तरुणच किंगमेकर ही ११ एप्रिलच्या अंकातील कव्हर स्टोरी वाचली आणि लक्षात आले की राजकीय पक्षांच्या दृष्टीने प्रत्येक घटक हा केवळ मतपेटीवर केंद्रित केलेला असतो. सध्याच्या लोकसभा निवडणुकांमध्ये तरुण मतदारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन साऱ्याच राजकीय पक्षांचे डोळे या तरुणाईच्या मतपेटीवर केंद्रित झाले आहेत. पण मुळात कोणताही ठोस विचार नसल्यामुळे सर्वानी तरुणांना सोयीस्कररीत्या वापरण्यास सुरुवात केली आहे. देश तरुणांचा म्हणायचे आणि उमेदवारी देताना मात्र वयस्करांना पुढे करायचे असा सार्वत्रिक खाक्या दिसून येतो. तरुणांना उमेदवारी दिलीच तर ती प्रस्थापित राजकीय घराण्यातच द्यायची आणि ढोल बडवायचे.
या लेखातील एक मुद्दा मात्र सर्वानाच विचार करायला लावणारा आहे, तो म्हणजे तरुणांची व्याख्या. ही व्याख्या विविध पक्षांनुसार ज्या प्रकारे १८ ते ५० वयापर्यंत फिरत आहे ते पाहता कोणालाच तरुणाई उमगली नाही. केवळ आपण तरुणांना महत्त्व देतो असे दाखविण्यासाठी तरुणाईचे कौतुक करण्याची धूळफेक सारेच राजकीय पक्ष करताना दिसतात. पण हे करताना त्यांचेच हसे होत आहे. पण हे सारे प्रकार भविष्यात महागात पडणार आहेत. कारण आज इतक्या मोठय़ा प्रमाणात असणारी तरुणाई हीच देशाचे भवितव्य असणार आहे. तिला अशा प्रकारे वागवणे हा अक्षम्य गुन्हा ठरेल.
केदार पाटील, नाशिक.
काव्य नव्हे हा अमृतसंचय!
सर्वागसुंदर असा वर्धापनदिन विशेषांक हाती आला आणि त्यातील मोजकेच पण योग्य विषयांवरील लेख पाहून खूपच आनंद झाला. गीतरामायणावरील लेख खूपच आवडले. मुख्य म्हणजे गीतरामायणासारख्या अजरामर कलाकृतीचा हीरक महोत्सव आणि लोकप्रभाचा ४१ वा वर्धापनदिन हे जुळून आलेले औचित्य साधत लोकप्रभाने गीतरामायणाच्या आठवणींना ज्याप्रमाणे उजाळा दिला आहे त्याला दाद द्यावी लागेल. खरे तर आमच्या पिढीने बाबूजींचे गीतरामायणाचे जाहीर कार्यक्रम कधीच ऐकले नाहीत. गदिमांनादेखील पाहिले नाहीत. पण या दोन थोर कलाकारांनी मागे ठेवलेला हा ठेवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमची पिढी ऐकते आहे. आजची पिढी गीतरामायण कानाला हेडफोन लावून ऐकणारी नाही. या पिढीला खरे तर आपल्याकडे केवढा मोठा वारसा आहे हे माहीतच नाही. पण आपल्या लेखामुळे किमान काही तरुणांनी जरी हे गीतरामायण ऐकले तरी त्याला त्यातील गोडवा, भावार्थ उमजू शकेल. विशेष म्हणजे आपण गीतरामायण ऐकण्यासाठी गदिमांच्या फेसबुक पेजची लिंक उपलब्ध करून दिल्यामुळे ऑनलाइन तरुणाईपर्यंत गीतरामायण पोहोचले आहे. त्याबद्दल गदिमांच्या या पिढीतील तरुणांना आणि लोकप्रभास धन्यवाद. आपल्यामुळेच हा अमृतसंचय नव्या पिढीपर्यंत पोहोचला आहे.
किरण देशमुख, कल्याण.
अपरिहार्य पण तद्दन फालतू
एक हजार कोटींचं जाहिरातयुद्ध ही कव्हर स्टोरी थोडय़ा उशिराच म्हणजे सर्वच माध्यमातून जाहिरातींचा भडिमार व्हायला लागल्यावर वाचली आणि प्रकर्षांने जाणवले ते हे की गेल्या काही वर्षांत राजकीय पक्षांना मतदारांच्या जवळ जाण्याचे माध्यम म्हणून जाहिराती करणं हे अपरिहार्य झालं आहे, पण या हजारो कोटी खर्चून केल्या जाणाऱ्या जाहिराती मात्र तद्दन फालतू या सदरात मोडणाऱ्या आहेत. दोन आठवडय़ांपासून दूरदर्शनवरील जाहिरातींचं प्रमाण ज्या प्रकारे वाढलं आहे, ते पाहता आपण सादर केलेली आकडेवारी ही केवळ उघडपणे सांगितली जाणारी आहे असंच वाटतं. अर्थात या सर्वाचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळेच आहेत. असो. मुद्दा हा की जाहिरातींचा भडिमार जर अपरिहार्य वाटत असेल तर त्यात किमान काहीतरी सृजनशील असावं असे पण नाही. सरधोपट पद्धतीने केल्या गेलेल्या या जाहिराती पाहता त्यातील फोलपणा जाणवतो. येनकेनप्रकारेण नेत्यांचे चेहरे लोकांसमोर येत राहतील अशीच या जाहिरातींची संकल्पना आहे. नेमकं काय सांगायचं आहे, कोणाला सांगायचं आहे याचं कसलंच भान दिसत नाही. हे सारं करण्यापेक्षा लोकहितार्थ चार कामं केली असती तर इतके वारेमाप पैसे जाहिरातींवर खर्च करण्याची गरजच राहिली नसती.
आरती सुतार, औरंगाबाद.
वाचनीय गौडबंगाल
राग ‘गौडबंगाल’ (लोकप्रभा, २१ मार्च) हा प्रभाकर बोकील यांचा सुंदर लेख वाचला. नायक-पाश्र्वगायक आणि संगीतकार यांबाबत घडलेले गौडबंगाल सदर लेखात चांगल्या पद्धतीने मांडले आहे, पण नायिका आणि पाश्र्वगायिका याबाबतीतही काही प्रमाणात गौडबंगाल जुळून आले होते की घडले होते याबाबतची साक्ष तो सुवर्णकाळच देईल. एकाच चित्रपटात नायिका दोन वेगवेगळ्या आवाजात गायली होती. ‘मेरा साया’ चित्रपटात नायिका साधनाची दुहेरी भूमिका होती, त्यामुळे ‘तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा..’ या गाण्यात लता मंगेशकरांचा आवाज आहे, तर ‘झूमका गिरा रे..’ या गाण्यासाठी आशा भोसलेंच्या आवाजाचा वापर मदन मोहन यांनी केला आहे. व्यक्ती एकच, पण व्यक्तिरेखा वेगवेगळ्या असल्यामुळे ते सुसंगत वाटते; पण याच साधनासाठी संगीतकार शंकर जयकिशन यांनी ‘आजा आयी बहार दिल है बेकरार..’ हे गाणे लता मंगेशकर यांच्याकडून आणि ‘दिल ने पुकारा और हम चले आये..’ हे द्वंद्वगीत गाण्यासाठी महंमद रफीबरोबर सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाचा वापर केला होता. चित्रपट होता शम्मी कपूर आणि साधना यांचा ‘राजकुमार’. त्या वेळी महंमद रफी आणि लताजींमध्ये रॉयल्टीवरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे दोघेही एकत्र गात नव्हते. संगीतकार सोलो गाण्यासाठी लताजींच्या आवाजाचा वापर करीत आणि रफीबरोबर द्वंद्वगीत गाण्यासाठी अन्य पाश्र्वगायिकांच्या आवाजाचा वापर करीत.
नायिका- नंदा, चित्रपट- जब जब फूल खिले, संगीतकार- कल्याणजी आनंदजी; ‘ये समाँ, समाँ है ये प्यार का..’ (लता मंगेशकर) आणि ‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठें..’ (महंमद रफी/ सुमन कल्याणपूर);
नायिका- जमुना, चित्रपट-हमराही, संगीतकार- शंकर जयकिशन, ‘मन रे तू ही बता क्या गाऊँ..’ (लता मंगेशकर) आणि ‘मुझको अपने गले लगा लो ओ मेरे हमराही..’ (महंमद रफी/ मुबारक बेगम).
‘ममता’ चित्रपटातील ‘रहें न रहें हम महका करेंगे..’ हे गाणे संगीतकार रोशन यांनी महंमद रफी/ सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात स्वरबद्ध केले होते, पण ते सोलो गाणे करताना लता मंगेशकर यांच्या आवाजात करण्यात आले. वहिदा रहमानसाठी ‘तीसरी कसम’ या चित्रपटात संगीतकार शंकर जयकिशन यांनी ‘आ, आ भी जा, रात ढलने लगी चाँद छुपने लगा..’ (लता मंगेशकर), ‘पान खाये सैंया हमार..’ (आशा भोसले) आणि एका काहीशा सवाल-जबाब गाण्यासाठी मुबारक बेगमच्या आवाजाचा वापर केला. वहिदा रहमानसाठीच संगीतकार जयदेव यांनी ‘मुझे जीने दो’ चित्रपटासाठी ‘रात भी हैं कुछ भीगी-भीगी..’ (लता मंगेशकर) आणि ‘मिलन ऋत आयी..’ (आशा भोसले) या दोन स्वरांचा वापर केला, तर रामलाल या संगीतकाराने संध्या नायिका असलेल्या ‘सेहरा’ चित्रपटासाठी ‘पंख होते तो उडम् आती रे..’ (लता मंगेशकर) आणि ‘हम है नशे में..ं’ (आशा भोसले) ही गाणी संध्यासाठी लता, आशाकडून गाऊन घेतली. याच संगीतकार रामलाल यांनी ‘गीत गाया पत्थरों ने’ या चित्रपटातील नायिका राजश्रीसाठी बहुतेक गाणी आशा भोसले यांच्या आवाजात गाऊन घेतली, पण राजश्रीवर चित्रित झालेले ‘गीत गाया पत्थरों ने’ हे गाणे किशोरी आमोणकर यांच्या आवाजात स्वरबद्ध केले. मराठीत
व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’ चित्रपट. यातील संध्या या नायिकेसाठी असलेल्या अप्रतिम लावण्या संगीतकार राम कदम यांनी उषा मंगेशकर यांच्याकडून गाऊन घेतल्या; पण ‘दे रे कान्हा चोळी अन् लुगडी..’ ही लावणी लता मंगेशकर यांच्याकडून गाऊन घेतली. ‘पिंजरा’ची हिंदी आवृत्ती ‘पिंजरा’ या नावानेच काढली. त्यातील संध्याची सर्व गाणी लता मंगेशकर यांच्याकडून राम कदम यांनी गाऊन घेतली. अर्थात त्यामुळे सुरांची आणि स्वरांची समीकरणे कधीच विसंगत वाटली नाहीत.
सुहास बसणकर, दादर
चुकीची चुकी
‘ही चुकी पूर्णपणे सिमरनचीच होती.’
११ एप्रिलच्या अंकातील कथेत वरील वाक्य आहे. चुकी हा शब्द ‘गलती’ या हिंदी शब्दाचा मराठी आविष्कार आहे का?
माझ्या मते ‘चूक’ ही ‘चूक’ असते, चुकी नसते. दुसरे म्हणजे मध्यंतर हे सदर लिहिणाऱ्या डॉ. उज्ज्वला दळवींचे लेखनकौशल्य अप्रतिम आहे. आता नवीन स्वरूपातला टाइलदार लेखानुक्रम फारच छान आहे. ‘हिम्मतवाला’ ही ग्रामीण कथा चांगली होती.
– मुकुंद शर्मा, लातूर.