धोक्याचा इशारा दुर्लक्षित करू नये…

‘पृथ्वीचे तापणारे हवामान- सत्य किती? तथ्य किती?’ या अत्यंत महत्त्वाच्या (आणि माझ्या आवडत्या) विषयावरील कव्हरस्टोरीतील लेख वाचून आनंद झाला. २०१४ साली आयपीसीसीने नवा अहवाल प्रसिद्ध केला lp06आहे, पण या लेखात त्याचा कुठेच उल्लेख झालेला नाही, हे मात्र खटकले. या अहवालात त्यांनी जुन्याच भूमिकेचा ठामपणे पुनरुच्चार केला आहे.
१. गेल्या तीन दशकांतील तापमान, सन १८५० नंतरच्या कुठल्याही दशकापेक्षा क्रमश: अधिक होते. २. उत्तर गोलार्धाचा विचार केला तर, गेल्या १४०० वर्षांत ‘१९८३ ते २०१२’ हा तीस वर्षांचा कालखंड बहुधा सर्वाधिक उष्णतेचा होता. (बहुधा म्हणजे ६६ ते १०० टक्के शक्यता) ३. कार्बन डाय ऑक्साइड वायू सागरी जलात शोषला जाऊन सागरी जलाचे मोठय़ा प्रमाणावर आम्लीकरण झालेले आहे. सागर जलाची आम्लता (पीएच) २६ टक्क्याने वाढली आहे. अर्थातच याचा सागरी प्रजातींवर अनिष्ट परिणाम होत आहे. ४. दोन्ही ध्रुव, हिमालयादी पर्वत शिखरे यातील बर्फ वितळत असून त्यामुळे जलसंसाधनांची संख्या व गुणवत्ता यावर अनिष्ट परिणाम होत आहे. ५. उपाययोजना केली नाही तर, या शतकाच्या अखेपर्यंत आपल्याला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल. ६. कार्बन डाय ऑक्साइडच्या उत्सर्जनाचे वनस्पतींवर काहीही दुष्परिणाम होत नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. हा अहवाल म्हणतो की- Assessment of many studies covering a wide range of regions and crops shows that negative impacts of climate change on crop yields have been more common than positive impacts (high confidence).
यामुळे मानवजातीच्या अन्न सुरक्षेवरही दुष्परिणाम होऊ शकतो. ही यादी अशीच खूप वाढवता येईल. प्रश्न तोच आहे, जो आपण विचारला आहे – ‘सत्य किती? तथ्य किती?’ कोण बरोबर आहे, आयपीसीसी का टीकाकार? पर्यावरणवाद्यांचा मूळ मुद्दा बरोबर असला तरी काही वेळा त्यांच्याकडून अतिरेक व अतिशयोक्ती होत असते व त्यामुळे कार्यनाश होऊ शकतो, असे मला वाटते. तसेच, व्यावहारिक पातळीवर या प्रश्नावर उपाय शोधताना, हा केवळ वैज्ञानिक विषय न राहता, त्यातील राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व अगदी धार्मिकदेखील पैलू लक्षात येतात. पहिला मुद्दा विकसित देश विरुद्ध विकसनशील देश असा येऊ शकतो. कोळसा जाळून वीजनिर्मिती केल्यास प्रदूषण होते, हे मान्य. पण मग भारत व चीन यांसारख्या देशांनी काय करायचे? दोन्ही देश मिळून २७५ कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या आहे. त्यांची ऊर्जेची गरज कशी भागणार? व्यावहारिक पातळीवर, राज्यकर्ते व अर्थतज्ज्ञ तातडीच्या व तात्कालिक गरजांच्या प्रश्नांकडे अधिक प्राधान्यक्रमाने पाहणार हे उघड आहे. या कारणांमुळेच आयपीसीसीवर एवढी जहरी टीका होते, असे वाटते. अर्थात आयपीसीसीने दिलेले धोक्याचे इशारे दुर्लक्षित करण्याजोगे नाहीत, हेच सत्य आहे, असेच माझे मत आहे.
प्रमोद पाटील, नाशिक, ई-मेलवरुन

चष्टनाने सुरू केले शालिवाहन शक

निरंजन
शालिवाहन शकाचे श्रेय कनिष्क वा चष्टन या कार्दमकवंशीय लहान सत्ताधाऱ्याला देण्याचा प्रयत्न चुकीचा lp07आहे. कनिष्क हा शक नव्हता, त्यामुळे तो शक संवत सुरू करण्याची शक्यता नव्हती. चष्टन हा एक सामान्य शक अधिपती होता, त्यामुळे त्याने संवत सुरू करण्याची वा उत्तर ते दक्षिणेतील लोकांनी स्वीकारण्याचीही शक्यता नव्हती. तेवढे मुळात त्याचे राज्यही नव्हते. असे असताना शालिवाहन शकाचे क्रेडिट चष्टनाला देण्यात कितपत अर्थ आहे हे संशोधकांनाच माहीत. स्थानिक गुढीपाडव्याच्या सणाची मुळे आक्रमकांत शोधणे योग्य आहे का?

श्रीराम थोरवे
हिंदू रूढीला चुकीचे ठरवून प्रसिद्धी मिळविण्याची क्लृप्ती वाटते.

उदान
सम्राट कनिष्कने चौथी धर्म परिषद इ.स. ७८ मध्ये घेतल्यानंतर, धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी चीन, मंगोलिया व इतर ठिकाणी प्रचारक पाठविल्याचा उल्लेख रोमिला थापर यांनी केला आहे. सम्राट कनिष्क हे शाक्य वंशीय बुद्धांचे अनुयायी असल्याने ‘शाक्य’ शब्दाचा अपभ्रंश ‘शक’ ही शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक बौद्ध (शाक्त) परंपरे प्रमाणे केल्यानंतर शके संवत सुरू केला, अर्थात शके संवत या काल सारणीचा संबंध बौद्ध परंपरेशी अर्थात सम्राट कनिष्काशी दिसतो.

श्रीनिधी घाटपांडे
कनिष्क कुशाण होता. शाक्य नाही. शिवाजी महाराजांनी शाक्त पद्धतीने अभिषेक करवला, शाक्य नाही.

जीत
भारतीय लोकांनी मात्र यामध्ये शालिवाहन राजाने शक राजाला हरविल्याची स्मृती कायम ठेवली, पण संवत्सर सुरू करणारा राजा हा कोणी तरी दुसराच होता हे ते विसरून गेले. गोष्ट चिकित्सक अभ्यासकाला पटणारी नाही. ज्या वेळेस कालगणना होते व अभ्यासकांकडून, तज्ज्ञांकडून एक मत होते ते काही कोणाच्या ‘हार-जीत’शी क्वचितच संबंधित असते. लेखनातील तर्क कोणत्या पुराव्यावर मांडले आहेत.

अज्ञान दूर करणारे विश्लेषण
केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण करणारे लेख प्रकाशित करुन जनसामान्यांचे अज्ञान दूर करण्याचा ‘लोकप्रभा’ने केलेला प्रयत्न चांगला आणि यशस्वी आहे. कारण शेवटी काय ‘सत्ता’ आणि ‘पक्ष’ यापेक्षा देशाचे हित महत्त्वाचे असते. या सरकारचा अर्थसंकल्प हा कसा प्रागतिक, भविष्यलक्षी, वास्तववादी आणि आश्वासक आहे हे विश्लेषण ‘आम’ आदमीला समजण्यासारखे होते.
त्याचबरोबर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रियांना हृदय सांभाळायला सांगणारा लेख उल्लेखनीय होता. युवक आणि स्त्री ह्य़ा समाजातील महत्त्वाच्या घटकांना चांगल्या आरोग्यासाठी भोगविलासाकडून योगविलासाकडे जाण्याचा जो मार्ग सांगितला आहे तो खूपच प्रभावी आहे.
– विवेक द. उराडे, नातेपूते (जि. सोलापूर)

स्फूर्तिदायक व वाचनीय अंक
‘लोकप्रभा’ वर्धापनदिन विशेषांक आवडला. आपण मांडलेली व्यक्तिमत्त्वं ही आकर्षक तर आहेतच, पण त्यांच्याकडून समाजाला खूप शिकण्यासारखे आहे. अंकातील ‘अनाथांचा प्रकाशकिरण’ हा लेख विशेष आवडला. कारण मी स्वत: त्यापैकीच एक आहे. समाजातील काही उच्चभ्रू घटक कसे हीनपणे वागतात त्याची ही पावतीच आहे. असो, देव या महाभागांना क्षमा करो.
बाकी अंक निश्चितच स्फूर्तिदायक व वाचनीय आहे. अशा प्रकारच्या अंकाची किंमत वाढवली तरी हरकत नाही.
पी. जे. बावडेकर, पुणे</strong>

स्वाइन फ्लूचे मार्गदर्शन
गेल्या काही आठवडय़ांपासून स्वाइन फ्लूच्या राज्यभरातील धुमाकुळाच्या बातम्या येत होत्या. अनेक उलटसुलट चर्चादेखील ऐकायला आल्या, राज्यकर्त्यांनी आपल्या अकलेचे तारेदेखील तोडले. या पाश्र्वभूमीवर ‘लोकप्रभा’ची स्वाइन फ्लूवरील विशेष मुखपृष्ठ कथा वाचली. अत्यंत संयत पद्धतीने आणि अभ्यासपूर्वक अशी मांडणी असलेले दोन्ही तज्ज्ञांचे लेख वाचून अनेक शंका दूर झाल्या. बऱ्याच वेळी आरोग्यविषयक चर्चा या केवळ आकडेवारी आणि आरोप-प्रत्यारोपांनीच भरलेल्या असतात. तो नेमका भाग टाळून स्वाइन फ्लूची साद्यंत आणि अभ्यासू माहिती आपण दिल्याबद्दल धन्यवाद. आरोग्यविषयक प्रश्न हाताळताना केवळ उपायांचा भडिमार करून चालत नाही. आजाराविषयीचे नेमके मार्गदर्शन त्यात अपेक्षित असते. तेच आपण केले आहे. हे दोन्ही लेख वाचल्यावर प्रश्न पडला तो असा की शासनाला अशा प्रकारे एखाद्या विषयाची मांडणी का करता येत नाही? की त्यांना ती करायचीच नसते.
केतकी पाटील, कोल्हापूर.

मी जरी पार्लेकर नसलो तरी रांगणेकर यांनी लिहिलेला ‘कैलासवासी पार्ले’ हा लेख मनापासून आवडला. नव्या जुन्या पाल्र्यातील घडलेल्या थोर लोकांबद्दल वाचणं आनंददायी होतं.
– शैलेश महाजन, ई-मेलवरून

वर्धापनदिन विशेषांकातील डॉ. किरीट मनकोडी यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा विनायक परब यांचा लेख उत्तम आहे. डॉ. मनकोडी हे खरेखुरे भारतीय हिरो आहेत. सर्व भारतीयांनी त्यांचे ॠण मान्य करावे लागेल.
प्रशांत कदम, ई-मेलवरून

३ एप्रिलच्या अंकातील नंदन कलबाग यांचा ‘विलायती पालक’ हा लेख वाचला. सदर लेख माहितीपूर्ण तर आहेच, पण रंजकदेखील आहे.
– अंकिता लेले, ई-मेलवरून