‘लोकप्रभा’, दि. २६.०६.२०१५ मधील ‘व्यवस्थाच नापास’ हा रेश्मा शिवडेकर यांचा लेख वाचून ‘गिरणी’तून पीठ काढल्यासारखी गुणांची खिरापत वाटून मुलांना केवळ ‘साक्षर’ बनवण्याचे शाळा नावाचे कारखाने काढणारी आजची आपली शिक्षण व्यवस्था असल्याची मनाला वेदना देणारी जाणीव झाली. कारण परीक्षा हा एक त्रास आहे, हा विद्यार्थ्यांचा समज आणि विद्यार्थ्यांना शिकवणे हा एक उपचार आहे, हा शिक्षकांचा समज होऊन बसला आहे.
‘शिक्षण हक्क कायद्या’सारख्या गोष्टीची थट्टा करणारी आणि ‘सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापना’च्या (सीसीई) लाभापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणारी आपली शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात शिक्षण मंडळ, शिक्षक, पालक-विद्यार्थी सारेच उदासीन वाटतात, ही खेदाची बाब आहे.
विद्यार्थिसुलभ, मानसिक ताण कमी करणारी शिक्षण पद्धती राबवायची असेल तर परीक्षाच न घेता वरच्या वर्गात ढकलणे, घेतलीच तर फुगवलेल्या गुणांनी त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा वाढवून ठेवणे, शाळेच्या १००% उत्तीर्ण निकालासाठी ‘तडजोडी’ करणे हे पुढची स्वयंसिद्ध आणि चतुरस्र पिढी तयार करायला मोठा अडथळा आहे हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसायचा आग्रह विद्यार्थ्यांना धरणे आणि त्यासाठी खाजगी शिकवण्यांचे पेव फुटणे हीसुद्धा एक फॅशन होत चाललीय. दहावीनंतर आढावा घेण्याऐवजी त्यांचा अभ्यासविषयांतला कल तेव्हाच पाहणे सयुक्तिक ठरेल असे वाटते. त्या दृष्टीने पुण्यातील ‘ज्ञानप्रबोधिनी’चा र्सवकष मूल्यमापन आणि त्याआधारित वैयक्तिकपणे अभ्यासक्रमाचे आरेखन करण्याचे मार्गदर्शन करण्याचा आदर्श समोर ठेवायला शिक्षण संस्थांची हरकत नसावी.
या लेखातून शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मतप्रदर्शनातून एकंदरीत जे समजले ते हे की, आपल्या आजच्या शिक्षण व्यवस्थेत ज्ञानार्जनातून बाणलेली हुशारी मात्र वाढण्याची खात्री देता येत नाही. कारण जिज्ञासा, त्यातून निरीक्षणातून ज्ञानाचे आकलन करण्याचे प्रयत्न, त्या ज्ञानाचे विश्लेषण करण्याची सवय, त्यातून सर्व बाजूंनी विचार करून निष्कर्ष काढण्याचा संयम या गोष्टींना दहावीपर्यंतच्या वर्गात (आठवीपर्यंत परीक्षा नाही म्हणून शिकवण्याची गरज नाही, हा गैरसमज आहेच) बाणवल्या न गेल्याने पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमांना जाऊ पाहणारे विद्यार्थी विज्ञान, अर्थशास्त्र, व्यापारशास्त्र एवढेच नव्हे तर भाषा अन् गणित विषयांतही केवळ स्वबळावरच ज्ञानार्जनाची धडपड करून गुणवत्तेच्या दृष्टीने व्यवहारी जीवनात तरू पाहू शकतात.
थोडक्यात, बारावीनंतरच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरीक्षेपासून ते पुढे व्यवहारी जगात लागणाऱ्या ज्ञानाचा कसदारपणा अंगी बाणवणारी शिक्षण पद्धती राबवण्याचा गांभीर्याने विचार केला जाण्याची आज गरज आहे.
श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे, ई-मेलवरून
ज्ञानार्जनाचा कस वाढवला पाहिजे
‘लोकप्रभा’, दि. २६.०६.२०१५ मधील ‘व्यवस्थाच नापास’ हा रेश्मा शिवडेकर यांचा लेख वाचून ‘गिरणी’तून पीठ काढल्यासारखी गुणांची खिरापत वाटून मुलांना केवळ ‘साक्षर’ बनवण्याचे शाळा नावाचे कारखाने...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-07-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response