आरोग्य विशेषांकातील प्राजक्ता कासले यांचा लेख ‘जगणे सुंदर, मरणे सुंदर’ हा लेख भावला. आमच्या कार्यालयात घडलेली घटना अगदी अशीच आहे. अगदी सर्व कामं वक्तशीर, जेवण वक्तशीर, बोलणे माफक, सर्व कार्यक्रमात सहभाग, अशी एक व्यक्ती होती. तिला अचानक कर्करोग उद्भवला. सगळे हवालदिल झाले. हे काय नवीन? मग अशा वेळी, सगळ्या मित्र वर्गाने साथ दिली, समुपदेशन केलं आणि येणाऱ्या प्रसंगाला खेळीमेळीने तोंड देण्याची दीक्षा दिली. प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तिला प्रेरित केलं, केमोथेरपीसारख्या उपचारात तिचे केस गेले असले, शरीरावर परिणाम झाला असला तरी मैत्री सोडली नाही. परिणामी त्या व्यक्तीने आपला आत्मविश्वास गमवला नाही. वेळप्रसंगी हवी ती साथ सगळ्यांनी दिली. यामुळे त्या व्यक्तीने जिद्दीने कर्करोगाला पराभूत केले. आम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहोत. खरे वातावरणनिर्मिती आणि येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याचे ठरवले. योग्य ती साथ मिळाली तर व्याधी जाते आणि माणुसकी नावाची दृढशक्ती नांदते हा अनुभव आहे.
म्हातारपण हे कधीच चुकत नाही, अशा वेळी त्या व्यक्तीला मानसिक आधार आणि प्रेम दिले तर येणारे मरण हे नक्कीच सुखकारक होते. या वेळी घरच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रेमाने करा किंवा रागाने करा, करावयाचे तर आहेच. मग अशा वेळी जर ते प्रेमाने केले तर ती व्यक्ती होणारे त्रास सुखेनैव सहन करते आणि मग दोघेही समाधान पावतात. या अंकातील सर्व लेख वाचनीय आणि मननीय आहेत तरीही ‘आजीबाईचा बटवा’, घरात आवश्यक औषधे कोणती?, अचानक आजार झाला तर कोणता काढा घ्यावा, कोरफड बहुगुणी कशी? तुळशी, लिंबू किंवा आले घरात का हवे अशा मुद्दय़ांचे विवेचन दिले असते तर आरोग्य विशेष अंक अधिक परिणामकारक ठरला असता.
सुरेश कुलकर्णी, ई-मेलवरून.
सरकारी रुग्णालयांची अनागोंदी
‘लोकप्रभा’च्या आरोग्य विशेषांकातील सरकारी रुग्णालयांवरील लेख वाचला आणि मला स्वत:ला केईएम रुग्णालयात आलेला अनुभव आठवला. तो काही फारसा चांगला नव्हता. रुग्णालयातील वॉर्ड्समधले टॉयलेट्स, अपघातग्रस्त विभागातील रुग्णांची व्यवस्था इतकेच नाही तर रुग्णांच्या मूलभूत सुविधांचीच तेथे वानवा आढळली. उशी, पांघरूण, पाणी या साध्या पण महत्त्वपूर्ण वस्तू उपलब्ध होत नाहीत. डॉक्टर्स सतत कामाच्या ओझ्याखाली असलेले दिसतील. अपघातग्रस्त विभागातील प्रक्रिया लांबलचक होती. तुम्ही रुग्णासोबत एकटे असाल तर ही सगळी परिस्थिती एखाद्यावर रडण्याची वेळ आणेल अशी असते. रुग्णांना घेऊन एक्स-रे, रक्ततपासणीसाठी धावाधाव करावी लागते. मी या सगळ्याचा अनुभव घेतलाय. माझ्या भावाचं याच दवाखान्यातील बारा क्रमांकाच्या वॉर्डमध्ये निधन झालं. त्याची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. त्याचं वाचणं तसं कठीणच होतं. पण, केईएममधले ते चार दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. दवाखान्याच्या त्या गलिच्छ वातावरणातून माझ्या भावाची लवकर सुटका होऊ दे, अशी मी प्रार्थना करत होतो. माझ्या सोबतीला आणखी कोणाला मी बोलवूही शकत नव्हते. कारण त्यांना त्या वॉर्डमधल्या अस्वच्छतेची लागण होण्याची शक्यता होती. दवाखान्याच्या स्टाफकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. परिचारिका उद्धट आहेत. विनंती करूनही गरम पाण्याची पिशवी दिली जात नाही. (माझ्या भावासाठी गरम पाण्याच्या पिशवीसाठी मी एका हॉटेलमध्ये गेलो. तिथल्या लोकांनीही देण्यास नकार दिला. पण, त्याची शेवटची इच्छा आहे असं सांगितल्यावर त्यांनी दिली.) कोणाचेही नातेवाईक त्या दवाखान्यात दाखल होऊ नयेत आणि त्यांना माझ्यासारखी वागणूक मिळू नये. माझा भाऊ मला दवाखान्याच्या डीनला तिथल्या अनागोंदी कारभाराविषयी सांगायला सुचवत होता. त्याने जिथे पाच र्वष काम केलं तिथेच अशा पद्धतीने मिळणाऱ्या वागणुकीमुळे माझ्या भावाला खूप दु:ख झाले होतं. या सगळ्या गोष्टी इथे सांगण्यामागचं कारण असं की, त्या दवाखान्यातल्या सोयी-सुविधांमध्ये सुधारणा व्हावी आणि इतर लोकांना माझ्यासारखा अनुभव येऊ नये.
– वैशाली आपटे, ई-मेलवरून.
२३ जानेवारीच्या आरोग्य विशेषांकामधील ‘सरकारी तरीही सर्वोत्तम’ हा लेख वाचला. लेख आवडला आणि पटलाही. कारण मी स्वत: या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. खासगी रुग्णालयातून चिकित्सा घेण्यासाठी लोक अमाप पैसा वाया घालवतात. सरकारी दवाखाने सर्वार्थाने उत्तम असतात. आरोग्यविषयक गंभीर मुद्दा मांडून महत्त्वाची माहिती या लेखात वाचायला मिळाली. त्यासाठी ‘लोकप्रभा’चे मन:पूर्वक धन्यवाद.
लखनसिंग सोरटे, ई-मेलवरून.
वाचनीय आणि मननीय ‘दत्त विशेषांक’
दत्त जयंतीनिमित्त काढलेला ‘दत्त विशेषांक’ अतिशय सुंदर, वाचनीय, मननीय असा आहे. विशेषत: ‘समन्वयाचा इतिहास’ हा मथितार्थ आवडला. त्यातील अभ्यासपूर्ण मजकुरामुळे दत्त संकल्पनेचा विचार वेगळा आणि मननीय वाटला. दत्तात्रेय हे दैवत जास्त करून महाराष्ट्रात पुजले जाते आणि दत्ताजवळ असणाऱ्या गाईमुळे आणि कुत्र्यांमुळे तो खूप मनाला भावतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्र असणेसुद्धा कुठे तरी मनाला दिलासादायक वाटते. पण त्यातील समन्वयाची झलक मात्र या लेखाच्या निमित्ताने समजली. अशा अभ्यासपूर्ण लेखासाठी मन:पूर्वक अभिनंदन! दत्ताची विविध सुरेख अशी चित्रेही या विशेषांकाची गोडी वाढवतात.
‘मालिकांचे दळण’ हा ‘छोटा पडदा’मधील लेख सामान्य प्रेक्षकांच्या भावना व्यक्त करणारा आहे. कुठलीही मालिका ठरावीक काळानंतर ती कंटाळवाणी होतेच होते. मग त्याला विविध फोडण्या देत प्रेक्षकांना पिळले जाते. उदाहरणार्थ ‘बालिका वधू’ या मालिकेत बालविवाह हा विषय घेतला होता, त्यावरील सर्व प्रकारचे भाष्य होऊनही ती मालिका चालविण्याचा अट्टहास का धरला जात आहे तेच समजत नाही. तेच आता ‘होणार सून मी..’ मालिकेचे होत आहे. जान्हवीच्या आईच्या रेखाटनातून नक्की काय दाखवायचे आहे तेच समजत नाही. खरे तर आमिर खान याने ‘सत्यमेव जयते’चे ठरावीक भाग करून थांबण्याची छान सुरुवात केली आहे, तेच या मालिकेनेसुद्धा करून दाखविले होते. पण अशा चांगल्या प्रयत्नाचे अनुकरण केले जात नाही, कारण व्यावसायिकतेच्या नावाखाली मालिका रेटणे जास्त फायद्याचे ठरत असावे.
– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव,
मुंबई, ई-मेलवरून.
‘नो मोबाइल डे’ ही गरज
तेजल शंृगारपुरे यांनी हलक्याफुलक्या शब्दात आजची मोबाइलसंबंधीची एक मोठी समस्या पुढे आणली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मोबाइल त्याच्या विविध उपयोगांमुळे जीवनाचा एक अत्यावश्यक भाग होऊन बसला आहे. तरीही त्याचा अतिरेक होऊन त्याचे व्यसन लागावे हे चुकीचेच आहे. आज तरुण पिढीच्या अगदी मुलांच्याही हातात मोबाइल हे अत्यावशक खेळणे झाले आहे. ते त्यांना सहजपणे मिळतेही आहे. त्यामुळे त्याचा गैरउपयोग होणे पर्याप्त आहे. सवयीचे व्यसन केव्हा होते हे मोठय़ांनाही कळत नाही तर लहान मुलांची गोष्टच निराळी.
इंटरनेट आणि मोबाइल ही एका दृष्टीने अभद्र युती आहे. मोबाइलच्या लहान आकारामुळे कुणाच्याही नकळत नजर चुकवून तो वापरता येतो. त्यामुळे त्याच्या दुरुपयोगावर नजर ठेवणे हे अधिकच कठीण झाले आहे. आपला मुलगा किंवा मुलगी मोबाइलच्या व्यसनाधीन व्हावी असे आई-वडिलांना कधीच वाटणार नाही. पण त्यावर उपाय काय ते कळत नसल्याने बहुतांश आई-वडील हतबल झालेले दिसतात. तेजल शंृगारपुरे यांनी लिहिल्याप्रमाणे ‘नो मोबाइल डे’ किंवा ‘डेज’ स्वेच्छेने अमलात आणले गेल्यास व्यसनातून मुक्त होण्यास नक्कीच मदत होईल. पण त्यासाठी प्रथम आपण कुठे तरी चुकतो आहोत याची जाणीव व्हावयास हवी.
सुरेश देवळालकर, हैदराबाद.
‘लोकप्रभा’च्या ३० जानेवारीच्या अंकातील डॉ. संदीप साखरे यांच्या ‘कोकणची सायकल सफर’ हा लेख खूपच छान आहे.
समीर हर्डीकर, कल्याण, ई-मेलवरून.
मी ‘लोकप्रभा’चा नियमित वाचक आहे. मला ‘लोकप्रभा’ला दाद द्यावीशी वाटते, कारण साहित्य, कला, पर्यटन आणि संगीत अशा अनेकरंगी बहुविध विषयांची माहिती त्याद्वारे मिळते. महत्त्वाचं म्हणजे ही माहिती वाचकाला समजेल अशी आणि अंतर्मुख करायला लावणारी असते. लोकांना कळणाऱ्या प्रभावी भाषेत निघणारा प्रत्येक अंक हा एक उत्तम नमुना असतो. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
मुकुंद इंगळे, ई-मेलवरून.