23प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी ‘इंदिरा’ हे त्यांचं अमृत महोत्सवी नाटक घेऊन येत आहेत. इंदिरा गांधी हा विषय घेऊन त्यांना नाटक का करावंसं वाटलं, या नाटकाचा विचार त्यांनी कसा केला, याविषयी त्यांच्याशी बातचीत.

आत्ता इंदिरा गांधींवर नाटक करावं, असं तुम्हाला का वाटलं?
– मला हे नाटक दोन गोष्टींसाठी महत्त्वाचं वाटतं. पहिलं रंगभूमी संदर्भात. रंगभूमीवर एक नवीन प्रयोग करता येईल. पूर्वी तीन अंकी नाटकं व्हायची. कथानक, प्रसंग, व्यक्तिरेखा, वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य अशी सारी भरगच्च मोठा परिणाम करणारी नाटकं यायला हवीत, असं मला नेहमीच वाटतं. अभिजात नाटकांचा अजूनही एक वर्ग आहे, ते त्यासाठी तहानलेले आहेत. अशी नाटकं कधी पाहायला मिळणार, असे ते विचारत असतात. सध्याच्या घडीला ते कठीण दिसतंय. एकंदरीत ते खर्चीकही असतं. पण त्यासाठी एक दृष्टी लागते, ती आपल्याकडे कमी झाली आहे, पण अशी नाटकं पाहणारा वर्ग अजूनही आपल्याकडे आहे. त्यामुळे मी तेव्हाच ठरवलं होतं की, हे रंगभूमीसाठी महत्त्वाचं आहे. तसंच हा विषयही महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक नाटक म्हटलं की आपण प्राचीन इतिहासामध्ये जातो. पण अलीकडच्या इतिहासातही काही महत्त्वाची व्यक्तिमत्त्व आहेत, ज्यांच्या आयुष्यात फार वादळी किंवा नाटय़पूर्ण घटना घडलेल्या आहेत किंवा व्यक्तिमत्त्व ज्यांचं आहे, त्यामधला धीरोदात्तपणा, गंभीरपणा हा कुठल्याही नाटककाराला मोह घालेल, असाच हा विषय आहे. म्हणून तो आतापर्यंत आला नसल्याने लिहावा असं वाटलं. त्यानंतर मी काही अभ्यास केला. इंदिराजींची बरीच चरित्रे आहेत. त्यामधून बऱ्याच बारीक गोष्टी मिळाल्या, काही गोष्टी पडताळून पाहता आल्या. त्यामधून हे नाटक उभं राहिलं. एवढय़ा मोठय़ा व्यक्तीवर नाटक बसवायचं, हे आव्हान होतंच. पण त्यासाठी मी त्यांची अखेरची नऊ वर्षे म्हणजे आणीबाणी ते त्यांची हत्या अशी घेतली आहेत. हे सारं त्या वेळेत बसवायचं, यामध्ये नाटय़ तंत्रावर एक हुकुमत लागते आणि प्रदीर्घ अनुभव. त्यामुळे मी हे लिहू शकलो. लिहून झाल्यावरही बरेच संस्कार मी करीत गेलो. कारण माझ्या शैलीमध्ये एक काटकसर आणि बंदिस्तपणा पाहायला मिळतो. त्यामुळे ते जास्त बंदिस्त, काटेकोर, रेखीव व्हावं, यासाठी मी त्यावर मेहनत घेतली आहे. यापूर्वी ‘दुभंग’ आणि ‘घर तिघांचं हवं’ अशीच दोन चरित्र नाटकं मी केली होती. पण, हे त्यापेक्षाही हे अधिक आव्हानात्मक. बऱ्याच लोकांना हा इतिहास माहिती आहे आणि त्यानुसार हे चुकीचं, हे बरोबर, अशा प्रतिमा तयार झाल्या आहेत. म्हणजे असाही काही वर्ग आहे ज्यांनी आणीबाणी पाहिली आहे, तर काहींनी ऐकलेली आहे. पण त्यातले तपशील आणि व्यक्तिमत्त्व या अंगाने कसे चढ-उतार आले किंवा कुठल्या परिस्थितीत आणीबाणी जाहीर केली तिथपासून ते खलिस्तानपर्यंत. लोकांनी सारं ऐकलेलं आहे. एक प्रकारे त्याच प्रेक्षकाचं नाटकाशी तादात्म्य असायला हवं आणि ते होईलच. कारण त्यांना विषय माहिती आहे आणि त्याचबरोबर कुतूहलही आहे. माझी त्यामध्ये भूमिका अशी आहे की, ते कुठल्याही पक्षाचं होऊ नये. ते राजकीय नाटकासारखं किंवा राजकीय मतं सांगणारं नाही किंवा कोणत्या पक्षाची बाजू घेणारं किंवा विरोध करणारं नाही. परंतु ज्याला आपण ‘ए पॉलिटिकल प्ले’ म्हणू, म्हणजे जे ‘नॉन पॉलिटिकल’ही नाही आणि ‘पॉलिटिकल’ही नाही, असं हे नाटक आहे. या नाटकामध्ये राजकारण तर आहेच, पण राजकारण हा त्याचा मुख्य विषय नाही. त्याच्यामध्ये इंदिरा गांधी हे व्यक्तिमत्त्व आहे. विजयापासून ते निवडणूक हरण्यापर्यंत, कमावलेलं सगळं जाण्यापर्यंत आणि पुन्हा मिळवण्यापर्यंतच्या घटना, त्यांचं कौटुंबिक आयुष्य, मुला-सुनांबरोबरचे नातेसंबंध अशा गोष्टी आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांचे स्वभाव वेगळे होते. एका बाजूला संजयचा त्यांना आधारही वाटत असे तर दुसरीकडे त्यांच्याशी मतभेदही होत असे. दोन्ही मुलांबाबतच्या संमिश्र भावना, एका बाजूने कौटुंबिक आलेखही यामध्ये आहे. या नाटकामध्ये तपशील देऊन ते रूक्ष होणार नाही, त्यामध्ये भावनांचाही भाग असेल. तपशील देत असताना भाषा बोजड होणार नाही, याचाही विचार केला आहे, तरीही त्या भाषेला वजन असेल, असं लिहिलं आहे. यापूर्वी महाभारतावर मी ‘अरण्यक’ लिहिलं होतं, त्यामध्येही भाषेचा भारदस्तपणा होता. अशा वेळी नटानांही काळजी घ्यावी लागते. त्यांना शब्द इकडचे तिकडे करून चालत नाही, बोली भाषा वापरून चालत नाही, त्याच वजनाने ती वाक्यं घेतली गेली पाहिजेत. या गोष्टींवर माझा पहिल्यापासून कटाक्ष होता. हे नाटक मीच बसवत असल्यामुळे या साऱ्या गोष्टी मला करून घेता येत आहेत. हे सारं आव्हान होतं, पण ते फारसं कठीण नव्हतं.

Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Indus Culture, Thane , Joshi-Bedekar College
ठाण्यातील नागरिकांना घडणार सिंधु संस्कृतीचे दर्शन, जोशी-बेडेकर महाविद्यालयात साकारले सिंधु संकृतीचे प्रदर्शन
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
98 akhil bharatiya marathi sahitya sammelan sharad pawar interaction with writers
महाराष्ट्र पूर्वपदावर आणण्यासाठी साहित्यिकांची लेखणी उपयुक्त; शरद पवार यांची अपेक्षा
raj Thackeray
…अन् राज ठाकरे यांनी घरी बोलावले; गंधर्व कलामंचच्या कलाकारांचे कौतुक
maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar writes letter
“प्रिय रसिक-मायबाप, मराठी चित्रपटसृष्टीला…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची प्रेक्षकांना भावनिक साद, म्हणाला…

त्यासाठी कुणाशी बोलला होतात का?
– हे नाटक मी बरंच आधी लिहिलं आहे, म्हणजे बारा वर्षांपूर्वी. तेव्हा वसंतराव साठे यांना दिल्लीला जाऊन आम्ही हे नाटक दाखवलं होतं. ते इंदिराजींच्या फार जवळचे होते. नाटकात दाखवलेल्या गोष्टी बरोबर आहेत का याची त्यांच्याकडून खात्री करून घेतली. त्यांनी काही गोष्टी सुचवाव्यात याबाबतही आम्ही त्यांना विचारलं. त्यांना नाटक फार आवडलं. त्या वेळी ते ८३ वर्षांचे होते, आता ते हयात नाहीत.

इंदिरा गांधी यांच्यावरच नाटक करावं, असं का वाटलं?
– इंदिरा गांधी यांच्यासारखं दुसरं व्यक्तिमत्त्व दिसत नाही. काहीअंशी पंडित नेहरूंपेक्षा त्यांचं आयुष्य अधिक नाटय़पूर्ण आहे. गांधींचं आयुष्य असंच होतं. पण, त्यावर नाटक आलं होतं. विषय ठरवल्यावर त्यावर अभ्यास करण्यामध्ये बराच वेळ गेला. तरीही फार वेळा जाऊ न देता मी वेगाने कामाला लागलो. अनेक घटना, अनेक पात्र काटकसरींनी कशी वापरावीत, हे पाहावं लागतं. प्रत्येकाचा पूर्ण उपयोग कसा व्हावा, हे पाहावं लागतं. प्रत्येक घटनेला, प्रवेशाला एक तारीख आहे, ती तारीख अधोरेखित करू, कारण त्या प्रत्येक तारखेला महत्त्व आहे. आणीबाणीचा निर्णय असेल किंवा अलहाबाद कोर्टाचा त्यांच्याविरोधात गेलेला निर्णय असेल, तिथपासून ते मृत्यूपर्यंत साऱ्या तारखा महत्त्वाच्या आहेत.

बारा वर्षांपूर्वी लिहिलेलं हे नाटक रंगभूमीवर यायला उशिरा का झाला?
– या नाटकासाठी योग्य ते निर्माते मला मिळाले नाहीत. अशा प्रकारची नाटकं यावीत, असा दृष्टिकोन असलेले निर्माते अजूनही आपल्याकडे नाहीत. जुन्या संस्थाही नाहीत. व्यवसायाच्या दृष्टीने कमी पात्र असलेलं नाटक करण्याकडे त्यांचा कल आहे. त्यामध्ये त्यांचीही चूक म्हणता येणार नाही. पण थोडी जास्त पात्र असलेलं, भव्य प्रमाणातलं नाटक यायला हवं, असं मला वाटतं. या नाटकामध्ये ज्यांचं योगदान आहे त्यांच्यामध्ये रंगभूषाकार विक्रम गायकवाड, नेपथ्यकार अजित दांडेकर यांसारखी माणसं रंगभूमीवर आहेत; पण, जी क्वचित कामं करतात. ही माणसं पुन्हा रंगभूमीकडे या नाटकाच्या माध्यमातून वळली आहेत. त्यामुळे अशा व्यक्ती घेऊन नाटक करणारे निर्माते मला भेटत नव्हते. माझ्या मनासारखी कलाकृती कोणतेही हस्तक्षेप न करता मला करू देईल, असा निर्माता मला भेटला नाही. आम्ही अनेक ठिकाणी मदतीसाठी गेलो, अनेक आश्वासनं मिळाली, पण त्यामधून काही निष्पन्न झालं नाही. शेवटी माझे काही मित्र एकत्रित आले आणि हे नाटक करायचंच, असं त्यांनी ठरवलं. पण तेवढय़ात सुदैवाने मला मार्कुस लोंढे हे निर्माते मिळाले. माझ्या कोणत्याही गोष्टींमध्ये त्यांचा हस्तक्षेप नाही. मला पूर्ण स्वातंत्र त्यांनी दिलं आहे, अगदी जाहिरातीच्या संकल्पनेपासून.

नाटक लिहीत असताना तुम्हाला इंदिराजी कशा भासल्या?
– मी त्यांचा व्यक्ती म्हणून विचार केला. त्यांच्या स्वभावात जशी बलस्थाने होती, तसे कच्चे दुवेही होते. अनेकदा त्या खंबीर होत्या पण, त्याच वेळी काही गोष्टींची भीतीही त्यांच्या मनात असायची. एका वेळेला त्यांना संरक्षणाची गरज होती आणि त्याच वेळी त्यांनी संजयचं संरक्षण हटवलं, आणीबाणी उठवली. हे सारं त्यांच्या स्वभावामध्ये होतं. खलिस्तानच्या वेळी एका अतिरेक्याला मारण्यासाठी आम्हाला इतक्या गोष्टी नष्ट कराव्या लागल्या. देशाला होणाऱ्या जखमांची जबाबदारी आपली राज्यकर्त्यांची असते, असं त्या म्हणतात. एका बाजूने सारं जिंकलंय, पण दुसऱ्या बाजूने या जखमांचं वाईटही वाटतंय, अशा साऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ती व्यक्ती चांगली की वाईट, हे मांडण्यापेक्षा ती व्यक्ती म्हणून कशी होती, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणीबाणी जाहीर करतानासुद्धा ती फक्त हुकूमशाही नव्हती, तर ती भीतीही होती. आताच्या घडीला आपण जर आणीबाणी जाहीर केली नाही तर उद्या आपल्यालाच मारलं जाईल, ही एका प्रकारची भीती होती. एका नाटककाराला या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.

ऐतिहासिक नाटक म्हटलं की टीका आलीच.. त्याबाबत काय सांगाल?
– हे नाटक उपलब्ध प्रकाशित माहितीवर आधारित आहे. यामधून कुणाचाही अवमान करण्याचा किंवा कुणाच्या भावना दुखावण्याचा कोणताही प्रयत्न नाही, अशी सूचना आम्ही नाटकापूर्वी करणार आहोत. अनेक चरित्रांमधून मिळालेली ही माहिती आहे.

इंदिराजींच्या भूमिकेसाठी कोणाचा चेहरा डोळ्यांपुढे होता?
– इंदिराजींच्या भूमिकेसाठी माझ्या डोक्यात सुरुवातीपासून सुप्रिया विनोदच होती. कारण तिला लहानपणापासून मी पाहत आलो. तिची कामं पाहिली. माझ्याबरोबरच तिने सत्यदेव दुबे, कमलाकर सारंग, विजय केंकरे, मंगेश कदम अशा दिग्गजांबरोबर कामं केली आहेत. साहित्याचा तिचा अभ्यास चांगला आहे. त्यामुळे वाक्याचा अर्थ. दोन वाक्यांमधला अर्थ तिला समजतो. त्यामुळे ही समज असलेली अभिनेत्री मला या भूमिकेसाठी हवी होती. वेगवेगळ्या प्रकारच्या भावना ती दाखवू शकते. प्रश्न फक्त एवढाच होता की ती इंदिरा गांधींसारखी दिसेल का? त्या वेळी रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना आम्ही विचारले. त्यांना दोन फोटोही पाठवले. त्या वेळी त्यांनी त्या फोटोवर इंदिराजींचा विग करून पाठवला आणि सुप्रिया इंदिराजींसारखी दिसत होती. त्यानंतर माझ्यावरची जबाबदारी आणखीच वाढली होती. आता इंदिरा मिळत नाही, असं म्हणता येणार नाही. काही दिवसांपूर्वी जब्बार पटेल यांनी यशवंतराव चव्हाणांवर सिनेमा केला तेव्हा विक्रम गायकवाडने त्यांना सुप्रियाचे नाव सुचवलं. त्या सिनेमामध्ये सुप्रियाने इंदिराजींचे काम केल्यावर मात्र ही भूमिका सुप्रिया करणार यावर शिक्कामोर्तब झालं.

सध्याच्या घडीला प्रेक्षकांचा स्तर खालावलेला दिसतो. या परिस्थितीत हे नाटक चालेल, असं वाटतं का?
– प्रेक्षकांना काय हवं, याचा विचार करून नाटक करायचं नसतं. नाटक करण्याचा तुमचा ध्यास असायला हवा. प्रेक्षकांचा दर्जा खालावला म्हणून निर्माते त्यांना हवं ते देऊ लागले आणि निर्माते देऊ लागले म्हणून प्रेक्षकांचा दर्जा खालावला, हे एक वर्तुळ आहे. आपल्याकडून जे चांगलं देता येईल ते देत जावं. अशा प्रकारच्या नाटकांसाठी भुकेला एक वर्ग आहे. सगळ्याच नाटकांचे हजार प्रयोग होतातच असं नाही. पण, एक चांगली कलाकृती रंगभूमीवर आणल्याचं समाधान मिळायला हवं.

इंदिरा गांधी यांसारख्या राज्यकर्त्यांची सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये किती उणीव भासते?
– इंदिरा गांधी यांचीच नाही तर प्रामाणिक राज्यकर्त्यांची गरज आहे. स्वत:साठी किंवा पक्षासाठी नव्हे तर जनतेसाठी काम करणारा राज्यकर्ता हवा. इतिहास पाहिला तर असे राज्यकर्ते त्या वेळीही होते. इंदिरा गांधी यांना राजकीय वारसा होता. स्वार्थ किंवा पैसा कमावणं, असं त्यांचं ध्येय नव्हतं. जे काही करायचं ते देशासाठी करायचं. घेतलेले निर्णय हे चुकीचे असतील किंवा बरोबर असतील, पण जे काही असेल ते देशाच्या हितासाठीच असेल, असं त्या वेळी होतं. त्यामुळे अशा राज्यकर्त्यांची उणीव नेहमीच भासत राहणार.

आत्ताच्या राज्यकर्त्यांनी या नाटकामधून काय शिकावं?
– कुणाला काही शिकवावं हा आमचा उद्देश कधीच नव्हता. पण देशप्रेम, सचोटी, प्रामाणिकपणा असायला हवा. या साऱ्या गोष्टी आम्ही या नाटकामध्ये दाखवल्या आहेत. उदाहरणार्थ, आणीबाणीतल्या आपल्या चुका इंदिरा गांधी यांनी लोकांपुढे मांडल्या, या चुकांमधून पुढे त्या शिकत गेल्या, लोकांचा विश्वास पुन्हा मिळवला; असा प्रामाणिकपणा असायला हवा. चांगलं प्रशासन, प्रशासक कसं असावं, हे शिकण्यासारखं आहे. इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे आजच्या राज्यकर्त्यांची चांगली पाश्र्वभूमी दिसून येत नाही. तसंच त्यांचं उत्तम शिक्षण झालं होतं, साहित्यवाचन, कविता करण्याची आवड होती. इंदिरा गांधी हे एक सुसंस्कारी व्यक्तिमत्त्व होतं. दुसरीकडे ग्लॅमरस राहण्याकडेही त्यांचा कल होता. आता मात्र असे राजकारणी दिसत नाहीत.

Story img Loader