हवामान खात्याने पाऊस येणार की नाही, येईल तो कोणत्या स्वरूपात, या भविष्यवाणी वर्तवली की सर्वसाधारण माणूस त्यातून काहीतरी पर्याय शोधू शकतो. होऊन गेला पाऊस! मान्सून बरसला. वेळेवर आला. दोन-तीन दिवस आनंद झाला. कौतुक व्हायला लागलं त्याचं! बेटा फुलून गेला! वेडा कुठला!! ऊन पडतंय न पडतंय की परत आलाच! गरगरून आभाळ आलं आणि सरीवर सरी बरसायला लागल्या. छे! काय पाऊस, विचारूच नका!! सगळीकडे पाणीच पाणी. अख्खी मुंबई पाण्यावर तरंगतेय. बहुतेक सगळ्या गावांची अशीच दशा! खड्डे, नाले, रस्ते नि विमानतळाच्या नवीन जागेतही जलाशय भरून वाहायला लागले. पेपर, टी.व्ही. न्यूजमध्ये फक्त पाऊस आणि पाऊस!! पाणी ओसंडून वाहायला लागलं आणि गप्पा, बातम्या नि पाण्यालासुद्धा ऊत आला. मान्सून वेळेवर बरसला. धुवाधार पावसाने त्रेधातिरपीट केली. माणसं हैराण झाली, गुरंढोरं चरायला मौताद झाली. गेल्या वर्षी कोरडा दुष्काळ, तर या वर्षी ओला!! कोणत्या ना कोणत्या परिस्थितीला माणसाने सज्ज राहावे तोंड द्यायला!! अशाच गोष्टींना तोंड द्यायला जन्माला आलोय, तर प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला आणि सांसारिक माणसाला पडलेले हे प्रश्न अनुत्तरितच राहतायेत!
अशा वेळेस पावसाच्या कोणत्याही रूपाची कल्पना करावीशी वाटेल का माणसाला? एव्हढेच कशाला, विविध पंचांगांत पावसाचे दिवस तारखांनिशी दिलेले असतात. पण पावसाचे अंदाज वर्तविणे हे काही पंचांगकर्त्यांचं मूळ उद्दिष्ट नाही. शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज यावा याकरिता हे लिहिलं जात म्हणे.
पाऊस कोसळतोच आहे. नाले बंद होतात. त्याची नदी होऊ न देण्याची दक्षता घ्यावी लागते. काडीकचरा नाल्यात तुंबून जातोय का याकडे लक्ष द्यावे लागते. नवे रस्ते आपले स्वरूप बदलत नाहीत ना याकडे लक्ष द्यावे लागते. जुन्या रस्त्यांना आपल्यावर तलाव साठणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागते. लाइट नीट लागलेत की नाही हेही पाहावं लागतं. बाहेर उघडय़ावर लावलेल्या पाण्याच्या मोटारी (पंपिंग सेट) नीट चालल्या आहेत का नाही हेही ध्यानात घ्यावे लागते. संसर्गजन्य रोगांची लागण तर लागली नाही ना हेही पाहावं लागतं. ट्रान्सफॉर्मर जळणार नाहीत ना हेही पाहायला पाहिजे. लोखंडाच्या खांबातून विद्युत प्रवाह होतोय का हे पण लक्षात घ्यावं. पाण्याने तुडुंब भरलेल्या रस्त्यातील मेनहोलच्या आत उतरून त्याची देखभाल करणाऱ्यांना तळापर्यंत जाता येतंय की नाही? व्हीआयपी एरियाजमध्ये काही त्रास होत नाही ना, कामावर वेळेवर जाणे आणि येणे होतेय का, वृद्धांना पावसामुळे आजार तर उद्भवले नाहीत ना, माशा-डास वगैरे जीवाणूंचा किती प्रादुर्भाव झालाय हे पण लक्षात यायला हवे. बापरे! हा पावसाळा!! किती किती परीक्षा द्यायला लावतो? साधी परीक्षा नाही, तर अग्निपरीक्षा! आणि वेगवेगळ्या दिव्यातून जावे लागते.
‘सावन में लग गयी आग, टिप टिप बरसा पानी, पानी ने आग लगाई’ या गाण्याचा अर्थ थोडा थोडा पाऊस पडतच राहतो. थांबण्याचे नावच घेत नाही. अगदी कंटाळून जावे त्या पावसामुळे! सगळीकडे ओलच ओल! त्यामुळे माणसे आणि जनावरेही हैराण झाली आहेत. या वर्षीच्या पावसाळ्याने उलगडू शकते पाऊस पडणे! पाऊस एखाद्या विरहाने व्याकूळ झालेल्या व्यक्तीला लागू पडेल. पाऊस पडण्याला परीक्षक म्हणता येईल. स्वत: तरल राहून दुसऱ्यांची परीक्षा घेतो. तीही कडक!! असेही मानले जाते की, चार महिन्यांचा उन्हाळा आणि एक दिवसाचा पावसाळा. म्हणजे एका दिवसाच्या पावसाने माणूस हैराण होऊ शकतो.
ज्या ज्या शहराला आपण सुंदरसंपन्न आणि सुविधापूर्ण शहर म्हणत होतो, पावसामुळे ते सगळे नष्ट झाले आहे. पाऊस थोडा वेळच पडला. परंतु तेवढय़ानेच सगळे अस्ताव्यस्त झालेले! अगदी प्यायलासुद्धा पाणी नाहीए! हा पाऊस नाही तर ‘यह बरसात नही आसां, बस इतना समझ लिजिए, एक आग का दरिया है!’ कोसळतोय कोसळतोय याला काय म्हणावे? ढग बरसताहेत आणि अशा वेळेला शहरातील माणसे नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये चकरा मारताहेत. काय करणार या पावसाला? सगळी व्यवस्था कोलमडून पडलीय. जर अगोदरच माहिती असते तर काहीतरी व्यवस्था करता आली असती. सगळ्या सगळ्या ठिकाणी धूळधाण उडालीय. जणू काही या पाण्यानेच ही आग लावलीय; म्हणजे ‘दुरावस्था.’
अलंकारिक भाषेत म्हणायचे झाल्यास जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ढग रडताहेत! आपण पाहिलेली स्वप्ने विखुरताहेत, शहराची व्यवस्था पण ढासळतेय, शहरातील लोकांचा अहंकार नष्ट होतोय, शहरातील रहिवाशांची फक्त तक्रारच ऐकावी लागते. निष्काळजीपणाने डुकरांच्या झुंडीवर झुंडी हिंडताहेत, अशा परिस्थितीत खूप घाण होते. पण डुकरांची मजा असते आणि साफ करणं माणसाला फार कठीण जातं.
पावसाने दगा दिला. चहूकडून ढग आकाशात जमले. ढग असे सरकत होते, जणू प्रेमिकेने आपली कूस बदलली. ढगाने गडगडाट केला आणि बरसायला सुरुवात केली. एक ना एक दिवस पाऊस पडणारच होता. मी सारखे लक्ष देऊन होते. जलधारांच्या सुरांच्या नाद-लयीकडे सारखे लक्ष जात होते.
आता तर नाले भरून जातील. दरवर्षी जमणारा उन्हाळ्यातील कचरा, नंतर होणारी पानझड, म्हणून अजून कचरा आणि नंतर तो ‘घुमड घुमड कर आई रे घटा’ म्हणावे असा पाऊस! अशा वेळेस वादळ सुटते. सगळा कचरा त्या पाण्याबरोबर वाहून एका जागी गोळा होतो. नाल्यात अडकतो. एखादी स्त्री आपल्या मुलाला सांगून कचरा खाली आलेल्या कचरागाडीत टाकायला देते. तो मुलगा कचरागाडी आली का नाही हे न बघता कुठेतरी नाल्याच्या कोपऱ्याला टाकून आपल्या कामासाठी निघून जातो. तोच कचरा नालीत अडकतो आणि कॅरी बॅग्स तरंगत फुगा बनून अडथळा करतात. नालेसफाई झाली तरी काही ठिकाणचे तसेच राहून जाते. परत आलेल्या धुवाधार पावसाने अजून कचरा साठतच जातो आणि लोकांना नगरपालिकेकडे धाव घ्यावी लागते. गल्लीबोळातून पाणी साठते आणि दरुगधी पसरायला लागते.
मी पण कल्पना करतेय की, कोणीतरी वयस्कर जोडपे त्या रिमझिम पावसात अडकले आहे. त्याला पायी येण्यासाठी अडचण होतेय आणि पावसाची रिप रिप तर थांबणं शक्य दिसत नाहीय. आनंदी आणि समाधानी वृत्तीचे प्राणी असतील तर म्हणणार ‘बरसात में मिले तुम सजन बरसात में’ हा नर्गिस-राज कपूरचा सिनेमा. अशा समाधानी आणि खेळीमेळीच्या वृत्तीतून जरी पावसात भिजणे झाले तरी शेवटी काही वेळेस माणूस या पावसाचा ओलेपणा नाही सहन करू शकत आणि मग आजारी पडतो. आजार त्रस्त करून सोडतात. नद्यांच्या काठाने मानवी संस्कृती विकसित होते. नद्याही प्रदूषणाच्या विळख्यातून सुटत नाहीत. परंतु मानवाने इतक्या झपाटय़ाने ‘प्रगती’ केली की जणू नदीच आपली आश्रित आहे. आपल्या कचऱ्याचे हलाहल, मल जल आणि सांडपाण्याचे विष तिला पाजून त्रस्त करून सोडलं. प्रदूषण मंडळाने प्रमुख नद्यांचे १५० टापू प्रदूषित असल्याचे २०१३ च्या शेवटी जाहीर केले आहे.
पाऊस संपला!! जणू कोणीतरी माझ्याजवळचं माणूस दूर गेल्यासारखं वाटतंय! उगाच हुरहुर, गप्पांना कारण! विषय काय, तर आज पाऊस पडेल. आज पाऊस आलाच नाही. उद्या पाऊस येणार का, आता आपल्याला पाऊस हवा अजून! बस झाला बाई, हा तर खूपच बरसलाय. या असतात पावसाच्या आगमनाच्या, अंदाजाच्या आणि त्याच्या जास्त येण्याने कंटाळवाणं करण्याच्या पावसाच्या गप्पा!! हल्ली मला वेडच लागलंय जणू! वर्तमानपत्रांच्या, टीव्हीवरच्या किंवा कुणाच्या बोलण्यावर (फोनवर किंवा सहज) लक्ष देऊन ऐकते आणि हवामानाच्या अंदाजावर विचार करताना पावसाळी चित्रे पाहिली की मला काव्य स्फुरायला लागते. पाऊस पडण्याची मला मजा वाटते. नगरपालिकेने नाले साफ केले नाहीत, त्यामुळे कचरा तुंबून सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. त्यात कदाचित नावेही चालवता येतील. दूर कामाच्या निमित्ताने गेलेली व्यक्ती परतताना किंवा कोणी कधी नव्हे तो नि ती बाहेर पडलीत आणि अचानक त्या वेळी पावसाने धूम मचवली आहे. ‘बरसात में हमसे मिले तुम सजन बरसात में’ असे म्हणत म्हणत रस्ता संपवावा लागेल की काय? आणि मी मात्र त्यावर काव्य करण्याचा विचार करते आणि मग कागदावर उतरते ती कविता. पावसाळी कवीची कल्पना, चार महिने उन्हाळा वगैरे वगैरे.
हवामान खात्याने भविष्यवाणी वर्तवली आणि पावसाच्या बाबतीत ती शंभर टक्के खरी ठरली, असे कधी होऊ शकेल का? मान्सून दहा दिवसांनी बरसेल, मृग गडगडाट करून करून थकला असेल. बिच्चारा पाऊस!! आणि या पावसाची कोणतीही वेळ आणि काळ असो! समजा एखादी स्त्री बाल्कनीत वाट पाहत असताना म्हणेल की ‘मेरे पिया गये रंगून वहां से किया है टेलिफोन’ कारण रंगूनमध्ये खूप पाऊस नेहमी पडत असतो.
यमक जुळवण्याचे आणि अर्थपूर्ण ओळी झाल्या की नाही हे मी परत परत वाचून पाहते. जमलेच तर एखादा श्रोता पाहते आणि माझं दीर्घ काव्य किंवा चार ओळीचं काव्य अजमावून घेतेच घेते आणि लागलीच कुठेतरी ते प्रकाशित करण्याचा चंगही बांधते. काव्याच्या पुस्तकासाठी प्रकाशकाकडे विचारणा करते. गेलेल्या पावसाच्या कवितांचे मूल्यमापन करून प्रकाशकही विचारात पडलेले मला समजलं. त्यांचा निरोप इनडायरेक्ट की पावसावरील कवितांचे अल्प स्वरूप होऊ शकेल तर?
पाऊस आणि पाऊस!!
हवामान खात्याने पाऊस येणार की नाही, येईल तो कोणत्या स्वरूपात, या भविष्यवाणी वर्तवली की सर्वसाधारण माणूस त्यातून काहीतरी पर्याय शोधू शकतो. होऊन गेला पाऊस! मान्सून बरसला.
आणखी वाचा
First published on: 03-10-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व ब्लॉगर्स कॉर्नर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers blog