गेल्या काही महिन्यांपासून ‘लोकप्रभा’मध्ये तरुणाईच्या लेखांचं प्रमाण वाढलं आहे. युथफुलमधील सर्वच लेख एकदम झकास असतात. १८ एप्रिलच्या अंकातील ‘आमच्यावेळी अस्सं होतं’ हा श्रीरंग कुळकर्णीचा लेख धम्माल होता. जवळपास सर्वच तरुणांना कायम येणारा हा अनुभव त्यांनी अगदी नेमकेपणाने मांडला आहे. लग्नात भेटलेले ज्येष्ठ आणि तरुणांचा संवादातील मिस्कीलपणा, अवघडलेपणा, आणि त्यातून होणारा त्रागा हे सारे काही या लेखात दिसून आले. अर्थात कायमच हा अनुभव येतो असे नाही. मात्र शक्यता हमखास असते. खर तर अशा वेळी आपल्या तरुणांना ज्येष्ठांना टाळायचे नसते, मात्र आमच्या वेळी आणि तुमच्या वेळी अशा संवादामुळे तार जुळत नाही. नवं हे सारंच वाईट नाही आणि जुने ते सारंच सोनं नाही याचं भान दोन्ही बाजूंना बाळगावे लागेल.
– प्रीती कदम, मुंबई.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोक शहाणे झालेत
दि. ११ एप्रिलच्या अंकातील ‘भविष्याची पावले’ हा मथितार्थ सर्वोत्तम होता. शरद पवार यांचे आपण योग्य मूल्यमापन केले आहे. शरद पवार एका दगडात अनेक पक्षी मारतात. हल्ली ते टिंगलटवाळी, विनोदही करू लागले आहेत. शाई पुसून दोनदा मतदान करा हा कोणता विनोद? असे सांगणे हा राज्यघटनेचा अपमान आहे. पवारांनी लोकशाहीची लोकशाई केली आहे. निवडणूक आयोगाच्या समज आणि कानपिचक्यांच्या पलीकडे कारवाई होत नाही. गोपीनाथ मुंडे यांनीदेखील असेच विधान केले होते. शेषन यांच्या काळातील आचारसंहिता आता उरली नाही. पण भारतीय मतदारही आता शहाणा झाला आहे. राजकारण्यांच्या दिवसाढवळ्या सुरू असणाऱ्या दरोडेखोरीमुळे लोक खूप शहाणे झाले आहेत. मतदारही एकमताने पक्षांना घायाळ करतील. मतदार आता फसणार नाहीत. शेकडो कोटी कसे कमावले ते या राजकारण्यांना सांगावे लागेल. ‘याला मारा, त्याला फाशी द्या’ असे विरोधक सांगतात, कर्जापोटी मरणाला कवटाळणारा शेतकरी कोणाला कशाला मारील, कोणाला फाशी देईल? जे ते आपापल्या कर्मानेच मरतील.
– आर. के मुधोळकर, नांदेड.

वर्धापनदिन अंक आवडला
दर्जेदार लेखनासाठी ‘लोकप्रभा’ची ख्याती आहेच, पण ४ एप्रिलचा वर्धापन दिन विशेषांक खूपच आवडला म्हणून हा पत्रप्रपंच. निसर्ग मानवाला सदैव सढळ हातांनी देतच असतो. मानव हा त्याचाच अंश असल्यामुळे त्याच्या ठिकाणीही दातृत्वाची सहज प्रवृत्ती आहे. त्यासाठी धर्मशास्त्राने दानवृत्तीचे उदात्तीकरण केले आहे व निरनिराळ्या प्रकारची दाने प्रसंगानुरूप कशी करावी याविषयी सांगितले आहे. जगातील जवळजवळ सर्व धर्मामध्ये दानवृत्तीचे महत्त्व सांगितले आहे. हेतू हा की लोकांमध्ये दान देण्याची प्रवृत्ती वाढीस लागावी. या अंकातील डॉ. अरविंद जामखेडकर यांचे विचार खूपच मोलाचे आहेत. या पृथ्वीतलावर जोपर्यंत मनुष्यत्व आहे, तोपर्यंत मानवाच्या ठिकाणी दानवृत्ती ही अस्तित्वात असणारच आहे. धर्मशास्त्रही असेच सांगते. की काल, देश, यांचा विचार करून ही प्रवृत्ती तशीच राहावी. मात्र अंतरंग न बदलता बाह्य़स्वरूप बदलले तरी चालते. ‘काशीखंड’ नावाच्या ग्रंथात असे म्हटले आहे. निरनिराळ्या शास्त्राचा अभ्यास करून महर्षीनी इह आणि परलोकाच्या हितासाठी चार प्रकारची दाने सांगितली आहेत ती अशी –
भीतेक्यश्राभयं देयं, व्याधितेभ्यस्तौषधम्,
देयां विद्यार्थिने विद्या, देयमन्नं क्षुधातुरम्
भ्यायलेल्या अभयदान, रोगपीडितांना औषधदान, विद्यार्थ्यांला विद्यादान व भुकेलेल्यांना अन्नदान, ही श्रेष्ठ दाने आहेत. या अंकातील अनेक लोकांनी समाजाला ज्या वेगवेगळ्या प्रकारे दान दिले आहे, त्यांचा समावेश वरील चार प्रकारांत होतो. त्याबद्दल सर्व दात्यांचे धन्यवाद. आपल्या या अंकामुळे देणाऱ्यांचे अनेक हात पुढे येवोत हीच इच्छा. शून्यातून वर आलेले मकरंद अनासपुरे यांचे कौतुक. गीतरामायणाच्या स्मृती पुन्हा उजळल्या त्याबद्दल धन्यवाद.
– गीता पेंडसे, ठाणे.

तरुण मतदार, वयस्कर लोकप्रतिनिधी
निवडणुकीतील युवकांच्या सहभागाविषयीची कव्हरस्टोरी वाचली. यंदाच्या निवडणुकीत मतदानास पात्र ठरलेल्या म्हणजे वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे नेते, राजकीय पक्ष, माध्यमं अशा सगळ्यांचंच लक्ष तरुण मतदारांकडे आहे. हे मतदार मतदानासाठी उतरले तर निवडणूक फिरेल अशीही शक्यता मांडली जात आहे. हे सगळं तसं असेलही, पण आपल्या राजकीय पक्षांना, नेत्यांना हे का समजत नाही, की तुम्ही जेव्हा मत मागता, तरुणाचं प्रतिनिधित्व करायची संधी मागता तेव्हा तुम्ही त्यांना काय देता? एकदा मत देऊन गेले की आपले लोकप्रतिनिधी पुढची पाच वर्षे फिरकतही नाहीत. सर्वाधिक तरुण मतदार सर्वाधिक वयस्कर लोकप्रतिनिधींना निवडून देणार आहेत, हा विरोधाभास नाही का?
– प्रीती दाभाडे, नाशिक.

आनंददायक प्रवासवर्णन
दि. २१ मार्च २०१४ च्या भटकंतीमधील आत्माराम परब यांचा ‘मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश’ हा लेख खूपच आवडला. नॉर्वे देशाचं वर्णन अतिशय सुंदर भाषेत लिहिलेलं आहे. सर्व फोटोग्राफ्स उत्तम आहेत. आपण प्रत्यक्ष सगळीकडे जाऊ शकत नाही. परंतु लेखामुळे आपल्याला जगात वेगवेगळा निसर्ग, वेगवेगळय़ा रूपात कसा भरून राहिला आहे हे समजते. त्यातूनही आनंद घेता येतो. निरनिराळय़ा देशांतील समाजजीवन कसं आहे, सुखसोयी, शिस्त कशी आहे हेही समजतं. आपल्याकडे पुष्कळ गोष्टींत सौंदर्य, पवित्रता आहे, पण समाजाला शिस्त कधी लागणार असंही वाटायला लागतं.
– वंदना विश्वास ताडफळे

लेख आवडला
‘रंग’ हा हृषीकेश जोशी यांचा लेख आवडला. रंग ही खरं तर किती नैसर्गिक गोष्ट आहे. आपल्या आसपासच्या निसर्गातल्या रंगछटांइतकी मनमोहक गोष्ट दुसरी कोणती नसेल. सूर्योदया, सूर्यास्ताच्या वेळचं आकाश, एरवीचं निरभ्र आकाश, हिरव्या रंगांच्या अनंत छटा, फुलांचे वेगवेगळे रंग, माणसांचे विविध रंग.. हे सगळं बघायचं, आपलंसं करायचं सोडून आपण रंगानुसार भेद करायला लागलो आहोत ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. पूर्वी एकजीव होण्याचं उदाहरण म्हणून इंद्रधनुष्याचं उदाहरण दिलं जायचं. त्यात रंग एकत्र असतात आणि आपलं वेगळं अस्तित्व राखूनही असतात. आपण मात्र रंगांच्या नावाखाली दुही निर्माण करतो आहोत. हृषीकेश जोशी यांनी फार वेगळ्या आणि चांगल्या पद्धतीने हा मुद्दा अधोरेखित केला आहे. – मिताली कात्रे, पुणे.

‘देण्यातील आनंद’ स्फूर्तिदायक
२१ मार्चच्या अंकात सोनाली नवांगुळ यांची जीवनकहाणी प्रकाशित करून तुम्ही त्यांचे कौतुक केलेत ते योग्यच झाले. त्यांनी लिहिलेले ‘लोकप्रभा’मधील लेख निरनिराळ्या विषयांवर आणि अभ्यासपूर्ण असतात. ४ एप्रिलच्या अंकातील ‘देण्यातील आनंद’ ही कव्हर स्टोरी स्फूर्तिदायक आहे. निरनिराळ्या क्षेत्रांतील वरवर सामान्य दिसणाऱ्या व्यक्तींनी समाजसेवेच्या ध्यासातून असामान्य कामे केली आहेत- करताहेत. अशी कामं जनतेपुढे आणून तुम्ही आम्हाला एक प्रकारे वाटच दाखविली आहे. उल्लेख केलेल्या सर्व व्यक्तींना नम्र अभिवादन. त्यांना पुढे आणणाऱ्या सर्व लेखकांना धन्यवाद. – सुरेश देवळाकर, हैदराबाद (ई-मेल)

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response