शेडच्या कोपऱ्यांतून एखाद-दोन काजवे चमकून अजूनही त्या जंगलातल्या दृश्याची आठवण करून देत होते. झोप म्हणावी तितकी भारी लागली नाही, पण लागली. मधूनच एखादं चिलट, एखादा किडा कानानाकाशी खेळून झोप उडवत होता. मग पाच वाजता कोंबडय़ांनी कोरसमध्ये आरवायला सुरुवात केली. खरी जाग मात्र आणली ती स्वानंदने. सव्वापाचच्या आसपास मोठय़ाने दचकण्याचा आवाज आला. उठून बघतो तर स्वानंद भेदरलेल्या अवस्थेत होता आणि दुष्यंतचा पाय त्याच्या अंगावर होता. दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली होती.
आम्ही आवरून गडफेरीला निघालो. गावातून किल्ल्यांकडे जाताना आधी भैरोबाचं देऊळ लागतं. तिथून त्याच्या एका बाजूला श्रीवर्धन तर एका बाजूला मनरंजन असे दोन किल्ले आहेत. त्यांना एकत्रितपणे राजमाची म्हणतात. किल्ल्यावर जाण्याच्या वाटा छोटय़ा आहेत व चुकायची शक्यता कमी आहे. श्रीवर्धन किल्ला मोठा आहे, मनरंजन तुलनेने छोटा. श्रीवर्धन आधी करू म्हणून आम्ही श्रीवर्धनकडे निघालो. समोर एक माकडांची टोळी होती आणि आमच्या हातात खाण्यापिण्याची एक कॅरीबॅग. डेंजर सिच्युएशन. आम्ही अशी युक्ती काढली की आपण कॅरीबॅग देवळात खुंटीला टांगू, खाली आल्यावर खाऊ पिऊ, तसाही जास्त वेळ लागणार नाही. आम्ही तसं केलं आणि किल्ल्यावर गेलो. श्रीवर्धन किल्ला सुरेख आहे. वरून दिसणारं दृश्य अतिशय सुंदर होतं. पावसाळ्यात त्याची रंगत अजून वेगळी असेल हे सांगायला नको. चिलखती बुरूज, टाकी आणि सर्वोच्च टोकावरचा भगवा बघून उतरताना डाव्या हाताला खाली असलेल्या बुरुजावर गेलो. तिथून मिनी कोकण कडा दिसतो. या मिनी कोकण कडय़ावरून पावसाळ्यात धबधबा कोसळत असतो. बघायलाच हवा असा हा ‘स्पॉट’ आहे. श्रीवर्धनवर असतानाच ठरवलं होतं की मनरंजनला जायला नको, तिथे फारसं काही नाही. श्रीवर्धनच आरामात बघू. त्यामुळे फोटो काढत, आरामात खाली आलो. भैरोबाच्या देवळासमोर लिंबू सरबत प्यायलं आणि आत पिशवी आणायला गेलो तर पिशवी गायब. जरा विचारल्यावर कळलं, ज्या माकडांना टाळण्यासाठी आम्ही ही युक्ती केली ती लई स्मार्ट होती. त्यांनी देवळाच्या आत येऊन आमची पिशवी लंपास केलेली होती.
मग टप्परवेअरच्या बाटल्या गेल्याच्या दु:खात आम्ही परतपावली जानोरेंकडे आलो. तिथे एक अत्रंगी ग्रुप आला होता. केस वाढलेली, सिगारेटी पिणारी, चित्रविचित्र हसणारी धेंडं त्या पडवीत पहुडली होती. आम्ही आमची जागा करून घेतली, चहा पोहे खाल्ले आणि ती मंडळी पांगल्यावर मग जानोरेंशी गप्पा मारत बसलो. अशा थिल्लर लोकांचं किल्ल्यांवर येणं, तमाशे करणं, किल्ले, शिवाजी महाराज, गोनीदा, बाबासाहेब पुरंदरे असं करत करत विषय राजकारणावर गेला. मस्त गप्पा झाल्या. साडेबारा कधी वाजले कळलंच नाही. मग मात्र पटापट आवरून एक गटचित्र काढून परतीच्या प्रवासाला लागलो.
निघता निघता जानोरे म्हणाले की, काल आलात तो खरा लांबचा रस्ता होता. त्यात तीन एक किमी जास्त पडतात. आता सरळ तुंगार्लीमार्गे जा. अंतर कमी आहे ते. झालं ना! काल ‘तो’ रस्ता कमी अंतराचा आहे समजून चाललो, आता ‘हा’ रस्ता कमी आहे असं मानून चालायचं होतं. आता खरी मजा होती. ऊन डोक्यावर होतं, पावसाचा येण्याचा मूड नव्हता, वारासुद्धा झोपलेला होता. अशात आम्ही चालत होतो. थांबत थांबत, पाणी पीत पीत, कालपेक्षा अंमळ कमी गप्पा मारत पावलं उचलत होतो. स्वानंद हळूहळू अधिकाधिक कुरकुर करू लागला. ‘‘किती अंतर आहे? किती वेळ लागेल?’’ असा जानोऱ्यांना पहिल्यांदा विचारलेला प्रश्न तो रस्त्यात जवळजवळ प्रत्येकाला विचारत होता. तोच नाही, आम्हीही विचारत होतो, पण तो जास्त. तेही असं व्हायचं की एका माणसाला आम्ही पाच जण (पुढेमागे चालत असल्याने) एकच प्रश्न विचारायचो. त्यातही गंमत म्हणजे प्रत्येक जण आधीच्या माणसाच्या उत्तराशी कमालीचं विसंगत उत्तर देत होता. त्यामुळे आम्हाला शेवटपर्यंत कळत नव्हतं की अजून किती चालायचंय आणि किती वेळ लागणार आहे. इतकं खिळवून ठेवणारा एखादा सिनेमाही मी आजवर बघितला नाही.
तुंगार्लीचा रस्ता छोटा होता की मोठा ते माहीत नाही, पण आम्ही मात्र येताना जास्त दमलो. पावलं दुखत होती, पाठ दुखत होती, पण ट्रेक मस्त झाल्याचा आनंद होता. काजवे जंगलातच नाही, आमच्या डोळ्यांसमोरही चमकले होते. गोष्ट इथेच संपत नाही. त्या दिवशी फेसबुकवर कुणी आक्षेपार्ह मजकूर टाकला म्हणे त्यामुळे लोणावळा बंद होतं. आली ना पंचाईत! बस स्टॅण्डवर मिसळ खाताना आम्हाला ही कल्पना नव्हती की घरी पोहोचेपर्यंत आम्हाला प्रचंड मोठा द्राविडी प्राणायाम करायचा आहे.
एकही बस मिळेना, मग शेवटी एका खोपोली बसमध्ये बसलो. तिने खोपोली फाटय़ाला गेलो. तिथून रिक्षाने खोपोली स्टेशनला गेलो. तिथून ट्रेनने कर्जत. तिथून धावत तिकीट काढून पुन्हा ट्रेनने ठाणे. सौरभचं एम-इंडिकेटर नसतं तर हे शक्य झालं नसतं. कारण बाकी मोबाइल गळपटलेले होते. ट्रेनमधून येताना पुढच्या ट्रेकचे बेत आखले.. नाहीत; कारण त्राणच नव्हते. झाल्या ट्रेकबद्दल मात्र बऱ्याच गप्पा मारल्या. शेवटपर्यंत हॅपनिंग झालेला हा ट्रेक नक्कीच अविस्मरणीय होता.