फार उशिरा आला पाऊस. अनोळखी वाटला. मी दार उघडलं नाही. खिडकीतून बोललो. आम्ही एकेकटी, सिंगल माणसं सेफ नसतो. त्याने मला येणार असल्याचं कळवलं नव्हतं. त्याला काय वाटलं, सगळे एकटे बॅचलर लोक बेशिस्त असतात? घर म्हणजे गबाळा लॉज असतो? इतकी पर्यटन केंद्रं असताना हा पाऊस माझ्याकडे कशाला आला? ‘सकाळी ये, आत्ता मी कुणाचाही पत्ता सांगणार नाही’ म्हणत मीच पावसाचा पत्ता कट केला. पाऊस येऊन गेल्यानंतर पुन्हा ग्लोबल उष्मा, स्वप्नांची वाफ करतच राहिला. ‘बियन’चा एसएमएस आला.
वर दही पेरलेली साबुदाण्याची खिचडी बियन मस्त करते. तिला वाटतं, मी एक लहान मूल आहे. पाऊसपाणी फणा काढून उभा राहिला, रस्ता अडवू लागला, तरी ती येईल. तीसुद्धा सिंगल असल्यामुळे तिचीही टिंगल होते. आम्ही अनेक सिंगल लोक ऊन-पावसात एकमेकांना धरून आहोत. आमच्या विरोधात एखादी वीज जास्तच चमकली, तरी आम्ही कोसळत नाही. उजळून उठतो! पावसापाण्यात आजारपण घेरतंच, पण एकेकटं माणूस स्वत:च बरं होतं, उठून बसतं असा माझा इतक्या पावसाळ्याचा अनुभव आहे.
ओल्या, गर्द पानापानांतून रातकिडे ओरडत होते. टिमक्या वाजवल्यागत एक ढालकीटक वेगळं संगीतही निर्माण करत होता. काजवा चक्क माझ्या मच्छर कर्टनवर येऊन बसला. मी तेही एसएमएसने मित्राला- गणेशला कळवलं. तोही वादळात तिकडे दिवा-कळव्याला एकटाच आहे.. माणूसप्राणी एकूणच अकेला, अलोनच असतो.. है ना? अगदी तुमचे ते नवरा-बायको घेतलेत तरी एक कुणीतरी आधी ढगाआड जातंच ना? मग एकच उरतं. मुलंबाळं असली, तरी ते डोकरं एकटंच राहतं. सून म्हणजे बायको नव्हेच!
पाऊस इतकं भटकतोय, पेरत जातोय, पूर आणतोय, गर्जना करतोय तरीही त्याचं नेतृत्व, कर्तृत्व अखेरीस एकाकीच आहे!
आहे किंवा नाही अशा स्टेटला तोच मला म्हणाला, ‘गडय़ा, हा सगळा खेळ मी कुणासाठी खेळतोय? कोण आहे माझं! ढग होते, ते आता पोकळ, पोके झाले. वीजबाई फार कडक! तिचं माझं जमलं नाही. तरी बरं, ‘लिव्ह इन’ होतं, लग्नाचा पिंजरा नव्हता. भांडण-वाद ‘प्रोसिजर’मध्ये अडकलं तर जाम ताप होतो. तू बरा रे निसटलास सगळय़ातून.. पावसाला माझा हेवा वाटावा? गुडघाभर पाण्यातून चालत जाणाऱ्या गरीब माणसाचा? कमाल आहे! मला वाटलं, श्रीमंत पाऊस सुखी असेल.. पण म्हणाला, मला झोप लागत नाही.. आता बोला!
सिमेंटच्या टाकीत, गॅलरीत मी मासे पाळले आहेत. गोल्डफिश जास्त हुशार आहे. तो मालकाला ओळखतो. तर त्या टाकीत शेवाळी रंगाचा पावसाळी बेडूक राहायला आलाय.. आणि आता जायचं नाव घेत नाय! करायचं काय? त्याला घालवावं तर मलाच त्याची भीती वाटते! केवढा मोठा आहे तो!
मी स्थानिक साप्ताहिकात काम करतो. संपादकाचा फोन पावसावर आवाज लावत येतो ‘टायपिस्ट वाट बघतोय. पेड मॅटरची प्रिंट आउट तयार आहे. करेक्शन्ससाठी लगेच ये’ मी दाभोळ रस्त्यावरून ‘दुपारच्या अंधारात’ पुढे पुढे सरकतो. पाणी मला मागे लोटायला बघतं, पण मी नेहमीच काळाच्या पुढे होतो.. आहे! माझी छत्री थोडी फाटलीय, पण खूप मोठी आहे. त्यात आणखी एखादं तरी गायगरीब माणूस मावतं. अगदीच छत्रछाता नसलेल्या वाटसरूला मी फाटक्या छत्रीतून बाजारपेठेपर्यंत नेलेलं आहे हे ‘लालित्य’ निर्माण करण्यासाठी मी सांगत नाही. पाऊस माझ्या आसपास आगेमागे असतोच. मी ‘पेज’ कसं लावतो ते बघत राहतो. खुळा!

‘वाचक लेखक’ या सदरासाठी लेख पाठवताना मेल अथवा पाकिटावर ‘वाचक लेखक सदरासाठी’ असे स्पष्टपणे नमूद करावे. आमचा पत्ता: लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१० फॅक्स : २७६३३००८  Email – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader