lp09खरंच मराठी चित्रपटाचा धंदा ‘प्राइम’ तारेल? 

‘मराठीचा धंदा जेमतेमच!’ विशेषांकातील याच शीर्षकाच्या लेखात वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची कुंडली मांडत ‘धंद्याचा’ घेतलेला मागोवा मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि मराठी प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणाराच होय! आणि आता मराठी चित्रपट ज्या ‘प्राइम टाइम’च्या वलयात शिरतोय त्यात टिकून राहणे हे कायम आव्हानच ठरणार आहे.
हे आव्हान टिकवण्यासाठी, ओघाने मराठी चित्रपट ‘प्राइम’ ठरण्यासाठी मराठी प्रेक्षकांनी आवर्जून मराठी चित्रपट पाहायला जाणे ही ‘प्राइम’ गरज होय! जर मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपट पाहायला गेला नाही तर कोणतीही ‘प्राइम’ वेळ व्यर्थ ठरणार आहे. मी जेव्हा जेव्हा म्हणून मराठी चित्रपट पाहायला गेलो तेव्हा तेव्हा मराठी चित्रपट प्रेक्षक प्रतिसादाबाबत मला विदारकच दृश्य पाहायला मिळाले. हिंदीतही नाव कमावलेल्या मराठी कलाकाराच्या एका मराठी चित्रपटाच्या दुपारी ‘बारा’च्या शोला मी गेलो होतो तेव्हा पुरेसे प्रेक्षक नसल्याने तो शो रद्द केल्याचे सांगितले. पण तो चित्रपट कसेही करून बघायचाच म्हणून तेव्हाच तीनच्या शोची तिकिटे काढली (तीही नाइलाजास्तव दिल्याचे भाव होते) आणि तीनच्या शोला संपूर्ण चित्रपटगृहात वीसही प्रेक्षक नव्हते, पण एसी मात्र फुल! ओघाने जे काही प्रेक्षक होते त्यांच्याकडून ‘थिएटरवाल्यांना परवडते कसे? एसीचा खर्च तरी भरून निघत असेल का? सगळ्या शोला अशीच स्थिती असेल तर नफ्याचे गणित कसे सोडवत असतील?’’ यासम कुजबुज सुरू होती. आणि तेच गणित मीही विषण्णतेने मनाशी घोळवत होतो. कारण तीच स्थिती नुकत्याच येऊन गेलेल्या इतर मराठी चित्रपटांची होती आणि तेही पहिल्या आठवडय़ात! त्यामुळे प्रश्न एकच ‘खरंच! नगण्य अपवाद वगळता मराठी चित्रपट ‘प्राइम’ ठरतात का?’ तेव्हा याबाबत सर्वेक्षण, आत्मपरीक्षण करून सर्वाची व्यावसायिकता जपत प्रेक्षकांना पैसा वसूल मानसिक समाधान भविष्यात मिळण्यासाठी प्रेक्षकांची ‘नेमकी’ आवड हेरत चाकोरीबद्धतेतून बाहेर येत मराठी चित्रपट ‘प्राइम’ ठरायला हवेत, तरच मराठी चित्रपटांचे ‘धंदा-गणित’सुद्धा जुळेल!
किरण प्र. चौधरी, वसई.

संगीतरसिकांना पर्वणी
‘किस्से फिल्मी गाण्यांचे, दुराव्यांचे आणि मनोरंजनाचे’ हा वसंत राजूरकर यांचा अकरा दुर्मीळ छायाचित्रांनी सजलेला लेख (लोकप्रभा, १ मे) माहितीपूर्ण, वाचनीय आणि संग्राह्य़ आहे. हिंदी चित्रपटांच्या संगीताविषयीच्या जुन्या आठवणीत रमणाऱ्या वाचकांना ही एक पर्वणीच आहे. १) ध्वनिमुद्रणाच्या तयारीत असणारा सी. रामचंद्र यांचा वाद्यवृंद, २) आशाताई आणि रफीसाहेब यांना गीताची चाल समजावून देताना ओ. पी. नय्यर, ३) गीताची रंगीत तालीम करताना रफीसाहेब आणि हार्मोनिअमवर किशोरदा, ४) आशाताई गात असताना शेजारी दादा (सचिन देव) बर्मन, ५) हार्मोनियमवर मन्नादा आणि शेजारी दादा बर्मन, ६) रेकॉर्डिग रूममध्ये देवसाहेब रफीसाहेबांशी बोलताना, ७) लतादीदी आणि आशाताई एकत्र गाताना, ८) शंकर, हसरत जयपुरी, राजसाहेब, जयकिशन आणि शैलेन्द्र एकत्र उभे असताना, ९) मदन मोहन आणि दीदी, १०) महेन्द्र कपूर, कल्याणजी, दीदी, सायरा बानू, दिलीपकुमार आणि आनंदजी एकत्र असताना, ११) वसंत देसाई, शंकर, सी. रामचंद्र आणि नौशाद बोलत असताना. ही छायाचित्रे एरवी कोठे पाहावयास मिळणार होती? यातील काही किस्से पूर्वीच्या चित्रपट रसिकांना परिचयाचे आहेत; पण जे माहिती नव्हते त्याबद्दल वाचताना कुतूहल निर्माण झाले. सी. रामचंद्र यांनी दीदींना टेपरेकॉर्डरची उपमा देणे आणि ओ. पी. नय्यर यांनी रफींना अपमानास्पद वागणूक देऊन माघारी पाठविणे या गोष्टी वरील दोन्ही संगीतकारांमध्ये अहंकार किती ओतप्रोत भरला होता हेच दर्शवितात. दीदींमुळेच सी. रामचंद्र यांच्या चालींचे सोने होऊन ते यशस्वी झाले तद्वतच रफी-आशा जोडीमुळेच ओ.पीं.ना दिगंत कीर्ती मिळाली हे दोघांनीही कधीही मान्य केले नाही, याला कृतघ्नपणाशिवाय आणखी काय म्हणणार? दीदींबद्दल शेलका शेरा मारताना ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या पंडित नेहरूंच्या डोळ्यात अश्रू उभे करणाऱ्या गीताचा सी. रामचंद्र यांना सोयीस्कर विसर पडला होता काय? शेवटी दीदींविना सी. रामचंद्र व रफी-आशाविना ओ. पी. नय्यर पूर्णपणे संपले. लेखात नसलेल्या एक-दोन घटना अशा : दीदी आणि संगीतकार शंकर यांच्यातील दुरावा ‘संन्यासी’च्या वेळी संपला आणि या चित्रपटाची गीते तुफान लोकप्रिय झाली. तसेच राज कपूर आणि दीदी यांच्यातील मतभेद ‘बॉबी’च्या वेळी संपुष्टात येऊन दीदींनी गायिलेली गीते किती गाजली हे वेगळे सांगावयास नको. जाता जाता लेखातील एक-दोन उल्लेखांबाबतची दुरुस्ती अशी : ‘शोले’तील ‘ये दोस्ती’ या गीतात किशोरदांचे सहगायक मन्ना डे होते; रफीसाहेब नव्हते. तसेच ‘सगीना’ हा चित्रपट कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केला नसून दादा (सचिन देव) बर्मन यांनी केला आहे.
अनिल रा. तोरणे, तळेगाव दाभाडे.

lp08चित्रातून जाणवले की..
एकंदरच चित्राबद्दल माझे सामान्य ज्ञान असल्यामुळे शिलकुमार कुंभार यांच्या चित्राचे पान सहज बघून पालटून पुढे जाणार होतो. पण चित्र पाहिल्यावर आपल्याला काय वाटतेय? हे वाक्य वाचल्यावर, तेच चित्र मुद्दाम न्याहाळत बसलो. चित्रात मला जाणवले ‘देह’ हा नाशिवंत असून प्रथम आत्मा हा हळूहळू त्याच्यातून निवृत्त होत आहे. हे विचार चित्रकाराने पारदर्शकतेने (काच) दाखवले असावेत.
व्यंकटेश माडगूळकर यांच्या आंबेजोगाई येथील १९८३ सालच्या मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणाची आठवण झाली. ते म्हणाले वाचकाच्या मतामुळे खट्ट होऊ नका. ते त्याचे एकटय़ाचे मत असते. अखेर समीक्षा ही पाण्यावरची अक्षरे असतात, दगडावरची नाही. प्रतिभावंताची एकच प्रत निसर्ग काढतो आणि तो साचा मोडून टाकतो. एक झाड दुसऱ्या झाडासारखं नसतं. एक चित्रकार दुसऱ्यासारखा नसतो. रंगा फडके सवरेत्कृष्ट व्यक्तिचित्रकार पुरस्कार शिलकुमार कुंभार यांना मिळाल्याबद्दल त्यांचे आणि ‘लोकप्रभा’ने त्यांना दाद दिल्याबद्दल अभिनंदन!
श्रीनिवास स. डोंगरे, दादर.

lp10डोळ्यात अंजन घातले
३ एप्रिलच्या अंकातील विनायक परब यांचा ‘मथितार्थ’ तरुण पिढीच्या डोळ्यांत चांगलेच अंजन घालणारा आहे. मोबाइलमय झालेले अनेक जण आपण आपल्या अवतीभवती सतत पाहतो. आपण स्वत:ही कमी-अधिक फरकानं मोबाइल नामक यंत्राच्या आहारी गेलो आहोत हे कटुसत्य आहे. मोबाइल, सेल्फी, व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, गुगल, चॅटिंग, मेसेजिंग, डाऊनलोडिंग हे सारे शब्द आता आपल्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलेले आहेत. सेल्फीच्या नादात आपण आपला जीव धोक्यात घालू लागलोय. डोळे सतत स्क्रीनवर खिळवून मनाने त्या एका वेगळ्याच विश्वात एवढे एकरूप झालोय की, एक ‘मूक जग’ यंत्रवत जगायला लागलोय. कळतंय पण वळत नाही अशी विचित्र मनोवस्था आहे. या साऱ्यावर अंकुश ठेवणं फक्त आणि फक्त आपल्या स्वत:च्या इच्छेवर अवलंबून आहे.
– रीमा चंद्रशेखर कुलकर्णी, पुणे</strong>

लेख आवडले
३ एप्रिलच्या ‘लोकप्रभा’तील विनायक परब यांचा ‘हे जीवन सुंदर आहे’ हा मथितार्थ अतिशय सुंदर व अर्थपूर्ण होता. ‘पूर्वी लाखमोलाचा जीव’ असे म्हटले जायचे, आता त्या पूर्वीच्या लाखांना अब्जांची किंमत आहे.’ हे वाक्य खरोखर सत्य आहे!
‘एक दिवसात हजार’ व ‘फिरते ग्रंथालय नव्हे, ग्रंथयान’ हे दोन्ही लेख (अभय जोशी व तेजल शंृगारपुरे) आवडले. पुंडलिक पै यांच्या वाचनालयाने ‘फ्रेंडस् वाचनालयाचा श्री गणेश केला, त्या वाचनालयाच्या अनेक शाखा वाढायला लागल्या आहेत. एका दिवसात एक हजाराहून अधिक सदस्यांच्या नोंदणीची नोंद लिम्का बुकमध्ये व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त करते व शुभेच्छा देते.
सुबोध भावे (भावे प्रयोग) यांचा आनंदाचा ठेवा, ‘बालगंधर्व’ या फिल्मच्या संदर्भातील लेख, देशपांडे यांनी दिलेली भेट (दुर्मीळ अशा नामवंत गायकांच्या ऑडिओ व व्हिडीओ सीडीज) त्यांना अनमोल अशी भेट वाटली, त्यांचे ‘लोकप्रभा’मधील लेख अतिशय सुंदर असतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो इतर अनेक लेख माहितीपूर्ण व वाचकीय असतातच ‘लोकप्रभा’ हे साप्ताहिक खरोखरच प्रत्येकाने वाचावे असेच आहे.
वैषाली के. देसाई, मुलुंड