‘लोकप्रभा’चा दिवाळी अंक आजवरच्या परंपरेला साजेसा असाच आहे. मेक टू ऑर्डर, तरुण आरजे, कोयनेचा हिरक महोत्सव, चांदीचा गाव, आलियाची फिरकी असे वैविध्य जपलेला हा अंक एक परिपूर्ण दिवाळी अंक ठरावा असाच आहे. 

आपल्याला हवं तसे दिसावं म्हणून शरीरात केले जाणारे बदल नेमके कसे आणि कितपत उपयुक्त आहे, त्यामागची शास्त्रीय मानसिक मीमांसा मांडल्यामुळे वाचकांना अभ्यासू पण गरजेचा असा हा विषयाची संपूर्ण माहिती मिळाली आहे. अर्थात अशा अभ्यासू विषयाला तरुण आरजेंच्या खळाळत्या उत्साहाची साथ मिळाल्यामुळे घरातील तरुणाईदेखील आपल्या अंकावर खूष आहे.
स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत कोयना धरण आणि वीज प्रकल्पाच्या अनोख्या स्थानावर आपण चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकला आहे. तर चांदीचा गाव हा एकशे दहा वर्षांपूर्वीपासून विकसित झालेला सेझ लोकप्रभामुळे वेगळ्या प्रकारे समोर आला आहे.
अंजली जोशी, अमरावती</strong>

हवीहवीशी खाद्ययात्रा
दिवाळीपूर्व अंकाचे औचित्य साधून ‘लोकप्रभा’ने प्रकाशित केलेला रुची विशेषांक मनापासून आवडला. या अंकात दिलेल्या ४०-५० रेसिपीज्मुळे दिवाळीच्या काळात नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ तयार करण्याची संधी आम्हाला मिळाली. सणासुदीच्या या काळात नेहमीच्याच खाद्यपदार्थाशिवाय वेगळं काहीतरी हवं असते ते नेमके वेळेवर वैदेही भावे यांनी सादर केल्याबद्दल ‘लोकप्रभा’स धन्यवाद.
विशेष म्हणजे वैद्य खडीवाले यांच्या पुस्तकातील रेसिपीज्मुळे रोजच्या जेवणात चांगला आरोग्यपूर्ण बदल मिळू शकला. पोह्य़ाची इडली, पोह्य़ाचे सांदण, पोह्य़ाचे पकोडे, चुरमुऱ्याची कचोरी, सुरण पिठलं भाजी, कडधान्याचा पुलाव या ऑफबीट डिशेस मुळे आमच्या उत्सवाला एक वेगळी चव आली.
दिवाळीच्या निमित्ताने आपण जरी असा रुची विशेषांक प्रकाशित केला असला तरी वर्षांतून एकदा संपूर्ण अंकच खाद्यविशेष असावा अशी अपेक्षा आहे.
निलेश देशमुख, पिंपरी.

दागिने आणि आपण
‘मालिका सजल्या दागिन्यात’ हा लेख (ऑक्टोबर) वाचला. मालिकांमधले दागिने वापरण्याचा ट्रेंड नेहमीचाच असला तरी एखाददुसरा अपवाद वगळता मला तरी हे दागिने म्हणजे नुसता भपका असतो, असं वाटतं. तो मालिकांपुरता असता तर ठीक होतं. पण ही सगळी दागिनेसंस्कृती प्रत्यक्षात आसपास वावरताना दिसते. खरं म्हणजे आजची स्त्री नोकरी करणारी, सुटसुटीत कपडे, दागिने वापरणारी आहे. मग असे भपकेबाज दागिने का दाखवता? आली एखादी मालिका की झाले त्यातले दागिने, कपडे लोकप्रिय या प्रकाराची तर मला गंमतच वाटते. आपण आपल्याला आवडेल, चांगलं दिसेल ते घालायचं की मालिकांमधली एखादी व्यक्तिरेखा घालते म्हणून घालायचं? मालिकांमधले दागिने फॉलो करताना हेही लक्षात घ्यायला हवं की तसे कपडे, मेकअप, सेट या सगळ्यावरच ते शोभून दिसतात. अर्थात या दागिन्यांमुळे एक झालं की सोन्याचा सोस करण्यापेक्षा त्यापेक्षाही किती तरी कमी पैशातले हे आर्टिफिशियल भरपूर संख्येने घेता आणि वापरता येतता. याच अंकात डॉ. म. वि. सोवनी यांचा लेख आहे. तो वाचायला मात्र मजा आली. आपले पारंपरिक दागिने कसे होते, ते अन्यथा समजलं नसतं.
गीता पवार, सोलापूर.

* जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने ज्यूंकरिता बनवलेल्या छळछावण्यांचे वर्णन वाचून मन सुन्न झाले (नेव्हर अगेन, पर्यटन- योगिनी वेंगुर्लेकर, १९ सप्टेंबर). दोन देशांमधील युद्धात सामान्य नागरिक नेहमीच भरडला जातो आणि निष्पाप व्यक्ती नाहक प्राणाला मुकतात. परंतु, त्यापासून कोणताही धडा न घेता जगभरातील राज्यकर्त्यांचा इतिहासाची पुनरावृत्ती घडविण्याकडेच कल असलेला दिसतो. दुसरीकडे, जगभरातील दहशतवाद्यांनी आपल्या धर्माचा चुकीचा अर्थ लावून आरंभलेली हिंसा कमालीचा उत्पात घडवून आणते आहे. दुर्दैवाने या अराजकवाद्यांना नामोहरम करण्यात तमाम राज्यकर्त्यांना अपयश आलेले दिसते.
केतन र. मेहेर, विरार (पूर्व) ई-मेलवरून.

* दिवाळी अंकातील चांदीचा गाव हा हुपरीवरील लेख अत्यंत माहितीपूर्ण आणि वाचनीय होता. माझ्या आडनावातच हुपरी असल्यामुळे हुपरीविषयीचा आणखीन इतिहास जाणून घ्यायला आवडेल.
निखिल हुपरीकर, ठाणे, ई-मेलवरून.

* बैलपोळ्याप्रमाणेच साजरा होणारा गाढवाचा पोळा हा २९ ऑगस्टच्या अंकातील संतोष विणके यांच्या लेखातील माहिती एकदम नवीन होती. अशा नावीन्यपूर्ण उत्सवांबद्दल अभ्यासू माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
आनंद बाळ्ये, ई-मेलवरून.

* १८ जुलैच्या अंकातील आंबा उत्पादनावर डॉ. श्रीधर सांडू यांनी लिहिलेला उत्तम लेख वाचला. त्यांनी दिलेला सल्ला हा उपयोगात आणण्यास सोईस्कर असा आहे. आंबा शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशा विषयाला लोकप्रभाने हात घातल्याबद्दल धन्यवाद. आपले साप्ताहिक केवळ शहरापुरते मर्यादित नाही तर शेतकऱ्यांनादेखील उपयुक्त आहे.
प्रकाश शनवारे, ई-मेलवरून.

* २२ ऑगस्टच्या अंकात दिलीप ठाकूर यांच्या लेखात मनोजकुमार यांचा शहीद चित्रपट १९६७ साली प्रदर्शित झाला असल्याचे लिहिले आहे तर त्याच अंकात अनिरुद्ध भातखंडे यांनी हा चित्रपट १९६५ साली प्रदर्शित झाल्याचे म्हटले आहे. नेमके साल कोणते?
कवींद्र भगीरथ साळुंके, ई-मेलवरून.

शब्दच्छल माझाही
दि. ३ ऑक्टोबरच्या अंकात विजय देशपांडे यांचा शब्दच्छल वाचला. मजा वाटली; पण एक छोटीशी चूक झाली आहे. तो बेल – बेलवृक्षाचे पान, पण ती बेल – घंटा यात ‘ती बेल’मधली ‘बेल’ इंग्लिश आहे, मराठी नाही. त्याचे मराठी शब्दाशी फक्त उच्चार साधम्र्य आहे. इंग्लिश-मराठी शब्दांचे उच्चार समान, पण अर्थ वेगळा- लिंग वेगळे अशा गटात हा शब्द बरोबर जाईल.
कळी या अर्थाने मुकुल शब्द स्त्रीलिंगी. ती कळी- तो नाही. (तो कळा- कमळाचा; ती कळा- अवस्था, दशा) वाणी शब्द धान्य विक्रेता या अर्थाने आपण वापरतो तो हा विक्रेता वैश्य-वाणी समाजाचा या अर्थाने आणि आता कोणीही हा व्यवसाय केला तरी त्याला आपण वाणीच म्हणतो; पण हा शब्दही या तुलनेसाठी योग्य वाटत नाही. (जसे कोणतेही कपाट गोदरेज- टूथपेस्ट कोलगेट किंवा साबण लक्स/निरमा तसे) कोकीळ हा पिक आहे, पीक नाही. भाषेतील गंमत दाखवण्याचा देशपांडे यांचा प्रयत्न मात्र छानच आहे.
राधा मराठे, ई-मेलवरून.

ट्रेकर्सची दिवाळी
सुहास जोशी यांचा ‘दिवे लागले रे’ हा ७ नोव्हेंबरच्या अंकातील लेख उत्तम होता. अशी वेगळी दिवाळी साजरी केली हे ऐकून आनंद वाटला. तसेही दिवाळीचा खरा आनंद हा दुसऱ्याला आनंद देण्यातच आहे. सतत अंधारात असणाऱ्या त्या खोपटय़ाने दिवाळीचा एक दिवस का होईना प्रकाश अनुभवला तो या ट्रेकरमुळे. फार उत्तम.
मयुर सानप, ई-मेलवरून.

Story img Loader