‘लोकप्रभा’ ३ एप्रिलच्या अंकात पृथ्वीच्या तापणाऱ्या हवामानासंबंधात तीन लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्या संबंधात माझे विचार मांडतो. अलीकडच्या काळात शाश्वत विकास ही संकल्पना जोर धरते आहे. मला सिमेंट उद्योगाबद्दल माहिती आहे. त्यात शाश्वत विकास कसा केला जातो आहे ते सांगतो.
१) सिमेंट बनविण्याच्या प्रक्रियेत चुनखडी तापविताना आणि ती तापविण्यासाठी इंधन (मुख्यत: कोळसा) जाळताना अशा दोन्ही टप्प्यांवर निर्माण होणारा कार्बन डाय ऑक्साइड हवेत सोडला जातो. एक टन साधे पोर्टलॅण्ड सिमेंट तयार करताना ०.७६ टन कार्बन डाय ऑक्साइड वातावरणात सोडला जातो. पण तेच ब्लेण्डेड सिमेंट (पोझ्झोलाना आणी स्लॅग) तयार करताना टनामागे अनुक्रमे ०.५३ आणि ०.३० टन इतकाच कार्बन डाय ऑक्साइड वातावरणात सोडला जातो. दुसरा फायदा असा की तितक्याच चुनखडीत अधिक सिमेंट तयार होते. तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा फायदा असा की फ्लाय अॅश अॅण्ड स्लॅग ही पॉवर स्टेशन आणि स्टीलच्या कारखान्यांचे वेस्ट्स आहेत. त्या डिस्पोज करण्याच्या समस्या कमी होतात. ही सिमेंट्स बनविण्याचा खर्चही कमी असतो.
२) सिमेंट किल्न आणि क्लीन्कर कूलरमधून हवेत सोडले जाणारे गॅसेस ३००-२०० डिग्री सेंटीग्रेड उष्णतामानाचे असतात. सध्या त्यापासून वीज निर्माण केली जात आहे. (६ं२३ी ँीं३ १ीू५ी१८) ती ग्रिड विजेपेक्षा स्वस्त असते आणि ह्य़ा निर्मितीत कार्बन डाय ऑक्साइडचा प्रश्नच उद्भवत नाही
३) जगातील कोळशाचे / तेलाचे साठे संपत जाणारे आहेत. पर्यायी इंधन म्हणून निरनिराळ्या प्रकारचे वेस्ट्स वापरता येतात. युरोपमध्ये ४० टक्के पर्यायी इंधन वापरले जाते. जैविक वेस्ट्स साधारणत: कार्बन न्युट्रल असतात. वेस्ट्स वापरण्याने फॉसिल्स इंधने वाचतात. ग्रीन हाउस गॅसेसचे उत्सर्जन कमी होते. कचऱ्यापासून इंधन बनविता येते. ते सिमेंट किल्नमध्ये काही प्रमाणात कोळशाची जागा घेऊ शकते. अशा रीतीने समाजालाही फायदा होतो.
४) वीज मुख्यत्वे कोळसा जाळून निर्माण केली जाते. विजेच्या तुटवडय़ामुळे बहुतेक सिमेंट कारखान्यांत त्यांचे स्वत:चे थर्मल पॉवर स्टेशन असते. तेही प्रदूषण करतात. सौर आणि पवन ऊर्जा ह्या शाश्वत ऊर्जा आहेत, त्यांना इंधन लागत नाही. देखरेखीचा खर्चही तुलनेत कमी असतो.
सिमेंट कारखाने म्हणून आता ह्य़ा नैसर्गिक ऊर्जाकडे वळू लागले आहेत. आता जरी भांडवली खर्च जास्त असला तरी नजीकच्या भविष्यकाळात तो स्वस्त होईल. यांच्यामुळे ग्रीन हाउस गॅसेस प्रदूषण होत नाही. भारतीय सिमेंट उद्योग अशा अनेक प्रकारे शाश्वत विकासाचा पाठपुरावा करीत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.
या सर्वावरून लक्षात येईल की ग्रीन हाउस गॅसेस उत्सर्जन कमी करण्याचे अनेक पर्याय आहेत. सुरुवातीला भांडवली खर्च करावा लागतो, पण उत्पादनाचा खर्च कमी असतो. भांडवली खर्चाचा परतावा मिळण्याचा कालावधी रिझनेबल आहे. तेव्हा जरी ग्रीन हाउस गॅसेस, ग्लोबल वॉर्मिगचा धोका आणि त्याचे दुष्परिणाम आता अतिशयोक्तीचे वाटत असले तरी खबरदारीचे उपाय अमलात आणून ग्लोबल वॉर्मिग नियंत्रणात ठेवण्याचे फायदेच आहेत. हे फायदे फक्त त्या त्या उद्योगापुरतेच मर्यादित नसून समाजालाही त्यामुळे फायदाच होतो. आयपीसीसी आणि इतर संस्थांनी दिलेले इशारे आपल्या हिताचेच आहेत असे समजण्यास हरकत नसावी. विकास चालू राहील-पर्यावरण सांभाळून, नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करून आणि तो दीर्घकालीन शाश्वत असेल.
सुरेश देवळालकर, हैद्राबाद, ई-मेलवरून.
फेमिनिझमच्या बुरख्याआडचा मुखवटा
मंदार खंडागळे
अतिशय सुंदर लेख. मूळ मुद्दय़ाला हात घातला आहे. किती उघडपणे, पण तरीही आपल्याला न कळू देता व्होग या कंपनीने त्यांचा छुपा अजेंडा सर्वासमोर आणला. उत्तम मार्केटिंगचा नमुनाच म्हणावे लागेल.
अमोल
हा व्हिडीओ हे सबलीकरण नव्हे तर एक असे बंड आहे ज्यात चांगल्या-वाइटचा बिलकूल विचार न करता मला जे वाटेल मग ते करताना माझ्या कुटुंबाचे काहीही होवो, त्याच्याशी मला काहीही करायचे नाही अशीच प्रवृत्ती पुरस्कृत केली जातेय. बऱ्याच बाबींशी सहमत आहोत ते तसं झालं पाहिजे, पण माझ्या शरीरावर माझा हक्क आहे म्हणून विवाहबाह्य़ सबंध ठेवायचे की नाही हे मीच ठरवेल ह्य़ासारख्या हीन दर्जाच्या विचाराला कुठलाही सुसंस्कृत समाज मान्यता देणार नाही हीच बाब पुरुषांसाठीही लागू होते. एवढय़ा मुक्त विचाराचे असल्यावर लग्नच का करावं?
आरजे
व्हिडीओ पहिला नाही. परंतु येथील चर्चा पाहून एक मुद्दा मिसिंग आहे असे वाटते आणि तो म्हणजे दीपिका बाईंनी त्यांचा चॉइस व्हिडीओ त्यांच्या दृष्टिकोनातून समाजसुधारणा व्हावी ह्य़ा उद्देशाने फुकट केलाय की कोणी मोठी बिदागी दिली व कुणीतरी भलत्यानेच लिहून दिले म्हणून व्हिडीओ करण्याची कल्पना सुचलीय? काही पुरुषांनी लगेच प्रत्युत्तर दिले त्यावरून त्यांना बरेच झोंबले असावे असे वाटते. आणि ते इतके की ‘तुझा चॉइस आवडला’ असे सांगताना स्वतचीच हीन मवालीपणाची मानसिकता उघड होतेय याचेही भान राहिले नाही?
विजय
भोंदूपणा हा भारतीय समाजाला भेडसावणारा शाप आहे आणि त्यापासून हिंदी चित्रसृष्टी अलिप्त न कधी होती ना कधी असेल. इतर समाज आपला भोंदूपणा आपापल्या सोयीनुसार महापुरुष किंवा महामहिला निवडत अनेक जयंत्या-पुण्यतिथ्यांतून दाखवत असतो, चित्रसृष्टी असल्या व्हिडीओतून दाखवते हाच काय तो फरक.
सत्य परिस्थिती मांडणारा लेख
‘बालनाटय़ाचा बाजार रोखणार कोण?’ हा २४ एप्रिलच्या अंकातील लेख खरोखर विचार करण्यासारखा आणि सत्य आहे. जे लिहिलंय तशीच कार्यप्रणाली सध्या प्रचलित आहे. मुलांना खरोखर शिकविणारी शिबिरे कमी आणि दाखवणारी जास्त अशी परिस्थिती आहे. आमची अख्खी पिढी ‘आविष्कार’ आणि ‘दुर्गा झाली गौरी’सारख्या अभिजात बालनाटय़ामुळे घडली, ज्यात सुकन्यासारखी उत्कृष्ट अभिनेत्रीसुद्धा होती.
पण त्याचबरोबर वरील लेखात निर्देशित केलेल्या माननीय व्यक्तींबरोबरीने एक तितकेच महत्त्वाचे नाव उल्लेखण्याचे राहून गेलेले दिसतेय ते म्हणजे सुलभा देशपांडे. सुलभाताईंच्या उल्लेखाशिवाय बालनाटय़ किंवा बालरंगभूमी हा विषय पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी हा पत्रप्रपंच. केवळ आविष्कारचा एक विद्यार्थी या नात्याने हे मांडावेसे वाटते.
निनाद देशपांडे, ई-मेलवरून
वॉशिंग मशीनची माहिती उपयुक्त
वॉशिंग मशीन घेताना (लोकप्रभा, २० फेब्रुवारी) हा लेख फारच उपयुक्त व माहितीपूर्ण आहे. कमी पाण्याचा वापर करणे व वीज वापरातही कपात करणे किंवा कमी वीज उपयोगात येणारी उपकरणे वापरणे हीसुद्धा काळाची गरज आहे. यासाठी वॉशिंग मशीन घेताना आपण केलेल्या सूचना कुटुंबीय निश्चित विचारात घेतील व त्या अनुषंगानेच विविध घरगुती उपकरणे खरेदी करून बचतीचा मार्ग, काटकसरीचा मार्ग स्वीकारतील अशी अपेक्षा आहे. वॉशिंग मशीनची क्षमता, फीचर्स, कपडे धुण्याची पद्धती, मशीन कोणत्या कंपनीचे घ्यावे या सर्व बाबी गृहिणी महिलांसाठी अत्यंत उपयुक्त, माहितीपूर्ण व काटकसरीच्या आहेत. त्यामुळे लोकप्रभाला लाख-लाख धन्यवाद.
महाशिवरात्रीनिमित्त ‘चिरंतन शिवकीर्तन’ या अंतर्गतची माहितीही ज्ञानात भर टाकणारी आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधून ही माहिती घारापुरी बेटावर जाण्यासाठी ज्ञानपूर्ण ठरेल एवढे निश्चित!
– धोंडीरामसिंह ध. राजपूत, वैजापूर, जि. औरंगाबाद.
वॉशिंग मशीनच्या माहितीत नावीन्य काय?
वॉशिंग मशीनसंदर्भातील लेख वाचला. लेखकाने मांडलेले मुद्दे हे विचार करण्यासारखे आहेत, मात्र ते बहुतांशपणे सर्वानाच माहितीदेखील असतात. पण लेखकाने ठरावीक एखादे मशीन खरेदी करावे, असे सूचित केले नाही. त्यामुळे हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. अशा लेखांमुळे नेमके मार्गदर्शन होत नाही.
पुंडे व्ही. व्ही., ई-मेलवरून.
मनातलेच विचार
‘फेमिनिझमच्या बुरख्याआडचा मुखवटा’ हा लेख वाचनीय आहे. जणू माझ्या मनातलेच विचार उतरलेत. स्त्रीवाद नावाच्या चेहऱ्यामागे बरेच भोंगळ राजकारण, अर्थकारण आणि स्त्रियांच्या भावनांचा विनाकारण केलेला खेळ आहे. लेखासाठी मनापासून धन्यवाद.
विनिता दुधाट, ई-मेलवरून.
खऱ्या समाजसेवकांची ओळख
सर्वप्रथम ‘लोकप्रभा’चे धन्यवाद. मी आपला एक नियमित वाचक आहे. आपल्या अंकातील सर्वच लेख हे वाचनीय व ज्ञान देणारे असतात. २७ मार्चचा ‘लोकप्रभा’चा वर्धापनदिन विशेषांक तर खूपच महत्त्वाचा आहे. या विशेषांकातून खऱ्या समाजसेवकांची माहिती मिळाली. विशेष म्हणजे यातून मला ‘मराठी काका’ भेटले. आपल्या कामाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
– विष्णू पूनमचंद राठोड, पुणे, ई-मेलवरून.
नि:स्वार्थी कार्यकर्त्यांची ओळख
‘लोकप्रभा’चा वर्धापन दिन विशेषांक अत्यंत माहितीपूर्ण होता. समाजातील दुर्बलांना आधार देणाऱ्या नि:स्वार्थी कार्यकर्त्यांबद्दल वाचून आनंद झाला.
माधवी दातार, ई-मेलवरून.