२०१४ हे वर्ष सिने इंडस्ट्रीत अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडींमध्ये रणबीर कपूर हा लोकप्रिय अभिनेता मात्र गायब होता. गेल्या वर्षी त्याचा एकही सिनेमा प्रदर्शित झाला नसला तरी या वर्षी मात्र तो चार सिनेमांची मेजवानी घेऊन येतोय.

बॉलीवुडसाठी २०१४ हे वर्ष वेगवेगळ्या गोष्टींसाठी खास ठरलं. अनेक सिनेमांच्या नायिकाच त्यातल्या हीरो ठरल्या तर अनेक नवीन कलाकारांची एंट्री इथे झाली. काहींचं दणक्यात पुनरागमन झालं तर काही नवोदित कलाकारांनीही बाजी मारली. अनेक सिनेमांचं संगीतही गाजलं. सलमान-शाहरुखच्या भांडणावर पडदा पडल्यामुळे इंडस्ट्रीत आनंदाचे वारे वाहत होते, तर दुसरीकडे हृतिकच्या घटस्फोटाचं गॉसिपिंग सुरु होतं. नवीन येणाऱ्या सिनेमांचे प्रमोशन्स जोरदार सुरु होते. काही सिनेमांना अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळालं. तर काही सिनेमांनी अपेक्षेप्रमाणे गल्ला भरला नाही. काही कलाकारांनी प्रेक्षकांची घोर निराशा केली. अनेक कलाकार सामाजिक, राजकीय घडामोडींवर व्यक्त होऊ लागले. चर्चेत राहण्याचं हेही एक कारण. लुक बदलणं हाही फंडा काही कलाकारांनी आजमावला. अशा शेकडो घडामोडी इंडस्ट्रीमध्ये वर्षभर वेगाने घडत होत्या. पण, वर्षभरात काही देखणे चेहरे मात्र सिनेमांमधून गायब झाले होते. अनुष्का शर्मा, आमिर खान यांच्यासारख्या काहींनी शेवटच्या महिन्यात उडी घेतली. पण, काहींनी सिनेमामध्ये दिसायचंच नाही असा पणच केला होता बहुधा. यातलं नंबर वनचं नाव म्हणजे रणबीर कपूर. २०१४ मध्ये त्याचा एकही सिनेमा आला नाही. पण, याची भरपाई म्हणून २०१५ या नवीन वर्षांत त्याचे बिग बजेटचे चार सिनेमे येतायत.

इंडस्ट्रीतल्या अनेक चर्चामध्ये वर्षभर सातत्य टिकवून होता तो चॉकलेट बॉय रणबीर कपूर. खरं तर गेल्या वर्षांत त्याचा एकही सिनेमा आला नाही. पण, तरी तो चर्चेत राहीला. याचं कारण म्हणजे त्याची गर्लफ्रेंड कतरिना कैफ. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ आणि ‘राजनिती’ हे दोन सिनेमे एकत्र केल्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. तोवर तिकडे रणबीर आणि दीपिकाचं ब्रेक अप झालं होतं. त्यामुळे ‘सिंगल रेडी टू मिंगल’ अशाच काहीशा आवेशात रणबीर असावा. पण, त्याच्या एकूणच प्रतिक्रियांवरुन तो सिंगल आहे पण, मिंगलसाठी काही सध्या रेडी नाही. पण रणबीर आणि कतरिना लवकरच मिंगल होतील अशी खबर आहे. दोघांनीही अजून त्यांचं ‘खास’ नातं जाहीर केलं नसलं तरी ते आता लपून राहीलेलं नाही. त्यांच्या नात्याची कबूली ते देत नसेल तरी त्यांच्याबाबत घडणाऱ्या घटना मात्र देत आहेत. वर्षभर रणबीर सिनेमामुळे नाही पण, अशा गॉसिपिंगमुळे चर्चेत राहीला. मग ती चर्चा त्यांचं एकत्र फिरणं असो किंवा एकत्र एका सिनेमात काम न करताही एकमेकांच्या सेटवर जाणं असो, चायपें चर्चा सुरुच..! अगदी अलीकडचं गॉसिपचं घेऊया. सलमान खानच्या लाडक्या बहिणीचं, अर्पिताचं लग्न होतं. आता कतरिना आणि सलमानचं नातं कसंही असलं तरी तिला लग्नाचं आमंत्रण होतं. कतरिना सगळी कामं बाजूला सोडून लग्नाला गेली होती. तिथे घडलेला किस्सा असा, सलमान कतरिनाला डान्स करण्यासाठी स्टेजवर बोलवत होता. त्याच्या बोलावण्यात ‘कतरिना कैफ’ असा उल्लेख होता. सारखं बोलावूनही ती काही स्टेजवर येईना. शेवटी सलमान म्हणाला, ‘मी तुला ‘खान’ होण्याची संधी दिली होती. पण, आता तुला ‘कपूर’च व्हायचंय तर मी काय करणार.’ यावरुन पुन्हा कॅट-रणबीर चर्चेत. खरं तर किस्सा घडला तो कतरिनाच्या बाबतीत. पण, ‘व्हाया रणबीर’ असा असल्यामुळे रणबीर चर्चेत येणं स्वाभाविक होतं. त्यावर रणबीरने तो सगळा किस्सा गंमत म्हणून घेतला आणि त्यावर शांत राहाणं पसंत केलं. रणबीर आणि कतरिनाच्या एकत्र फिरण्या-रहाण्यावरुन तर दर दोन आठवडय़ांनी एक गॉसिप हमखास ठरलेलं. दोघांनी मिळून एक घर घेतलंय, एकत्र राहणार आहेत, लवकरच लग्न करणार आहेत अशा अनेक चर्चाना उधाण आलं होतं. नवीन वर्षांचं स्वागतही त्याने लंडनला कतरिनाच्या घरी जाऊन केल्याची चर्चा आहे. त्यामुळे रणबीर कपूर सिनेमात दिसला नसला तरी त्याच्या चाहत्यांना याचं दु:खं नक्कीच झालं नसावं, कारण या ना त्या कारणाने तो पेज थ्रीवर दिसत होता.
रणबीरला ‘गॉसिप बादशहा’ अशी पदवी बहाल खरं तर काहीच हरकत नाही. पण, तो फक्त अफेअरमुळे चर्चेत राहत नाही तर त्यांच्या चोख कामामुळेही चर्चेत राहतो. हे त्याने याआधीच सिद्ध केलंय. २०११ आणि २०१२ मध्ये अनुक्रमे ‘रॉकस्टार’, ‘बर्फी’ आलेल्या सिनेमांसाठी त्याला सवोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार मिळाले होते. हे दोन्ही सिनेमे त्याच्या करिअरमधले माइलस्टोन ठरलेले सिनेमे. सलग दोन वर्ष सवरेत्कृष्ट अभिनेत्याचे प्रतिष्ठेचे पुरस्कार त्याच्या नावे झाले. त्यानंतरच्या वर्षांत म्हणजे २०१३ मध्ये ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘बेशरम’ हे दोन सिनेमे त्याने केले. यातला ‘ये जवानी..’ सुपरहिट झाला. पण, ‘बेशरम’ हा बरा ठरला. त्यानंतर मात्र तो सिनेमांमध्ये दिसला नाही. २०१४ या संपूर्ण वर्षांत तो सिनेमा सोडून इतर अनेक माध्यमांमध्ये झळकला. रिअॅलिटी शो, फूटबॉल लीग, पुरस्कार सोहळे, जाहिरात अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून तो प्रेक्षकांना भेटला. ‘भूतनाथ रिटर्न्स’ या सिनेमात तो पाहुणा कलाकार म्हणून दिसला, अनेक नव्या जाहिरातींमधूनही तो भेटीस आला, फुटबॉल लीगमध्ये एक टीम विकत घेतली, काही पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचालन केलं, रिअॅलिटी शो, टॉक शोमध्येही दिसला. पण, सलग अडीच-तीन तास त्याला बघण्यासाठी थिएटरकडे पावलं वळली नाहीत. याचं कारण त्याचा एकही सिनेमा आला नाही. पण, कपूर म्हणजे पक्का प्रोफेशनल. म्हणून तर त्याने ब्रेक अप झाल्यावरही दीपिका पदुकोणसोबत ‘ये जवानी है दिवानी’ हा सिनेमा केला. तसाच व्यावसायिक दृष्टिकोन वर्षभर ठेवला होता. सिनेमात दिसत नाही तरी इंडस्ट्रीतलं ‘दिसणं’ महत्त्वाचं असतं हे त्याला चांगलंच ठाऊक आहे. म्हणून तो वेगवेगळ्या माध्यमातून ‘दिसत’ राहीला.
एकही सिनेमा नाही म्हणजे त्याला सिनेमाच्या ऑफर्स नाहीत, असं नाही. ‘कपूर’ घराण्याकडे ऑफर्सचा तुटवडा नक्कीच नाही. हे या वर्षी हळूहळू सिद्ध होईल. कारण या वर्षी तो चार बिग बजेट सिनेमांमधून दिसणार आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बॉम्बे वेल्वेट’, अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’, इम्तिआज अली दिग्दर्शित ‘तमाशा’ आणि विक्रमजीत सिंग या नवोदित दिग्दर्शकाचा ‘रॉय’ असे त्याचे चार सिनेमे येत आहेत. विशेष म्हणजे यापैकी दोन सिनेमांमध्ये तो जॅकलीन फर्नाडिस आणि अनुष्का शर्मा या नायिकांसोबत पहिल्यांदाच काम करणार आहे. तर सध्याची त्याची गर्लफ्रेंड कतरिना कैफ आणि एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणसोबतही तो दोन सिनेमांमध्ये दिसणार आहे. दीपिका आणि रणबीरला स्क्रीनवर एकत्र बघायला प्रेक्षकांना आवडतं आणि इम्तिआजसारखा हुशार दिग्दर्शक गल्लाभरु सिनेमा करतोच, हे तो जाणून आहे. म्हणूनच व्यावसायिक दृष्टीकोन जागरुक ठेवून तो तिच्यासोबत ‘तमाशा’ हा सिनेमा करतोय. ‘बर्फी’ ने मिळवून दिलेल्या यशाने रणबीरला इंडस्ट्रीत वेगळं स्थान मिळवून दिलं. त्यामुळे अनुराग बासूचं व्हिजन रणबीर जाणून आहे. म्हणून ‘जग्गा जासूस’ तो करतोय. त्यात कतरिनाही कैफही काम करतेय हे त्याच्या पथ्यावरच पडलंय. सिनेइंडस्ट्रीत अनुराग कश्यप या दिग्दर्शकासोबत अनेकांना काम करण्याची इच्छा असते. त्यापैकीच रणबीर एक. त्यातही अनुराग सिनेमा करण्यासाठी वेगळ्या कथा निवडतो. ‘बॉम्बे वेल्वेट’ हा सिनेमाही वेगळ्या धाटणीचा आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसत आहे. रुपेरी पडद्यावर नवी कोरी जोडी बघायला प्रेक्षक नेहमी पसंती देतो. हेही रणबीर चांगलं ओळखून आहे. त्यामुळे अनुराग कश्यप, वेगळा विषय, अनुष्का शर्मासोबत पहिल्यांदाच काम असा त्रिवेणी संगम असल्यामुळे रणबीर या सिनेमात दिसेल. तर या सिनेमांच्या रांगेतला पहिला सिनेमा ‘रॉय’ पुढच्या महिन्यात रिलीज होतोय. याही सिनेमाचं वैशिष्टय़ असं की, जॅकलीन फर्नाडिससोबत तो पहिल्यांदाच काम करणार आहे. यामध्ये अर्जुन रामपाल हा अभिनेताही आहे. याआधी अर्जुनसोबत रणबीरने ‘राजनिती’ हा सिनेमा केला आहे.
रणबीरच्या या वर्षांतल्या महत्त्वाच्या सिनेमांची साखळी या महिन्यापासून सुरु होतेय. त्याचा पहिला सिनेमा ‘रॉय’ हा आज प्रदर्शित झाला. तर मे महिन्यात ‘बॉम्बे वेल्वेट’, ऑगस्टमध्ये ‘जग्गा जासूस’ आणि डिसेंबरमध्ये ‘तमाशा’ असे दर दोन-तीन महिन्यांच्या अंतरावर हे सिनेमे रिलीज होतायत. त्यामुळे वर्षभर सिनेमाच्या निमित्ताने सगळीकडे चर्चेत कसं राहता येईल आणि इंडस्ट्रीत सर्वत्र आपणच कसे ‘दिसू’ याची पुरेपुर काळजी रणबीरने घेतलेली दिसते. रणबीरच्या एका सिनेमाची जादू साधारण दीड महिना तरी राहते. त्यामुळे एका सिनेमाची चर्चा संपेल तोच दुसरा थिएटरवर येऊन पोहोचेल, अशी स्थिती रणबीरच्या सिनेमांच्या बाबतीत या वर्षांत बघायला मिळणार आहे. खरं तर सलग दोन वर्ष सवरेत्कृष्ट अभिनेत्याचे मानाचे पुरस्कार मिळाल्यानंतर इतका गुणी अभिनेता वर्षभर एकाही सिनेमात दिसत नाही म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांना आणि एकुणच प्रेक्षकांनाही कुणकुण लागली होती. पण, त्याचं सडेतोड उत्तर देण्यासाठी तो या वर्षांत चार सिनेमे घेऊन येतोय. रणबीरने केलेले सगळेच सिनेमे आतापर्यंत हिट झालेच आहेत असं नाही. त्यामुळे हे चारही सिनेमे बॉक्स ऑफीसवर सुपरहिट होतीलच याची शाश्वती नाही. पण, ज्या दिग्दर्शकांसोबत तो दिसणार आहे किंवा तो करत असलेल्या सिनेमांचे विषय पाहता ते सिनेमे लोकप्रिय होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. आताच्या गर्लफ्रेंडसोबत ऑनस्क्रीन केमिस्ट्री, एक्स गर्लफ्रेंड असूनही दीपिकासोबतचा ऑनस्क्रीन जबरदस्त रोमान्स, अनुष्का शर्मा आणि जॅकलीन फर्नाडिस यांच्यासोबतचं पहिलंवहिलं काम ही सिनेमा लोकप्रिय होण्याची काही कारणं. याशिवाय सिनेमाचा विषय, अभिनय, दिग्दर्शकाचं कसब अशा अनेक गोष्टीही त्यात असू शकतात. प्रत्येक वर्ष हे प्रत्येकासाठी काही ना काही घेऊन येत असतं. चांगल्या-वाईट गोष्टींचा मेळ त्यात असतो. रणबीरच्या वाटय़ाला काय असेल हे जसजसं वर्ष पुढे सरकेल तसतसं कळेलच. २०१४ या वर्षांत रणबीरची सिनेमांची झोळी रिकामीच होती. पण, या वर्षांत चार सिनेमे करुन तरी त्याची झोळी भरते की तशीच रिकामी राहते ते बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
चैताली जोशी

Story img Loader