मज्जारज्जूवर ताण आला की पाठीचे स्नायू ताणले जातात. मग मानेचे खांद्याचे, कंबरेचे स्नायू दुखतात. कशामुळे पाठ दुखते याचे उत्तर शरीराची ढब न सांभाळण्यामुळे, असे सरळ सरळ दिसते.
‘लम्बॅगो’ हा शब्द मी माझ्या वडिलांकडून लहानपणी ऐकला. मी त्या वेळी दहा-बारा वर्षांचा होतो. ते म्हणत, ‘‘तुडव माझी पाठ वात आलाय. आऽहाऽ हा! बरं वाटलं. पाठ भरली होती.’’ मग ते पाठीची/ कमरेची हाडं कडाकडा मोडत. त्यांच्या चेहऱ्यावर ‘रिलीफ’ (वेदनाशमन) दिसे. नंतर मला कळलं की लम्बर (Lumbar) म्हणजे कमरेजवळचा भाग व ‘लम्बॅगो’ म्हणजे कटिवात ऊर्फ कमरेतील उसण ऊर्फ Pain in the muscles of loins कमजोर करणारं पाठीचं दुखणं. हे अगदी तरुण मंडळीतही आढळतं. महत्त्वाचं काय तर पाठीत वाकता कामा नये. शरीराची विशिष्ट ठेवण, शरीराची ढब किंवा पवित्रा हा पाठदुखीवर साधासुधा पण खात्रीचा उपचार आहे. ‘क्रॉनिक’ किंवा जुनी, तीव्र पाठदुखी मानसिक उल्हासामुळे नक्कीच बरी होते. हा माझा स्वत:चा अनुभव आहे. ८१व्या वर्षी मी दररोज ६ तास लिहितो आणि दररोज ४ किलोमीटर चालतो.
शास्त्रीय दृष्टिकोनातून असे सिद्ध झाले आहे की ८० टक्के पाठदुखीरुग्ण मनातील घोळामुळे, अपयशामुळे, नकोसे झाल्यामुळे खचलेले असतात. वेदनाशामक गोळ्या आणि नैराश्यनिवारक कॅप्सुल्स यांचा फारसा उपयोग होत नाही. माझ्या वडिलांचीही तीच मानसिक स्थिती होती असेल. शाबासकीची थाप आणि पाठिंबा मिळाला की पाठदुखी गेलीच म्हणून समजा.
पाठ म्हणजे मुख्यत: मेरुदंड, कणा, स्पाइन (spine). त्याच्या आत मज्जारज्जू ऊर्फ (spinal cord) असते. मज्जारज्जूचे संरक्षण करण्यासाठी जेवढी काळजी घेतलेली दिसते, त्याभोवती जेवढे मजबूत कवच दिलेले असते, तेवढे संरक्षण शरीरातील कुठल्याही अवयवाला दिलेले दिसत नाही. मज्जारज्जूचे संरक्षण करणाऱ्या मेरुदंडाची (back bone) रचना खूपच गुंतागुंतीची असते. पाठ व मज्जारज्जू (spine and spinal cord) शरीराच्या सर्व तऱ्हेच्या हालचाली मग त्या स्वेच्छेने असोत, अजाणतेपणे केलेल्या असोत, किंवा ‘रिफ्लेक्स’ म्हणून झालेल्या असोत त्या सर्व मज्जारज्जूंच्या मार्फत (spinal cord) चालतात.
आरोग्यशास्त्रात ज्याला इफरंट व एफरंट संवेदना (मेंदूकडून येणाऱ्या व मेंदूकडे जाणाऱ्या) म्हणतात. त्या सर्व मज्जारज्जूच्या मार्फत चालू असतात. मेरुदंडामध्ये (spinal column) रज्जू (spinal cord) असतो व त्यात विशिष्ट द्रवही असतो. तो द्रव (C-S-F- Cerebral spinal Fluid) मेंदूत असलेल्या द्रवाशी जोडलेला असतो. काही काम या द्रवांत असलेल्या विशेष गुणांमुळे होते व काही काम मज्जातंतूंमार्फत, मज्जातंतूतून होऊ शकते. मेरुदंड (spinal column) वर किंवा खाली पक्का बांधलेला नसतो. तर तो वर व खाली अशा दोन्ही बाजूंना लटकल्यासारखा असतो. मांस मज्जा यांच्या साहाय्याने, त्याला जागेवर ठेवलेले असते. त्याच्या आत मज्जारज्जू (spinal cord) असतो. तो मेरुदंड हाडांनी बनलेला असल्याने वजनदार असतो.
मनुष्य काम करत असताना, उभे असताना, बसलेला असताना, मेरुदंड खालच्या बाजूला सरकण्याची शक्यता असते. म्हणून वयानुसार मानेची लांबी कमी होऊन डोके खांद्याकडे टेकायला सुरुवात होते, मेरुदंड खाली उतरायला लागतो. उतरलेला मेरुदंड, नुसतीच मनुष्याची उंची कमी करतो असे नव्हे, तर मेरुदंडातून निघणारी नस दबली गेल्यामुळे, हातापायांना मुंग्या येणे, बधिरता येणे वगैरे त्रास होऊ शकतात.
एकूण काय, तर मज्जारज्जूवर सर्व ताण असतो. मज्जारज्जूवर ताण आला की पाठीचे स्नायू ताणले जातात. मग मानेचे खांद्याचे, कंबरेचे स्नायू दुखतात. कशामुळे पाठ दुखते याचे उत्तर शरीराची ढब न सांभाळण्यामुळे, असे सरळ सरळ दिसते. योग्य वेळी पोट साफ ठेवणे, पोटाचा घेर वाढू न देणे, कंबरेपासून मानेपर्यंत तेल लावून मालीश करणे वगैरे उपचारांद्वारा पाठीच्या दुखण्यावर इलाज करता येतो. मेरुदंडाची व मणक्याची झीज झाल्यासही मज्जारज्जूवर ताण येऊ शकतो आणि पाठ दुखू लागते.
पाठदुखीमुळे मन अस्वस्थ होते. जीव त्रस्त होतो. एवढेच नव्हे तर काम करण्याचा उत्साहच मावळतो. जीवनात अपयश येते आणि पुन्हा पाठदुखी चालू होते, असे हे दुष्टचक्र आहे. पाठीचा कणा (Backone) हा संपूर्ण शरीराचा भरभक्कम आधार असतो. मानेमध्ये ७, छातीच्या मागच्या भागामध्ये १२, कंबरेमध्ये ५, तसेच माकडहाडात ५ (सांधलेल्या स्थितीत) व त्याच्याखाली ३ ते ५ मणके (कॉसिक्स)असतात. कवटीपासून बैठकीपर्यंत हे मणके रचलेले असतात. दोन मणक्यांमध्ये एक चकती असते. तिला डिस्क (गादी) म्हणतात. यामुळेच कणा हवा तसा वाकतो. तसेच दोघांनाही धरणारे स्नायू व अस्थिबंधने असतात. अत्यंत महत्त्वाच्या मज्जारज्जूला (spinal cord) पाठीचा कणा (spinal column) सांभाळतोच. तरीही उत्साही, कृतिशील मन सर्वात महत्त्वाचे.