‘जातपंचायतीचा फास- ठेवतोय महाराष्ट्राला मागास’ या कव्हर स्टोरीअंतर्गत असलेले दोन्ही लेख मती गुंग करणारे आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली तरी जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात, तेही महाराष्ट्रात जातपंचायत इतकी प्रबळ असावी हे दुर्दैवी आहे. मुळात आपल्या घटनेने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सार्वभौमत्व सर्वाना दिले असले तरी प्रत्यक्षात ५० टक्क्यांहून अधिक जनतेला स्वातंत्र्य म्हणजे काय हेच माहीत नाही. त्यामुळे देश स्वतंत्र आहे वा नाही याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही, कारण गरिबी, अज्ञान आणि बेरोजगारी हे सर्व हातात हात घालून चालत असल्याने स्वत:च्या जातीसमुदायाशी एकनिष्ठ असणे ही त्यांची मानसिक गरज बनते आणि त्याचा गैरफायदा पंच घेतात. वस्तुत: गावोगावी ग्रामपंचायत असावी जसे ठरविले गेले ते असेच लहान समुदायाच्या अडचणी तिथल्या तिथे सोडविल्या जाव्यात म्हणूनच पण समाजावरील जातीचा पगडा इतका घट्ट आहे, की सरपंचाला वाळीत टाकण्याचा निर्णय जातपंचायत द्यायचे धाडस करते हे अविश्वसनीय आहे. पण आपले समस्त राजकारणच आजही जातिधर्माच्या बेरजा-वजाबाक्यांवर आधारित असेल तर जातपंचायतींच्या उचापत्या कोण पुढाकार घेऊन बंद करणार? जोपर्यंत शिक्षणाची दारे सर्वासाठी उघडत नाहीत आणि बेरोजगारी संपत नाही तोपर्यंत या प्रकारांना आळा घालणे कठीण आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तापालट झालेला आहे तेव्हा या विषयातही ‘अच्छे दिन’ यावेत, हीच जनेच्छा!

‘प्राधान्य मुलांच्या सुरक्षिततेला..’ या ‘प्रासंगिक’मधील लेखात मुक्त करण्यात आलेल्या ८५ मुलांपैकी ८१ मुले परत त्याच कामात आढळली हे वास्तव हेच प्रामुख्याने अधोरेखित करते की, पोटाची खळगी जर रिकामी असेल तर कुठलेही हक्क वा सुरक्षेपेक्षा एक वेळ पोटभर जेवण जास्त महत्त्वाचे ठरते. आज आपल्या देशात लाखो बालके कुपोषित आहेत, अर्धपोटी जगत आहेत, हे सत्य आपण डोळ्याआड करून जर आपण बालहक्काची चर्चा केली तर ते करवंटी खवण्यासारखे होईल, ज्यात खोबरे मिळणारच नाही. खरी गरज आहे ती सर्व लहानथोर बालकांना दोन वेळ पोटभर जेवणाची सोय करण्याची आणि समाजाच्या निम्न आर्थिक स्तरात कुटुंबनियोजनाचे महत्त्व बिंबविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करण्याची. अर्थात त्याचा अर्थ बेछूट नसबंदी करत सुटा असा नसून लोकांचे प्रबोधन करून त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन कुटुंबनियोजनाचे पाऊल उचलावे म्हणून उपाय योजण्याची.
माया हेमंत भाटकर, चारकोप गाव, मुंबई.

आरोग्य तळाच्या पायरीवर…
‘लोकप्रभा’चा २८ नोव्हेंबरचा अंक वाचला. ‘तुम्हाला काय हवंय? शिस्त की पश्चात्ताप?’ ही कव्हर स्टोरी वाचून खाडकन् डोळे उघडल्याची जाणीव झाली. अर्थात ही माझी एकटीची नाही तर अनेकांची प्रतिक्रिया असणार. कारण आजच्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी आपण प्रत्येक जण वेळेशी कसे झगडतो आहोत ते आपलं आपल्याला माहीत आहे. पैसा, करियर, ऑफिस, घर या आपल्या सगळ्यांच्या प्रायॉरिटी आहेत. त्या लिस्टमध्ये आपलं आरोग्य हा मुद्दा शेवटच्या स्थानावरसुद्धा नाही. सगळ्यात महत्त्वाच्या मुद्दय़ाशी आपण सगळ्यात वाईट तडजोड करतो आहोत.
मला यासंदर्भात कुठेतरी वाचलेला लोकमान्य टिळकांचा एक संदर्भ आठवतो. तो असा की, कॉलेजमध्ये शिकत असताना लोकमान्य सतत आजारी पडत होते. मग त्यांनी सरळ शिक्षण थांबवलं आणि वर्षभर शरीरसाधना केली. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’ म्हणत भरपूर व्यायाम केला. माझं आरोग्य चांगलं असेल तर मी पुढच्या आयुष्यात मला पाहिजे ते करू शकेन, असं त्यांचं म्हणणं होतं. हा संदर्भ खरंच आहे की नाही ते मला माहीत नाही, पण आपल्या आयुष्याकडे कसं बघायला हवं हे आजच्या आमच्यासारख्या धावणाऱ्या पिढीला समजावून देण्यासाठी चांगला आहे.
चांगलं जगण्यासाठी आपणच आपल्या शरीराला चांगलं जोपासणं गरजेचं आहे. त्यासाठी चांगलं खाण्याबरोबरच नियमित व्यायामही हवाच. पण हल्लीच्या काळात चांगलं खाणं म्हणजे चांगल्या हॉटेलमध्ये खाणं हा अनेकांचा समज आहे. अ‍ॅसिडिटी झाली की गोळ्या घ्यायच्या हे हल्लीचं ब्रीदवाक्य आहे; पण अ‍ॅसिडिटी होऊच नये यासाठी तुम्ही काय करता, हे महत्त्वाचं आहे. टीव्हीवरही अमुकतमुक गोळ्या घ्या आणि वाट्टेल ते वाट्टेल तेवढं खा, असं सांगितलं जातं. त्या सगळ्यामधलं आपण आपल्याला सोयीचे तेच घेतो आणि एका दुष्टचक्राला सामोरे जातो.
खूप गोष्टी कळत असूनही कळत नसल्याचं सोंग घेतो. ‘तुम्हाला काय हवंय? शिस्त की पश्चात्ताप?’ या लेखाने आपल्याला जागं करायचा प्रयत्न केला आहे. आता पुढचं पाऊल आपण टाकायचं आहे.
कविता सोनवणे, पुणे.

‘दुसरी बाजू’ आवडले
हृषीकेश जोशी यांचे ‘दुसरी बाजू’ या सदरातील कधी नर्मविनोदाच्या अंगाने जाणारे, तर कधी वास्तवातील कारुण्याच्या कडेने जाणारे लिखाण वाचले. ‘रंग’ या लेखातून सुमार अकलेची नेतृत्वे समाजाला मिळाली तर कशी उभी सामाजिक फूट पडते, ते पुन्हा जाणवले, तर ‘तारतम्य’मधील नटींच्या अनुभवाने बनॉर्ड शॉ यांची एक गोष्ट आठवली. एक सुंदर नटी शॉ यांच्यावर भाळून एकदा त्यांच्याशी गप्पा मारताना म्हणाली, ‘आपण लग्न करू या, म्हणजे आपले होणारे मूल माझ्यासारखे सुंदर व तुमच्यासारखे बुद्धिमान होईल.’ तिच्या रटाळ बडबडीने वैतागलेले शॉ तत्परतेने उत्तरले, ‘ते ठीक आहे मॅडम, पण जर याच्या उलट झाले तर..’ असो. हृषीकेश जोशी यांच्या लिखाणातून विचारांना चालना मिळाली.
श्यामसुंदर गंधे, पुणे