मोदीजी, जमिनीवर या!
दि. ५ जून २०१५ चा लोकप्रभा वाचला. ‘असमाधानाचे जनक’, या राजेंद्र साठे यांनी लिहिलेल्या कव्हर स्टोरीतील विचार पटले.
लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी मोदींनी जणू आभास मंडळच स्थापन केले होते. ते वर्षभरातच निराशेच्या वादळांनी आच्छादित झाले आहे. त्यांच्या निवडणुकीपूर्वीच्या घोषणा फोल ठरू लागल्या आहेत. विदेशी बँकांमध्ये घर करून बसलेला काळा पैसा भारतात येईल व प्रत्येक भारतीयाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा होतील, असं गाजर त्यांनी दाखवलं होतं. पण माझं खातं तर अजून रितंच आहे. तसंच दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातून खेचून बाहेर आणू हे विधानही फोल ठरलं आहे. सुरुवातीला शाल व साडीची देवाण-घेवाण झाली पण पूर्वानुभवाप्रमाणे पाकनीती तशीच राहिली.
भाजपने म्हणजे पर्यायाने मोदी यांनी सत्तेच्या मोहाला बळी पडून जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत पीडीपीशी हातमिळवणी करून आपले सिद्धांतदेखील (जसे ३७० कलम हटविणे) धुळीस मिळविले. वर्षभरात एकही भ्रष्टाचाराचा मामला नाही असे छातीठोकपणे सांगितले जाते. पण भाजपशासित मध्य प्रदेशात आय.ए.एस.पासून ते पर्यंत कोटय़धीश झालेली प्रशासकीय यंत्रणा पाहता भ्रष्टाचार नाही असे कसे म्हणता येईल? देशात विशिष्ट शाळांमधील शिक्षक-शिक्षिकांचे आर्थिक शोषण कसे काय पंतप्रधानांच्या किंवा शिक्षणमंत्र्यांच्या लक्षात कसे येत नाही याचेच नवल वाटते.
एकंदरीत वर्षभराचा आढावा घेता सामान्य जनतेच्या वाटय़ाला मात्र निराशाच आली आहे. मोदींनी ओबामांना भेटताना एकीकडे दहा लाखांचा सूट वापरला आणि दुसरीकडे ते संसदेच्या कॅन्टीनमध्ये २९ रु. (एकोणतीस रु.) चे जेवण जेवले. दोन्ही बातम्यांची चर्चा झाली. सामान्य जनता मात्र महागाईचा मार झेलायला आहेच.
बांगलादेशमध्ये महिलांचे गुण गाणारे, ‘बालिका बचाओ’, ‘बालिका पढाओ’चे आवाहन करणारे पंतप्रधान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसे वागले ही व्यक्तिगत बाब असली तरी पंतप्रधान या नात्याने समाजप्रमुख म्हणून ती बाजूला करता येत नाही. त्यामुळेच त्यांची ही प्रतिमा आमच्या मनात तरी डागाळलेली आहे.
परराष्ट्रनीती सक्षम करण्याचे त्यांचे धोरण असेल तरी ते कार्य परराष्ट्रमंत्र्यांनी केलेले बरे वाटले असते. भूमिअधिग्रहण बिल व तिसऱ्यांदा आणलेला अध्यादेश मोदींनी स्वत:च्या पायावर कुऱ्हाडच मारून घेतली आहे. देशात शेतकरी तर मरतोच आहे ना!
लेखाच्या सुरुवातीला लेखकाने जे अमेरिकेचे अध्यक्ष ओबामांचे उदाहरण प्रस्तुत केलेले तंतोतंत पटणारे आहे.
म्हणून मोदीजी, आपल्याला सांगावेसे वाटते आहे की, विदेशयात्रांना आळा घाला, घोषणावीर बनू नका व जमिनीवरच राहा.
– संध्या रामकृष्ण बायवार
बानापुरा, जि. होशंगाबाद (म.प्र.)
ब्रेकअपनंतरचे प्रेम
‘ब्रेकअपनंतरचे प्रेम’ ही प्राची साटम यांची गोष्ट वाचली. नेहमीच्या आयुष्यातलं एक अंग म्हणून एक्स्पायरी डेट असलेली आताची नाती. प्रेम आणि शारीरिक गरज यातला फरक काय हे पण त्यांना काळत नाही. कमिटमेंट नको म्हणजे जबाबदारी नको. कारण जबाबदारी ही आजच्या पिढीला तिच्या फ्रीडममध्ये नकोशी वाटत असते. मग ते प्रेम कसे? आपण आपल्या पार्टनरला धोका देत आहोत याचा त्या व्यक्तीला त्रास होत असेल तर त्याचा अर्थ प्रेमाचा धागा शिल्लक आहे. पण ही जाणीव असूनही तो किंवा ती दुसरीकडे स्वत:ला गुंतवत असेल तर याचा विचार करायला हवा की हे दुसरे प्रेम आहे की काय आहे. (आणि मुलंच फसवतात असे नाही. किती तरी मुली वेळा फक्त फायद्यापुरता वापर करून घेतात. लेखिकेने दोन्ही वेळा मुलंच फसवतात, असे दाखवले आहे.) माणसे भरकटतात, कारण त्यांना कळतंच नाही मैत्री आणि प्रेम काय असते.
लेखिका शेवटी म्हणते, ‘हु केअर्स?’ खरंच कोणाला काहीच पडलेले नाही. त्यांची स्टोरी त्यांना पुढे न्यायची असेल तर नेतील नाही तर अजून कोणाच्या जीवनामध्ये साइड रोल म्हणून उभे राहतील, पण शेवटी कुठे तरी हे नाते त्यांच्या मनात घर करून राहीलच आणि याचा दोष ते स्वत:ला देतील किंवा आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीला जुन्या नात्यांच्या भिंगातून पाहतील.
प्रणव जोशी.
शेवग्याचे महत्त्व
‘लोकप्रभा’ ५ जून २०१५च्या अंकात पान १३ वरील वाचक प्रतिसादात एका वाचकाचे शेवग्याचे औषधी उपयोग काय यासंबंधी विचारणा करणारे पत्र वाचले. त्यामुळे हे पत्र लिहीत आहे. शेवगा पानात जीवनसत्त्व ‘क’ असते. हे ‘रक्त’वाढीस आवश्यक असून त्यामुळे लोहाचे शोषण चांगले होते, जीवनसत्त्व ‘क’ कमी असेल तर दात हालतात . यासाठी शेवग्याच्या पानांचा उपयोग करावा. हिरडय़ा वारंवार सुजत असतील तर त्यासाठी याचा उपयोग करावा.
शेवग्याला लॅटिनमध्ये ‘मोरिंगा ऑल हफेरा मोरेंगो टेरिगोस्वर्मा’ म्हणतात. याच्या वापरामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुधारून जास्त मूत्रोत्पत्ती होते.
– डॉ. रा. म. साठय़े
(माजी अधिष्ठाता, रा.आ. पोदार वैद्यक महाविद्यालय व म.आ. पोदार रुग्णालय, वरळी, मुंबई-१८)
‘मनोमनी’ आवडले
‘लोकप्रभा’ हे साप्ताहिक दिवसेंदिवस जास्तच आवडायला लागले आहे. लोकप्रभातील विविध लेख वाचताना आपले आपल्या आसपासच्या गोष्टींबद्दलचे, विविध विषयांबद्दलचे ज्ञान किती तोकडे असते हे जाणवते. अलीकडच्या काळातले डॉ. जान्हवी केदारे यांचे लेख मला आवडले. ‘लोकप्रभा’ला माझ्या शुभेच्छा.
संकेत नगराळे (ई-मेलवरून).
‘लोकप्रभा’ असाच टेकसॅव्ही राहो..
मी ‘लोकप्रभा’चा नियमित वाचक आहे. हे साप्ताहिक दिवसेंदिवस अधिकाधिक माहितीपूर्ण होत चालले आहे. १९ जूनच्या अंकातील क्लाऊड कॉम्प्युटिंगचा लेख वाचून तर माझे हे मत अधिकच पक्के झाले असे मी म्हणेन. लेखातून फ्री क्लाऊड कॉम्प्युटिंगसंबंधीच्या विविध लिंक दिल्याबद्दल प्रशांत जोशी यांचे आभार. वैद्य खडीवाले यांचा सुक्या मेव्यासंदर्भातला उपयुक्त लेखही आवडला. डबस्मॅश या ट्रेंडची लोकप्रभाने दखल घेतल्याचे बघून बरे वाटले. विविध अॅप्लिकेशन्स, मोबाइल, टीव्ही मॉडेल्स, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन्स, एमपीथ्री प्लेअर्स अशा विविध गॅझेट्सबद्दल सतत माहिती देणारा ‘लोकप्रभा’ नेहमी असाच टेकसॅव्ही रहावा अशी अपेक्षा.
गिरीश गावस्कर, विलेपार्ले.
‘कशिश’चा नवा दृष्टिकोन
‘कशिश’ या मुंबईतील ‘गे’ फिल्म महोत्सवाचा ‘लोकप्रभा’ने दिलेला तटस्थ वृत्तांत ‘गे’ नसलेले समीक्षक, जाणकार पत्रकार, चोखंदळ प्रेक्षक यांनाही विचार करायला लावणारा आणि माहितीपूर्णही आहे. अशा प्रकारचा वृत्तपत्रीय मजकूरही संदर्भ पुरवत असतो. मानवी हक्कांचा मुद्दाही मांडतो. समाजातले ‘गे’ लोकांबद्दलचे गैरसमज व अज्ञानमूलक तिरस्कार कमी करण्यासाठी केवळ ‘कशिश’ सारखे चित्रमहोत्सवच नव्हेत, तर ‘लोकप्रभा’सारखी आधुनिक विचारसरणीची साप्ताहिकेही कारणीभूत ठरतील यात वाद नाही. असे विषय सरसकट विकृत ठरवून नाकारणाऱ्या कोकणातील एखाद्या लहान दैनिकाच्या तुलनेत हे विशेषत्वाने जाणवले. एक नवा दृष्टिकोन ‘लोकप्रभा’ देत आहे!
माधव गवाणकर, दापोली.
तक्ता चुकीचा..
‘लोकप्रभा’तील एअर कंडिशनरविषयीचा लेख वाचला. मी स्वत: एसीचा वितरक आहे. एसीविषयीच्या लेखातील एसीची क्षमता आणि जागा यांच्याविषयीचा तक्ता चुकीचा आहे. त्या विषयी पूर्ण माहिती घेऊन मगच असे लेख प्रसिद्ध करावेत ही विनंती. अशा माहितीतून लोकांची दिशाभूल होते याची कृपया दखल घ्यावी.
सचिन बहीर (ई-मेलवरून).
‘हॉलीवूड बीचवर एक दिवस!’ वाचून खूप मजा आली आणि नक्की कसं असेल तिथले ठिकाण याचा मनात विचार सुरू झाला. मुंबईत अशी ठिकाणे नाहीच मुळी आणि सरकारलादेखील तशी गरज वाटत नाही.
– राजू शिंदे (ई-मेलवरून).
जॉर्डन दर्शन आवडले.
डॉ. सुनील राजपूत, औरंगाबाद (ई-मेलवरून).
..तरीही टीका होणारच
‘लोकप्रभा’ ५ जून २०१५ मधील ‘केवळ टीका नको, कारणमीमांसा शोधा’ हे सुधीर देशपांडे यांचे पत्र वाचले. कोणीही नवीन मुख्यमंत्री वा पंतप्रधान रात्रीतून बदल करू शकणार नाहीत हे अगदी खरे आहे, परंतु व्यवस्थेत बदल करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे तरुण तडफदार अभ्यासू आणि अनुभवीही आहेत. महाराष्ट्राला आदर्श राज्य करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
सरकारी कार्यालयातील लाचखोरी आजही सुरू आहे. शिक्षण मंत्रालयात बदली-बढतीसाठी पैसे घेणे आजही सुरू आहे. भ्रष्टाचाऱ्यांना बढती दिली जात आहे. हळूहळू व्यवस्थेतही बदल होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस प्रामाणिकपणे काम करीत असले तरी भांबावले आहेत. मोठी जबाबदारी अंगावर पडली आहे. आमदारकीनंतर एकदम मुख्यमंत्रिपद मिळाले. ज्येष्ठ मंत्र्यांचा ताप, शिवसेनेला सांभाळत सरकार चालविणे सोपे नाही.
अनुदानित शाळांत नोकरीसाठी २० ते २५ लाख रुपये खंडणी घेतली जाते. सरकार शंभर टक्के वेतन अनुदान देते आणि काही शिक्षण-संस्थाचालक नोकरी देण्यासाठी पैसे खातात. ही खंडणी पद्धती काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. भाजप -शिवसेनेच्या सरकारने ही खंडणीची पद्धत बंद करण्यासाठी अनुदानित शाळांत सरकारतर्फे शिक्षकभरती करण्याचा निर्णय तात्काळ घेतला पाहिजे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून अशा चांगल्या निर्णयाची अपेक्षा आहे.
आर. के. मुधोळकर, नांदेड.