lp08माहितीपूर्ण अंक
‘लोकप्रभा’चा फेब्रुवारी २८ ते ५ मार्च चा अंक आवडला. अंकातील स्वाइन फ्लू बाबतची सर्व माहिती वाचनीय होती, तसेच औषध कंपन्यांचा डाव किती खरा, किती खोटा? शहाणपणाची ‘साथ’च करेल स्वाईन फ्लूवर मात! हा डॉ. प्रदीप आवटे यांचा लेख वाचून त्याला प्रतिकार करणे किती सोपे आहे हे समजले, तसेच या औषध कंपन्यांची अन् खाजगी दवाखान्याची लूटमार समजली. आपण काळजी घेणे महत्वाचे. अंकातील ‘छोटा पडदा’ सदरातील ‘राज्य नव्या नायिकांचे!’ हा चैताली जोशी यांनी घेतलेला आढावा वाचनीय होता. पूर्वी टीव्हीवर तेच तेच चेहरे पाहून कंटाळा येत असे, आता नवीन पिढीतही चांगले अभिनय गुण आहेत हे या लेखाने दाखवून दिले आहे. एकंदर अंक वाचनीय होता.
– संतोष ह. राऊत, सातारा

lp10पर्यटनाची दिशा आणि दशा
‘लोकप्रभा’चा पर्यटन विशेषांक हाती आल्यावर लगोलग वाचून संपवला. एखाद्या वेगळ्या विषयाकडे पर्यटनाच्या दृष्टीने कसे पाहावे याची दिशा आपल्या अंकाने दिलीच, पण असे काही करायचे असते हे आपल्या थोर पर्यटन मंडळाच्या गावीच नसल्याने आपल्या पर्यटनाची दशादेखील जाणवली. मुळात आपला पर्यटनाचा विकास हा सरकारी यादीतील वास्तू आणि स्थळांपुरताच मर्यादित असतो. एखादा अधिकारी एखादी योजना आखायला घेतो, काहीतरी वेगळे करू पाहतो, पण तोवर त्याची बदलीच होते. परिणामी नवा अधिकारी नवं राज्य सुरू होतं आणि मिळत जाणारी दिशा दशेमध्ये परावर्तित होते. कोकणाबाबत अशाच हजारो योजनांच्या घोषणा ऐकल्या. माझ्या माहितीप्रमाणे काही धडपडय़ा अधिकाऱ्यांनी नावीन्यपूर्ण पावलं उचलली, पण तेवढय़ात बदली झाल्याने पुन्हा पर्यटनाची गाडी जुन्या वाटेनेच जात राहिली. आपल्या अंकातून मिळालेली दिशा या दशेचे परिवर्तन करू शकते, पण त्यासाठी धोरणात्मक पुनर्रचनेची गरज आहे; पण येथेच तर सारे घोडे पेंड खाते.
– विश्वास महाजन, नाशिक.

lp09विश्वचषकाचा गोंधळ
विश्वचषक म्हटल्यावर सकल विश्वाचा पसारा समोर येतो. ते साहजिकच आहे. पण आपला विश्वचषक हा सहा खंडांतील सहा टोकांनादेखील नीटसा जोडलेला नाही. सहभागी टिम्स पाहिल्या की लक्षात येते ते म्हणजे एका हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच संघ हे या खेळात तरबेज आहेत. एकूण १६ संघांपैकी ही संख्या अर्धीदेखील नाही. मग उर्वरित संघ हे काय फक्त जागा भरण्यासाठी अथवा दिवस वाढविण्यासाठी तयार केले आहेत का? असे असेल तर पाच-सात देशांत खेळणाऱ्या या सामन्यांना विश्वचषक का म्हणायचे आणि त्यासाठी आपणदेखील त्यामागे वेडय़ासारखे धावायचे. मला तर या सर्वामागे खेळापेक्षा अर्थकारणाचाच प्रभाव अधिक दिसतो; किंबहुना तेच या खेळाचे सत्य असावे.
– सुनील मानकामे, संगमनेर.

lp11माहीतीपूर्ण लेखमाला
हल्ली एक फॅशनच आली आहे, कोणत्याही नव्या गोष्टीचा संदर्भ जुन्याशी जोडायचा आणि त्यावर चर्वितचर्वण करायचे. एखाद्या थोर व्यक्तीचा संदर्भ त्याच्याही पूर्वीच्या इतिहासातील थोर व्यक्तीशी जोडायचा. पण असे जोडकाम करणाऱ्यांना त्यामागील नेमकं शास्त्रदेखील माहिती नसते. पण ‘लोकप्रभा’त सुरू असलेली कौटिल्य आणि शिवराय लेखमाला मात्र अपवाद आहे. इतिहासाचे दस्तऐवजी दाखले देत केलेली ही मांडणी वाचकांच्या ज्ञानात भर घालणारी आहे.
– अमेय देशमुख, जालना</strong>

आरोग्याची काळजी
आपल्या अंकातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ असणाऱ्या आरोग्यविषयक लेखांबद्दल आपणास विशेष धन्यवाद द्यावे लागतील. वैद्य खडीवाले, डॉ. अविनाश सुपे, डॉ. रत्नपारखी, डॉ. केदारे यांच्या या नव्या सदरांबद्दल आपणास शतश: धन्यवाद.
– मंदार कुलकर्णी, औरंगाबाद</strong>

सासू-सुना
जगात काही सनातन तिढे आहेत. त्यावर कितीही लेखणी झिजवली तरी कमीच पडेल. सासू-सुना हा विषय त्यापैकीच एक. राधा मराठे यांनी लिहिलेला प्रदीर्घ लेख ज्यांनी वाचला असेल, त्यांना नक्कीच एक दिशादर्शन झाले असेल. या मुद्दय़ावर जगाच्या अंतापर्यत चर्चा चालू राहील.
– संजय काळे, ठाणे</strong>

ऑस्करवारी आवडली
फेब्रुवारी महिन्यात ऑस्करचे वेध लागतात. पण बऱ्याच वेळा होत असं की इंग्रजी चित्रपटांवर मराठीत फारसं लिखाण आढळत नाही. जे काही येतं ते बहुतांश वरवरचं असते. त्यामुळे चांगल्या विषयांचे रसग्रहण होत नाही. मात्र ‘लोकप्रभा’ने गेल्या दोन वर्षांपासून ऑस्कर चित्रपटांवर छोटीशी का होईना लेखमाला प्रकाशित करुन आम्हाला चांगल्या विषयांची माहिती करुन दिली. खर तर आपण चांगल्या इंग्रजी चित्रपटांवर वर्षभर लेखमालिका दिली तरी हरकत नाही.
– अरुंधती जगताप, सोलापूर