मुलाचं नाव ‘चिऊ?’ ‘चिवा’ तरी ठेवायचं. ‘चिमण’ चाललं असतं. जुनं असलं तरी फनी वाटतं ‘चिमण.’ बायका असं बोलायच्या. ‘आश्रमातून आणलेलं मूल.. काय कौतुक करतेय! जसं काही स्वत:चं आहे’ असंही बोललं गेलं. लहान बाळ घरी आलं या आनंदात कुंदबालाला बाकी काही ऐकूच आलं नाही. ती त्याला ‘चिऊ’ म्हणायची! ‘चिन्मय’ कागदोपत्री. घरात मात्र चिऊ. मैत्रिणी उपहासाने हसल्या. उपरोधाने टोकेरी बोलल्या. त्या ‘मैत्रिणी’ होत्या का? तसं म्हणायचं.
विवाह न करता बाळ दत्तक घेणारी ती कॉलनीत पहिलीच बाई होती. बया विचित्रच दिसतेय. नवऱ्याचा नाही पत्ता आणि लोकांचं मूल हिच्या घरात हजर! पाळणासुद्धा विकत आणलान! नवा पाळणा आणतं का कुणी? इतरांचा वापरण्याची पद्धत आहे. संस्कारच नाहीत हो मुलींना.. काळेबाई फणफणल्या. निवृत्त झाल्यामुळे त्या ‘मोकळ्या’ होत्या. बोलणाऱ्या बाईला जगात कुणी थांबवू शकतं का? कुंदबालालाही मूल दत्तक घेण्यापासून कुणी रोखू शकलं नाही. तशी ती प्रसिद्ध गायिका! तिचं रेकॉर्डिग असलं की, आम्हा रेडिओवाल्यांना थोडा ताणच यायचा. तिचं काही बिनसलं तर ध्वनिमुद्रण रद्द करून स्टुडिओतून थेट घरी जाणार हे नक्की! तिला आणायला आमची, रेडिओस्टेशनची गाडी जायची. ‘रेडिओलहरी’ शब्द आम्ही वापरायचो. पण या कलावतीच खऱ्या ‘लहरी.’
मूल दत्तक घेणं, स्वत:चं लग्न झालेलं नसताना मनापासून प्रेमाने सांभाळणं ही मात्र कुंदबालाची ‘लहर’ नव्हती. जिद्द होती. तिने मुलाखतच दिली. ‘काय हरकत आहे अविवाहित बाईने बाळ दत्तक घ्यायला.’ मी काही नोकरी करत नाही. गाण्याच्या तालमी, सराव घरीच करते. शिवाय पैसा आहे. एखाद्या बाळाचं भलं होत असेल तर त्यासाठी आक्षेप कशाला? ‘सिंगल’ बाईची टिंगल कशासाठी? मी आणि माझं बाळ इतकंच जग असू शकत नाही का?
काळ किती वेगानं उडतो! ‘चिऊ’ मोठा झाला. व्यायामशाळेत जाऊ लागला. अंगापिंडाने भरला. खांदे रुंदावले. कोरीव मिशी शोभून दिसली. गोरापान तर आहेच. त्याच्या आवडीचा ‘हॉटेल मॅनेजमेंट’चा कोर्स त्याने पूर्ण केला. महाग होता, पण नोकरीची हमी देणारा. युरोपात त्याला जॉब ऑफर आली. त्याला निरोप देताना तिला भरून आलं. ‘आऊ, मी फ्रान्समध्ये असलो, तरी तुझ्या जवळ आहे असंच समज. तुझं ‘सी.डी.’वरचं गाणं मी रोज ऐकेन. मलाही ‘फील’ होईल की, माझी आऊ माझ्यापाशी आहे. जग ‘ऑनलाइन’ किती जवळ आलंय! काळजी कशाला?.. असं समंजस पोरगं! स्वत:चं अनाथपण त्याने स्वीकारलं नाही. कारण तो स्वत:ला ‘अनाथ’ समजतच नाही. कुंदबालाने त्याला शाळेत तो शिकत होता तेव्हाच सगळं समजावून दिलं. तेव्हा चिन्मय म्हणाला, ‘मला माझ्या खऱ्या आईवडिलांना शोधायचंच नाही! तूच माझी आई आहेस. तू नसतीस तर आज मी कुठं असतो?.. आज चिन्मय पॅरिसला आहे. धरतीवरचा स्वर्गच तो!
कुंदबालाला नवरा, त्याची अरेरावी, त्याच्या धाकात राहणं यातलं काही नको होतं. प्रत्येक बाईला पुरुषसुखाची फार आवड असतेच असं नाही. मात्र, वात्सल्याची तहान तिला लागली. उन्हाचं चांदणं व्हावं तसं तिचं आयुष्य चिन्मयमुळे शीतल झालं. नवरा केला नाही, पण मूल सांभाळलं म्हणून तिच्यावर टीका करण्याचा कुणाला हक्क नाही. खरंच नाही.
(नावे काल्पनिक)